नामदार मुश्रीफ यांच्या आजरा तालुक्यातील फेर्या वाढल्या…
राष्ट्रवादीचे कार्यकर्ते फुल्ल रिचार्ज
ज्योतिप्रसाद सावंत
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यापासून ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या आजरा तालुक्यातील फेऱ्या वाढल्या आहेत. जिल्हा बँक प्रचारासह निवडणुकीनंतर वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावण्यास सुरुवात केल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. जिल्हा बँकेच्या निवडणूक निकालातून कार्यकर्त्यांना एकत्र आणून आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीसह आजरा साखर कारखान्याच्या निवडणुकांची बीजे रोवली जात असल्याचीही चर्चा आहे. अण्णा भाऊ संस्था समूहाचे प्रमुख व भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक चराटी यांचा सुधीर देसाई यांनी जिल्हा बँक निवडणुकीत धक्कादायक पराभव केल्यानंतर राष्ट्रवादीमध्ये आगामी निवडणुकांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
देसाई यांच्या विजयाने राष्ट्रवादीला आगामी निवडणूका सोप्या जाणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जाते. एकीकडे मंत्री मुश्रीफ यांना राष्ट्रवादीला संपूर्ण ताकद देण्यास सुरुवात केली असताना दुसरीकडे भाजपाच्या कार्यकर्त्यांची मात्र वरिष्ठांच्या दुर्लक्षामुळे चांगलीच अडचण होऊ लागली आहे. भाजपाच्या वरिष्ठ नेते मंडळींनी केलेले दुर्लक्ष चराटी यांच्या पराभवाचे प्रमुख कारण सांगितले जाते. समोर स्थानिक स्वराज्य संस्थांसह तालुक्यातील प्रमुख सहकारी संस्थांच्या निवडणुका असताना भाजपा नेत्यांकडून आजरा तालुक्याकडे होणारे दुर्लक्ष कार्यकर्त्यांना खटकू लागले आहे.
शहरातील विकास कामांकरिता शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, यांच्यासह ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे निधीसाठी भाजपाप्रणीत आघाडीची सत्ता असणाऱ्या नगरपंचायतीच्या कारभाऱ्यांना हात पसरावे लागत आहेत. यापूर्वी ‘टीम सतेज’च्या माध्यमातून गृहराज्यमंत्री पाटील यांनी निधीसाठी हातभार लावला होता. परंतु आता टीम सतेजचे प्रमुख कारभारी जिल्हा बँक निवडणुकीत चराटी यांच्या पाठीशी राहिले असल्याने निधीसाठी पुन्हा पाटील यांच्याकडे जाताना मर्यादा येऊ लागल्या आहेत. वास्तविक भाजपा नेतृत्वाने जिल्ह्यामध्ये कार्यकर्त्यांची उत्कृष्ट फळी असणाऱ्या आजरा तालुक्याला बळ देण्याची गरज आहे. नामदार मुश्रीफ यांचा आजरा तालुक्यातील हस्तक्षेप हा भाजपाच्या दृष्टीने धोक्याचा इशारा समजला जातो.
एकीकडे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते फुल रिचार्ज झाले असताना दुसरीकडे चराटी यांच्या पराभवाने स्थानिक भाजपा कार्यकर्त्यांनी समोर अनेक अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत.

कासार कांडगाव पोटनिवडणुकीत महेश गुरव विजयी
कासारकांडगाव येथील ग्रामपंचायत इतका झालेल्या पोटनिवडणुकीत महेश मधुकर गुरव यांनी मनीषा नारायणराव सरदेसाई यांचा पराभव करत विजय मिळवला. विजयानंतर गुरव यांच्या समर्थकांनी जल्लोष करत आनंदोत्सव साजरा केला.

जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी पुन्हा ना.मुश्रीफ …?
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष निवडीसाठी नूतन संचालकांची बैठक उद्या होत आहे. बँकेच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचीच निवड होईल, असे चित्र आहे.
उद्या गुरुवारी अध्यक्ष निवडीसाठी नूतन संचालक मंडळाची बैठक होत आहे. २१ सदस्यिय संचालक मंडळात ८ संचालक राष्ट्रवादीचे आहेत.
अध्यक्षपदासाठी काँग्रेसचे आमदार पी. एन. पाटील यांचेही नाव चर्चेत आहे. मात्र त्यांच्या नावाविषयी नूतन संचालक मंडळात एक मत होण्याची शक्यता फारशी नाही. त्यामुळेच अध्यक्षपदाची माळ पुन्हा एकदा सर्वानुमते विद्यमान अध्यक्ष व सत्तारूढ पॅनलचे नेते मंत्री हसन मुश्रीफ यांच्याच गळ्यात पडेल, असा राजकीय निरीक्षकांचा अंदाज आहे.

आजरा तालुक्यात जिल्हा परिषदेचे तीनच मतदारसंघ राहणार…
आजरा तालुक्यामध्ये आजरा ग्रामपंचायतीचे नगरपंचायत रूपांतर झाल्यानंतर जिल्हा परिषदेचा एक मतदारसंघ रद्द होणार असल्याची चर्चा गेले काही दिवस सुरू होती. परंतु सध्या सुरू असणाऱ्या हालचाली पाहता तालुक्यामध्ये पुर्विप्रमाणे तीनच मतदार संघ राहणार आहेत. यामध्ये मतदारसंघ रचनेत काही गावे पूर्वीच्या मतदारसंघाऐवजी दुसऱ्या मतदारसंघात येण्याची शक्यता आहे. तालुक्याची सध्याची लोकसंख्या एक लाख २० हजार २६५ इतकी आहे. आजरा शहरातील १७३०९ इतके मतदान नगरपंचायतीकरीता असल्याने उर्वरित एक लाख २ हजार ९५६ मतदारांमध्ये जिल्हा परिषदेचे तीन मतदारसंघ विभागले जाणार आहेत. उत्तर- पूर्व, पूर्व-पश्चिम, पश्चिम- दक्षिण अशा क्रमाने जिल्हा परिषद मतदारसंघाची रचना होणार आहे. ज्या गावांची मतदार संख्या जास्त आहे त्या गावांच्या नावाने नवीन पंचायत समिती मतदारसंघ अस्तित्वात येणार आहेत. या हालचाली पाहता तालुक्यातील एक जिल्हापरिषदेच्या मतदारसंघ रद्द होणार या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.






