शनिवार दि.२८ फेब्रुवारी २०२६


इनास बारदेसकर यांचे अपघाती निधन

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
सांगली येथे शिक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या उत्तूर येथील इनास पावलू बारदेसकर (वय ५५ वर्षे ) यांचे सांगली येथे दुचाकी व डंपरची धडक होऊन झालेल्या अपघातात शुक्रवारी सकाळी निधन झाले.
बारदेसकर हे सांगली येथे शिक्षक म्हणून कार्यरत होते. शुक्रवारी सकाळी ते शाळेच्या दिशेने जात असताना दुचाकी व डंपरची समोरासमोर धडक झाली यामध्ये ते गंभीर जखमी झाले व जागीच त्यांचा मृत्यू झाला.
मूळ गाव उत्तूर (ता. आजरा) असलेले बारदेसकर सध्या मिरज येथे वास्तव्यास होते. केंद्रशाळा दत्तनगर प्रशालेचे मुख्याध्यापक म्हणून त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली होती. प्रेमळ, सुसंस्कृत, कर्तव्यनिष्ठ आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्व म्हणून ते सर्वांच्या परिचयाचे होते.
त्यांच्या पश्चात एक भाऊ, पत्नी आणि एक मुलगी असा परिवार आहे.

रेशनधान्य दुकानदारावर कारवाई करावी : ग्राहकाची मागणी
आजरा तहसीलसमोर उपोषण

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
रेशनधान्य दुकानदाराने पावती प्रमाणे धान्य दिले नाही. धान्य कमी का दिले याची विचारणा केल्यावर संबंधीत दुकानदाराने मारहाण केली आहे. या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी ग्राहक पांडुरंग लक्ष्मण कोरगावकर रा. पोळगाव (ता. आजरा) यांनी सहकारमंत्र्याकडे निवेदनातून केली आहे. याबाबत त्यांनी कुटुंबासह आजरा तहसीलदार कार्यालयासमोर उपोषण सुरु केले आहे.
ग्राहक पांडुरंग कोरगावकर यांनी निवेदनात म्हंटले आहे, पत्नी मिरा पांडुरंग कोरगावकर यांच्या नावे पिवळी शिधापत्रिका आहे. धान्य आणण्यासाठी पोळगाव येथील श्री. रवळनाथ स्वस्त धान्य दुकानात गेले होते. दुकानदाराकडून १२ किलो तांदूळ घेतले. पावतीप्रमाणे तांदूळ नसून केवळ दहा किलो तांदूळ मिळाल्याचे सांगीतले. यावर दुकानदाराने कानफटीत मारली. माझी कोणाकडेही तक्रार करा. मी कोणालाही घाबरत नाही असे सांगून शिवीगाळ केली. सदरच्या दुकानाबाबतही बेकायदेशीरपणे चालवण्यास दिले आहे. या दूकानातून ग्राहकांना चांगली सेवा मिळत नाही. अपुरे धान्य मिळते. शासनाची फसवणूक केली जात आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणाची सखोल चाकशी करावी. संबंधीत दुकानदारांवर कारवाई करावी. परवाना रद्द करावा व आपणाला योग्य तो न्याय द्यावा अशी मागणी केली आहे. निवेदनावर पांडुरंग कोरगावकर यांची सही आहे.

आजरा महाविद्यालयात आज बांबू हस्तकला प्रशिक्षण

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
येथील आजरा महाविद्यालयात एक दिवशीय बांबू हस्तकला प्रशिक्षण अशी विशेष कार्यशाळा होत आहे. आज शनिवार (ता. २८) सकाळी १० वाजता येथील अण्णा भाऊ सांस्कृतिक सभागृहात कार्यशाळेला सुरुवात होईल. सायंकाळी पाच वाजेपर्यंत कार्यशाळा चालेल. शिवाजी विद्यापीठ कोल्हापुर अग्रणी महाविद्यालय योजना, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय हलकर्णी क्लस्टर अंतर्गत ही कार्यशाळा होईल. आजरा महाविद्यालय आजरा वनस्पतीशास्त्र व पर्यावरणशास्ज विभाग आणि आजरा बांबू क्लस्टर फाऊंडेशनच्यावतीने आयोजन केले आहे. अधिक माहीतीसाठी प्रा. मल्लिकार्जुन शिंत्रे व डॉ .राजीव कर्पे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

निधन वार्ता
पार्वती पाटील

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
महागोंड (ता.आजरा) येथील जुन्या पिढीतील पार्वती कुंडलिक पाटील (वय ९४) यांचे काल रात्री अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पाच मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
रक्षा विसर्जन आज शनिवारी (२८ फेब्रुवारी) होणार आहे.

मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात
आजरा महाविद्यालय आजरा

आजरा महाविद्यालयातील मराठी विभागाच्या वतीने मराठी राजभाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. त्यानिमित्त ग्रंथ प्रदर्शन आणि मराठी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. प्राचार्य डॉ. अशोक सादळे अध्यक्षस्थानी होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला कविवर्य कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. डॉ. आप्पासो बुडके यांनी सर्वांना मराठी भाषा संवर्धन शपथ दिली.
कार्यक्रमात अथर्व मोहिते, संचिता तरडेकर, श्रेया लटके, क्षितिजा ढोकरे, सानिका पन्हाळकर, अक्षरा कांबळे, सानिका गुंजाळ यांनी कुसुमाग्रजांच्या निवडक कवितांचे वाचन केले. श्रुती कांबळे हिने ‘अभिमान माय मराठीचा’ या विषयावर भाषण केले. यावेळी डॉ. सादळे, मराठी विभाग प्रमुख डॉ. आनंद बल्लाळ, प्रा. विनायक चव्हाण यांची भाषणे झाली.
यावेळी पर्यवेक्षक प्रा. मनोज पाटील, अधीक्षक योगेश पाटील, ग्रंथपाल प्रा. रवींद्र आजगेकर, प्रा. योगिता भोकरे, प्रा. सुषमा नलावडे, प्रा. मल्लिकार्जुन शिंत्रे, डॉ. अविनाश वर्धन आदी उपस्थित होते.
प्रा. वैशाली देसाई यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन निदा इंचनाळकर हिने तर समृद्धी कालेकर हिने उपस्थितांचे आभार मानले.
आजरा हायस्कूला आजरा

कवी कुसुमाग्रज तथा वि.वा.शिरवाडकर यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. लेखक सलीम सरदार मुल्ला हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मराठी विभागाने तयार केलेल्या ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मराठी साहित्यिक या भित्तीपत्रकाचे उद्घाटन मुल्ला यांच्या हस्ते झाले. भित्तिपत्रकाची माहिती मराठी विभाग प्रमुख श्री विजय पोतदार यांनी सांगितली. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त वक्तृत्व, कथाकथन, निबंध लेखन व अभिवाचन स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. शाळेतील ग्रंथालयामार्फत मराठी शब्दकोश व विश्वकोश यांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला. लेखक समीर मुल्लाम्हणाले, निसर्ग व मानव यांचे नाते अतूट आहे. निसर्गातील झाडे, प्राणी, पक्षी यांच्या प्रत्येक कृतीतून माणसाला जगण्याची प्रेरणा मिळते
अध्यक्षीय मनोगत शाळेचे मुख्याध्यापक श्री.ए.एलतोडकर यांनी केले. कार्यक्रमास उपमुख्याध्यापिका सौ. एच.एस.कामत, पर्यवेक्षक श्री.ए.आर. व्हसकोटी तसेच सर्व मराठी विषय शिक्षक, इतर सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते .
पं.दीनदयाळ विद्यालय आजरा

पं. दीनदयाळ विद्यालयामध्ये मराठी भाषा गौरव दिन ‘ उत्साहात साजरा करण्यात आला. इ. पाचवीच्या विद्यार्थिनींनी आपल्या सुंदर नृत्यातून मराठी भाषेचा गौरव केला. कु. दूर्वा बुरुड हिने ज्ञानपीठ पारितोषिक विजेते वि .वा .शिरवाडकर यांच्या बद्दल माहिती सांगितली. कु ऋतुजा कदम हिने कुसुमाग्रज आणि त्यांच्या साहित्याची ओळख करून दिली. कु. समृद्धी कालेकर हिने मराठी भाषेचे महत्व सांगून त्यांची ‘ कणा ‘ ही कविता सादर केली. विद्यार्थी विद्यार्थिनींनी जास्तीत जास्त सहभाग घेऊन कवी कुसुमाग्रज तसेच इतर कवींच्या कविता, बालगीते सादर केली. मुख्याध्यापक संजीव देसाई यांनी कुसुमाग्रजांची माहिती सांगितली .
यावेळी शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी- उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभांगी निर्मळे तर आभार भरत बुरुड यांनी मानले.

व्यंकटराव येथे ‘पर्यावरण संवर्धन’ या विषयावर व्याख्यान संपन्न

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा येथील व्यंकटराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये ‘पर्यावरण सेवा योजना’ अंतर्गत “मानव-वन्यजीव संघर्ष… पर्यावरण संवर्धन” या विषयावर वनक्षेत्रपाल श्री. दत्तात्रय पाटील यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
‘जीवो जीवस्य जीवनम्’ या सूत्राचा पाटील यांनी अर्थ स्पष्ट केला. जंगलातील सफारीचा अनुभव देत त्यांनी वन्यजीवांचे महत्त्व आणि पर्यावरणीय समतोल कसा राखावा, याचे सखोल मार्गदर्शन केले. तसेच, अचानक एखादा वन्यप्राणी समोर आल्यास कोणती खबरदारी घ्यावी, याबाबत माहिती दिली.
या कार्यक्रमाला प्रशालेचे प्राचार्य श्री. एम. एम. नोगुर्डेकर , पर्यवेक्षिका सौ. व्ही. जे. शेलार , सौ. आर. एन. पाटील , सौ. ए. डी. पाटील , श्री. एम. ए. पाटील , श्री.प्रकाश पाटील-आर्दाळकर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन पर्यावरण सेवा विभागाचे प्रमुख श्री. एस. वाय. भोये व सौ. ए. एस. गुरव यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी व्यंकटराव ज्युनिअर कॉलेजचे व्यवस्थापक श्री. एम. ए. पाटील यांनी आभार मानले.
छाया वृत्त…
आजरा येथील चराटी व आपटे कॉलनीतील बगीचा बांधकाम पूर्ण होऊन जवळपास एक वर्ष उलटले होते. नगरपंचायतीने ताबा घेतल्यानंतर तो बगीचा कुलूप लावून बंद ठेवण्यात आला होता. मात्र कालांतराने त्या ठिकाणी दुरवस्था निर्माण होत असल्याचे लक्षात आल्यानंतर नगरसेवक श्री. परशुराम बामणे यांनी पुढाकार घेत स्थानिक नागरिकांच्या सोयीसाठी बगीचा पुन्हा खुला करून देण्यात आला.

बुरुडे ता. आजरा येथे अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्तीच्या घटकांचा विकास करणे अंतर्गत मंजूर १० लाख रुपये रस्त्याचे उद्घाटन लोकनियुक्त सरपंच श्रीमती वैशाली गुरव, उपसरपंच सुनिल बागवे, सदस्य संजय कांबळे, मनीषा तेंडुलकर, मानसी पेंडसे, विजया कांबळे, धोंडीबा पाटील, तंटामुक्त अध्यक्ष मारुतीराव देशमुख, दशरथ बागवे, आवणापा होनाळकर, सुर्यकांत कांबळे.संदिप होनाळकर, आर. एस. कांबळे यांच्या हस्ते आज करण्यात आले . यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आजचे पंचांग
♦ दिनांक : २८ फेब्रुवारी २०२६
♦ वार : शनिवार
♦ माह (अमावस्यांत) : फाल्गुन
♦ माह (पूर्णिमांत) : फाल्गुन
♦ ऋतु : वसंत
♦ आयन : उत्तरायण
♦ पक्ष : शुक्ल पक्ष
♦ तिथी : द्वादशी तिथी (रात्री ८.४३ पर्यंत) त्यानंतर त्रयोदशी तिथी
♦ नक्षत्र : पुनर्वसू नक्षत्र (सकाळी ९.३४ पर्यंत) त्यानंतर पुष्य नक्षत्र
♦ योग : सौभाग्य योग (सायंकाळी ५.०१ पर्यंत) त्यानंतर शोभन योग
♦ करण : भाव करण (सकाळी ९.३६ पर्यंत) त्यानंतर बलवा करण
♦ चंद्र राशी : कर्क राशी
♦ सूर्य राशी : कुंभ राशी
♦ अशुभ मुहूर्त:
राहु काळ : सकाळी ९.५५ ते सकाळी ११.२३ पर्यंत
♦ शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.२८ ते दुपारी १.१५
♦ सूर्योदय : सकाळी ७.००
♦ सूर्यास्त : सायंकाळी ६.४२
♦ संवत्सर : विश्वावसु
♦ संवत्सर(उत्तर) : सिद्धार्थी
♦ विक्रम संवत: २०८२ विक्रम संवत
शक संवत: १९४७ शक संवत
फोटो क्लिक…
अखंड हरिनाम सप्ताह सोहळा मडिलगे….


