mrityunjaymahanews
अन्य

शुक्रवार सातच्या बातम्या

शुक्रवार 

३ जुलै २०२६

ना समाधानकारक वृष्टी…
ना अतिवृष्टीची
जून महिन्यात केवळ ११२ मिलिमीटर पाऊस


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

पावसाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यात यंदा जून महिना कोरडा गेला आहे. संपूर्ण जून महिन्यात तालुक्यात दहा दिवस किरकोळ पाऊस आला असून केवळ संपूर्ण महिनाभर केवळ ११२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. कोणत्याही प्रकारच्या अतिवृष्टीची नोंद या कालावधीत झालेली नाही.

शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी जूनमधील पाऊस निर्णायक मानला जातो. मात्र यंदा पावसाने पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांची चिंता वाढली होती. गेल्या दोन दिवसापासून मात्र पावसामध्ये वाढ झाली आहे.

“जूनमध्ये चांगला पाऊस झाला तरच खरीप हंगाम साधतो. पण यंदा ना समाधानकारक पाऊस, ना अतिवृष्टी. अशी स्थिती यापूर्वी कधी अनुभवली नाही,” असे तालुक्यातील ज्येष्ठ शेतकरी सांगतात.

हवामान खात्याने ४ ते ७ जुलै दरम्यान जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. मात्र जूनच्या तुटीमुळे खरीप हंगामावर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.

पावसाळी साहित्याची अपेक्षित उलाढाल नाही…

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर छत्र्या, रेनकोट, प्लास्टिक, पावसाळी चपला, बूट आदी साहित्याने दुकाने भरली आहेत. परंतु समाधानकारक पाऊस नसल्याने अद्याप या साहित्याला गि-हाईक दिसत नाही.

केले.

आजरा साखर कारखान्यात मील रोलर पुजन

आजरा: मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्यात सन २०२६-२७ गळीत हंगामाकरीता ओव्हर होलींगचे काम गतीने सुरू झाले असून कारखान्याचे चेअरमन मुकुंदराव देसाई यांचे हस्ते व संचालक मंडळाच्या उपस्थितीत मील रोलर पुजनाचा कार्यकम मोठया उत्साहात संपन्न झाला.

यावेळी चेअरमन यांनी येत्या सन २०२६-२७ चा गळीत हंगाम माहे ऑक्टोंबर, २०२६ मध्ये सुरू करणेच्या दृष्टीने मशिनरी दुरूस्ती व देखभालीची कामे सुरू आहेत. कारखान्याने गळीत हंगाम २०२६-२७ करीता ७ हजार ७०० हेक्टर ऊस क्षेत्राची नोंद पुर्ण केली आहे. येत्या गळीत हंगामात ४ लाख मे.टन ऊस गाळपाचे कारखान्याने नियोजन केले आहे. ३० सप्टेंबर २०२६ पुर्वी कारखाना दुरूस्ती व देखभालीची कामे पुर्ण करून कारखाना गळीतासाठी सज्ज ठेवणार आहे. येणा-या गळीत हंगामासाठी सक्षम ३८५ परजिल्हयातील व स्थानिक तोडणी वाहतुक यंत्रणा उभारली असुन सदर यंत्रणेस पहिल्या ॲडव्हान्सची रक्कम वाटप केली आहे. त्याच प्रमाणे गळीत हंगामासाठी आवश्यक कामकाजाचे नियोजन व्यवस्थापना मार्फत केले जात आहे अशी माहिती दिली.

यावेळी कारखान्याचे व्हा. चेअरमन अनिल फडके, जेष्ठ संचालक वसंतराव धुरे, उदयसिंह पोवार, मधुकर देसाई, मारूती घोरपडे, सुभाष देसाई, रणजित देसाई, संभाजी रामचंद्र पाटील, शिवाजी नांदवडेकर, राजेश जोशीलकर, गोविंद पाटील, संचालिका रचना होलम, सौ. मनिषा देसाई, संचालक काशिनाथ तेली, अशोक तर्डेकर, हरी कांबळे तसेच कारखान्याचे तज्ञ संचालक नामदेव नार्वेकर, रशिद पठाण, शासन नियुक्त प्रतिनिधी दिगंबर देसाई आणि कार्यकारी संचालक एस. के. सावंत, जनरल मॅनेजर (टेक्नि) एम. आर. पाटील, चिफ अकौंटंट प्रकाश चव्हाण, चिफ केमिस्ट सुजय पाटील, कार्यालय अधिक्षक अनिल देसाई, सिव्हील इंजिनिअर शंकर आजगेकर, एच. आर. मॅनेंजर सुभाष भादवणकर व अधिकारी, युनियन अध्यक्ष व युनियनचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

वडिलांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसा निमित्ताने  @75 या कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा संपन्न.


उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

असुसं प्रकाशन अंतर्गत कवी अविनाश लोंढे यांच्या @ 75 ह्या पहिल्या वहिल्या कविता संग्रहाचा प्रकाशन सोहळा त्यांच्या वडिलांच्या ७५ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने मोठ्या उत्साहात पार पडला. पुस्तकाचे प्रकाशन डॉ. जगताप, प्रा. संजय खोचारे व कवीचे वडिल श्री ईश्वर लोंढे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य रामकृष्ण मगदूम व स्वागत प्रास्ताविक सौ विद्या खामकर यांनी केले.
या पुस्तकाचे नावीन्य म्हणजे कवी अविनाश लोंढे यांचे वडील ईश्वर लोंढे यांच्या ७५ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने ७५ स्वलिखित कवितांचा संग्रह, @७५ या नावाने छापून प्रकाशित करण्यात आला. कवी यांनी आपल्या मनोगतात सांगितले की यातील ७५ पुस्तके ते शाळा, कॉलेज, वाचनालय, ग्रंथालयाला मोफत देणार आहेत. उपस्थित सर्वांनीच या अनोख्या प्रकाशन सोहळ्यात आपली मनोगते व्यक्त केली.

सदर कार्यक्रमाला तानाजी पावले, अशोक गुरव, बाळासो जाधव, किरण चव्हाण, सचिन दुधाळे, सुशांत बोटे, सौ.पवार व मान्यवर उपस्थित होते .

आजरा महाविद्यालयात बार्टीच्या विविध योजना व जात वैधता प्रक्रियेवर मार्गदर्शन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा येथील आजरा महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (बार्टी), कोल्हापूर यांच्या वतीने “बार्टीच्या विविध योजना व जात वैधता (कास्ट व्हॅलिडिटी) प्रक्रिया” या विषयावर मार्गदर्शनपर कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक व शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डी. पी. संकपाळ हे होते.

प्रारंभी एम. आर. शिंत्रे यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करत विद्यार्थ्यांनी शासनाच्या विविध शैक्षणिक योजनांची माहिती घेऊन त्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
प्रमुख मार्गदर्शक म्हणून बार्टीच्या प्रतिभा सावंत यांनी बार्टीमार्फत राबविण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, कौशल्य विकास, संशोधन व इतर विविध योजनांची सविस्तर माहिती दिली. तसेच जात वैधता प्रमाणपत्रासाठी आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, पडताळणीची कार्यपद्धती आणि आवश्यक खबरदारी याबाबत सखोल मार्गदर्शन केले. शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी वेळेत आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून उपलब्ध संधींचा प्रभावीपणे उपयोग करावा, असे त्यांनी सांगितले.

यावेळी बी. एम. वायकसकर यांनी जात वैधता प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रांची सविस्तर माहिती देत, कागदपत्रांची अचूकता व पूर्तता ही यशस्वी प्रक्रियेची गुरुकिल्ली असल्याचे सांगितले.
अध्यक्षीय मनोगतात उपप्राचार्य डी. पी. संकपाळ यांनी विद्यार्थ्यांनी अशा मार्गदर्शनपर उपक्रमांचा लाभ घेत आपल्या शैक्षणिक व करिअरच्या वाटचालीसाठी शासनाच्या योजनांचा प्रभावी वापर करावा, असे प्रतिपादन केले. योग्य माहिती, नियोजन आणि वेळेवर केलेली कागदपत्रांची पूर्तता विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाची असल्याचेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. जी. पोतदार, पर्यवेक्षक मनोजकुमार पाटील, कार्यालय अधीक्षक योगेश पाटील, प्रवीण कोळी, संदीप देसाई तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

राईसमिल ते गांधीनगर रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात शिवसेना (ठाकरे गट) आक्रमक; तात्काळ दुरुस्ती न केल्यास आंदोलनाचा इशारा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा येथील राईसमिल ते गांधीनगर या महत्त्वाच्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून, तात्काळ डागडुजी करावी, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने दिला आहे. याबाबतचे निवेदन आजरा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांना देण्यात आले.

शिवसेना तालुका प्रमुख युवराज शामराव पोवार यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राईसमिल ते गांधीनगर हा रस्ता आजरा नगरपंचायतीच्या हद्दीत येतो. या रस्त्यावरून एरंडोळ, पोळगांव अशा १० ते १२ गावांचा संपर्क आहे. गांधीनगर येथे ग्रामीण रुग्णालय असल्याने दररोज अनेक रुग्ण, अपघातग्रस्त रुग्णवाहिकेतून व एस.टी. बसने याच मार्गाने ये-जा करतात. सध्या रस्त्यावर सर्वत्र मोठमोठे खड्डे पडले असून, पावसामुळे त्यात गुडघाभर पाणी साचले आहे. यामुळे वाहन चालवताना चालकांच्या अंगावर चिखल उडतो. रुग्णांना रुग्णालयात नेताना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. नागरिक व वाहनचालक यांना रोजचा प्रवास जिकिरीचा झाला आहे.

“मागणीची दखल न घेतल्यास शिवसेनेच्या वतीने नगरपंचायत कार्यालयावर आंदोलन करण्यात येईल,” असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.

निवेदनावर उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील, तालुका प्रमुख युवराज पोवार, कामगार सेना शहरप्रमुख बिलाल लतिफ, युवासेना उपतालुका प्रमुख अमित गुरव, तालुका उपसंघटक हरिश्चंद्र व्हरकटे यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.

फोटो क्लिक 

 

स्थळ : सोहाळे- दोरूगडेवाडी परिसर

हत्तींच्या उपद्रवावर चर्चा करण्यासाठी वनविभागाचे शिवसेनेला निमंत्रण;आज बैठक

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा तालुक्यात वन्य हत्तींमुळे शेतकरी व नागरिकांना होणाऱ्या त्रासाबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने पुकारलेल्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर वन विभागाने चर्चेची तयारी दर्शवली आहे.आज शुक्रवार, दि. ३ जुलै २०२६ रोजी सकाळी ११ वाजता वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले असून, मोर्चा स्थगित करून चर्चेत सहभागी होण्याची विनंती वन विभागाने केली आहे.

परिक्षेत्र वन अधिकारी, आजरा यांनी शिवसेना तालुका प्रमुखांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, हत्तींच्या उपद्रवाबाबत शिवसेनेने दिलेल्या निवेदनाची वन विभागाने गंभीर दखल घेतली आहे.
वन विभागाने हत्ती प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांची माहितीही दिली आहे:

“मोर्चा काढण्याऐवजी चर्चेच्या माध्यमातून हा विषय सकारात्मक व समन्वयाने मार्गी लागेल. त्यामुळे प्रस्तावित मोर्चा स्थगित करून वन विभागाशी प्रत्यक्ष चर्चा करावी,” अशी विनंती वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन सावंत यांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर आज सकाळी वनविभाग कार्यालय सुलगाव येथे बैठक होणार आहे.

 

आजचे पंचांग

दिनांक : ३ जुलै २०२६
वार : शुक्रवार
माह (अमावस्यांत) : ज्येष्ठ
माह (पूर्णिमांत) : आषाढ
ऋतु : वर्षा
आयन : दक्षिणायन
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथी : तृतीया तिथी (सकाळी ११.२० पर्यंत) त्यानंतर चतुर्थी तिथी
नक्षत्र : श्रवण नक्षत्र (सकाळी ११.४६ पर्यंत) त्यानंतर धनिष्ठा नक्षत्र
योग : विष्कुम्भ योग (सायंकाळी ०४.५९ पर्यंत) त्यानंतर प्रीति योग
करण : विस्ती भद्रा करण (सकाळी ११.२० पर्यंत) त्यानंतर भाव करण
चंद्र राशी : मकर राशी (४ जुलै रात्री १२.४७ पर्यंत) त्यानंतर कुंभ राशी
सूर्य राशी : मिथुन राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : सकाळी ११.०४ ते दुपारी १२.४३ पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.१६ ते दुपारी ०१.०९
सूर्योदय : सकाळी ०६.०६
सूर्यास्त : सायंकाळी ०७.१९
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत

संबंधित पोस्ट

तालुका खरेदी विक्री संघाच्या अध्यक्षपदी महादेवराव पाटील… उपाध्यक्षपदी दौलती पाटील

mrityunjay mahanews

आजरा अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी रमेश कुरुणकर

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

हत्तीने दिली ट्रॅक्सला धडक…. रामतीर्थ यात्रा नाही तर राजकीय कार्यक्रमांना परवानगी देऊ नये… ‘सर्वोदय’ मध्ये सत्ताधारीच

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

error: Content is protected !!