रविवार
२६ जुलै २०२६


आजरा तालुक्यात विठू नामाचा गजर ; बाल वारकऱ्यांच्या दिंड्यांनी वातावरण भक्तिमय

आषाढी एकादशी आजरा शहरासह संपूर्ण तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरी झाली. तालुकाभरात ठीक ठिकाणच्या विठ्ठल मंदिरांमध्ये भाविकांनी दर्शन घेऊन विठू नामाचा गजर केला.
आजरा येथील रवळनाथ प्राथमिक व आदर्श बालक मंदिर शाळेच्या चिमुकल्यांनी वारकरी वेशात दिंडी काढली. हातात पताका, डोक्यावर तुळशीवृंदावन घेऊन “विठोबा रखुमाई…ज्ञानेश्वर माऊली” च्या जयघोषात संपूर्ण परिसर दुमदुमला. रवळनाथ शाळेच्या मुख्याध्यापिका उज्वला देसाई आणि आदर्श बालक मंदिरच्या मुख्याध्यापिका नारे यांच्या हस्ते पालखीचे पूजन झाले.
सोहाळे, बाची, सोहाळेवाडी येथेही ग्रामपंचायत आणि शाळांच्या पुढाकाराने बालवारकऱ्यांची दिंडी निघाली. टाळ-मृदंगाच्या गजरात विद्यार्थ्यांनी भक्तीचा अनोखा सोहळा सादर केला. सरपंच भारती डेळेकर यांनी यावेळी लहानग्यांच्या भक्तीचे कौतुक केले.
विद्या मंदिर स्वामी विवेकानंद शाळेची दिंडी शाळेपासून शिवाजीनगर विठ्ठल मंदिरापर्यंत मुलांच्या विठ्ठल रुक्मिणी व वारकरी अशा वेशभूषा परिधान करून हरिनामाचा गजर करत काढण्यात आली. नागरिकांनी मुलांना फराळाचे वाटप करून प्रोत्साहन दिले.
पेरणोली येथेही दिंडीसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

वर्षभरात तीन सख्ख्या भावांचा मृत्यू.…
नावलकर कुटुंबीयांवर शोककळा…

पेरणोली तालुका आजरा येथील गेल्या वर्षभरात नावलकर कुटुंबातील तीन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला आहे. यामुळे नावलकर कुटुंबीयावर शोककळा पसरली आहे.
वर्षभरापूर्वी १७ ऑगस्ट २०२५ रोजी राजाराम धोंडीबा नावलकर यांचा त्यानंतर २५ जानेवारी २०२६ रोजी शंकर धोंडीबा नावलकर यांचा तर २२ जुलै २०२६ रोजी सदाशिव धोंडीबा नावलकर यांचा मृत्यू झाला.
वैशिष्ट्य म्हणजे या तिघांचाही मृत्यू आकस्मिक पद्धतीने झाला आहे. कोणत्याही प्रकारचा आजार नसताना अचानकपणे त्यांना मृत्यूने गाठले आहे.
एकाच शेतकरी कुटुंबातील या तीन सख्ख्या भावांचा वर्षभरात मृत्यू झाल्याने पेरणोली पंचक्रोशीत हा चर्चेचा विषय बनला आहे.

शिक्षणमंत्र्याच्या राजीनाम्यानंतर वंचित, सेक्यूलर कडून जल्लोष

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर वंचित बहुजन आघाडी, आजरा तालुका सेक्युलर मुव्हमेंट या संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. फटाके फोडून आनंद व्यक्त केला. विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी झालेला संघर्ष व लढ्याला अखेर यश मिळाले असून लोकशाही मार्गाने उभारलेल्या आंदोलनाचा हा विजय असल्याची भावना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांना कायम पाठिंबा देत राहू आणि शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता, जबाबदारी व उत्तरदायित्व निर्माण करण्यासाठी संघर्ष सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार व्यक्त केला. या वेळी संघटनाचे पदाधिकारी उपस्थित होते.
पेरणोली (ता. आजरा) येथेही आनंद व्यक्त करण्यात आला. मप्रेश देसाई, पांडुरंग दोरुगडे, दिनेश कांबळे, मारुती मुळीक, अरविंद लोखंडे, संदिप पारदे, स्वप्नील सावंत, अवधूत हावलदार, दिलीप वंजारे, साईल धुमाळ, संकेत दळवी, संतोष देसाई, गोविंदा दारुडकर, श्रीवर्धन देसाई, किशोर चव्हाण, गजानन कोडक यांच्यासह विद्यार्थी व युवक उपस्थित होते.

निधन वार्ता
सुनिता त्रिभुवने

आजरा येथील सुनिता नेमिनाथ त्रिभुवने ( वय ६५ वर्षे ) यांचे अल्पशा आजाराने काल शनिवारी निधन झाले.
त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुले, एक विवाहित मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
येथील व्यापारी समीर व सुहास यांच्या त्या आई होत.

गंगा बागेत बिबट्या…?
आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा शहरातील गंगा बागेत बिबट्याने दर्शन दिल्याचा दावा स्थानिक जनावरे राखणाऱ्या मंडळींनी केला आहे.
काल शनिवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास बिबट्याला गंगा बागेत जाताना पाहिले असल्याचे सांगितले जाते. यामुळे शिव कॉलनी आयडियल कॉलनी सह परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
वनविभागाने याबाबत शहानिशा करावी अशी मागणी होत आहे.

गांधीनगर येथे आषाढी एकादशीनिमित्त विविध कार्यक्रम

आजरा:येथील गांधीनगर भागातील श्री संतसेना महाराज मंदिरात आषाढी एकादशीचे औचित्य साधून श्री विठ्ठल-रुक्मिणीची भव्य महापूजा उत्साहात साजरी करण्यात आली. ही पूजा ज्येष्ठ भाविक श्री श्रीकांत पारपोलकर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी यांच्या हस्ते पारंपरिक पद्धतीने व भक्तीमय वातावरणात संपन्न झाली.आषाढी एकादशी निमित्त मंदिरात पहाटेपासूनच विठ्ठल नामाचा गजर सुरू होता. मूर्तीला विलोभनीय अभिषेक घालून विशेष फुलांची आरास करण्यात आली होती.
आजरा नाभिक समाज संघटनेचे अध्यक्ष आकाश शिंदे, सक्रिय सदस्य निखिल पाचवडेकर, निखिल काशीद, सतीश शिंदे तसेच समाज सल्लागार कमिटीचे ज्येष्ठ मार्गदर्शक अशोक पाचवडेकर आणि कृष्णा यादव उपस्थित होते. त्यांच्यासोबतच गांधीनगर परिसरातील प्रतिष्ठित ग्रामस्थ पारपोलकर कुटुंबीय व इतर विठ्ठलभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. पूजेनंतर उपस्थितांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. संपूर्ण परिसरात ‘माऊली-विठ्ठल’ च्या जयघोषाने भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.

आजचे पंचांग
दिनांक : २६ जुलै २०२६
वार : रविवार
माह (अमावस्यांत) : आषाढ
माह (पूर्णिमांत) : आषाढ
ऋतु : वर्षा
आयन : दक्षिणायन
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथी : द्वादशी तिथी (दुपारी ०१.५७ पर्यंत) त्यानंतर त्रयोदशी तिथी
नक्षत्र : ज्येष्ठा नक्षत्र (सकाळी ०७.३४ पर्यंत) त्यानंतर मूळ नक्षत्र
योग : इन्द्र योग (रात्री १०.०४ पर्यंत) त्यानंतर वैधृति योग
करण : बलवा करण (दुपारी ०१.५७ पर्यंत) त्यानंतर कौलव करण
चंद्र राशी : वृश्चिक राशी (सकाळी ०७.३४ पर्यंत) धनु राशी
सूर्य राशी : कर्क राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : सायंकाळी ०५.३८ ते सायंकाळी ०७.१६ पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.१९ ते दुपारी ०१.११
सूर्योदय : सकाळी ०६.१४
सूर्यास्त : सायंकाळी ०७.१६
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत
विशेष सूचना
बऱ्याच वेळा ‘ मृत्युंजय महान्यूज’ ची लिंक ओपन होत नाही अशा तक्रारी वाढलेल्या आहेत. लिंक ओपन करताना वायफाय वर ओपन न करता ती मोबाईल नेटवर्क सुरू करून ओपन केल्यास लवकर बातम्या पहावयास मिळतात.
कांही वेळा ट्राफिक जाममुळे/सर्वर मधील अडथळ्यामुळे लिंक लवकर ओपन होत नाही. थोडा वेळ थांबून लिंक ओपन करावी. काही तांत्रिक अडचणी सुरू आहेत. आम्ही दूर करण्याचा प्रयत्न करत आहोत.
….मुख्य संपादक


