mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

बुधवार २७ मे  २०२६

साडेतीनशेहेहून अधिक शेतकऱ्यांच्या हरकती दाखल…
शक्तीपीठाच्या विरोधात तालुक्यातील शेतकरी एकवटला…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात आजरा तालुक्यातील साडेतीनशेहून अधिक शेतकऱ्यांनी आज तहसीलदार आजरा यांच्यामार्फत उपविभागीय अधिकारी भुदरगड यांना हरकती सादर केल्या. आज सकाळी साडेअकरा वाजता संघर्ष समितीचे कॉ. संपत देसाई व तानाजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयासमोर पेरणोली, मसोली, एरंडोळ, देवर्डे, वेळवट्टी, खानापूर इत्यादी बाधित गावातले शेतकरी मोठ्या संख्येने एकत्र आले.

एकच जिद्द शक्तीपीठ रद्द अशा जोरदार घोषणा देत शेतकऱ्यांनी आपल्या हरकती आज सादर केल्या.वैयक्तिक हरकतीचे अर्जात आपल्या शेतजमिनीसह या रस्त्यामुळे पाण्याचे निचरा होण्याचे नैसर्गिक मार्ग बदलले जाणार आहेत. पाण्याचे स्त्रोत आटले जाऊन जमिनी कोरडवाहू होणार आहेत. पर्यावरणाची न भरून येणारी विपरीत परिस्थिती तयार होणार आहे. शेतकरी उध्वस्त होणारच पण याबरोबरच इथला निसर्ग आणि पर्यावरण ही उध्वस्त होणार आहे. कवडीमोल दराने शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन त्या भांडवलदारांच्या घशात घातल्या जाणार आहेत. त्यामुळे प्रसंगी रक्त सांडू पण शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही असा निर्धार तालुक्यातील शक्तीपीठ बाधित शेतकऱ्यांनी केला आहे.

हरकतीचे अर्ज एकत्र करून गाववार स्वतंत्र याद्या बनवून तहसीलदार यांचे प्रतिनिधी तहसीलदार यांचे प्रतिनिधी म्हणून वरिष्ठ कारकून त्यांच्याकडे हरकतीचे अर्ज देण्यात आले. यावेळी जि .प.सदस्य सुधीर देसाई,भीमराव माधव, सर्जेराव देसाई, चंद्रकांत गुरव, किरण गुरव, बाळू जाधव, निवृत्ती कांबळे, दिपाली गुरव, सुभाष देसाई, निवृत्ती फगरे, शंकर पाटील, दिनेश कांबळे, बाळू पाटील, छाया गुरव, शंकर हळवणकर यांच्यासह शक्तीपीठ बाधित गावातील शेतकरी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

इंधन दरवाढ पार्श्वभूमीवर शिवसेनेचे शुक्रवारी रास्ता रोको

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

सरकारच्या नाकर्तेपणामुळे देशामध्ये दोन-तीन दिवसात इंधनामध्ये भरमसाठ दर वाढ करण्यात आली आहे. यामुळे सर्वसामान्य माणसांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. दोन वेळचे अन्न मिळणे सुद्धा मुश्किल झाले आहे. सर्वसामान्यांना इंधन बचतीचे सल्ले देणारे पंतप्रधान ५०-६० गाड्यांचा ताफा घेऊन राज्यांचा दौरा करत आहेत. परदेश दौरा करत आहेत ‌.

या सर्व पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून (उ.बा.ठा.) शुक्रवारी सकाळी संभाजी चौक येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे लेखी निवेदन तहसीलदारांना देण्यात आले आहे.

यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील, तालुकाप्रमुख युवराज पोवार, चंदर पाटील, सुयश पाटील, अमित गुरव, समीर चांद, विजय डोंगरे, महेश पाटील, बिलाल लतिफ यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

गंगा चंद्र साहित्य मंचचा काव्य पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

घाटकरवाडी ता. आजरा येथील गंगा चंद्र साहित्य कला सेवा मंच यांच्या वतीने देण्यात येणारे काव्य पुरस्कार 2026 चा वितरण सोहळा ज्येष्ठ नेते जयवंतराव शिंपी व साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त सलीम मुल्ला उपस्थितीत पार पडला.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन पुस्तक, वृक्ष पूजन व मान्यवरांच्या औक्षण स्वागताने झाले..कार्यक्रमाची प्रस्तावना गंगा चंद्र चे अध्यक्ष तथा रेंज फॉरेस्ट ऑफिसर दत्ता पाटील यांनी केली..प्रथम लहान मुलांच्या काव्यवाचनाच्या विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले .

विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींसाठी विशेष पुरस्कार देण्यात आले त्यामध्येश्री सुभाष शंकर विभुते, सौ. जयश्री निवृत्ती अडकूरकर, घाटकरवाडी य
कु.संजीवनी निवृत्ती खोत, ठाणे त्यांना सन्मानित करण्यात आले.श्रीहरी काव्य पुरस्कार – उषा भोसले, लातूर/ काव्यसंग्रह अंकुर ,जिजाई काव्य पुरस्कार – कल्पना मलये,कणकवली/ काव्यसंग्रह समज उमज सुवर्णसाक्षी पुरस्कार -श्री प्रदीप बडदे, नवी मुंबई / काव्यसंग्रह माणुसकीची अंत्ययात्रा..

आयोजकांतर्फे ओंकार पाटील, मदन देसाई, अस्मिता पुंडपळ, समीर मोरजकर यांनी मनोगत व्यक्त केले.श्रीहरी पाटील यांनी आपल्या विशेष शैलीत कला, लोककला,संस्कार याविषयी उपस्थिताना मार्गदर्शन केले.प्रमुख पाहुणे सलीम मुल्ला, जयवंतराव शिंपी यांनी, एकत्रित कुटुंब पद्धती, नातेसंबंध, साहित्य चळवळ याविषयी भावना व्यक्त केल्या..कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार ‘ गंगाचंद्र’ च्या सचिव सौ. वैष्णवी पाटील यांनी केले. .

जमिनीतील पोषण मूल्य वाढविण्यासाठी शेतकऱ्यांनी हिरवळीची, कंपोष्ट खते, जैविक निविष्ठा वापराव्यात.

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

जमिनीतील पोषण मूल्य वाढविण्यासाठी सेंद्रीय कर्ब महत्वाचे आहे. शेतकऱ्यांनी हिरवळीची, कंपोष्ट खते, जैविक निविष्ठा वापराव्यात. एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाची गरज आहे. उत्पादन वाढीसाठी फेरपालट करण्याबरोबर खताचा संतुलीत वापर करणे आवश्यक आहे. कृषी विज्ञान केंद कणेरीचे विशेषतज्ञ राजेंद्र वावरे यांनी सांगीतले.

तालुका कृषी कार्यालय, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) कोल्हापूर अंतर्गत बहिरेवाडी (ता. आजरा) येथे खरीप हंगाम पूर्व शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम झाला. खतांचा संतु‌लित वापर व एलनिनो मोहीम, सोयाबीन, भात, भुईमूग लागवड तंत्रज्ञान या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. सरपंच रत्नजा सावंत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. पंचायत समिती सदस्य विकास चाथे प्रमुख उपस्थित होते.

आजरा तालुका कृषी अधिकारी भूषण पाटील यांनी महाडीबीटी, पीएम किसान, पिक स्पर्धा त्याचबरोबर कृषी विभागाच्या विविध योजनांची माहीती दिली. कृषी विज्ञान केंद्र कणेरीचे पांडुरंग काळे यांनी सोयाबीन, भात बीजप्रक्रियेचे महत्व स्पष्ट केले. सोयाबीन लागवड पध्दतीबद्दल माहीती दिली. सुनील कुमार यांनी कृषी विज्ञान केद्र कणेरी मठाच्या कामाची माहीती दिली. श्री. चाथे यांनी शेतकऱ्यांनी माती परीक्षण करून पिक घेण्याचे आवाहन केले. या वेळी मंडळ कृषी अधिकारी विजयसिंह दळवी, उपकृषी अधिकारी उत्तरचे पी. जी पाटील, सहाय्यक कृषी अधिकारी एस. बी. गडकरी, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा अमित यमगेकर, कृषी सेवक ओमकार संकेश्वरी, दऱ्याप्पा पाटील, शशिकांत शेवाळे, वसंत मिसाळ, शंकर पाटील, अर्जुन कुंभार, गोपाळ सावंत आदीसह शेतकरी उपस्थित होते.

नविन चाफवड़े येथे ग्रामस्थ व तरुण वर्गाकडून जलजीवन मिशन अंतर्गत असलेल्या जॅकवेल ची साफसफाई

आजरा: मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

नविन चाफवड़े येथे उन्हाळ्यामुळे पाणी स्त्रोत कमी होवू नये व झाडांचा पालापाचोळा साठून / कुजून साथीचे आजार पसरू नये व झऱ्यातून येणाऱ्या पाण्याचा प्रवाह सुरळीत रहाण्यासाठी पावसाळ्याच्या धर्तीवर पाण्याच्या प्रवाहाची साफसफाई व जॅकवेल व परिसरातील झुडपे तोडून स्वच्छता करण्यात आली.

यावेळी नविन चाफवडे गाव कमिटी अध्यक्ष पांडूरंग धडाम, माजी सरपंच विलास धडाम, प्रकाश मस्कर, जानबा देवलकर, योगेश घेवडे, गणपती राणे, शिवाजी घूरे, अशोक धडाम व सर्व ग्रामस्थ,तरुण वर्ग उपस्थित होते.

आजरा महाविद्यालयात बारावीतील यशवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा उत्साहात

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा महाविद्यालय, आजरा येथे इयत्ता बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष अशोकअण्णा चराटी, उपाध्यक्ष विलास अण्णा नाईक, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अनिल देशपांडे, सचिव रमेश अण्णा कुरुणकर, सन्माननीय संचालक विजयकुमार पाटील, संचालक के. व्ही. येसने सर, प्राचार्य डॉ. एन. सादळे, उपप्राचार्य डी. पी. संकपाळ, पर्यवेक्षक मनोजकुमार पाटील तसेच अधीक्षक योगेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

इयत्ता बारावी विज्ञान शाखेत कुमारी नवार राखी राजू (८३.५०%), कुमारी परुळेकर भक्ती  ( ८२.६७%) आणि कुमारी गावडे आदिती यशवंत ( ८०.६७%) यांनी प्रथम तीन क्रमांक पटकावत यश संपादन केले.

वाणिज्य शाखेत कुमार इंगळे पियुष बाळाराम ( ८०.८३%), कुमारी रेडेकर साक्षी संजय ( ७८.५०%) आणि कुमार बालके सुशील नामदेव ( ७८.३३%) यांनी गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये स्थान मिळविले.

कला शाखेत कुमारी कळसूरे वंदना भागोजी ( ७०.८३%), कुमारी शिरसागर सिद्धिका गुरुपद (६६.१७%) आणि कुमारी कांबळे माधुरी उदय (६४.६७%) यांनी विशेष यश मिळवले.
बँकिंग फायनान्शियल सर्व्हिसेस अँड इन्शुरन्स विभागात कुमारी केरकर यशश्री दिगंबर ( ८६.००%), कुमारी सुतार सानिका साताप्पा ( ८५.५०%) आणि कुमारी दोरुगडे महेश्वरी सुभाष ( ८१.१७%) यांनी उल्लेखनीय कामगिरी नोंदवली.
इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी विभागात कुमार कांबळे अनिकेत ज्ञानदेव ( ७१.३३%), कुमार मराठे विघ्नेश संतोष ( ७१.००%) आणि कुमार कांबळे प्रणव चंद्रकांत ( ६७.८३%) यांनी यश संपादन केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी उपप्राचार्य डी. पी. संकपाळ यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. गुणवंत विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून यशामागील मेहनत, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य याविषयी भावना व्यक्त केल्या.अध्यक्षीय मनोगतात डॉ. अनिल देशपांडे यांनी विद्यार्थ्यांना भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा देत परिश्रम, सातत्य आणि सकारात्मक दृष्टिकोन यांचे महत्त्व अधोरेखित केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रत्नदीप पवार यांनी केले, तर आभार प्रदर्शन एम. एस. पाटील यांनी केले.

आयपीएल न्यूज

बंगळूरूने गुजरातचा ९२ धावांनी पराभव करत पहिल्या क्वालिफायर लढतीत विजय मिळवला आहे. यामुळे बंगळुरु अंतिम फेरीत पोहोचला आहे. ३३ चेंडू ९३ धावा करणारा रजत पाटीदार याला सामनावीर घोषित करण्यात आले.

आज इलिमिनेटर सामन्यात राजस्थान व हैदराबाद यांच्यात लढत होणार आहे.

आजचे पंचांग

दिनांक : २७ मे २०२६
वार : बुधवार
माह (अमावस्यांत) : अधिक ज्येष्ठ
माह (पूर्णिमांत) : अधिक ज्येष्ठ
ऋतु : ग्रीष्म
आयन : उत्तरायण
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथी : एकादशी (सकाळी ०६.२१ पर्यंत) त्यानंतर द्वादशी तिथी
नक्षत्र : चित्रा नक्षत्र (२८ मे सकाळी ०८.०७ पर्यंत) त्यानंतर स्वाती नक्षत्र
योग : व्यातीपात योग (२८ मे पहाटे ०३.२४ पर्यंत) त्यानंतर वरीयान योग
करण : विस्ती भद्रा करण (सकाळी ०६.२१ पर्यंत) त्यानंतर भाव करण
चंद्र राशी : कन्या राशी (सायंकाळी ०६.५९ पर्यंत) त्यानंतर तूळ राशी
सूर्य राशी : वृषभ राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : दुपारी १२.३५ ते दुपारी ०२ .१३ पर्यंत
सूर्योदय : सकाळी ०६.०२
सूर्यास्त : सायंकाळी ०७.१०
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत

महत्त्वाच्या बातम्या

♦ इराण – अमेरिका युद्ध थांबण्याची अपेक्षा केली जात असतानाच अमेरिकेकडून नव्याने हवाई हल्ले सुरू करण्यात आले आहेत. प्रत्युत्तरादाखल इराणही सक्रिय झाले आहे.

आजरा तालुक्यातील घाटकरवाडी येथे अत्याधुनिक हत्ती संगोपन केंद्र उभारण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री प्रकाशराव आबिटकर यांनी दिली. याबाबतच्या आराखड्याचे सादरीकरण नुकतेच करण्यात आले.

♦ कच्च्या तेलाच्या किमतीतील वाढ झाल्याने देशांतर्गत शेअर बाजारात लक्षणीय घसरण झाली असून मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ४७९.२६ अंकांनी घसरला आहे.

डोक्यावर ओझं अन् मनात जगण्याची जिद्द’: एका कष्टकऱ्याची संघर्षगाथा

​”जगण्यासाठी प्रत्येकालाच संघर्ष करावा लागतो, पण काही लोकांचा संघर्ष हा केवळ जगण्यासाठी नसून आपल्या माणसांच्या स्वप्नांना पंख देण्यासाठी असतो…”
​फोटोमध्ये दिसणारा हा परप्रांतीय व्यावसायिक मजूर त्याच संघर्षाचे एक जिवंत प्रतीक आहे. डोक्यावर बेकरीच्या पदार्थांचा—बटर, बिस्किटे, खारी—मोठा टोपला, खांद्याला अडकवलेली वजनदार पोती आणि पायात साध्या चपला. हा केवळ एक माल विकणारा विक्रेता नाही, तर तो आपल्या कुटुंबाचा आधारस्तंभ आहे.

मैलोन्मैलांचा प्रवास आणि अथांग कष्ट सोसत
​आपल्या पोटाची आणि कुटुंबाची भूक भागवण्यासाठी हा माणूस दररोज कमीत कमी १० ते १५ किलोमीटर पायपीट करतो. ऊन असो, वारा असो वा पाऊस, गल्लीबोळांतून फिरत “खारी-टोस्ट-बटर” अशी साद घालत त्याचा दिवस सुरू होतो. डोक्यावरचे ओझे जितके जड, तितकीच त्याच्यावर असलेल्या कौटुंबिक जबाबदाऱ्याही मोठी असतात. स्वतः मैलोन्मैल चालतो, जेणेकरून गावाकडे असणाऱ्या त्याच्या मुलांचे भविष्य स्थिर व्हावे, त्यांना चांगले शिक्षण मिळावे.

​आजकालच्या जगात शॉर्टकट शोधणाऱ्यांची कमतरता नाही, पण अशा परिस्थितीतही घामाच्या प्रत्येक थेंबातून आणि प्रामाणिक कष्टाने आपली उपजीविका करणारी ही माणसं खऱ्या अर्थाने वंदनीय आहेत. परप्रांतीय असला तरी या मातीने त्याला आणि त्याच्या कष्टाला सामावून घेतले आहे. अशा कष्टाळू माणसांकडे केवळ एक मजूर म्हणून न बघता, त्यांच्या स्वाभिमानाचा आणि जिद्दीचा आदर करायला हवा.

​कधीकधी आपल्या दारात जेव्हा अशी कष्टाळू माणसं येतात, तेव्हा त्यांच्याशी चार शब्द प्रेमाचे बोलणे किंवा त्यांच्याकडून वस्तू घेताना दोन रुपयांसाठी हुज्जत न घालणे, हीच त्यांच्या कष्टाला दिलेली खरी पावती ठरेल.​”श्रमाची किंमत पैशात करता येईलही, पण त्या श्रमामागे असणाऱ्या कुटुंबाच्या ओढीची आणि निष्ठेची किंमत कधीच करता येत नाही.”

​दररोज एवढा खडतर प्रवास करून हसतमुखाने उपजीविका करणाऱ्या या खऱ्याखुऱ्या ‘कष्टकऱ्याला’ आणि त्याच्या जिद्दीला मनापासून सलाम!

शब्दांकन व छायाचित्र….कृष्णा दावणे
(कलाकलाक्षक, व्यंकटराव प्रशाला)

 

संबंधित पोस्ट

सर्वसामान्यांच्या चुली पेटवण्याचे काम आम. आबिटकर यांनी केले

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

लोकशाहीर द. ना. गव्हाणकर स्मारकासाठी दोन कोटींची तरतूद करणार :नामदार मुश्रीफ…… यासह आजरा स्थानिक ताज्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!