mrityunjaymahanews
अन्य

मंगळवार – सातच्या बातम्या

मंगळवार

१६ जून २०२६

बेलेवाडी परिसरात पुन्हा बिबट्याची चाहूल,ग्रामस्थांमध्ये सतर्कतेचे वातावरण

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा 

आजरा तालुक्यातील बेलेवाडी (हुबळगी) येथील मंगाई डोंगर परिसरात बिबट्याच्या हालचालींचा संशय व्यक्त करण्यात आल्याने शेतकरी व ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. शनिवारी मध्यरात्री शेतांची राखण करण्यासाठी गेलेल्या काही शेतकऱ्यांना जवळच्या अंतरावर वन्यप्राणी दिसल्याची घटना घडली.

शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री गस्त घालत असताना टॉर्चच्या प्रकाशात मोठा वन्यप्राणी दिसून आला. तो बिबट्या असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून कोणताही धोका न पत्करता शेतकरी तातडीने गावाकडे परतले.
विशेष म्हणजे, याच परिसरात सुमारे आठ दिवसांपूर्वीही बिबट्याचे दर्शन झाल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे. त्यामुळे परिसरात बिबट्याचा वावर असल्याची शक्यता व्यक्त केली जात असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या पथकाने परिसराची पाहणी केली. घटनास्थळी आढळलेल्या पावलांच्या ठशांची नोंद घेण्यात आली असून ते बिबट्याचेच आहेत का, याची खातरजमा सुरू आहे. तसेच परिसरात शोधमोहीम राबवून वन्यप्राण्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे.
वन विभागाने नागरिकांना रात्रीच्या वेळी एकट्याने शेतात किंवा डोंगर परिसरात जाणे टाळण्याचे तसेच जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधण्याचे आवाहन केले आहे. मंगाई डोंगर परिसर वनक्षेत्रालगत असल्याने येथे वन्यप्राण्यांचा वावर अधूनमधून आढळत असला, तरी सलग दुसऱ्यांदा बिबट्याच्या दर्शनाची चर्चा झाल्याने ग्रामस्थ अधिक सतर्क झाले आहेत.

पाऊसही नाही…
आणि प्रकल्पामधील पाणीही नाही…
तालुक्यातील शेतकरी धास्तावला...


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा तालुक्यामध्ये गेले आठ ते दहा दिवस पावसाचा एक थेंबही पडलेला नाही. बहुतांशी शेतकऱ्यांनी भात पेरणीची कामे उरकून घेतली आहेत. मध्यंतरी झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांनी हे केलेले धाडस आता अंगलट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पेरलेले उगवले परंतु ते टिकवून ठेवणे अडचणीचे झाले आहे. पुन्हा एक वेळ पावसाअभावी तापमानात वाढ होऊ लागली आहे. जमिनीतील ओलावा कमी होऊ लागल्याने पेरणी वाया जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.

एकीकडे पाऊस नाही तर दुसरीकडे अलनिनो च्या पार्श्वभूमीवर शासनाने प्रकल्पातील पाणीसाठा फक्त पिण्याच्या वापराकरता आरक्षित जाहीर केला आहे. त्यामुळे शेतीला पाणी आणायचे कुठून ? असा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे.

तालुक्यातील विविध प्रकल्पांमध्ये बऱ्यापैकी पाणीसाठा आहे. परंतु पाणी उचलण्यावर मर्यादा आलेल्या आहेत. तालुक्यामध्ये बारमाही वाहणाऱ्या नद्या असल्यामुळे शेतीच्या पाण्याकरता कुप नलिका, विहिरी यांचा वापर अत्यल्प केला जातो. त्यामुळे त्यांचे प्रमाणही कमी आहे.

येत्या आठवडाभरात पावसाने हजेरी लावली नाही तर सिंचनाच्या पाण्याचे फार मोठे संकट तालुक्यातील शेतकरी वर्गावर येणार आहे अशावेळी शेतकरी पाण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

स्वागतोत्सव…
तालुक्यातला नवागतांचे जंगी स्वागत

शाळांत किलबिलाट सुरू


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

मराठी शाळेचा आज पहिल्या दिनाचे औचित्य साधून  पहिलीमधे प्रवेश घेणाऱ्या मुलांचे जोरदार व वा‌द्यांच्या निनादात जंगी स्वागत करण्यात आले. तालुक्यातील विविध शाळामधे तहसीलदार, गटविकास अधिकारी यासह प्रशासकीय अधिकाऱ्यांनी फुलांचे गुच्छ देवून नवागत विद्यार्थांचे स्वागत केले.

गत दोन दिवसांपासून मराठी शाळांनी नवागतांच्या स्वागताची जय्यत तयारी केली होती. शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, शिक्षक व पालक यामध्ये मग्न होते. ट्रॅक्टर, बैलगाडी फुलांच्या माळांनी चांगली सजवून मुलांना शाळेत आणले जात होते. वाद्याच्या निनादात मुलांनी शाळेत प्रवेश केला. होनेवाडी (ता. आजरा) येथे बैलगाडीतून तर सरोळी (ता. आजरा) येथे ट्रॅक्टरच्या ट्रालीतून विद्यार्थांना प्रशालेत आणण्यात आले. गवसेसह तालुक्यातील अन्य मराठी शाळामधे विद्यार्थांचे जंगी स्वागत झाले. पेरणोली (ता. आजरा) येथे तहसीलदार समीर माने यांनी मुलांना पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. श्री. माने यांनी मार्गदर्शन केले. या. वेळी सरपंच वनश्री देसाई, उपसरपंच संकेत सावंत, ग्रामपंचायत सदस्य संदिप नावलकर, रणजित फगरे, सुनिता कालेकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अविनाश जोशीलकर, मुख्याध्यापक एकनाथ पाटील, धनाजी रावण समिती सदस्य, पालक, शिक्षक उपस्थित होते.

सुलगाव (ता. आजरा) येथील शाळेत निवासी नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई यांनी नवागत विद्यार्थांचे स्वागत केले. विविध शाळामधे नवागताचे स्वागत झाले.

हंदेवाडी शाळेतील सेल्फी पाॉईंट लक्षवेधी

हंदेवाडी येथे सेल्फी पाॉईंट करण्यात आला होता. यामधे नवागत मुलगी म्हणते, मी मराठी शाळेत शिकणार आहे. माझा मराठी शाळेतील प्रवेश निश्चित आहे. हा सेल्फी पॉईंट नवागतांचा आकर्षणाचा विषय ठरला.

उत्तूर शाळांमध्ये नवागत विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत.
५८ विद्यार्थ्यांची नोंदणी.

उत्तूर : केंद्रशाळा व कन्याशाळा उत्तूर येथे नवागत विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना पेन, वह्या, पुस्तके, चॉकलेट तसेच पेढ्यांचे वाटप करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांना गोड शिरा देऊन शैक्षणिक वर्षाचा पहिला दिवस आनंददायी करण्यात आला.कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य शिरीष देसाई, अध्यक्ष सचिन उत्तूरकर, उपाध्यक्ष सचिन पोवार, सरिता जक्कणवर, वर्षा परीट, ग्रामपंचायत सदस्य महेश करंबळी, सविता कुरूणकर, मोहन यादव तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना शिरीष देसाई यांनी शाळांच्या भौतिक सुविधा पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषद निधीतून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही दिली.शाळेतील प्रवेशाबाबत समाधानकारक चित्र दिसून आले. इयत्ता पहिलीत १७ मुले व १७ मुलींनी प्रवेश घेतला असून इयत्ता दुसरी ते सातवीपर्यंत ११ मुले व १३ मुलींनी नवीन प्रवेश घेतला आहे. आगामी १५ ते २० दिवसांत विद्यार्थ्यांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता असल्याचे मुख्याध्यापकांनी सांगितले.

वर्गशिक्षिका अलका मॅडम यांनी तोरणे लावून वर्गांची आकर्षक सजावट केली होती. सेल्फी पॉईंट उभारून विद्यार्थ्यांचे फोटो काढण्यात आले. तसेच प्रत्येक विद्यार्थ्याच्या गणवेशावर नावाचे बॅच लावून आणि कागदी टोप्या देऊन त्यांचा पहिला दिवस संस्मरणीय बनविण्यात आला.

कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक बाळगोंडा कोकितकर यांनी केले. सूत्रसंचालन अनिल बामणे यांनी केले, तर विलास वाईगंडे यांनी आभार मानले. प्रशांत पाटील यांनी विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीची शपथ दिली.

मनसेतर्फे वृक्षारोपण

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त,
महाराष्ट्र नवनिर्माण सेना आजरा  मार्फत वृक्षारोपण करण्यात आले.

वृक्षारोपण करून निसर्ग संवर्धनचा संदेश देण्यात आला.वनरक्षक अधिकारी  श्री. कृष्णा डेळेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी मनसे तालुका अध्यक्ष श्री. आनंदा घंटे,
उपाध्यक्ष श्री. सुशांत पोवार, जिल्हा उपाध्यक्षा  सौ. सरिता सावंत, मनसे विद्यार्थी सेना शहर प्रमुख यश सुतार, मडीलगे शाखा प्रमुख श्री. विनायक घंटे.,श्री. मयूर हरळकर, श्री. वसंत घाटगे.श्री.सागर खोत,श्री. वसंत सावंत, श्री. सुनील पाटील, श्री. चंद्रकांत इंगळे, सौ. संगीता राठोड, कुंडलिक शिंदे, मधुकर, दोरुगडे (वनसेवक), वन्यजीव बचाव पथकाचे अक्षय पाटील , साहिल डेळेकर, समीर केरकर, सौरभ कोंडूस्कर, विनू पताडे
उपस्थित होते.

थोडक्यात  …

१०७ दिवस सुरू असलेले युद्ध अखेर संपुष्टात आले असून यामुळे संपूर्ण जगातून समाधान व्यक्त होत आहे. भारतामधील इंधन टंचाई व वाढलेले तेलाचे दर कमी होण्याची शक्यता आहे.

♦ काळम्मावाडी धरणाचे पाणी झपाट्याने खाली उतरत असून धर्मामध्ये केवळ ८.७९ इतकाच पाणीसाठा आहे.

♦ राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या दहा टक्के हंगामी भाव वाढीला आणखी एक महिन्याची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे राज्यभरातील लाखो प्रवाशांना आणखी महिनाभर वाढीव भाडे दरानेच प्रवास करावा लागणार आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात गॅझेटमध्ये एक लाख ४० हजार कुणबी जातीच्या नोंदी आढळल्या आहेत. राज्य सरकारने या सर्वांना आठ दिवसात जातीचे प्रमाणपत्र द्यावे अशी मागणी जरांगे- पाटील यांनी केली आहे.

छायावृत्त

श्री शिवप्रतिष्ठान हिंदूस्थान, हरपवडे (विभाग -आजरा) यांच्या कडुन गत वर्षाप्रमाणे याही वर्षी ज्या विद्यार्थींना वडिलांचे छत्र हरपले आहे व जे गरजू आहेत अशांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यासाठी आर्थिक सहकार्य हे श्री शिवजन्मोत्सव २०२६ या वर्षीची देणगी मधील शिल्लक रक्कम व तसेच श्री अमोल कोंडूस्कर सर (सोहाळे) यांनी आपल्या मुलाच्या जन्मदिवसा निमित्त जी ५००१ /- रक्कम दिली होती व श्री कमलेश डाबरे (मुंबई) यांनी २५००/- ₹ सामाजिक कार्यासाठी दिली.

या वेळी धारकरी आदर्श हळवणकर,रामराव जाधव, आदित्य सावंत, विनायक पाटील, जीवन कांबळे, तेजस सावंत, संस्कार कांबळे उपस्थित होते.

आजचे पंचांग 

दिनांक : १६ जून २०२६
वार : मंगळवार
माह (अमावस्यांत) : ज्येष्ठ
माह (पूर्णिमांत) : ज्येष्ठ
ऋतु : ग्रीष्म ,,
आयन : उत्तरायण
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथी : द्वितीया (१७ जून रात्री १२.५२ पर्यंत) त्यानंतर तृतीया तिथी
नक्षत्र : आर्द्रा नक्षत्र (सायंकाळी ०४.१२ पर्यंत) त्यानंतर पुनर्वसू नक्षत्र
योग : वृद्धि योग (१७ जून रात्री १२.३४ पर्यंत) त्यानंतर ध्रुव योग
करण : बलवा करण (दुपारी ०२.३९ पर्यंत) त्यानंतर कौलव करण
चंद्र राशी : मिथुन राशी
सूर्य राशी : मिथुन राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : दुपारी ०३.५८ ते सायंकाळी ०५.३७ पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.१३ ते दुपारी ०१.०६
सूर्योदय : सकाळी ०६.०२
सूर्यास्त : सायंकाळी ०७.१६
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

गॅस सिलेंडरच्या आगीतील जखमीचा मृत्यू

mrityunjay mahanews
error: Content is protected !!