सोमवार दि.३ नोव्हेंबर २०२६


उत्तूर येथे सोनार असल्याचे सांगून फसवणूक

उत्तूर : प्रतिनिधी
सोनार असल्याची बतावणी करून खोटे सोने देऊन खऱ्या सोन्याची फसवणूक केल्याची घटना उत्तूर, ता. आजरा येथे घडली आहे. याबाबत आजरा पोलीस ठाण्यात तीन अज्ञातांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मीबाई गणपती निंऊगरे (वय ७० वर्षे, व्यवसाय शेती, रा. अरळगुंडी, ता. भुदरगड, जिल्हा कोल्हापूर) यांना १७ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास उत्तूर येथील हिंलजकर यांच्या घरासमोर एक अनोळखी महिला व दोन अनोळखी पुरुष यांनी बोलावून घेतले. त्यातील एकाने फिर्यादीच्या हातातील पुतळ्या पाहून मी सोनार आहे, हे दागिने जुने व खरे असून याची किंमत १५ लाख रुपये आहे, असे सांगितले. त्यानंतर त्या महिलेने आपल्या हातातील पुतळ्या कपड्यात बांधून फिर्यादीच्या हातात दिल्या. त्याबदल्यात फिर्यादी यांच्याकडून गळ्यातील बोरमाळ, कानातील कर्णफुले व कानातील पट्ट्या तपासण्यासाठी मागितल्या.
त्या पुतळ्या गोड बोलत खऱ्या असल्याचे सांगितल्याने फिर्यादी यांनी आपल्या गळ्यातील बोरमाळ काढून दिली व आरोपी महिलेने त्यांची कर्णफुले व कानातील पट्ट्या काढून घेतल्या व परत दिल्या. नंतर घरी आल्यावर मुलगी सरीता हिने त्या पुतळ्या खोट्या असल्याचे सांगितले. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने फिर्यादी यांनी फिर्याद दिली.
चोरीस गेलेल्या मालामध्ये ३२०००/- रुपये किमतीची ४ ग्रॅम वजनाची एक सोन्याची बोरमाळ, १२,००० रुपये किमतीची १.५ ग्रॅम वजनाची दोन कर्णफुले आणि १२०००/- रुपये किमतीची १.५ ग्रॅम वजनाची कानातील दोन पट्टया असा एकूण ५६००० रुपयांचा ऐवज आहे.

देशी दारूच्या बाटलीवर छापील किंमतीपेक्षा जास्त पैसे घेतले जात असल्याबद्दल उत्पादन शुल्ककडे तक्रार

आजरा : प्रतिनिधी
देशी दारू विक्रेते बाटलीवर छापलेल्या किंमतीपेक्षा जास्त रक्कम ग्राहकांकडून घेत असल्याबाबत ग्राहक पंचायत महाराष्ट्रच्या वतीने राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, अनेक दुकानदार ८० रुपये किंमतीच्या बाटलीला ९० रुपये तर ४० रुपयाच्या बाटलीला ४५ रुपये घेत आहेत. व्यसन करू नये यासाठी आम्ही प्रबोधन करणारी मंडळी आहोत. परंतु दिवसभर अंगमेहनतीचे काम करणारे कष्टकरी, शेतमजूर, गवंडी, कामगार, हमाल असे अनेक जण देशी दारू घेतात. त्यांच्याकडून प्रत्येक बाटलीमागे १० रुपये जास्त घेणे म्हणजे गरिब कुटुंबाच्या घरातील १० रुपये चुकीच्या मार्गाने घेणे होय.
या संदर्भात काही ग्राहकांनी तक्रार केल्याने जादा पैसे घेत असणाऱ्यांची खात्री करून कारवाई करावी, अशी मागणी ग्राहक पंचायतीने राज्य उत्पादन शुल्क गडहिंग्लजचे निरीक्षक यांच्याकडे केली आहे.
याबाबतच्या निवेदनावर शिवाजी गुरव, बस्तू बारदेस्कर गडहिंग्लज, महादेव सुतार,आजरा, अनिल कलकुटगी, तानाजी कुराडे गडहिंग्लज, रोहिणी चौगुले गडहिंग्लज आदींच्या सह्या आहेत.

एक लाख दहा हजार रुपयांची रक्कम गेली कुठे ?
उपसरपंच प्रशांत कोटकर यांच्यासह १६ जणांची जिल्हा परिषदेकडे तक्रार
आजरा : प्रतिनिधी
हाजगोळी खुर्द (ता. आजरा) येथील ग्रामपंचायतीच्या १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून स्वच्छतेच्या कामासाठी खर्च करण्यात आलेल्या १ लाख १० हजार रुपयांच्या रकमेची चौकशी करण्याची मागणी उपसरपंच प्रशांत तुकाराम कोटकर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे लेखी निवेदन सादर करण्यात आले आहे.
निवेदनानुसार, ग्रामसेवक एस. के. येळणे यांनी ग्रामपंचायतीच्या १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून स्वच्छतेच्या कामासाठी १ लाख १० हजार रुपये खर्च केल्याचे दिसून येत आहे. मात्र हा खर्ग्राच मपंचायतीच्या कोणत्याही मासिक सभेत मंजूर करण्यात आलेला नसल्याचा तसेच ग्रामपंचायतीच्या खर्चाच्या नोंदीत त्याचा उल्लेख नसल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे.
या प्रकरणाची गटविकास अधिकारी व पंचायत समिती आजरा यांच्यामार्फत चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
सदर रक्कम कोणाच्या नावाने काढण्यात आली, तिचा प्रत्यक्ष विनियोग कसा झाला आणि खर्चाची नोंद ग्रामपंचायतीच्या अभिलेखात का नाही, याबाबत चौकशी करून संबंधितांकडून व्याजासह रक्कम वसूल करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
निवेदनावर उपसरपंच प्रशांत तुकाराम कोटकर, सौ. मनिषा अरुण कांबळे, सौ. लता हणमंत जाधव, सौ. शुभांगी निलेश होरंबळे, श्री. आदित्य आनंदा कातकर, बाळकृष्ण राजाराम कांबळे, बाळासो गणपती तांबेकर, रोहन सुधाकर जाधव आदींच्या सहया आहेत.

भादवण येथे दूध उत्पादकांना गोड्या तेलाचे किट वाटप

भादवण : प्रतिनिधी
भादवण ता.आजरा येथील मा . बाळासाहेब ठाकरे सह दूध संस्थेच्या वतीने दूध उत्पदकांना दिपावली निमित्त गोड्या तेलाची कीट वाटप करण्यात आले.
गोकूळ निवडणूकीच्या माध्यमातून दूध संस्थेला आर्थिक लाभ झाला होता तो सर्व लाभ सभासदाना आणि .आदर्श विद्या मंदीरच्या .शालेय मुलांना कोजागिरी पोर्णीमेनिमित्य दूध देऊन त्याच बरोबर घरगुती दूध खरेदी करणारे खरेदीदार यांना पण एक दिवस रोज लागणारे दूध मोफत देऊन खर्च करणेत आले.
संस्थापक अध्यक्ष शिवसेना तालुका प्रमुख श्री. संजय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व्हा चेअरमण अर्जुन कुंभार यांच्या हस्ते श्रीमती बेबीताई पाटील यांना तेलाचे कीट देऊन वाटप शुभारंभ करणेत आला. याप्रसंगी संजय देसाई,बाळासाहेब गाडे, चंद्रकांत कोलते, शिवाजी गोईलकर, संभाजी पाटील यांच्यासह संचालक व सभासद उपस्थीत होते.

मुंबईत मोफत घरे देई पर्यंतदरमहा घरांचे भाडे द्या ; काॅ. अतूल दिघे.

आजरा : प्रतिनिधी
मुंबईत गिरणी कामगारांना मोफत घरे मिळाली पाहिजे, या मागणीसाठी गेली एकवीस वर्षे सातत्याने संघटना पाठपुरावा करत असल्याने, पंद्रा हजार गिरणी कामगारांना मुंबईत घरे मिळाली आहेत. म्हाडा कडे नोंदणी केलेल्या सर्व गिरणी कामगारांना मुंबईत मोफत घरे देईपर्यंत, दरमहा गिरणी कामगारांना घरांच्या भाड्यापोटी, किमान वीस हजार द्यावेत. अशी मागणी आजरा येथील किसान भवनात आयोजित केलेल्या, गिरणी कामगार मेळाव्यात अध्यक्षस्थानावरून बोलताना काॅ. अतूल दिघे यांनी व्यक्त केली.
स्वागत नारायण भडांगे यांनी केले. यावेळी काॅ. दिघे यांनी राज्यात दुष्काळाचे सावट पसरले असून, नवीन ऊस लागन थांबल्याने, दुध उत्पादनात घट होवून, शेती मशागतीसाठी उपलब्ध असणारे ट्रॅक्टर मालकासह शेतकरी अडचणीत येणार आहेत. या वर्षी शेतकऱ्यांना एकरी साठ हजार ची मदत द्या . पिक कर्जे माफ करा. पेन्शन मध्ये वाढ करा व गिरणी कामगारांना दरमहा वीस हजार घरभाडे द्या. तसेच विद्यार्थीना मोफत बससेवा व परीक्षा शुल्क माफ करावे. या मागण्यासाठी ५ नोव्हेंबरला जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी, सर्वांनी उपस्थित राहावे.असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षांचे जिल्हा अध्यक्ष व आजरा तालूका गिरणी कामगार संघटना अध्यक्ष काॅ. शांताराम पाटील यांनी गिरणी कामगारांच्या हक्कांसाठी शासन पातळीवर संघटित प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू असून, गिरणी कामगार व वारसदार यांना मुंबई हक्कांचे घर मिळवून देण्यासाठी, शेवट पर्यंत लढा दिला जात असल्याने. आपण सर्वांनी शेतकरी व विद्यार्थी हक्कांसाठी एकजूट रहाण्याचे सांगून, प्रत्येक गावात भेटी देवून फाॅर्म भरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी तानाजी पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. या मेळाव्याला महादेव होडगे, निवृत्ती मिसाळे, नारायण राणे, गोपाळ रेडेकर, हिंदूराव कांबळे, मनपा बोलके,रघूनाथ कातकर, बाबूराव केसरकर, मारूती मुरूकटे, धोंडिबा गुरव, जे के सावंत, राजश्री कुंभार, अनिता बागवे,सुशाबाई तुपट यांच्या सह गिरणी कामगार व वारसदार उपस्थित होते आभार काॅ. संजय घाटगे यांनी मानले.
आजरा आगारात ४ नोव्हेंबरला प्रवासी राजा आणि कामगार पालक दिन
आजरा : प्रतिनिधी
रा. प. आजरा आगारात बुधवार दि. ४ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रवासी राजा दिन व कामगार पालक दिन साजरा करण्यात येणार आहे. प्रवासी आणि कामगारांच्या समस्या स्थानिक पातळीवर सोडविण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
याबाबत आगार व्यवस्थापक यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, दि. ४ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत प्रवाशांच्या लेखी तक्रारी स्वीकारल्या जातील. त्या तक्रारींवर उपाययोजना करण्याबाबत विभाग नियंत्रक आदेश देतील.
तर दुपारच्या सत्रात दुपारी ३.०० ते ५.०० या वेळेत आगारातील रा.प. कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक तसेच संघटनात्मक समस्या ऐकून घेऊन त्यावर तातडीने योग्य ती कार्यवाही केली जाईल.
प्रवासी व कर्मचाऱ्यांनी आपल्या तक्रारी लेखी स्वरूपात नेमून दिलेल्या वेळेत आगारात द्याव्यात असे आवाहन आगार व्यवस्थापक यांच्या वतीने करण्यात आले आहे.

आजचे पंचांग
दिनांक : ३ नोव्हेंबर २०२६
वार :मंगळवार
माह (अमावस्यांत) : आश्विन
माह (पूर्णिमांत) : कार्तिक
ऋतु : हेमंत
आयन : दक्षिणायन
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथी : नवमी तिथी (सकाळी ११.५४ पर्यंत) त्यानंतर दशमी तिथी
नक्षत्र : मघा नक्षत्र (४ नोव्हेंबर पहाटे ०३.२६ पर्यंत) त्यानंतर पूर्वा फाल्गुनी नक्षत्र
योग : शुक्ल योग (सकाळी ०९.५३ पर्यंत) त्यानंतर ब्रह्म योग
करण : गराजा करण (सकाळी ११.५४ पर्यंत) त्यानंतर वाणीजा करण
चंद्र राशी : सिंह राशी
सूर्य राशी : तूळ राशी
अशुभ मुहूर्त :
राहु काळ : दुपारी ०३.१३ ते दुपारी ०४.३८ पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : सकाळी ११.५९ ते दुपारी १२.४५
सूर्योदय : सकाळी ०६.४१
सूर्यास्त : सायंकाळी ०६.०३
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत
