गुरुवार दि. ५ मार्च २०२६


डंपरखाली सापडून कामगाराचा मृत्यू

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
रस्ते काम सुरू असताना कागद अंथरणाऱ्या चंदनकुमार रामचंद्र ऋषी वय २२ वर्षे रा. परोरा, नित्यानंद नगर पूर्णिया, बिहार या कामगाराच्या अंगावरून दहा चाकी डंपर गेल्याने कामगाराचा जागीच मृत्यू झाला हा रोड गावच्या हद्दीमध्ये सदर प्रकार घडला.
याबाबत मिळालेली माहिती अशी की…
सध्या महागाव – हलकर्णी येथील रस्त्याचे काम सुरू आहे. रंजनकुमार अरविंद यादव रा. बिहार हे कामावरील आपला दहा चाकी डंपर मागे घेत होते. याच दरम्यान चंदनकुमार रस्त्यावर प्लास्टिक अंथरण्याचे काम करत होता. डंपरची धडक लागून तो खाली पडला. चालकाच्या तो खाली पडला असल्याचे ध्यानात न आल्याने त्याच्या अंगावरून गाडी जाऊन त्याचा चिरडून मृत्यू झाला. याप्रकरणी सिपिन चंद्रदेव ऋषी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रंजनकुमार अरविंद यादव यांच्या विरोधात हजरा पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.

तालुकावासीय हळहळले…
डॉ. सुरज पाटणे यांची आत्महत्या

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा येथील माजी तालुका आरोग्य अधिकारी व वाटंगी प्राथमिक आरोग्य केंद्राचे माजी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरज मोहन पाटणे मुळगाव बागणी ता. मिरज यांनी वयाच्या ५१ यावर्षी मिरज येथील राहत्या घरी नैराश्यातून गळफास घेऊन आत्महत्या केली. या आत्महत्येने केवळ वैद्यकीय क्षेत्रच नाही तर संपूर्ण आजरा तालुका हळहळत आहे.
वैद्यकीय क्षेत्रातील एक सेवाभावी वृत्तीचे डॉक्टर अशी त्यांची आजरा तालुक्यात ख्याती होती. डॉ. पाटणे यांच्यामुळे शासकीय आरोग्य यंत्रणा तालुकावासीयांना जवळची वाटत असे. आजरा तालुकावासीयांच्या आग्रहास्तव त्यांनी तब्बल २५ वर्षे तालुक्यात प्रामाणिकपणे सेवा बजावली. त्यानंतर त्यांनी दोन वर्षांपूर्वी स्वेच्छा निवृत्ती घेतली होती. दीड महिन्यापूर्वी पत्नीचे कर्करोगाने निधन झाल्यानंतर ते एकाकी जीवन जगत होते. काल बुधवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास मिरज,जिल्हा सांगली येथील राहत्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पक्षात एक भाऊ आहे.
त्यांना भेटण्यासाठी चाललो…
मी शांत व स्थिर मनस्थितीत माझ्या प्रिय आई, वडील व पत्नी नयन यांना भेटण्यासाठी मी चाललो आहे. सहकाऱ्यांनी मला समजून घ्यावे. माझ्या मृत्यूस कोणालाही जबाबदार धरु नये. अशा आशयाची चिठ्ठी लिहून त्यांनी जगाचा निरोप घेतला.

अपघातात एक जखमी

आजरा: मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
काल बुधवारी दुपारी १२.२५ वाजता आजरा – आंबोली मार्गावर मसोली फाटा येथे दुचाकी व चारचाकीची जोरात धडक होऊन झालेल्या अपघातात बालेकोट कर्नाटक येथील सुरेश चौहान हा दुचाकीस्वार गंभीर झाला आहे. चालक चौहान हा समोरच्या ट्रकची बाजू काढून पुढे जात असताना विरुद्ध दिशेने समोरून येणाऱ्या ट्रेकला जोरदार धडक होऊन सदर अपघात झाला.
जगद्गुरु श्री नरेंद्राचार्यजी महाराज संस्थान्या रुग्णवाहिकेचे चालक सुधाकर कळेकर घटनास्थळी पोहोचले व अपघातग्रस्त व्यक्तीवर ग्रामीण रुग्णालय, आजरा येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथे दाखल केले आहे.
एरंडोळ – बुजवडे रस्ता कामाचा शुभारंभ

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
येरंडोळ, ता. आजरा येथील भाजप ग्रामविकास आणि पंचायतराज विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष जयवंत मसणू सुतार यांच्या माध्यमातून जिल्हा नियोजन मधून मंजूर असलेल्या ₹ २५ लाखाच्या येरंडोळ – बुजवडे रस्त्याचा शुभारंभ अण्णाभाऊ संस्था समूहाचे प्रमुख व भाजपा जिल्हाध्यक्ष अशोकअण्णा चराटी यांचे हस्ते करणेत आला. याकामासाठी आमदार शिवाजीराव पाटील सह पालकमंत्री माधुरी मिसाळ यांचे सहकार्य लाभले.
यावेळी सरपंच सौ. सरिता सुभाष पाटील, उप सरपंच श्री. भीमराव माधव , ग्रामसेवक गुरव , माजी सरपंच एकनाथ पाटील , संतोष ढोनुक्षे, भिकाजी पाटील, शंकर पाटील, तुकाराम पाटील, हर्षवर्धन महागावकर , अमोल सुतार,ज्ञअमर ढोनुक्षे, प्रताप होलम, राहुल तळेवाडीकर, सुरेश सुतार आणि इंजिनीअर ज्ञानेश्वर पाटील आदी उपस्थित होते.

७ मार्च ते १५ मे अखेर छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर
आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा क्र.१ अन्वये योजना आजरा तहसिल कार्यालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये शिबीराचे आयोजन करण्यात आलेले आहे. शासन निर्णयानुसार सर्वसामान्य जनता व शेतकरी यांचे महसूल विभागांतर्गत क्षेत्रीय कार्यालयाशी दैनंदिन प्रश्न निकाली काढणे, महाराष्ट्र जमिन महसूल संहितेच्या नवीन तरतुदीच्या जनजागृती प्रभावी अंमलबजावणी करणे, डिजिटल सेवांचा जास्तीत जास्त वापर सुनिश्चित करणे नागरिकांना एकदिवशीय सेवा पुरविणे या उद्देशाने माहे ७ मार्च २०२६ ते १५ मे-२०२६ या कालावधीमध्ये राज्यात महसूल मंडळ स्तरावर तसेच नगरपरिषद नगरपंचायत पातळीवर छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा क्र.१ राबविण्याबाबत निर्देशीत करण्यात आलेले आहे.
त्या अनुषंगाने शनिवार दिनांक ७ मार्च २०२६ रोजी आण्णाभाऊ सांस्कृतिक हॉल आजरा, आजरा हायस्कूल आजरा, शनिवार १४ मार्च २०२६ गवसे रवळनाथ मंदिर गवसे, शुक्रवार १० एप्रिल २०२६ मलिग्रे मल्लिकार्जुन मंदिर मलिग्रे, शुक्रवार १७ एप्रिल २०२६ उत्तूर महादेव मंदिर उत्तूर व शुक्रवार १५ मे २०२६ रोजी आजरा प्रशासकिय हॉल तहसिल कार्यालय आजरा या दिवशी अभियानातर्गत प्रलंबित फेरफार, ७/१२ मधील चुकांची दुरुस्ती, डिजीटल स्वाक्षरीचे ७/१२ आणि ८-अ, उत्पन्न, रहिवास आणि जातीचे प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलीअर प्रमाणपत्र, घरासाठी पत्रे वाटप ई-मोजणी अर्ज, ॲग्रीस्टॅक आणि पी.एम. किसान नोंदणी करण्यात येणार असल्याने सदर योजनांचा लाभ जास्तीजास्त नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन तहसिलदार श्री. समीर माने यानी केले आहे.

आग लागलीच…
वनौषधी पार्क आगीच्या भक्षस्थानी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही आजऱ्याजवळील पारेवाडी येथे लागलेल्या आगीत खाजगी क्षेत्रासह वनक्षेत्र व वनौषधी पार्कचे क्षेत्र जळून गेले.काल दुपारी बाराच्या सुमाराला आग लागली. आगीचे नेमके कारण समजलेले नाही. आगीमधे काजू बागांचे नुकसान झा आहे. त्याचबरोबर वनौषधी पार्कलाही फटका बसला आहे. आजरा नगरपंचायतीच्या अग्नीशमन दलाच्या मदतीने आग आटोक्यात आणली. अन्यथा मोठा अनर्थ होणार होता.
आज दुपारी बाराच्या सुमाराला आगीच्या ज्वाळा पारेवाडी परिसरात दिसू लागल्या. धुराचे लोट आजऱ्यात दिसू लागले. ही गोष्ट समजताच वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्यासोबत सरपंच परिषदचे जिल्हाध्यक्ष जि. एम. पाटील होते. त्यांनी झाडांच्या फांद्यानी आग विझवण्यास सुरुवात केली. रणरणते उन्ह व वाळलेले गवत यामुळे आग सर्वत्र पसरत गेली. त्यामुळे आग आटोक्यात आणणे अडचणीचे बनले. दरम्यान आजरा नगरपंचायतीच्या अग्नीशमन दलाला पाचारण करण्यात आले. त्यांनी पाण्याचे फवारे मारून आग विझवण्यास सुरुवात केली. ब्लोअरच्या मदतीनेही आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. तब्बल तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग विझवण्यात यश आले. सुमारे चाळीस हेक्टरच्या क्षेत्राला फटका बसला आहे. काजूच्या बागांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
वनपाल बी. आर. निकम, वनरक्षक प्रियांका पाटील, वनमजूर रमेश पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी मदत केली.

आजरा साखर कारखान्यामध्ये सुरक्षा सप्ताहाचे आयोजन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
गवसे ता. आजरा येथील वसंतराव देसाई आजरा साखर कारखाना येथे राष्ट्रीय सुरक्षितता सप्ताहाची उत्साहात सुरुवात करण्यात आली. कारखान्याचे चेअरमन मुकुंददादा देसाई यांच्या हस्ते मेन गेटवर सुरक्षितता ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सर्व कर्मचाऱ्यांना सुरक्षिततेची शपथ देण्यात आली.
यावेळी मार्गदर्शनपर भाषणात चेअरमन मुकुंदादादा देसाई म्हणाले, सुरक्षिततेच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करून स्वतःबरोबर कारखाना व समाज सुरक्षित राहील यासाठी आपण सर्वांनी दक्ष राहून काम करावे. त्यासाठी प्रशासनाची आपल्याला कायम साथ राहील. निष्काळजीपणा आणि बेफिकीरपणाने केलेले काम स्वतःबरोबर समाजाला हानिकारक ठरते.
यावेळी कारखान्याचे विविध विभागाचे खाते प्रमुख उपखाते प्रमुख व कर्मचारी मोठ्या संख्येने हजर होते. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेफ्टी ऑफिसर रमेश देसाई यांनी केले.

गटर्स मधील विद्युत पोल हलवा : वीज वितरणला निवेदन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा येथील चर्च गल्ली परिसरातील रहिवाशांनी सार्वजनिक गटारीमध्ये असलेले विद्युत पोल हलविण्याबाबत निवेदन दिले आहे. हे निवेदन महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेडच्या उपअभियंता, उपविभाग आजरा यांना सादर करण्यात आले.
चर्च गल्ली मागील आपटे कॉलनी, गट क्रमांक ३१७ परिसरात शेतरस्त्याच्या गटारीमध्ये विद्युत मंडळाचे पोल उभे आहेत. या मार्गावर नवीन गटर बांधकाम व रस्त्याचे काम येत्या आठवड्यात सुरू होणार असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. मात्र सध्या असलेले पोल रस्ते व गटार बांधकामासाठी अडथळा ठरण्याची शक्यता असल्याने ते तातडीने दुसऱ्या ठिकाणी बसवून देण्याची विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या निवेदनावर रुजायला डिसोझा, आश्रम साबंरेकर, मोतीराम बार्देसकर, मिनीन डिसोझा, पावलू कुतिनो, उमेश शिंदे, तानाजी शिंदे, अंतोन कुतिनो, सीमा पोवार, महादेव जाधव तसेच इतर रहिवाशांच्या सह्या आहेत. संबंधित कामे सुरळीत पार पडण्यासाठी व नागरिकांना भविष्यात अडचणी येऊ नयेत म्हणून पहाणी करून लवकरात लवकर आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात आली आहे.

आजचे पंचांग
♦ दिनांक : ५ मार्च २०२६
♦ वार : गुरुवार
♦ माह (अमावस्यांत) : फाल्गुन
♦ माह (पूर्णिमांत) : चैत्र
♦ ऋतु : वसंत
♦ आयन : उत्तरायण
♦ पक्ष : कृष्ण पक्ष
♦ तिथी : द्वितीया तिथी (सायंकाळी ५.०३ पर्यंत) त्यानंतर तृतीया तिथी
♦ नक्षत्र : उत्तरा फाल्गुनी नक्षत्र (सकाळी ८.१७ पर्यंत) त्यानंतर हस्त नक्षत्र
♦ योग : शूल योग (सकाळी ७.४५ पर्यंत) त्यानंतर गण्ड योग
♦ करण : गराजा करण (सायंकाळी ५.०३ पर्यंत) त्यानंतर वाणीजा करण
♦ चंद्र राशी : कन्या राशी
♦ सूर्य राशी : कुंभ राशी
♦ अशुभ मुहूर्त:
राहु काळ : दुपारी २.१९ ते दुपारी ३.४७ पर्यंत
♦ शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.२६ ते दुपारी १.१४
♦ सूर्योदय : सकाळी ६.५६
♦ सूर्यास्त : सायंकाळी ६.४४
♦ संवत्सर : विश्वावसु
♦ संवत्सर(उत्तर) : सिद्धार्थी
♦ विक्रम संवत: २०८२ विक्रम संवत
♦ शक संवत: १९४७


