सोमवार ११ मे २०२६


गडहिंग्लज बस प्रवाशांच्या प्रतीक्षेत तर
कोल्हापूरचे प्रवासी बसच्या प्रतीक्षेत...

जत्रा-यात्रांसह लग्नसराईचा हंगाम सुरू असल्याने एसटी महामंडळाचा देखील हंगाम सुरू झाला आहे. परंतु नियोजनाच्या अभावामुळे गडहिंग्लज मार्गावरील बस फेऱ्या प्रवाशांच्या प्रतीक्षेत तर कोल्हापूर मार्गावरील प्रवासी बस फेऱ्यांच्या प्रतीक्षेत अशी विचित्र अवस्था सध्या निर्माण होऊ लागले आहे.
आजऱ्यासह गडहिंग्लज आगाराच्या बस फेऱ्या आजरा- गडहिंग्लज मार्गावर मोठ्या प्रमाणावर आहेत. याच मार्गावर खाजगी वाहतूकही जोरात सुरू असल्याने रिकाम्या बस बऱ्याच वेळा धावताना दिसतात. याउलट आजरा – कोल्हापूर मार्गावरील प्रवासी बसच्या प्रतीक्षेत असलेले वारंवार पहावयास मिळतात. स्थानिक बस फेऱ्यांचे वेळापत्रक कोलमडले असल्याने सावंतवाडी, वेंगुर्ला येथून येणाऱ्या बस फेऱ्यातून प्रवास करणे म्हणजे पूर्ण प्रवास उभे राहून करण्याची तयारी ठेवणे अशी गर्दीमुळे अवस्था निर्माण झाली आहे.
आगाराकडून आजरा- कोल्हापूर नॉनस्टॉप फेऱ्या चालू कराव्यात अशी मागणी प्रवासी वर्गाकडून होत असताना याकडे फारसे लक्ष व्यवस्थापनाकडून दिले जात नाही असे दिसते. अलीकडे तापमान वाढीचा परिणाम बस वारंवार खराब होत असल्याचाही अनुभव प्रवाशांना येऊ लागला आहे. एखादी बस कोठे बंद पडेल आणि बस बदलून प्रवास करण्याचे संकट कधी ओढवेल याची खात्री देता येत नाही.
एकंदर आजरा आगाराने आता कारभारात सुधारणा करण्याबरोबरच कोल्हापूर मार्गावर नॉनस्टॉप बस फेऱ्या दिवसभर सुरू करण्याची गरज प्रकर्षाने पुढे येऊ लागली आहे.

प्रवाशाचा २३ लाखांचा ऐवज मिळवून दिला :
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कामगिरी

श्री. धनाजी बाबुराव कांबळे व त्यांच्या पत्नी सौ. संगीता धनाजी कांबळे रा. पेरणोली ता.आजरा जि. कोल्हापूर या मुंबई येथे राहणेस असुन त्या आज रोजी त्यांचे मुळ गांवी पेरणोली ता. आजरा येथे येत असताना खाजगी ट्रॅव्हल्स मधुन आजरा येथे सकाळी उतरले. ते घरी गेलेनंतर त्यांच्या एकुण सहा बॅगांपैकी एक बॅग मिळुन आली नाही. त्या बॅगमध्ये त्यांचे एकुण पंधरा तोळे वजनाचे दागीने, एक लाख रुपये रोख रक्कम तसेच इतर मौल्यावन वस्तु असलेने त्या घाबरलेल्या अवस्थेत आजरा पोलीस ठाणे येथे आल्या. त्यांचेकडे चौकशी करुन त्यांची तक्रार नोंदवित असतानाच त्यांनी दिलेल्या प्राथमिक माहिती नुसार व त्यांनी वर्णन केलेला खाजगी ट्रॅव्हल्सचा गाडी नंबर, प्रवासाची वेळ, गाडीतुन उतरलेले ठिकाण, बॅगचे वर्णन याची संपुर्ण माहिती घेवुन सपोनि शितलकुमार डोईजड यांनी आजरा पोलीस ठाणे येथे तपासाकामी आलेले स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार समीर कांबळे व आजरा पोलीस ठाणेकडील वैभव गवळी यांना सदर ठिकाणी तात्काळ पाठविले.
सदरचे ठिकाण हे आजरा शहरातील मुख्य चौक असुन रहदारीचा परिसर आहे. सदर ठिकाणचे परिसरातील सी.सी.टी.व्ही ची पाहणी करुन बॅगेचा शोध घेत असताना, जवळच असले दुकानाचे बाहेर बेवारस अवस्थेत मिळुन आली. त्यावेळी सदरचा प्रकार चोरीचा नसलेची खात्री झाली. सदरची बॅग तात्काळ हस्तगत केलेने सदर महिलेचे एकुण पंधरा तोळे सोन्याचे दागीने, बॅगेत असलेले एक लाख रुपये तसेच इतर मौल्यवान वस्तु खात्री करुन सुखरुप त्यांचे ताबेत देण्यात आले आहे.
स्थानिक गुन्हे शाखा व आजरा पोलीस ठाणे यांनी केलेल्या कामगीरीमुळे आजरा येथील ग्रामस्थ, व्यापारी यांनी कोल्हापूर पोलीसांचे कौतुक व अभिनंदन केले आहे.

उत्तुर येथील रोजगार मेळाव्यात१९ युवकांना नोकरीची संधी
उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
स्व. अनंतराव आजगावकर यांच्या प्रथम स्मृतिवर्षानिमित्त विद्यापीठ विकास मंच व स्वामी समर्थ सहकारी दुग्ध व्यावसायिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रोजगार मेळावा नुकताच उत्तूर विद्यालय, उत्तूर येथे उत्साहात संपन्न झाला.
मेळाव्याचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य शिरीष देसाई, लोकनियुक्त सरपंच किरण आमनगी, उपसरपंच शिवाजी लोकरे, सचिन उतुरकर, उत्तूर विद्यालयाचे मुख्याध्यापक रवींद्र महापुरे तसेच प्रकाश जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
या रोजगार मेळाव्यासाठी ३०० हून अधिक पदवीधर युवक-युवतींनी नोंदणी केली होती. त्यापैकी ९४ उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखतींमध्ये सहभाग नोंदवला. पुणे येथील वॉस ऑटोमॅटिक कंपनीकडून १४ जणांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. तसेच बँकिंग क्षेत्रात एका उमेदवाराची निवड करण्यात आली. कोल्हापूर येथील प्रथम फाउंडेशन यांच्या माध्यमातून घेतलेल्या मुलाखतींमधून आणखी ४ उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. अशा प्रकारे एकूण १९ जणांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली.
ग्रामीण भागात प्रथमच अशा प्रकारचा रोजगार मेळावा आयोजित करण्यात आल्याने युवकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. मेळावा यशस्वी करण्यासाठी विद्यापीठ विकास मंचचे निमंत्रक स्वागत परुळेकर यांच्यासह शिवाजी आडावकर, दिगंबर यादव, अभिषेक रोडगी, विक्रांत तवंदकर व अभिनंदन परुळेकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

कवी अनुज केसरकर ‘दिनकर सेवा पुरस्कारा’ने गौरव

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
मराठी साहित्य आणि कला क्षेत्राच्या संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या ‘मराठी साहित्य व कला सेवा’ संस्थेचा १० वा वर्धापन दिन सोहळा शनिवारी (दि. ९ मे २०२६) प्रभादेवी /मुंबई येथे पार पडला. मुंबई स्थित आजरेकर साहित्यिक, कवी आणि समाजसेवक अनुज केसरकर यांचा त्यांच्या सामाजिक आणि साहित्यिक क्षेत्रातील बहुआयामी योगदानाबद्दल विशेष सत्कार करण्यात आला.
मंडळाच्या सचिव डॉ. मीनाक्षी पाटील प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. तसेच शिवसाहित्यिक डॉ. हेमंत राजे गायकवाड आणि लोकशाहीर व अभिनेते नंदेश उमप यांचीही प्रमुख उपस्थिती लाभली. संस्थापक गुरुदत्त वाकदेकर यांचा यामध्ये विशेष पुढाकार होता. साहित्य आणि कला क्षेत्रातील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नमिता आफळे यांनी केले. तर कार्यक्रमाच्या आयोजनासाठी श्रद्धा कानडे, विनय कांबळे आणि प्रेरणा साळकर यांनी समन्वयक म्हणून विशेष परिश्रम घेतले

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत मलिग्रे ग्रामपंचायतीला भेट

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान २०२५-२६ अंतर्गत पंचायत समिती रत्नागिरी जि. रत्नागिरी कडील तालुकास्तरीय मूल्यांकन समितीने मलिग्रे ग्रामपंचायतीला भेट देऊन प्रत्यक्ष राबविणेत आलेल्या उपक्रमांची पाहणी केली.
यामध्ये घरकुल, पांणंद रस्ते, स्मशानशेड, शाळा, अंगणवाडी, आरोग्य केंद्र, वृक्षारोपण, रेन वॉटर हार्वेस्टिंग, सौर ऊर्जा, सिसिटीव्ही ई ची पाहणी केली . यावेळी समिती मध्ये रत्नागिरीचे गटविकास अधिकारी चेतन शेळके, बालविकास प्रकल्प अधिकारी केदार चव्हाण,अक्षय शिंदे कृषी अधिकारी,नारायण पवार विस्तार अधिकारी उपस्थित होते. सर्व केलेल्या उपक्रमाचे कौतुक व समाधान व्यक्त केले.
यावेळी पंचायत समिती सदस्य समीर पारदे, गटविकास अधिकारी आजरा विलास पाटील प्रमुख उपस्थिती होती.समिती चे स्वागत प्रशासक शारदा गुरव व सर्व प्रशासकीय समिती सदस्य यांनी केले. आभार व सर्व अभियानाचे सादरीकरण ग्रामपंचायत अधिकारी धनाजी पाटील यांनी केले.
आजचे पंचांग
दिनांक : ११ मे २०२६
वार : सोमवार
माह (अमावस्यांत) : वैशाख
माह (पूर्णिमांत) : ज्येष्ठ
ऋतु : ग्रीष्म
आयन : उत्तरायण
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथी : नवमी तिथी (दुपारी ०३.२४ पर्यंत) त्यानंतर दशमी तिथी
नक्षत्र : शततारका नक्षत्र (१२ मे रात्री ०१.२८ पर्यंत) त्यानंतर पूर्वाभाद्रपदा नक्षत्र
योग : इन्द्र योग (१२ मे रात्री ०१.०३ पर्यंत) त्यानंतर वैधृति योग
करण : गराजा करण (दुपारी 03:24 पर्यंत) त्यानंतर वाणीजा करण
चंद्र राशी : कुंभ राशी
सूर्य राशी : मेष राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : सकाळी ०७.४४ ते सकाळी ०९.२१ पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.०९ ते दुपारी ०१.०१
सूर्योदय : सकाळी ०६.०७
सूर्यास्त : सायंकाळी ०७.०३
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत

आयपीएल न्यूज
बंगळूर विरुद्ध मुंबई या रोमहर्षक सामन्यात बंगळुरुने शेवटच्या चेंडूत विजय मिळवून गुण तक्त्यात पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे. मुंबई आणि लखनौ संघ सद्यस्थितीत जवळजवळ स्पर्धेबाहेर पडले आहेत. गोलंदाज भुवनेश्वर कुमार याला सामनावीर घोषित करण्यात आले.
गुण तक्ता…
पहिले पाच संघ
१. बंगळूरु १४ गुण
२. हैदराबाद १४ गुण
३. गुजरात १४ गुण
४.पंजाब १३ गुण
५.चेन्नई व राजस्थान प्रत्येकी १२ गुण


