
आज-यात दोन घरांना आग.. साडेपाच लाखांचे नुकसान

आजरा येथील सुतार गल्लीत मरगुबाई मंदिराशेजारी भरवस्तीत असणाऱ्या नरेंद्र मनोहर सुतार यांच्या वर्कशॉपसह ,अमर शिवाजी सुतार,हनमंत सुतार या सुतार कुटुंबियांच्या घरांना रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास अचानकपणे आग लागल्याने चांगलाच गोंधळ उडाला. अल्पावधीतच या आगीने रौद्ररूप धारण केल्याने आगीमध्ये सुतार बंधूंच्या मशीनरीसह तयार केलेल्या फर्निचर व घराचे सुमारे साडेपाच लाखांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे . स्थानिक नागरिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला.यासाठी गडहिंग्लज येथील अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.
रात्रीची वेळ असल्यामुळे आग आटोक्यात आणण्यावर अनेक मर्यादा येताना दिसत होत्या. अखेर पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास आग आटोक्यात आणण्यात सर्वांना यश आले. परंतु या आगीमध्ये सुतार कुटुंबियांचे प्रापंचिक साहित्य, व्यवसायाची मशीनरी,तयार फर्निचर यासह इतर साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. घटनास्थळी तातडीने सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील हारूगडे यांनी भेट देऊन माहिती घेतली. सुदैवाने आगीमध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.

आगीचे नेमके कारण समजले नसले तरी शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.






