mrityunjaymahanews
अन्यआजरा तालुका विशेषकोल्हापूरक्रीडागुन्हाजीवनमंत्रटेक्नोलॉजीठळक बातम्यादेशबिझनेसभारतमनोरंजनमहाराष्ट्रराजकीयरोजगारविदेशसामाजिकस्थानिक

गुरुवार – सातच्या बातम्या

गुरुवार

१३ ऑगस्ट २०२६

मारामारी प्रकरणी आणखी तिघांविरोधात गुन्हा नोंद…


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा येथील आमराई गल्ली परिसरात बार मध्ये झालेल्या भांडणाचे पर्यवसान मारामारीत होऊन यामध्ये चौघे जखमी झाले असून शैलेश कृष्णा दारुटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संजय पाटील रा.देवर्डे, कुलदीप केसरकर, अमर व्हळतकर दोघे रा.साळगाव व दीपक शिवाजी सुतार रा.आजरा या चौघां विरोधात आजरा पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे.

मंगळवारी दुपारी साडेबारा वाजता सदर प्रकार घडला. या मारामारीत फिर्यादी शैलेश दारुटे रा.आवंडी, आदित्य वंजारे रा. अमराई गल्ली, आजरा, मैनुद्दीन शेख रा. भारत नगर आजरा व संजय पाटील रा.देवर्डे हे जखमी झाले आहेत.

दरम्यान याप्रकरणी संजय शामराव पाटील रा. देवर्डे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आदित्य अभय वंजारे ( वय २२ रा. आमराई गल्ली) शैलेश कृष्णा दारुटे रा.आवंडी वसाहत व मैनुद्दीन हुसेन शेख रा. भारत नगर यांनी आपल्यासह कुलदीप केसरकर ,अमर व्हळतकर व दीपक सुतार यांना मारहाण करून जखमी केल्याची फिर्याद दिली आहे यावरून वंजारे यांच्यासह तिघांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

आज-यात ‘आजच्या काळासाठी तुकोबा’ पुस्तकावर चर्चा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

सध्या अनेक महाराजांचा सुळसुळाट होत आहे. वारक-यांचा झेंडाही बदलत आहे.परंतु तुकारामांचा विचार खेड्यातील माणसांनी, निरक्षरांनी जिवंत ठेवला असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे मराठी विभागप्रमुख प्रा डॉ रणधीर शिंदे यांनी केले.
येथील जनता बँकेच्या सभागृहात राम कृष्ण हरी संस्थेच्या वतीने हभप देवदत्त परूळेकर लिखित आजच्या काळासाठी तुकोबा या पुस्तकावर आयोजित चर्चा सत्रात ते बोलत होते. जनता बँकेचे अध्यक्ष मुकुंदराव देसाई अध्यक्षस्थानी होते.

ह.भ.प . परूळेकर म्हणाले, जो माणूस भेदाभेद करतो तो वारकरी संप्रदायाच्या विचाराचा नाही. संतांचा विचार आपण सोडत असल्याने प्रश्न निर्माण होत आहेत. व्यवसाय करणाऱ्या व शाळकरी मुलांनी पुस्तक वाचण्याची गरज आहे. तुकाराम हे औषध आहे. तो समजून घेतला तर समाजाचे आरोग्य सदृढ होईल.

सुभाष विभुते म्हणाले,गीतेवर बंडखोरी करून प्राकृत भाषेत ज्ञानेश्वरी लिहिली.गुलामगिरीच्या काळात तुकाराम महाराजांचा जन्म झाला. तुकारामांनी कोणतेही क्षेत्र सोडले नाही. समाजाच्या मनातील वास्तव तुकारामांनी मांडले.यावेळी प्रा सुनील शिंत्रे, कवी अजय कांडर यांनी चर्चेत सहभाग घेतला.

यावेळी जि. प सदस्य सुधीर देसाई, संजय सावंत, रणजीत देसाई,दिगंबर देसाई,राजू होलम,विक्रम देसाई,गौरव सुतार, शांताराम पाटील आदी उपस्थित होते. युवराज जाधव यांनी प्रास्ताविक केले. काशिनाथ मोरे यांनी सूत्रसंचालन केले. प्रकाश मोरूसकर यांनी आभार मानले.

बिबट्या मडिलगे- महागोंड परिसरात

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

बिबट्याने काल बुधवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास मडिलगे ग्रामस्थांना दर्शन दिले.

येथील आरळगुंडकर यांच्या शेतातून तो डोंगराच्या दिशेने गेला. पुढे महागोंड येथील रस्ता ओलांडतात वाहन चालकांनी त्याला पाहिले.

बिबट्यांचा बंदोबस्त करण्याचे आव्हान आता वनविभागासमोर उभे ठाकले आहे.

आजरा वन विभागामार्फत जागतिक हत्ती दिन संपन्न…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

जागतिक हत्ती दिनानिमित्त कोल्हापूर वनविभाग, वनपरिक्षेत्र आजरा (प्रा.) यांच्या वतीने सुलगाव रोपवाटिका, सुलगाव येथील परिक्षेत्र वनअधिकारी, आजरा यांच्या कार्यालयात कोल्हापूर वनविभागाचे उपवनसंरक्षक कोल्हापूर श्री. धैर्यशील पाटील सो, यांचे प्रेरणेने व मार्गदर्शनखाली जनजागृतीपर कार्यक्रमाचे श्री. सचिन सावंत, परीक्षेत्र वनअधिकारी आजरा यांचे अध्यक्षतेखाली आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमास श्री. विजय पाटील (मानद वन्यजीव रक्षक) तसेच श्रीमती शीतल पाटील (परिक्षेत्र वनअधिकारी, पाटणे) हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. श्री. दत्तात्रय पाटील (वनक्षेत्रपाल, सा. व चंदगड) हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. कृष्णा डेळेकर (वनपाल) यांनी केले

आजरा वनपरिक्षेत्रात सध्या ‘गणेश’ आणि ‘राजा’ या दोन टस्कर हत्तींचा वावर असून, त्यांच्या भ्रमंतीदरम्यान काही वेळा शेतपिकांचे नुकसान होण्याच्या घटना घडतात. अशा परिस्थितीत वनविभागाकडून शासनाच्या प्रचलित नियमांनुसार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची कार्यवाही करण्यात येते. मानव आणि हत्ती यांच्यातील संघर्ष टाळण्यासाठी हत्तींच्या नैसर्गिक वावराचा आदर करणे, त्यांच्या हालचालींमध्ये अडथळा निर्माण न करणे आणि वनविभागाला वेळेवर माहिती देणे आवश्यक आहे. हत्तींचे संरक्षण करताना शेतकरी व स्थानिक नागरिकांच्या हिताचेही संरक्षण करणे, हा वनविभागाचा सहअस्तित्वाचा दृष्टिकोन आहे असे श्री. सचिन सावंत, परीक्षेत्र वनअधिकारी आजरा यांनी कार्यक्रमदरम्यान सांगितले.

मानव–हत्ती संघर्ष कमी करण्यासाठी वनविभाग व स्थानिक नागरिकांनी समन्वयाने काम करणे, ही काळाची गरज असल्याचे प्रमुख वक्ते श्री. दत्तात्रय पाटील, परीक्षेत्र वनअधिकारी (सामाजिक वनिकरण) चंदगड यांनी उपस्थिताना सांगितले.

प्रमुख अतिथी श्री विजय पाटील, मानद वन्यजीव रक्षक यांनी उपस्थितांना हत्ती संवर्धन, वन्यजीव संरक्षण आणि मानव–हत्ती सहअस्तित्वाबाबत मार्गदर्शन केले.

कार्यक्रमादरम्यान वन्यजीव बचाव पथक तसेच हत्ती हाकारा गटातील सदस्यांना वन्यप्राण्यांच्या सुरक्षित रेस्क्यू व व्यवस्थापनासाठी आवश्यक साहित्य-सामग्रीचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमास आजरा वनपरिक्षेत्राचे श्री. सचिन सावंत, (परिक्षेत्र वनअधिकारी, आजरा) श्री. कृष्णा डेळेकर (वनपाल उत्तर आजरा), श्री. संदीप शिंदे (वनपाल दक्षिण आजरा), श्रीमती कविता सावंत (वनपाल धनगरमोळा), तसेच आजरा वनपरिक्षेत्रातील सर्व वनरक्षक, वनसेवक, वन्यजीव बचाव पथक, हत्ती हाकारा गट व कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.

आजरा महागाव रस्ता की डर्ट ट्रॅक…?

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा – महागाव रस्त्याची पूर्णपणे दुर्दशा झाली असून पावसामुळे या रस्त्याला डर्ट ट्रॅकचे स्वरूप प्राप्त झाले आहे. लहान मोठे अपघात वारंवार होत असून वाहन चालकातून एकंदर रस्त्याच्या कामाबद्दल संताप व्यक्त होत आहे.

मुळातच या रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहे. गेल्या दिड वर्षापासून रस्ता करण्याचे काम सुरू आहे. रस्त्याचे सलग काम सुरू नसल्यामुळे काही ठिकाणी अर्धवट अवस्थेत काम तसेच ठेवले आहे यामुळे जेथे काँक्रिटीकरण झालेले नाही तेथे सर्वत्र चिखलाचे साम्राज्य आहे. हा चिखल वाहनांच्या माध्यमातून काँक्रिटीकरण केलेल्या रस्त्यावर ही येत आहे. पावसामुळे येथे निसरट होऊन वाहने घसरून अपघात होत आहेत.

यावर नेमके नियंत्रण कोणाचे आहे याबाबत स्पष्टता नसल्याने हे रेंगाळलेले काम पूर्ण कधी होणार व वाहन चालकांची यातून सुटका कधी होणार असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

विद्या मंदिर पारेवाडी शाळेत विद्यार्थ्यांना रेनकोट व शैक्षणिक साहित्यांचे वाटप

आजरा: मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

पारेवाडी विद्या मंदिराच्या विद्यार्थ्यांना Connect For Organization & Pagariya Welfare Foundation, Mumbai या संस्थेमार्फत व आजरा महाविद्यालय आजरामधील राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत ‘विद्या मंदिर पारेवाडी या शाळेतील पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात आले. यामध्ये रेनकोट, वह्या, परीक्षेसाठी आवश्यक पॅड व इतर शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमास आजरा महाविद्यालयातील कनिष्ठ विभागातील एनएसएस प्रकल्प अधिकारी प्रा, रत्नदीप पवार, प्रा.अविनाश वर्धन तसेच सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रा. अनिल निर्मळे, पारेवाडी गावचे पोलीस पाटील श्री. महेश माने तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री. विनायक राजयोगी, सहाय्यक शिक्षिका यादव याबरोबरच पालक विद्यार्थी उपस्थित होते. आभार मुख्याध्यापक विनायक राजयोगी यांनी मांडले.

चर्चेनंतरही तोडगा नाही, बसस्थानकासाठी आंदोलनावर गुरव ठाम

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

उत्तूर येथील रखडलेल्या बसस्थानकाच्या बांधकामाचा प्रश्न चर्चेनंतरही कायम राहिला आहे. बांधकाम पुन्हा सुरू करण्यासाठी कॉ. शिवाजी गुरव यांनी १८ ऑगस्टपासून बेमुदत धरणे व हलगी नाद आंदोलन करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.या पार्श्वभूमीवर एस.टी. महामंडळाचे अधिकारी, ग्रामपंचायत पदाधिकारी व गुरव यांच्यात चर्चा झाली. महामंडळाच्या विभागीय अधिकारी वृषाली भोसले यांनी बांधकाम महामंडळाने जाणीवपूर्वक थांबविले नसून, बांधकामासंदर्भात तक्रार झाल्याने परवानगी स्थगित करण्यात आल्याचे स्पष्ट केले.

दरम्यान, सरपंच किरण आमणगी, ग्रामपंचायत सदस्य महेश करंबळी व संजय उत्तूरकर यांनीही संबंधितांशी चर्चा करून प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेण्याचे आश्वासन दिले. मात्र, अद्याप प्रत्यक्ष काम सुरू करण्याबाबत ठोस निर्णय झालेला नसल्याने गुरव यांनी आंदोलनाचा इशारा कायम ठेवला आहे.

१८ ऑगस्टपूर्वी बसस्थानकाच्या कामाबाबत ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा नियोजित आंदोलन करण्यात येईल, असा इशारा गुरव यांनी दिला.

आजचे पंचांग

दिनांक : १३ ऑगस्ट २०२६
वार : गुरुवार
माह (अमावस्यांत) : श्रावण
माह (पूर्णिमांत) : श्रावण
ऋतु : वर्षा
आयन : दक्षिणायन
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथी : प्रथम तिथी (रात्री ०८.४१ पर्यंत) त्यानंतर द्वितीया तिथी
नक्षत्र : मघा नक्षत्र (१४ ऑगस्ट पहाटे ०४.३७ पर्यंत) त्यानंतर पूर्वा फाल्गुनी नक्षत्र
योग : वरीयान योग (दुपारी १२.१५ पर्यंत) त्यानंतर परिघ योग
करण : किंस्तुघना करण (सकाळी ०९.५० पर्यंत) त्यानंतर भाव करण
चंद्र राशी : सिंह राशी
सूर्य राशी : कर्क राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : दुपारी ०२.१९ ते दुपारी ०३.५५ पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.१८ ते दुपारी ०१.०९
सूर्योदय : सकाळी ०६.२०
सूर्यास्त : सायंकाळी ०७.०६
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत

कौतुकास्पद…

व्यंकटराव प्राथमिक आजरा ची विद्यार्थिनी कुमारी अद्विता किशोर खोत हीने चौथी शिष्यवृत्ती परीक्षेत दैदिप्यमान यश संपादन केले आहे. ३०० पैकी २७६ गुण संपादन करून तिने राज्यात दहावी येण्याचा मान पटकावला आहे .याप्रसंगी तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

होनेवाडी विद्या मंदिर

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा २०२६ मध्ये विद्या मंदिर होनेवाडीचासंस्कार सुनील पाटील जिल्हा गुणवत्ता यादीत ९ वा, तर अपूर्वा राजकुमार पाटील हिचा १० वा क्रमांक पटकावला.

होनेवाडी गावातील ग्रामस्थ, मुंबईस्थित होनेवाडीकर तसेच गावातील विविध संस्था आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे कौतुक होत आहे.

संबंधित पोस्ट

इटे येथे घरफोडीत दोन लाख ३९ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास

हत्तीचा धुमाकूळ… ट्रॅक्टर सह बैलगाडी केली पलटी

mrityunjay mahanews

आज-यात तणाव…

mrityunjay mahanews

Breaking News

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!