mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

सोमवार दि. २३ मार्च २०२६

तरुणांचे टोळके विविध गुन्ह्यात
लवकरच होणार उलगडा…?

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

केवळ चैनीसाठी व व्यसनांसाठी शहरांमध्ये घरफोड्या करणे, दुचाकी चोऱ्या करणे यासह विविध गुन्ह्यात अडकलेल्या तरुणांना जेरबंद करण्याची मोहीम जिल्हा पोलीस दलाच्या एका विभागाकडून सुरू असून यामध्ये पोलिसांना तपासात यश मिळाले असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

गेल्या कांही दिवसांपासून शहर व परिसरात होणाऱ्या घर फोड्या, दुचाकी चोऱ्या इत्यादी गुन्ह्यांसह विविध गुन्हे हे पोलिसांच्या दृष्टीने डोकेदुखी ठरले आहेत.

पोलिसांनी याप्रकरणी खबऱ्यामार्फत ठिकठिकाणी सापळे रचले असून एक दोन दिवसात या सर्व धक्कादायक प्रकरणाचा पर्दाफाश होणार आहे.

शिरसंगीत हत्तीचा धिंगाणा, स्कूलबस केली पलटी
चारचाकीचेही केले नुकसान, पिकात धुडघूस


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

सिरसंगी ता आजरा येथील परिसरात वावरत असलेला टस्कर चांगलाच आक्रमक झाला आहे. शनिवारी रात्री हत्तीने थेट गावात प्रवेश करून स्कूल बस पलटी करण्याबरोबरच एका ओम्नी कारचे नुकसान तर केलेच परंतु त्याचबरोबर आजूबाजूच्या केळीच्या,फणसांच्या झाडांचेही मोठे नुकसान केले आहे.

शनिवार (ता.२१) मध्यरात्री टस्कराने स्कूल बस पलटी करून काचा फोडल्या. मारुती ओमणीचेही नुकसान केले आहे. पहाटेच्या दरम्यान या परिसरातील फणस व केळीची झाडेही मोडून टाकली. गेले सहा महीने तो पिकांची नुकसान करीत आहे.

सिरसंगी परिसरानजीकच्या जंगलात टस्कराने मुक्काम ठोकला आहे. तो जंगलातून सायंकाळच्या सुमारास शेतात उतरतो व पिकांची नुकसान करतो. त्याची नेहमीचाच शिरस्ता झालेला आहे. त्याच्या उपद्रवाने शेतकरी हैराण झालेले असून त्याचा तातडीने बंदोबस्त करावा. अशी मागणी ते करीत आहेत. सिरसंगी गावच्या प्रवेशाला स्कूलबसच्या स्थानिक चालकाने नेहमीप्रमाणे स्कूल बस उभी केली होती. ही स्कूलबस गडहिंग्लज येथील एका संस्थेची आहे. मध्यरात्री टस्कर गावा जवळ आला. त्यांने स्कूल बस पलटवून टाकली व तिचे नुकसान केले.

बाळासाहेब कुपेकर यांचे निधन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

माजी विधानसभा अध्यक्ष कै. बाबासाहेब कुपेकर यांचे कनिष्ठ बंधू बापूसाहेब उर्फ बाळासाहेब रखमाजीराव कुपेकर/ देसाई यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने काल रविवारी सायंकाळी निधन झाले. दौलत साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष व राजा शिवछत्रपती महाविद्यालयाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी यापूर्वी धुरा सांभाळली आहे. डॉ. शिवराज कुपेकर आणि संगणक तज्ञ रविराज कुपेकर यांचे ते वडील होत .आज सोमवारी सकाळी साडेदहा वाजता मुळगाव कानडेवाडी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

चित्री प्रकल्प स्थळी जलदिन…

परिसराची केली स्वच्छता 

आजरा : मृत्युंजय महान् यूज वृत्तसेवा 

जलस्त्रोत प्रदुषण विरहीत ठेवण्याची आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे. त्याचबरोबर पाण्याचा जपून वापर करणे ही काळाची गरज आहे. असे प्रतिपादन पर्यावरण अभ्यासक व जलयोध्दा उदय गायकवाड यांनी केले. चित्री प्रकल्प स्थळी जलदिनानिमित्त आयोजित स्वच्छता मोहिमेच्या वेळी ते बोलत होते.
या वेळी चित्री ॲडव्हेंचर, सारथी चॅरिटेबल ट्रस्ट,कृष्णात पर्यावरण मंडळ, सह्याद्री ॲडव्हेंचर, पाटबंधारे विभाग व शिवराज विद्यासंकुल गडहिंग्लज याच्यावतीने चित्री प्रकल्पाच्या परिसराची स्वच्छता व परिक्रमेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्री. गायकवाड यांनी मार्गदर्शन केले.

उपसभापती सौ. यशोदा पोवार, उपविभागीय अभियंता पाटबंधारे विभाग गडहिंग्लज अविनाश फडतारे, सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्राचे जिल्हा अध्यक्ष जी. एम. पाटील, प्रा. सुनिल शिंत्रे, दिग्वीजय कुराडे, प्राचार्य उर्मिला पाटील, आर. के. वांद्रे, युवराज पोवार, संजयभाई सावंत यासह ग्रामस्थ, वि‌द्यार्थी उपस्थित होते.

अनंत पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रा. अनिल मगर यांनी परिक्रमेची सविस्तर माहीती दिली. श्री. गायकवाड म्हणाले, सध्या जलस्त्रोस्त्राचे मोठ्या प्रमाणात प्रक्षण होत आहे. नदी, नाले व आढे हे कचरा व विविध प्रकारच्या रसायनानी प्रक्षीत झालेले आहेत. पाणी हे जीवनदायी नानले जाते. तेच जर दुषीत भविष्य अडचणीचे आहे. पाणी प्रक्षीत होणार नाही याची काळजी प्रत्येकांने घेतली पाहीजेत. पाण्याचा जपून वापर करायवयास हवा. दिग्वीजय कुराडे यांनी परिक्रमा पूर्ण केलेले अनुभव सांगीतले. परिक्रमेत सहभागी झालेल्यांना प्रमाणपत्र भेट देण्यात आली. या वेळी प्रा. शिंत्रे यांनी मार्गदर्शन केले. या वेळी धोंडीबा येडगे, गंगराम कोकरे, सुनिल गावडे, इचलकरंजी शास्त्र महावि‌द्यालाये विद्यार्थी, निडगल (ता. खानापूर, जि. बेळगाव मधील ग्रामस्थ उपस्थित होते. धोंडीबा येडगे यांनी आभार मानले.

चित्री परिसरात स्वच्छता मोहीम

स्वयंसेवकांनी चित्री परिसरात स्वच्छथा मोहीम राबविली. सुमारे दोन टन कचरा गोळा करण्यात आला. यामध्ये काचेच्या व प्लास्टिकच्या बाटल्या, प्लास्टिक, पत्रावळ्या जमा करण्यात आल्या. स्वच्छतेची मोहीम वर्षभर राबविण्याचे ठरले.

चित्री प्रकल्पावर पार्टीला बंदी...

चित्री परिसरात बहुतांश जण पार्टी करतात. यामुळे येथे कचरा वाढला आहे. पाणी प्रक्षीत होण्याचा धोका आहे. येथे जर कोण पार्टी करतांना आढळ्यास त्याच्यावर कडक कारवाई केली जाणार आहे.

सरोळी येथे विविध विकास कामांचा शुभारंभ


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

सरोळी ता.आजरा येथे रु ३५ लाख मंजूर असलेल्या विविध विकास कामांचा शुभारंभ भाजप नेते जयवंत मसणू सुतार यांचे हस्ते करण्यात आले.

या कामांकरिता खासदार धनंजय महाडिक, आमदार शिवाजीराव पाटील, अशोकअण्णा चराटी यांचे सहकार्य लाभले.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी निंगुडगे गावचे माजी सरपंच संभाजीराव सरदेसाई होते.

याप्रसंगी प्रवीण पाटील, डॉ.विजय पाटील,प्रकाश पाटील, बबन देसाई,माजी सरपंच एम. टी.पाटील, सुरेश सुतार, जनार्दन सुतार,प्रकाश पाटील, बस्तू बारदेस्कर सर, अमोल सुतार,सागर पाटील, देवेन्द्र कांबळे,महेश सुतार, रमेश देसाई आदी उपस्थित होते.

शिरसंगी येथे उद्या रवळनाथ मूर्ती प्राणप्रतिष्ठापणा सोहळा


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

शिरसंगी ता. आजरा येथे मंगळवार दिनांक २४ मार्च व बुधवार दिनांक २५ मार्च रोजी ग्रामदैवत श्री रवळनशनाथ देवालय मुर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सदर सोहळ्याचे पौराहित्य वेदशास्त्र संपन्न डॉ. के.डी. हिरेमठ व सहकारी वेदमूर्ती बाळासाहेब सुतार महाराज यांच्या मंत्रघोषात करण्यात येणार आहे

मंगळवार दिनांक २४ मार्च रोजी सकाळी ठीक ७:१५ वाजता हरिपाठ,भजन व गावातील सर्व ग्रामस्थ व महिलांच्या उपस्थितीत श्री मूर्तीची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यानंतर गणेश पूजा धान्यादीवास, पुण्याहवाचन, वास्तु होम, मंदिर शुद्धीकरण, मंत्रोच्चार इत्यादी विधी रात्री दहा वाजेपर्यंत सुरू राहतील. रात्री अकरा वाजता जागरा निमित्य ‘ माझी मायबोली ‘ राधानगरी प्रस्तुत ‘ व्यथा महाराष्ट्राची ‘ हा लोक रंजनाचा कार्यक्रम होणार आहे बुधवार दिनांक २५ मार्च रोजी मूर्ती प्राणप्रतिष्ठा, प्रदान होम, महाआरती व त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम व जागरणा निमित्य शाहीर सदाशिव निकम यांचा मनोरंजनाचा कार्यक्रम होणार असल्याचे संयोजकांनी सांगितले.

हॉटेल्स हळूहळू बंद होत आहेत…
बाहेरगावच्या चाकरमान्यांचे हाल


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

इंधन टंचाईमुळे आजरा शहर व परिसरातील अनेक हॉटेल्स व चहाच्या टपऱ्या हळूहळू बंद होऊ लागल्या आहेत.यामुळे बाहेरगावाहून रोजगारानिमित्य शहरात येणाऱ्या चाकरमान्यांचे व पर्यटकांचे हाल होण्यास सुरुवात झाली आहे.

आर्दाळ क्रिकेट स्पर्धेत आजरा स्पोर्ट्सचा दमदार विजय

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आर्दाळ येथे क्रिकेट प्रेमींच्या वतीने आयोजित करण्यात आलेली क्रिकेट स्पर्धा उत्साहात संपन्न झाली असून या स्पर्धेत आजरा स्पोर्ट्स, आजरा संघाने प्रथम क्रमांक पटकावला, तर कॅम्पस जाधेवाडी द्वितीय, रवी फार्मा आजरा तृतीय आणि जोमकाईदेवी उत्तूर संघाने चतुर्थ क्रमांक मिळवला. स्पर्धेतील वैयक्तिक पारितोषिकांमध्ये मालिकावीर म्हणून प्रशांत पाटील (बबलू), उत्कृष्ट फलंदाज म्हणून प्रशांत ढोणुक्षे आणि उत्कृष्ट गोलंदाज म्हणून अशोक पाचवडेकर यांचा गौरव करण्यात आला.

स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.ही स्पर्धा क्रिकेट प्रेमी आर्दाळ यांच्या वतीने आयोजित करण्यात आली असून प्रसाद हळदकर, युवराज तिप्पे, अमोल बांबरे, अवी बाबर, सागर सुतार तसेच प्रॅक्टिस क्लब आर्दाळच्या खेळाडूंनी आयोजन करून ही स्पर्धा यशस्वीरीत्या पार पाडली.

आजचे पंचांग

दिनांक : २३ मार्च २०२६
वार : सोमवार

माह (अमावस्यांत) : चैत्र
माह (पूर्णिमांत) : चैत्र
ऋतु : वसंत
आयन : उत्तरायण
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथी : पंचमी तिथी (सायंकाळी ०६.३८ पर्यंत) त्यानंतर षष्ठी तिथी
नक्षत्र : कृत्तिका नक्षत्र (रात्री ०८.४९ पर्यंत) त्यानंतर रोहिणी नक्षत्र
योग : विष्कुम्भ योग (दुपारी १२.२१ पर्यंत) त्यानंतर प्रीति योग
करण : भाव करण (सकाळी ०७.५६ पर्यंत) त्यानंतर बलवा करण
चंद्र राशी : वृषभ राशी
सूर्य राशी : मीन राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : सकाळी ०८.१२ ते सकाळी ०९.४३ पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.२१ ते दुपारी ०१.०९
सूर्योदय : सकाळी ०६.४१
सूर्यास्त : सायंकाळी ०६.४९
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत

 

संबंधित पोस्ट

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकामध्ये चराटी- शिंपी गटाचे आव्हान राष्ट्रवादीसमोर कायम

mrityunjay mahanews

आज-यात किरीट सोमय्या यांचा निषेध…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

आईचे दशकार्य करण्यासाठी आलेल्या मुलाचा मृत्यू : आजरा येथील घटना

mrityunjay mahanews

आजच्या बातम्या

mrityunjay mahanews

पंचायत समिती अधिकाऱ्याचा ऑन ड्युटी मृत्यू

mrityunjay mahanews
error: Content is protected !!