विधान परिषद निवडणुकांचे बिगुल वाजले: निवडणुका जंगी होण्यासाठी मतदारांचे देव पाण्यात.
ज्योतिप्रसाद सावंत:-
दिवाळी होऊन आठवडाभराचा कालावधी होतो न होतो तोच विधानपरिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्याने मतदारांची दिवाळीनंतर पुन्हा एकदा दिवाळी होणार आहे. विद्यमान सदस्य गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या विरोधात नेटका उमेदवार उभा राहून निवडणुका जंगी व्हाव्यात यासाठी मतदारांनी देव पाण्यात ठेवले आहेत. २०१५ साली विद्यमान गृहराज्यमंत्री सतेज पाटील व माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यामध्ये विधानपरिषदेकरीता थेट लढत होऊन या निवडणुकीत महाडिक यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. या निवडणुकीनंतर जिल्ह्यांमध्ये अनेक राजकीय उलथापालथी होत गेल्या. यानंतर पाठोपाठ झालेल्या लोकसभा, विधानसभेसह जिल्हा परिषद, गोकुळ दूध संघाच्या निवडणुकांमध्ये महाडिक यांची राजकीय पीछेहाट होतच राहिली. परंतु गतवेळीच्या निवडणुकीमध्ये प्रचंड चुरस निर्माण झाल्याने मतदारांची चंगळ झाली होती. मतदार संघातील जि. प. सदस्य, स्थानिक स्वराज्य संस्थांचे मतदार यांचे या निवडणुकीत उखळ पांढरे झाले होते. या निवडणुकीनंतर नगरसेवक बनण्याचे अनेकांनी स्वप्न पाहण्यामागचे विधानपरिषदेकरीता मतदानाचा असणारा अधिकार हे एक प्रमुख कारण होते. कोरोनामुळे निवडणुका लांबल्या असल्या तरी आपली कारकीर्द संपण्यापूर्वीच विधानपरिषदेच्या निवडणुकीला मतदार म्हणून सामोरे जाता यावे यासाठी अनेक अनेक मतदार अप्रत्यक्षरीत्या आशावादी होते. महाविकास आघाडीकडून गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांची उमेदवारी निश्चित असली तरी विरोधात कोण?हा प्रश्न सध्या महत्त्वाचा आहे. माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या परिवारातील एखादी व्यक्ती उमेदवार म्हणून गृहराज्यमंत्री पाटील यांच्या विरोधात उभी राहिली तरच या निवडणुकीला खऱ्या अर्थाने रंगत येणार आहे. सध्यातरी निवडणूक चुरशीने व्हावी यासाठी मतदार देव पाण्यात ठेवून आहेत हे नक्की.

