
बुधवार दि.११ नोव्हेंबर २०२६

सासूच वाट्याला आली…
मंत्री मुश्रीफ यांच्या राजकीय खेळीने आम.शिवाजीभाऊंची झाली गोची

आजरा : ज्योतिप्रसाद सावंत
गोकुळच्या निवडणुकीपूर्वी आमदार शिवाजीभाऊ पाटील यांनी मंत्री मुश्रीफ यांच्या विरोधात केलेली थेट विधाने त्यानंतर मुश्रीफ यांनी आमदार शिवाजीभाऊ व आपल्यात दिल जमाई झाल्याचे जाहीर केले होते .निवडणुकीच्या निकालानंतर मंत्री मुश्रीफ यांना पुन्हा सत्तेसाठी प्रयत्न सुरू केल्याने आम.शिवाजीभाऊंनी आपणाला हे पसंत नसल्याचे सांगत नाराजी व्यक्त केली होती. ज्यांचे बहुमत आहे त्यांना सत्ता द्या… असे उघडपणे त्यांनी सांगितले होते पण मुश्रीफ हे त्यांच्यापेक्षा काकणभर वरचढ ठरत शिवाजी भाऊंच्या बोलण्याची नेमकी खोच लक्षात घेऊन त्यांनी शिवाजी पाटील यांचे कट्टर विरोधक माजी आमदार राजेश पाटील यांची राष्ट्रवादीतून अध्यक्षपदाकरिता शिफारस केलीच पण अध्यक्षपद पदरातही पाडून घेतले. यामुळे एका दगडात अनेक पक्षी मारण्याचे काम मंत्री मुश्रीफ यांनी केले आहे.
जे शिवाजीभाऊ बोलत होते त्यामागे गोकुळ मध्ये महायुतीची सत्ता आलीच तर राजेश पाटील यांना अध्यक्षपदाची संधी मिळणार याची त्यांना चांगलीच जाण होती म्हणूनच त्यांनी सत्ता नसली तरी चालेल पण हा खेळ थांबवा असे उघडपणे सांगितले होते. आता मुश्रीफ यांनी शिवाजीभाऊ वर कोटी करत राजेश पाटलांना अध्यक्षपदाची संधी देऊन एक प्रकारे पुढच्या विधानसभा निवडणुकीसाठी गोकुळच्या माध्यमातून मतदार संघाची मशागत करण्याची संधीही दिली आहे असे म्हणण्यास हरकत नाही.
इथून पुढे चंदगड विधानसभा मतदारसंघाच्या राजकारणात मोठ्या घडामोडी होणार हे देखील आता स्पष्ट होऊ लागले आहे. राजेश पाटील यांचे नाव पुढे आणल्याने कागल मधील मंडलिक परिवाराच्या विरोधाची धार थोडी बोथट करण्याचाही प्रयत्न मुश्रीफ यांनी केलेला आहे.
एकंदर गोकुळ अध्यक्षपद निवडीच्या माध्यमातून मंत्री मुश्रीफ यांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले आहेत हे नक्की. शिवाजी भाऊंची अवस्था मात्र तूर्तास सासूच वाट्याला आल्यासारखी झाली आहे. पण यामुळे शिवाजीभाऊंची राजकीय पकड हलक्यात घेणे चुकीचे ठरेल.

गोकुळच्या अध्यक्षपदी राजेश पाटील

कोल्हापूर : प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ ( गोकुळ ) च्या अध्यक्षपदी गेल्या आठवडाभराच्या नाट्यपूर्ण घडामोडीनंतर माजी आमदार व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते राजेश पाटील यांची १६ विरुद्ध १३ मतांनी निवड झाली.
पाटील यांच्या या निवडीने चंदगडला प्रथमच गोकुळचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे.

कोवाडे येथे घरफोडी, ५६ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल चोरीला
आजरा : प्रतिनिधी
कोवाडे ता. आजरा येथील मारुती आप्पा चौगुले यांच्या राहत्या घरी १० नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी १ ते सायंकाळी ४ या वेळेत अज्ञात चोरट्याने घरफोडी केली.
चौगुले यांच्या घराच्या वरील बाजूने कौले काढून घरात प्रवेश करून खालील मजल्यावरील तिजोरी उघडून त्यातील साहित्य विस्कटले. तसेच दुसऱ्या मजल्यावरील लाकडी पेटीचे कुलूप तोडून पेटीत सॅकमध्ये ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली.
चोरीस गेलेल्या मुद्देमालामध्ये ३ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, १ ग्रॅम वजनाचे बदाम आकाराचे सोन्याचे लॉकेट, अंदाजे दीड तोळे वजनाचे चांदीचे लहान मुलांचे पायातील एक पैंजण जोड, अंदाजे ३ तोळे वजनाचे चांदीचे लहान मुलांचे हातातील बिंदलीचे तीन जोड, अंदाजे २ तोळे वजनाचे चांदीचे लहान मुलांचे पायातील वाळे एक जोड आणि १७ हजार रुपये रोख रक्कम यांचा समावेश आहे. या सर्व मुद्देमालाची एकूण किंमत ५६ हजार ७५० रुपये इतकी आहे.
आजरा पोलीस पुढील तपास करीत आहेत.


होन्याळीत शॉर्टसर्किटने ऊस जळाला…
चार शेतकऱ्यांचे नुकसान
उत्तूर : प्रतिनिधी
होन्याळी येथे शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत चार शेतकऱ्यांचा अंदाजे तीन ते चार लोड ऊस जळून नुकसान झाले. सुमारे तीन एकर क्षेत्रातील ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. दोन विद्युत तारा जवळ असल्याने त्यावर पक्षी बसताच तारा एकमेकांच्या संपर्कात आल्या. त्यातून ठिणग्या पडून उसाला आग लागल्याची माहिती मिळाली.
यामध्ये रविंद्र सरोळकर, दौलती सरोळकर, अंजूबाई सरोळकर आणि शारदा सरोळकर या शेतकऱ्यांचे नुकसान झाले. हा ऊस वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्याच्या उत्तूर सेंटरअंतर्गत येत होता.घटनेची माहिती मिळताच उत्तूर सेंटर ऑफिसमधील कर्मचाऱ्यांनी जळीत ऊस प्लॉटला भेट देऊन तातडीने तोडणीची यंत्रणा राबवली. जळालेल्या उसाची तोडणी सुरू केल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला.ऊस तोडणीची यंत्रणा तातडीने राबविण्यासाठी पी. व्ही. कांबळे, पी. डी. उतूरकर, अनिस बागवान, बी. के. इंगळे, व्ही. जे. शिंत्रे आणि पी. एस. कांबळे यांनी विशेष प्रयत्न केले.


स्वामी विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्थेत
४ कोटी ३८ लाख ठेव संकलन

आजरा : प्रतिनिधी
विश्वास, पारदर्शकता आणि सहाकाराच्या मूल्यांची जपणूक करीत गेली ५४ वर्षे कार्यरत असलेल्या स्वामी विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्था मर्या., आजराने संस्थेने एका दिवसात तब्बल रू, ४ कोटी ३८ लाख इतक्या ठेर्वीचे संकलन केले आहे. हा विक्रमी प्रतिसाद म्हणजे केवळ आर्थिक यश नसून संस्थेने वर्षानुवर्षे जपलेल्या विश्वासाच्या नात्याची आणि सभासदांच्या आपुलकीची पावतीच आहे.
सहकार क्षेत्रात आर्थिक व्यवहारांपेक्षा विश्वासाचे नाते अधिक महत्वाचे असते. हाच विश्वास केंद्रस्थानी ठेवून संस्थेने सभासदाभिमुख कारभार, आर्थिक शिस्त, पारदर्शक व्यवहार आणि आधुनिक सेवांचा समन्वय साधला आहे. संस्थेच्या प्रगतीत प्रत्येक सभासदाचा सहभाग महत्वाचा असून सभासदांनी दाखविलेला विश्वास हीच संस्थेची खरी संपत्ती आहे. दीपावली पाडव्याच्या शुभमुहूर्तावर मिळालेला हा उत्स्फूर्त प्रतिसाद संस्थेच्या आजवरच्या कार्याची आणि विश्वासार्हतेची साक्ष देणारा आहे. असे संस्थेचे चेअरमन श्री दयानंद सिध्दाप्पा भुसारी यांनी सांगितले.
संस्थेकडे वसुल भागभांडवल रू. ४ कोटी ६१ लाख, ठेवी रू. २०४ कोटी ५१ लाख, कर्जवाटप रू. १६३ कोटी २६ लाख, बँक गुंतवणूक रू. ६४ कोटी ५२ लाख व ऑडिट वर्ग सतत ‘अ’ असून एकूण ९ शाखा कार्यरत आहेत. सर्व ठिकाणी संस्थेच्या स्वमालकीच्या इमारती आहेत. संस्थेच्या सर्व शाखांकडे ऑनलाईन वीज बिल, फोनबिल, डीटीएच रिचार्ज, मनिट्रान्स्फर करणेची सोय, एनईएफटी, आरटीजीएस, क्यू आर कोड, आयएमपीएस, एसएमएस सुविधा, सोनेतारण व इतर कर्जाची सोय, इ. अनेक सुविधा सभासदांकरिता उपलब्ध करण्यात आल्या आहेत, संस्थेच्या सर्व शाखा संगणकीकृत आहेत. आधुनिक तंत्रज्ञान आणि सहकारातील विश्वासार्हता यांचा समन्वय साधत संस्था सभासद, खातेदार व ग्राहकांना अधिक सुलभ, जलद व पारदर्शक सेवा देत आहे. संस्थेने आपल्या उल्लेखनीय कार्यातून राज्यपातळीवरील विविध पुरस्कारही प्राप्त केले आहेत.
संस्थेचे चेअरमन श्री, दयानंद सिध्दाप्पा भुसारी, व्हा. चेअरमन श्री सुधीर बाबुराव कुंभार, मुख्यकार्यकारी अधिकारी श्री शिवानंद श्रीकांत घुगरे, सरव्यवस्थापक श्री. सुरेश बाळू सावंत व संचालक मंडळ यांनी सर्वांचे आभार मानले.
जनता सहकारी गृहतारण संस्थेची दीपावली पाडव्याला ७ शाखांमध्ये ३ कोटी ४ लाख १५ हजारांचे ठेवी संकलन

आजरा : प्रतिनिधी
दीपावली पाडव्याच्या शुभमुहूर्तावर जनता सहकारी गृहतारण संस्था मर्यादित, आजरा या अग्रगण्य संस्थेने आर्थिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करत एकाच दिवसात तब्बल ३ कोटी ४ लाख १५ हजार रुपयांचे विक्रमी ठेवी संकलन केले आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष श्री. मारुती मोरे यांनी दिली.
दिवाळी पाडव्यानिमित्त संस्थेच्या एकूण ७ शाखांमध्ये ग्राहकांनी व ठेवीदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यामध्ये आजरा, गडहिंग्लज, कोल्हापूर, गारगोटी, इचलकरंजी, सांगली आणि पाटणे फाटा (ता. चंदगड) या सर्व शाखांमधून मोठ्या प्रमाणावर ठेवी जमा झाल्या आहेत. संस्थेच्या या उल्लेखनीय यशाबद्दल बोलताना अध्यक्ष श्री. मारुती मोरे म्हणाले, “संस्थेच्या संचालक मंडळाचे मार्गदर्शन, मुख्य कार्यालय संचालक मंडळ, सर्व शाखांचे चेअरमन, व्हा. चेअरमन व संचालक मंडळ तसेच अधिकारी आणि कर्मचारी वर्ग यांनी घेतलेली मेहनत यामुळेच हे यश शक्य झाले आहे.” त्यांनी या सर्व सहकाऱ्यांचे विशेष अभिनंदन केले असून, संस्थेवर विश्वास ठेवून ठेवी ठेवणाऱ्या सर्व ठेवीदारांचे आभार व्यक्त केले.
ग्राहकांच्या विश्वासावर आणि माणस जोडणारी संस्था म्हणून ओळख असणारी संस्था यापुढील काळातही असेच उत्तम वित्तीय सेवा देत राहील, असा विश्वास यानिमित्ताने व्यक्त करण्यात आला आहे.
दीपावली पाडव्याच्या शुभमुहूर्तावर आजरा अर्बन चा रु. १२०० कोटींचा ठेवीचा टप्पा पूर्ण

आजरा : प्रतिनिधी
दि आजरा अर्बन को-ऑप. बँक लि., आजरा (मल्टी-स्टेट) या बँकेकडे दीपावली पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर एकाच दिवसात तब्बल ९ कोटी ३७ लाख रुपयांच्या ठेवी जमा झाल्या असून, १५८७ नवीन खाती उघडण्यात आली आहेत. सभासद, ठेवीदार, ग्राहक व हितचिंतक यांनी बँकेवर दाखविलेल्या दृढ विश्वासमुळे बँकेकडे मोठ्या प्रमाणात ठेवी ठेवल्या आहेत.
सध्या बँकेकडे एकूण १२०१ कोटी रूपयाच्या ठेवी जमा झाल्या आहेत. त्याबाबत बँकेचे चेअरमन व अण्णा भाऊ संस्था समुहाचे प्रमुख मा. श्री. अशोकअण्णा चराटीसो व मा. संचालक मंडळ यांनी सर्व ठेवीदार, सभासद व हितचिंतक यांचे आभार मानले असून सर्वांना बँकेच्या वतीने दीपावली पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या.
बँकेने केंद्र शासनाची PMFME (सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग) व PMEGP तसेच राज्य शासनाची अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना या केंद्र आणि राज्य शासनाच्या अनुदान योजना तसेच माफक व्याजदरात अॅपल कर्ज योजना व पर्यटकांसाठी हमसफर कर्ज योजना राबविल्या आहेत. बँकेमध्ये आधुनिक अशा FCO कार्य प्रणालीच्या माध्यमातून बँकेत सेव्हिंग खाती उघडण्याची सुविधा आहे. मोबाईल बँकिंग, IOS application, Google Pay, PhonePe, Paytm, QR Code तसेच Whatsapp Banking च्या माध्यमातून सर्व ग्राहकांना आपल्या बँकेतील त्यांच्या सर्व खात्यांचे statement पाहणे, चेक बुक रिक्वेस्ट देणे, खाते ब्लॉक करणे ई-पासबूक इ. सुविधा उपलब्ध आहेत. या सुविधांचा लाभ ग्राहकांनी घ्यावा असे मत बँकेचे चेअरमन व अण्णा भाऊ संस्था समूह प्रमुख श्री. अशोक चराटी यांनी व्यक्त केले.
जनता बँक आजराकडे एका दिवसात तब्बल रु. १८ कोटी २८ लाखाच्या ठेवी जमा

आजरा : प्रतिनिधी
जनता सहकारी बँक लि., आजरा या बँकेकडे दिपावली पाडव्यानिमित्य एका दिवसात तब्बल रु. १८ कोटी २८ लाखाच्या ठेवी जमा झाल्या आहेत.
बँकेने आज पर्यंत अनेक यशाची शिखरे पार करत जिल्हयात तसेच देशात सर्वोकृष्ट बैंक, बेस्ट सीईओ, बेस्ट चेअरमन असे अनेक सतत १० वर्ष पुरस्कार प्राप्त केले आहेत. बँकेने घरबांधणी करिता सावली गृहकर्ज योजना, कार लोन ९% व्याजदराने सुरू केली आहे. इतर सर्व वाहन तारण कर्जे १०% तसेच नव्याने सुरू करणेत आलेली सोलार कर्ज योजना १०.००% व्याजदराने कमीत कमी कागदपत्र, कोणतेही हिडन चार्जेस न घेता सर्व शाखांमधून सुरू करणेत आल्या आहेत.
बँकेने सर्व अद्यावत टेक्नॉलोजी सर्व्हस चालू केली असून बँकेने यु.पी.आय., गुगल पे, फोन पे, क्यु आर कोड, भिम इ. सेवा चालू करुन ग्राहकांना त्वरीत पेर्मेन्ट करणेची सुविधा उपलब्ध करुन दिलेली आहे. बँकेकडे रू. ५१४ कोटी ठेवी व रू. ३४१ कोटी कर्जे, एकूण बँकेचा मिश्र व्यवसाय ८५५ कोटी इतका आहे. बँकेचा ऑडिट वर्ग सतत “अ” आहे. तसेच रू. ४०.०६ कोटी इतके स्वभांडवल असून बँकेने एकूण रू. २१० कोटी गुंतवणूक असून एन.पी.ए. ०% राखून बँकेने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा ECBA हा निकष पूर्ण केला आहे. बँकेला कोल्हापूर, सांगली, सिंधुदूर्ग, सातारा, पुणे याबरोबर ठाणे, मुंबई व मुंबई उपनगरे कार्यक्षेत्र मंजूर झाले आहे. बँकेकडे सर्व प्रकारच्या अद्ययावत सोई-सुविधा उपलब्ध आहेत.
बँकेने आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळ योजनेअंतर्गत तरुण उद्योजकांना बिनव्याजी कर्ज, महाराष्ट्र राज्य इतर मागास वर्गीय वित्त विकास महामंडळ यांची परतावा कर्ज योजना, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ व्याज परतावा कर्ज योजना व पंतप्रधान सुक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग (PMFE) मार्फत दिल्या जाणाऱ्या रु. १० लाखापर्यतची सबसिडीची कर्ज देवून तरुण उद्योजकांना उभारी देण्याचे काम बँक करत आहे. तसेच बँकेने ग्राहकाभिमुख सेवा देण्याचा संकल्प केला आहे. असे बँकेचे चेअरमन श्री. मुकुंददादा देसाई व बँकेचे सीईओ श्री. एम. बी. पाटील यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. . यावेळी बँकेचे सर्व संचालक व अधिकारी वर्ग उपस्थित होता.
जे. पी. नाईक पतसंस्थेची दिवाळी पाडव्याला २ कोटी ४९ लाखांची ठेव जमा

आजरा : प्रतिनिधी
शिक्षणतपस्वी जे. पी. नाईक नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, आजरा या संस्थेने दिवाळी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर एकाच दिवसात तब्बल २ कोटी ४९ लाख रुपयांच्या ठेवी संकलित करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
संस्थेवरील सभासदांचा वाढता विश्वास, पारदर्शक कारभार, आकर्षक ठेव योजना आणि तत्पर ग्राहकसेवा यामुळे संस्थेची आर्थिक प्रगती सातत्याने होत आहे. मुख्य कार्यालयासह दोन्ही शाखांतील कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेऊन ही कामगिरी साध्य केली.


आजरा नगरपंचायत प्रभाग क्र. १५ मध्ये भव्य रांगोळी स्पर्धा उत्साहात संपन्न; लता कुंभार ठरल्या प्रथम क्रमांकाच्या मानकरी…

आजरा (प्रतिनिधी):
दिवाळी सणाच्या निमित्ताने आजरा नगरपंचायत प्रभाग क्र. १५ (‘नारी शक्ती’ वॉर्ड) मध्ये नगरसेवक श्री. परशुराम बामणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेत सौ. लता प्रसाद कुंभार यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला आयोजक नगरसेवक श्री. परशुराम बामणे यांनी प्रास्ताविक करताना स्पर्धेच्या आयोजनामागची पार्श्वभूमी विशद केली व प्रभागातील महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आणि पारंपरिक सणांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी अशा सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. प्रास्ताविकानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अनुक्रमे बक्षीस वितरण करण्यात आले. स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचे मानाचे पारितोषिक प्रमुख पाहुण्या नगरसेविका डॉ. स्मिता कुंभार यांच्या हस्ते सौ. लता प्रसाद कुंभार यांना प्रदान करण्यात आले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे:
प्रथम क्रमांक: सौ./कु. लता प्रसाद कुंभार
द्वितीय क्रमांक: सौ./कु. समीक्षा सावरतकर
तृतीय क्रमांक: सौ./कु. पल्लवी कुंभार
चतुर्थ क्रमांक: सौ./कु. प्रगती सुतार
पाचवा क्रमांक: सौ./कु. विशाखा सोनार
विजेत्यांना आकर्षक चषक व भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले, तसेच स्पर्धेत सहभाग घेतलेल्या इतर सर्व महिला स्पर्धकांना उत्तेजनार्थ बक्षिसे देऊन त्यांचा उत्साह वाढवण्यात आला. स्पर्धेचे अत्यंत काटेकोर, निःपक्ष व पारदर्शक परीक्षण श्री. बाळासाहेब धोंडीबा रक्ताडे व श्री. के. ए. दावणे यांनी केले.
रवळनाथ कॉलनीचे अध्यक्ष अतुल पाटील यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांच्या विशेष सहकार्याने आणि चोख नियोजनामुळे हा संपूर्ण कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध व देखण्या स्वरूपात पार पडला.
या कार्यक्रमास नगरसेवक परेश पोतदार, बाळ केसरकर, श्री. पांडुरंग सावरकर, अनिल पाटील, मेजर जोतिबा आजगेकर, मेजर दिनकर जाधव, आयडीयल कॉलनीचे अध्यक्ष, श्री. धडाम, शिवाजी खरुडे, रवींद्र कांबळे यांच्यासह परिसरातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


फोटो क्लिक…

नवरात्रीनिमित्त होणाऱ्या जागर आरती नंतर आजरा शहरवासीयांना दीपावली पाडव्यानिमित्त पुन्हा एक वेळ श्री रवळनाथ मंदिर परिसरात डोक्यावरील आरतीचा थरार अनुभवावयास मिळाला.


निधन वार्ता
सूर्यकांत दोरुगडे

सोहाळे येथील सूर्यकांत पांडुरंग दोरुगडे ( वय ५६ वर्षे ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन भाऊ असा परिवार आहे.


आजचे पंचांग
दिनांक : 11 नोव्हेंबर 2026
वार : बुधवार
माह (अमावस्यांत) : कार्तिक
माह (पूर्णिमांत) : कार्तिक
ऋतु : हेमंत
आयन : दक्षिणायन
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथी : द्वितीया तिथी (दुपारी 03:53 पर्यंत) त्यानंतर तृतीया तिथी
नक्षत्र : अनुराधा नक्षत्र (सकाळी 11:37 पर्यंत) त्यानंतर ज्येष्ठा नक्षत्र
योग : अतिगण्ड योग (12 नोव्हेंबर पहाटे 03:40 पर्यंत) त्यानंतर सुकर्मा योग
करण : कौलव करण (दुपारी 03:53 पर्यंत) त्यानंतर तैतुला करण
चंद्र राशी : वृश्चिक राशी
सूर्य राशी : तूळ राशी
अशुभ मुहूर्त :
राहु काळ : दुपारी 12:22 ते दुपारी 01:47 पर्यंत
सूर्योदय : सकाळी 06:44
सूर्यास्त : सायंकाळी 06:00
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: 2083 विक्रम संवत
शक संवत: 1948 शक संवत

