mrityunjaymahanews
अन्य

मंगळवार – सातच्या बातम्या

रामतीर्थावर सुरांची दिवाळी… ‘दिवाळी अनप्लग्ड’ ने रसिक मंत्रमुग्ध !

आजरा : प्रतिनिधी

दिवाळी म्हणजे दिव्यांची रोषणाई, फराळाचा सुगंध आणि त्यात भर पडली ती सुरांची! दिवाळी पाडव्याच्या पूर्वसंध्येला रामतीर्थच्या निसर्गरम्य परिसरात स्थानिक कलाकारांचा रंगलेला ‘दिवाळी अनप्लग्ड – म्युझिक, लाईट्स, टुगेदरनेस’ हा सांगीतिक कार्यक्रम रसिकांच्या कायम लक्षात राहील असाच झाला.

या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे आपलीच स्थानिक कलाकार मंडळींनी अतिशय सुंदर पद्धतीने केलेले गीतांचे सादरीकरण.

डॉ. स्नेहा शर्मा यांच्या सुमधुर आवाज, त्यानंतर शर्वरी पतकी – देशपांडे यांनी आपल्या गोड गळ्याने जुन्या-नव्या गाण्यांची अशी मेजवानी दिली की अनेकांनी सोबत गुणगुणायला सुरुवात केली.ज्ञानेश कामत यांच्या गाण्यांनी तरुणाईला भुरळ घातली. केतन सुतार यांच्या गिटारच्या तालावर पाय आपोआप थिरकत होते. आदित्य सुतार आणि वैभव नार्वेकर यांनी आपल्या वेगळ्या शैलीने कार्यक्रमाला रंगत आणली. तर निवेदक साईश गोटेकर यांनी आपल्या बहारदार निवेदनाने रसिकांची मने जिंकली.

एकामागोमाग एक गाणी… कधी भावगीत, कधी हिंदी जुनी गाणी, कोळी गीते, तर कधी दिवाळीच्या आठवणी जागवणारी गाणी… रसिकांनी प्रत्येक गाण्याला भरभरून दाद दिली. शुभम संभाजी पाटील, विकी रॉड्रिग्ज आदींनी या कार्यक्रमाचे नियोजन केले होते.

शहरातील अनेक मान्यवर संगीतप्रेमी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहून मैफिलीचा आस्वाद लुटला.

रामतीर्थवरची ही सांगीतिक दिवाळी आजरेकरांसाठी एक सुंदर आठवण ठरली.

पावसाने दगा दिला…

भाताचा उतारा घटला,

तांदळाचे दर वाढणार !

आजरा : प्रतिनिधी

आजरा तालुका हा भात या पिकासाठी प्रसिद्ध आहे. येथील इंद्रायणी आणि घनसाळ तांदळाला राज्यभरातून मोठी मागणी आहे. सुवासिक, चविष्ट भात म्हणून आजऱ्याच्या तांदळाची ओळख आहे. मात्र यावर्षी पावसाने दगा दिल्याने भात उत्पादक शेतकरी, राईस मिल धारक आणि सर्वसामान्य ग्राहक तिघेही अडचणीत सापडले आहेत.

यावर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला पाऊस वेळेवर झाला, त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहात भाताची लावणी केली. मात्र नंतर पावसाने मोठी उघडीप दिली. भाताला पाणी लागण्याच्या, लोंबे फुटण्याच्या आणि दाणे भरण्याच्या महत्त्वाच्या काळातच पाऊस कमी झाला. काही भागात भाताची रोपे करपली, तर काही भागात दाणे नीट भरलेच नाहीत.

त्यामुळे यावर्षी भाताच्या उताऱ्यात मोठी घट झाली आहे. गेल्या वर्षी एकरी १८ ते २० क्विंटलपर्यंत उतारा मिळणाऱ्या शेतकऱ्यांना यावर्षी १० ते १२ क्विंटलवरच समाधान मानावे लागत आहे. काही ठिकाणी तर अर्ध्यापेक्षाही कमी उत्पादन झाले आहे.

खत, बियाणे, मजुरी, नांगरणी यासाठी शेतकऱ्यांनी हजारो रुपये खर्च केले. पण उत्पादनच कमी झाल्याने खर्चही निघणे कठीण झाले आहे. “पाऊस वेळेवर असता तर चांगला उतारा आला असता. आता कर्ज कसे फेडायचे, हाच प्रश्न आहे,” अशी भावना अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

राईस मिल धारकही अडचणीत

आजरा तालुक्यात अनेक राईस मिल आहेत. इंद्रायणी, घनसाळ भातावरच या मिल चालतात. भाताची आवक घटल्याने मिल मालकांसमोर कच्च्या मालाचा प्रश्न निर्माण झाला आहे. मिल चालवण्यासाठी भातच मिळत नसल्याने अनेक मिल बंद ठेवाव्या लागण्याची शक्यता आहे

तांदळाचे दर वाढणार…

बाजारात भाताची आवक कमी झाली की, तांदळाचे दर वाढणार हे नक्की आहे. सध्या इंद्रायणी तांदळाचा दर ७० ते ८० रुपये किलो आहे. तो येत्या काही दिवसांत ९० ते १०० रुपये किलोपर्यंत जाण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. घनसाळ तांदळाच्याही दरात १० ते १५ रुपयांनी वाढ होण्याची शक्यता आहे. तालुक्यात समाधानकारक उत्पादन झाल्याने भेसळयुक्त घनसाळ मोठ्या प्रमाणावर विक्रीला येण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

ट्रॅक्टर की रेल्वे…?

एका ट्रॅक्टरला चार ट्रॉल्या जोडून ऊस वाहतूक

आजरा : प्रतिनिधी

आजरा परिसरात ऊस हंगाम सुरू झाल्यापासून ऊस वाहतुकीसाठी एका ट्रॅक्टरला चार-चार ट्रॉल्या जोडल्या जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत.

आजरा शहरातील मुख्य रस्त्यावर ट्रॅक्टरला चार ट्रॉल्या जोडून ऊस वाहतूक केली जाताना  रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण होताना दिसतो . दुचाकीस्वार आणि इतर वाहनचालकांना रस्त्यावरून जाताना अडचण होताना दिसते.

नियमाप्रमाणे एका ट्रॅक्टरला मर्यादित ट्रॉल्या जोडणे अपेक्षित असताना अधिक ट्रॉल्या जोडून वाहतूक केली जात आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी होण्याबरोबरच अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.

या प्रकाराकडे वाहतूक पोलिसांनी लक्ष देऊन कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

श्री. दुर्गामाता दुध संस्था देऊळवाडीकडून दुध उत्पादकांना दिवाळी
बोनस व बक्षीस वाटप

आजरा: प्रतिनिधी
श्री. दुर्गामाता दुध संस्था मर्या, देऊळवाडी तर्फे
संस्थेकडे चालु आर्थिक वर्षात दुध पुरवठा केलेल्या उत्पादकांना एकूण खरेदी रक्कमेवर ५ टक्के बोनस व जादा दुध पुरवठा करणाऱ्या पाच उत्पादकांचा सत्कार करणेत आला.

प्रथम क्रमांक -कु. प्रियंका जोतीबा खोत, दुसरा क्रमांक- शारुबाई नागोजी घेवडे, तृतीय क्रमांक-.सुमित्रा तुळसाप्पा पोवार, चौथा क्रमांक- सौ. वर्षा ज्ञानेश्वर सावंत, पाचवा क्रमांक – सावित्री बंडू कदम यांनी मिळवला.

कार्यक्रमाला संस्थेचे संस्थापक श्री. सुरेश सावंत, संस्थापक अध्यक्षा सौ. राजश्री सावंत, व्हा. चेअरमन सौ. रंजना खोत, सल्लागार, तुळसाप्पा पोवार, नागोजी घेवड, जोतीबा, खोत, हरिष खोत, धोंडिबा सावंत, शिवाजी सावंत, अर्जुन पोवार, गणेश कानोलकर सर्व संचालीका व सभासद हजर होते

अभिनंदनीय…

आजरा : प्रतिनिधी 

आजरा येथील ज्येष्ठ डॉक्टर, इंडियन मेडिकल असोसिएशनचे तालुकाध्यक्ष डॉ. दीपक सातोसकर यांना इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र राज्य या संघटनेने त्यांच्या समर्पित कार्याची दखल घेत त्यांची २०२५-२६ सालाकरिता ‘ प्रेसिडेंट ॲप्रिसिएशन अवॉर्ड’ साठी निवड केली आहे.

नागपूर येथे १३ नोव्हेंबर रोजी सदर अवॉर्डचे वितरण होणार आहे. या गौरवाबद्दल त्यांचे विशेष कौतुक होत आहे.

निधन वार्ता 

सौ.वसुधा वाणी-म्हापसेकर

शिवाजीनगर, आजरा येथील दिलीप मुकुंद म्हापसेकर यांची कन्या सौ. वसुधा परेश वाणी -म्हापसेकर यांचे अल्पशा आजाराने हडपसर, पुणे येथे निधन झाले. निधन समिती त्यांची वय २९ वर्षे होते.

त्यांच्या पश्चात पती, सासू, सासरे,आई, वडील, भाऊ व मुलगी असा परिवार आहे.

संभाजी सुतार

मडीलगे ता. आजरा येथे बैलगाड्या बनवण्यात विशेष हातखंडा असणारे संभाजी धोंडीबा सुतार ( वय ६७ वर्षे ) यांचे हृदय विकाराने निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

तुळसाबाई पुंडपळ

आरदाळ ता.आजरा येथील तुळसाबाई नाना पुंडपळ ( वय८५ वर्षे ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी नातवंडे असा परिवार आहे
रक्षाविसर्जन गुरुवारी सकाळी ९ वाजता आहे.

आज डोक्यावरची आरती…

दीपावली पाडव्यानिमित्त आज रवळनाथ मंदिर आजरा येथे साडेबारा वाजता डोक्यावरच्या आरतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. जागर आरती नंतर पुन्हा एक वेळ शहरवासीयांना डोक्यावरच्या आरतीचा थरार अनुभवावयास मिळणार आहे.

आजचे पंचांग

आजचे पंचांग
दिनांक : १० नोव्हेंबर २०२६
वार : मंगळवार
माह (अमावस्यांत) : कार्तिक
माह (पूर्णिमांत) : कार्तिक
ऋतु : हेमंत
आयन : दक्षिणायन
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथी : प्रथम तिथी (दुपारी ०१.५९ पर्यंत) त्यानंतर द्वितीया तिथी
नक्षत्र : विशाखा नक्षत्र (सकाळी ०९.१९ पर्यंत) त्यानंतर अनुराधा नक्षत्र
योग : शोभन योग (११ नोव्हेंबर पहाटे ०३.०९ पर्यंत) त्यानंतर अतिगण्ड योग
करण : भाव करण (दुपारी ०१.५९ पर्यंत) त्यानंतर बलवा करण
चंद्र राशी : वृश्चिक राशी
सूर्य राशी : तूळ राशी
अशुभ मुहूर्त :
राहु काळ : दुपारी ०३.११ ते सायंकाळी ०४.३६ पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.०० ते दुपारी १२.४५
सूर्योदय : सकाळी ०६.४४
सूर्यास्त : सायंकाळी ०६.००
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

गुरुवार – सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!