mrityunjaymahanews
अन्यआजरा तालुका विशेषकोल्हापूरक्रीडागुन्हाजीवनमंत्रटेक्नोलॉजीठळक बातम्यादेशबिझनेसभारतमनोरंजनमहाराष्ट्रराजकीयरोजगारविदेशसामाजिकस्थानिक

गुरुवार – सातच्या बातम्या

गुरुवार

६ ऑगस्ट २०२६

काजू-आंबा बागांच्या नुकसानीसाठी हेक्टरी ३ लाख भरपाई द्या.
शेतकरी संघटना आक्रमक

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

कोल्हापूर जिल्ह्यात यंदा अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे काजू व आंबा बागांचे ७५ ते ८० टक्के नुकसान झाले आहे. शासनाने हेक्टरी २२ हजार रुपये भरपाई जाहीर केली असली तरी ती तुटपुंजी असल्याचे सांगत स्वाभिमानी शेतकरी संघटने हेक्टरी ३ लाख रुपये भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य सचिव राजेंद्र गड्ड्यानवार पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांना बाबतचे निवेदन दिले.

निवेदनात भरपाई वितरणातील पाच प्रमुख अडचणी मांडल्या आहेत. सातबारा नोंदीचा अभाव, सामायिक सातबारा व ८ अ उतारा, शासकीय व मुलकी हक्काच्या जमिनी, देवस्थान जमिनी आणि प्रलंबित वारस नोंदी यामुळे अनेक पात्र शेतकरी भरपाईपासून वंचित राहत आहेत. अशा शेतकऱ्यांच्या शेतावर प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामा करावा आणि स्थानिक साक्षीदारांच्या आधारे भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात आली.

गड्ड्यानवर यांनी सांगितले की, काजू पट्ट्यातील शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. त्यामुळे तातडीने हेक्टरी ३ लाख भरपाई मंजूर करून सर्व प्रशासकीय अडचणी दूर कराव्यात. १५ दिवसांत निर्णय न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. यावेळी पालकमंत्री आबिटकर यांनी शासनाकडे याचा पाठपुरावा केला जाईल असे सांगितले.

या निवेदनावर तानाजी देसाई, सखाराम केसरकर, कृष्णा पाटील, निवृत्ती कांबळे, भिकाजी कांबळे, कुंडलिक गुरव, अशोक सासुलकर, धोंडीबा सावंत, विश्वास पाटील, आदींच्या सह्या आहेत.

शोधमोहीमेला यश
‘ त्या ‘ डॉक्टरांचा मृतदेह सापडला

आंबोली : विशेष प्रतिनिधी

आंबोली येथील प्रसिद्ध महादेवगड पॉईंट परिसरात सुमारे ४०० फूट खोल दरीत कोसळलेल्या जत्राट/ निपाणी येथील ४५ वर्षीय डॉ.आयुब सय्यद या पर्यटकाचा मृतदेह बुधवारी सकाळी शोध मोहीमेदरम्यान दरीतून बाहेर काढण्यात यश आले.

डॉ.आयुब सय्यद हे आपल्या नऊ सहकाऱ्यांसह मंगळवारी सकाळी आंबोली येथे पर्यटनासाठी आले होते. सायंकाळी पाचच्या सुमारास महादेवगड पॉईंट परिसरात असताना लघुशंकेसाठी ते संरक्षक कठड्याच्या रेलिंगच्या पलीकडे गेले. त्यावेळी अचानक तोल जाऊन ते सुमारे ४०० फूट खोल दरीत कोसळले. पॉईंटवर एका स्थानिक विक्रेत्याने हा प्रकार पाहताच त्याच्या सहकाऱ्यांना याची माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच सावंतवाडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम आपल्या पथकासह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आंबोली व सांगली येथील सह्याद्री ॲडव्हेंचर रेस्क्यू टीमची मदत घेत शोधमोहीम सुरू केली. मात्र मुसळधार पाऊस, दाट धुके, संततधार पावसामुळे निर्माण झालेली प्रतिकूल परिस्थिती आणि अंधार यामुळे मंगळवारी सायंकाळी सुरू झालेली मोहीम काही काळ थांबवावी लागली.

यानंतर बुधवारी पहाटे पुन्हा एकदा रेस्क्यू पथकाने अत्यंत कठीण परिस्थितीत शोधकार्य सुरू केले. सकाळी सुमारे दहा वाजण्याच्या दरम्यान दरीत मृतदेह आढळून आला. त्यानंतर रेस्क्यू टीमने मोठ्या प्रयत्नांनंतर मृतदेह बाहेर काढला.

आरदाळ हायस्कूलमध्ये ‘नेतृत्व गुण व व्यक्तिमत्व विकास’ विषयावर व्याख्यान संपन्न

उत्तुर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आरदाळ माध्यमिक विद्यालयात “नेतृत्व गुण व व्यक्तिमत्त्व विकास” या विषयावर संवेदना फाउंडेशनचे कार्याध्यक्ष श्री. पांडुरंग शंकर मोहिते यांचे व्याख्यान पार पडले.

मुख्याध्यापक श्री. शरद पाटील यांच्या प्रास्ताविकाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. परिचय श्री. किरण चव्हाण यांनी करून दिला.

पांडुरंग मोहिते यांनी हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार यांची उदाहरणे देत आत्मविश्वास, जिद्द आणि मेहनतीचे महत्त्व सांगितले. ‘थ्री इडियट्स’, ‘तारे जमीन पर’, ‘चक दे इंडिया’ चित्रपटांचा दाखला देत वेळेचे नियोजन, प्रामाणिकपणा आणि चांगल्या सवयी अंगिकारण्याचा संदेश दिला. 

कार्यक्रमास शरद पाटील, पांडुरंग मोहिते, घाटगे सर, अमोल बांबरे यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन रणजित सुतार यांनी केले तर आभार स्वप्नाली बांबरे यांनी मानले.

बाबू जैनापुरे यांचे निधन…


आजरा ; मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सेवानिवृत्त शाखाधिकारी मोहम्मदहनीफ शौकतअली चांदसो उर्फ बाबू जैनापुरे यांचे बुधवारी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. निधन समयी त्यांचे वय ६१ वर्षे होते.

उत्तम क्रिकेटपट्टू अशी ओळख असणाऱ्या जैनापुरे यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुले, एक मुलगी, नातवंडे, सुना असा परिवार आहे.

आजचे पंचांग 

दिनांक : ६ ऑगस्ट २०२६
वार : गुरुवार
माह (अमावस्यांत) : आषाढ
माह (पूर्णिमांत) : श्रावण
ऋतु : वर्षा
आयन : दक्षिणायन
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथी : अष्टमी तिथी (सायंकाळी ०६.५२ पर्यंत) त्यानंतर नवमी तिथी
नक्षत्र : भरणी नक्षत्र (रात्री ०८.१३ पर्यंत) त्यानंतर कृत्तिका नक्षत्र
योग : गण्ड योग (दुपारी ३.०० पर्यंत) त्यानंतर वृद्धि योग
करण : बलवा करण (सकाळी ०७.५० पर्यंत) त्यानंतर कौलव करण
चंद्र राशी : मेष राशी (०७ ऑगस्ट रात्री ०१.५२ पर्यंत) वृषभ राशी
सूर्य राशी : कर्क राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : दुपारी ०२.२१ ते दुपारी ०३.५७ पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.१९ ते दुपारी ०१.१०
सूर्योदय : सकाळी ०६.१८
सूर्यास्त : सायंकाळी ०७.११
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत

छाया वृत्त

रवळनाथ मंदिर, पोळगाव येथे कार्यक्षेत्रातील पशुपालकांना पशुवैद्यकीय दवाखाना पोळगाव ता. आजरा मार्फत सौ. यशोदा पोवार उपसभापती, पंचायत समिती आजरा, युवराज पोवार, संचालक गडहिंग्लज बाजार समिती सौ. माधुरी गुरव सरपंच, पोळगाव, दत्तात्रय धडाम सदस्य ग्रामपंचायत पोळगाव व डॉ. सुधीर मिणचेकर पशुधन पर्यवेक्षक पोळगाव व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत मका बियाणे वाटप करण्यात आले.

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!