गुरुवार ३० एप्रिल २०२६


वकील असल्याची बतावणी करून ३०,५००/- रुपयांचा गंडा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आपण सरकारी वकील आहोत असे सांगून नोकरीचे अमिष दाखवण्याबरोबरच घर भाड्याने पाहिजे असे सांगत देवकांडगाव या.आजरा येथील जनार्दन आबासो देसाई यांची ३०५००/- रुपयांची फसवणूक करून अज्ञाताने पोबारा केल्याची घटना घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, एका अज्ञात इसमाने आपण सरकारी वकील असल्याचे सांगत जनार्दन देसाई यांना आपणाला घर भाड्याने हवे आहे व आपल्या ओळखी असून आपण आपणाला नोकरीला लावतो असे सांगून त्यांच्याकडून बाथरूम चे मटेरियल आणण्यासाठी १७०००/- रुपये रोख, १२८००/- रुपयांचा मोबाईल व सिम कार्ड घेऊन पोबारा केला.
याबाबतची फिर्याद जनार्दन देसाई यांनी आजरा पोलिसात दिली असून पोलीस हवालदार पांडुरंग येलकर पुढील तपास करीत आहेत.

उदयराज पवार यांना पेरणोलीत तर दौलती पाटील यांना कोरिवड्यात धक्का…
पोटनिवडणुकीत विरोधकांची बाजी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुक्यातील पेरणोलीत शिंदे शिवसेना, भाजप व स्वाभिमानी संघटनेच्या सौ. वनश्री रवींद्र देसाई सरपंच पदासाठी निवडून आल्या तर कोरीवडे येथे राष्ट्रवादी व शिंदे शिवसेनेची पिछेहाट होत भाजप पुरस्कृत महादेव युवा आघाडीचे विवेक पाटील विजयी झाले.येथे दामाजी पाटील ( आजोबा) व विवेक पाटील (नातू) अशी चुरशीची लढत होत नातवाने आजोबांचा पराभव केला. या निकालामुळे पेरणोलीत पंचायत समितीचे माजी सभापती उदयराज पवार व कोरिवड्यात तालुका खरेदी विक्री संघाचे माजी उपाध्यक्ष दौलती पाटील यांना धक्का बसला आहे.
पेरणोली,कोरीवडे ग्रामपंचायतीत सरपंच पदासाठी निवडणूक झाली.पेरणोलीत एका जागेसाठी ४ महिला रिंगणात होत्या. यामध्ये आजरा कारखान्याचे संचालक उदयराज पवार यांच्या पत्नीचा पराभव झाला तर कोरीवडे येथे दुरंगी लढत झाली. राष्ट्रवादी व शिंदे गटाला येथे पराभव पत्करावा लागला तर भाजपने विजय मिळवला.पेरणोलीत सर्वसाधारण महिला तर कोरीवडे येथे इतर मागासवर्गीय पुरुष असे आरक्षण होते.

आजरा तालुक्यातील बहिरेवाडी व धामणे येथे सदस्य पदासाठी पोटनिवडणूक झाली.
ग्रामपंचायत निवडणूक निकाल असा
पेरणोली
वनश्री देसाई – ६८२ ( विजयी – सरपंच ),राजश्री पवार – ६५७,संजीवनी नावलकर – १५१,शितल हळवणकर – २० ,नोटा – १०
कोरीवडे
विवेक पाटील – ३७४ ( विजयी – सरपंच )
दामाजी पाटील – २७९ व नोटा – ०२
बहिरेवाडी
प्रिती कांबळे – 273 २७३ ( विजयी ),,मंगल आयवाळे – २६१ ,नोटा – ८

धामणे
पांडुरंग मगदूम – २९३ (विजयी सदस्य, राष्ट्रवादी, शिवसेना शिंदे व भाजप)शंकर लोकरे -१२७ व नोटा – ०६
निवडणूक निकालानंतर विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी आतषबाजी , गुलालाची उधळण व घोषणाबाजीसह जोरदार जल्लोष केला.

सोहाळे येथे महालक्ष्मी यात्रा उत्साहात…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
सोहाळे ता.आजरा येथे श्री महालक्ष्मी यात्रा उत्साहात पार पडली हजारो भाविकांनी यात्रेनिमित्त सोहाळे येथे भेट देऊन विविध कार्यक्रमांमध्ये सहभाग नोंदवला.
बुधवारी पहाटेपर्यंत लक्ष्मी खेळवण्याचा कार्यक्रम सुरू होता. त्यानंतर बळ देण्यासह देवीला नैवेद्य, सुवासिनी वाढणे, देवीची ओटी भरणे व त्यानंतर स्नेहभोजनाचा कार्यक्रम पार पडला. सर्वच कार्यक्रमांना भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. बुधवारी रात्री उशिरापर्यंत जेवणावळींचा कार्यक्रम सुरू होता. यात्रा कालावधीत दुचाकी व चारचाकी वाहने मोठ्या संख्येने दाखल झाल्याने काही कालावधी करता वाहतुकीची कोंडी झाली होती.
यात्रा कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. यात्रा कमिटीने यात्रेचे नेटके नियोजन केले होते.

तहसील कार्यालयात आज ‘माझे गाव आरोग्य संपन्न गाव’ कार्यशाळा
आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आज गुरुवार दिनांक ३० रोजी सकाळी ११.०० वाजता तहसीलदार कार्यालय सभागृह आजरा येथे “माझे गाव आरोग्य संपन्न गाव” कार्यशाळा आयोजित केली आहे. तसेच आजरा तालुक्यातील टीबी मुक्त ग्रामपंचायत यांना प्रमाणपत्र आणि शील्ड वाटप कार्यक्रम आयोजित केला आहे.या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य उपस्थित राहणार आहेत.अशी माहिती
तालुका आरोग्य अधिकारी
पंचायत समिती आजरा यांनी दिली आहे.

संस्कार तेजमचे यश ; सामान्यज्ञान स्पर्धेत तालुक्यात द्वितीय

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
रायजर्स ट्रेक फाउंडेशन, महाराष्ट्र यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य राज्यस्तरीय सामान्यज्ञान स्पर्धेत आजरा येथील व्यंकटराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्याने नेत्रदीपक यश संपादन केले आहे. विद्यालयातील इयत्ता ९ वी मधील विद्यार्थी संस्कार संजय तेजम याने या स्पर्धेत तालुकास्तरावर द्वितीय क्रमांक पटकावून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
यावेळी प्राचार्य श्री. एम. एम. नागुर्डेकर यांनी संस्कारचे अभिनंदन करून त्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच पर्यवेक्षिका सौ. व्ही. जे. शेलार आणि वर्गशिक्षिका सौ. ए. डी. पाटील यांनीही संस्कारच्या मेहनतीचे व यशाचे कौतुक केले.


आजचे पंचांग
दिनांक : ३० एप्रिल २०२६
वार : गुरुवार
माह (अमावस्यांत) : वैशाख यज्ञ
माह (पूर्णिमांत) : वैशाख
ऋतु : ग्रीष्म
आयन : उत्तरायण
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथी : चतुर्दशी (रात्री ०९.१२ पर्यंत) त्यानंतर पौर्णिमा तिथी
नक्षत्र : चित्रा नक्षत्र (१ मे रात्री ०२.१६ पर्यंत) त्यानंतर स्वाती नक्षत्र
योग : वज्र योग (रात्री ०८.५४ पर्यंत) त्यानंतर सिद्धि योग
करण : गराजा करण (सकाळी ०८.२९ पर्यंत) त्यानंतर वाणीजा करण
चंद्र राशी : कन्या राशी (दुपारी ०१.१३ पर्यंत) त्यानंतर तूळ राशी
सूर्य राशी : मेष राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : दुपारी ०२.१२ ते दुपारी ०३.४८ पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.१० ते दुपारी ०१.०१
सूर्योदय : सकाळी ०६.१२
सूर्यास्त : सायंकाळी ०६.५९
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत

आयपीएल न्यूज
मुंबई विरुद्ध हैदराबाद सामन्यांमध्ये मुंबईने 224 इतकी मोठी धावसंख्या उभारून हैदराबादने १८.४ षटकात धावसंख्या पूर्ण केल्याने मुंबईची साडेसाती कायम राहिली आहे ३० चेंडूत ६५ नाबाद धावा करणाऱ्या हेन्रीच क्लासेस याला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.
आजचा सामना :-
गुजरात विरुद्ध बंगरूळु
वेळ : सायंकाळी ७.३० पासून
गुण तक्ता- पहिले चार संघ
१. पंजाब – १३ गूण
२. बंगळुरू – १२ गुण
३ हैदराबाद – १२ गुण
४. राजस्थान – १२ गुण
ऑरेंज कॅप अभिषेक शर्मा – हैदराबाद नऊ सामन्यात ४२५ धावा
पर्पल कॅप ईशान मलिंगा – हैदराबाद नऊ सामन्यात १५ बळी


