मंगळवार दि.१३ जानेवारी २०२६

उपनगराध्यक्षपदी सौ. पूजा डोंगरे
स्वीकृतची माळ डॉ. इंद्रजीत देसाई व विक्रम पटेकर यांच्या गळ्यात

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी प्रभाग दोन मधून निवडून आलेल्या पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या कट्टर समर्थक व निवडणुकीत जायंट किलर ठरलेल्या सौ. पूजा अश्विनी डोंगरे यांची बिनविरोध निवड झाली. तर स्वीकृत नगराध्यक्ष पदासाठी सत्तारूढ आघाडीतून अण्णाभाऊ सूतगिरणीचे संचालक डॉ. इंद्रजीत नानासो देसाई व राष्ट्रीय काँग्रेस कडून जयवंतराव शिंपी यांचे समर्थक विक्रम पटेकर यांची निवड झाली.
निवड पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष अशोकअण्णा चराटी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. उपनगराध्यक्ष पदासाठी अन्याय निवारण समितीचे नगरसेवक परशुराम बामणे यांनी अर्ज दाखल केला होता. परंतु त्यांनी निवडी पूर्वी माघार घेतल्याने सौ. डोंगरे यांची बिनविरोध निवड झाली.
निवडीनंतर त्यांचा नगराध्यक्ष चराटी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना नूतन नगराध्यक्षा सौ. डोंगरे यांनी सर्वांना विश्वासात घेऊन पारदर्शक पद्धतीने कारभार केला जाईल. शहराच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगितले. पालकमंत्री प्रकाश आबिटकर, अशोकअण्णा चराटी व प्रभाग दोन मधील मतदारांनी आपल्यावर दाखवलेल्या विश्वासाला आपण कदापिही तडा जाऊ देणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी नूतन स्वीकृत संचालक डॉ इंद्रजीत देसाई व विक्रम पाटेकर यांनीही मनोगत व्यक्त केले व सदर पदावर संधी दिल्याबद्दल नेतेमंडळींचे आभार मानले.

बैठकीस मुख्याधिकारी सुरज सुर्वे यांच्यासह सर्व नगरसेवक, अधिकारी उपस्थित होते. आभार निहाल नायकवडी यांनी मांनले.
चारचाकीला दुचाकीची धडक…
एक गंभीर जखमी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा – आंबोली मार्गावर माद्याळ फाट्यानजीक भरधाव दुचाकीने चार चाकीला चुकीच्या दिशेने येत जोराची धडक दिल्याने विजय संजय बासर मु. शिरगाव ता. वाळवा, जिल्हा सांगली हा आजरा साखर कारखान्यात इंजिनीयरिंग विभागाला काम करणारा कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की…
सोमवारी दुपारी सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास विजय बासर हा या मार्गावरून कारखान्याच्या दिशेने चालला असताना समोरून येणाऱ्या चार चाकीला चुकीच्या दिशेने जाऊन त्याने जोराची ठोकर दिली. यामध्ये तो गंभीर जखमी होण्याबरोबरच दोन्ही गाड्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. याबाबतची फिर्याद चार चाकी चालक अक्षय राहुल भालेराव ( रा. विक्रम नगर, बोधी चौक, लातूर ) याने आजरा पोलिसात दिली आहे. या फिर्यादीवरून भोसर याने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून सदर अपघातास जबाबदार ठरल्याबद्दल त्याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.
पोलीस हवालदार अनिल सरांबळे पुढील तपास करीत आहेत.

मुकुंददादांच्या साक्षीने अशोक अण्णांनी स्वीकारला नगराध्यक्ष पदाचा कार्यभार

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
नगरपंचायत पंचवार्षिक निवडणुक निकालानंतर तब्बल २२ दिवसांनी नूतन नगराध्यक्ष अशोकअण्णा चराटी यांनी सहकारी मित्र मुकुंदराव देसाई यांच्या साक्षीने मोठ्या दणक्यात काल सोमवारी नगराध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारला.
यावेळी बोलताना नगराध्यक्ष अशोक अण्णा चराटी म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन नगरपंचायत कारभार पारदर्शक पद्धतीने करण्यास आपण कटीबद्द आहोत. प्राधान्याने स्वच्छ व मुबलक पाणी, रस्ते गटर्स याकरिता आपण प्रयत्नशील आहोत. बाजारपेठेतील वाहतुकीची होणारी कोंडी हा शहरातील सध्याचा प्रमुख प्रश्न मार्गी लावणे आवश्यक आहे त्यासाठी आपण निश्चितच विशेष उपाय योजना करण्यासाठी प्रयत्नशील राहू. प्रशासक कालावधीमध्ये कारभार करणारे वेगळे आणि बदनामी दुसऱ्यांची असे प्रकार होत गेले. पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ व आमदार शिवाजीराव पाटील यांच्या सहकार्याने शहराचा चेहरा मोहरा बदलण्यात येईल. विरोधी आघाडीतून निवडून आलेल्या मंडळींनी गावच्या विकासात कोणत्याही प्रकारचे राजकारण करू नये. सर्वजण एकत्रित काम करूया असे आवाहन केले.
आजरा कारखान्याचे अध्यक्ष मुकुंदराव देसाई म्हणाले, प्रशासक काळात नगरपंचायतीमध्ये अनेक गैरकामे झाली. यामध्ये विद्यमान नगरसेवकांची नाहक बदनामी झाली. अशोक सराटी हे आपले चांगले मित्र आहेत. एक धडाडीचा नेता अशी ओळख असणाऱ्या अशोकअण्णांना आपण नेहमीच साथ दिली आहे. केवळ तब्येतीमुळे काही निर्णय वेळेत झाले नाहीत अन्यथा नगरपंचायत सभागृहातील चित्र वेगळे असते असेही त्यांनी सांगितले. निवडणुकीपूर्वी सुरुवातीपासूनच मंत्री मुश्रीफ यांनी अशोक चराटी यांच्याशी चर्चा करण्याबाबत वेळोवेळी संदेश दिले होते. पण आपणावर तब्येतीमुळे मर्यादा येत गेल्या तसे त्यांनी नम्रपणे कबूल केले.
यावेळी जनता बँकेचे संचालक रणजीत देसाई, राजू होलम, आजरा अर्बन बँकेचे उपाध्यक्ष संजय चव्हाण, अतिश कुमार देसाई, माज नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी, संयोगिता बापट,अश्विन डोंगरे, आरिफ खेडेकर, सना चांद, समीर चांद, यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
अदृश्य शक्ती आपल्या पाठीशी…
निवडणुकीनंतर सभागृहातील कांही अदृश्य शक्ती आपल्या पाठीशी आहे असेही त्यांनी विरोधी गटातील सदस्यांना उद्देशून विधान केले.
रहिमतबी खेडेकर ताराराणी सोबत…
राष्ट्रवादी शरद पवार गटातून निवडून आलेल्या रहिमतबी खेडेकर यांनी ताराराणी आघाडी सोबत राहण्याचा निर्णय घेतल्याने आघाडीचे संख्याबळ दहा इतके झाले आहे.
सवाद्य व फेट्यांसह सत्तारुढांचा सभागृहात प्रवेश…
नूतन नगरसेवकांच्या कार्यभार स्वीकारण्याच्या पार्श्वभूमीवर नगरपंचायत सजून गेली होती. सत्तारूढ आघाडीच्या सर्व नगर सेवकांनी वाजत गाजत सभागृहात प्रवेश केला.

शक्तिपीठ महामार्गाला सर्व शक्तीनिशी विरोध करणार…
पेरणोली येथे शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या बैठकीत निर्णय…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
नव्याने आरेखीत केलेल्या शक्तीपीठ महामार्गाला सर्व शक्तीनिशी विरोध करण्याचा निर्णय आज पेरणोली येथे झालेल्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत करण्यात आला. शुक्रवारी याबाबतचे निवेदन तहसीलदार आजरा यांना देण्यात येणार असून जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा कार्यक्रम बघून बाधित गावातील शेतकऱ्यांचा मेळावा लवकरच घेण्यात येणार आहे.
सुरुवातीला शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचे निमंत्रक कॉ. संपत देसाई यांनी शक्तिपीठ महामार्ग बद्दल आपली भूमिका स्पष्ट करताना म्हणाले , शक्तीपीठ महामार्ग हा शेतकऱ्यांच्या हिताचा नसून तो केवळ भांडवलदारांचे हितसंबंध जपण्यासाठी बांधण्यात येणार आहे. इथल्या पर्यावरणाची, नद्या-नाल्यांची, जंगलाची शेतीची नासधूस करून मानवी जीवन उध्वस्त करणारा आहे. हा रस्ता शेतकऱ्यांच्या उपयोगाचा नसून साधा प्रवेशही आपल्याला यावर करता येणार नाही, त्यामुळे या रस्त्याला तीव्र विरोध असून कोणत्याही परिस्थितीत हा महामार्ग आम्ही होऊ देणार नाही
शेतकरी संघटनेचे तानाजी देसाई म्हणाले, हा रस्ता केवळ अदानीसाठी बांधला जात आहे आज अदानी देश ताब्यात घ्यायला निघाला आहे रस्ता हे त्याचे प्रातिनिधिक रूप आहे. गडचिरोलीहून गोव्याला खनिजे सहजपणे नेता यावी केवळ यासाठी हा रस्ता बांधला जात आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत हा रस्ता होऊ द्यायचा नाही असा निर्धार आपण करूया.
जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई म्हणाले, आपण सगळे मिळून सर्व शक्तीनिशी या महामार्गाला विरोध करूया कोणत्याही परिस्थितीत आपण हा मार्ग आपण होऊ द्यायचा नाही त्यासाठी पक्ष संघटना बाजूला ठेवून संघटितपणे सामोरे जाऊया
युवराज जाधव (खानापूर), अमर पवार (पेरणोली), आनंदराव कुंभार (कोरीवडे), सुभाष देसाई (पेरणोली), जनार्दन देसाई, पांडुरंग जोशीलकर, सुररेश पाटील (कोरिवडे), डॉ धनाजी राणे (वेळवट्टी) हरिभाऊ कांबळे यांनीही कांही महत्वाच्या सूचना मांडल्या.
यावेळी युवराज पोवार, संकेत सावंत, नामदेव गुरव, डी ए पाटील, उदय कोडक, सर्जेराव देसाई, दिनेश कांबळे, सचिन देसाई, शंकर तिबिले, मारुती पाटील, हिंदुराव कालेकर, शंकर हाळवणकर, विठ्ठल मस्कर, बाळासो कुकडे, भीमराव हाळवणकर, संभाजी पाटील, मयुरेश देसाई, ज्ञानदेव ढोकरे, संदीप पाटील, अशोक सासुलकर यांच्यासह पेरणोली, हरपवडे, कोरिवडे, वेळवट्टी, खानापूर गावातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

वजन-मापे विभागाच्या भरारी पथकाच्या तपासणीत आजरा साखर कारखान्याचे वजन काटे अचुक
आजरा: मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
निरीक्षक वैद्यमापन शास्त्र व इतर अधिकारी यांचे भरारी पथकाने वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्याचे दोन्ही ऊस वजन काटयाची तपासणी करण्यासाठी सकाळी अचानक भेट दिली व दोन्ही वजन काट्यांची संपुर्ण पडताळणी केली. त्यांनी तपासणी कामी ट्रक व ट्रॅक्टर अशा पुर्वी वजन केलेल्या व नविन वाहनांची वजने घेतली. तसेच ८ टनाची वजने प्रत्यक्षात ठेवून पडताळणी केली त्यामध्ये कोणतीही तफावत आढळून आली नाही. त्यामुळे वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्याचे ऊस, साखर व उपपदार्थ वजन करणारे सर्व काटे बिनचूक व निर्दोष असलेचे स्पष्ट झाले. काटे बिनचूक असलेचा अहवाल भरारी पथक अधिकारी यांनी कारखान्यास सादर केला.
भरारी पथकाचे अधिकारी श्री.एम.व्ही.देसाई, निवासी नायब तहसिलदार, आजरा, श्री. अनिल ईश्वर सरंबळे, पोलिस निरिक्षक प्रतिनिधी, आजरा, श्री. अविनाश अरूण शिंगाडी, निरीक्षक वैद्यमापन शास्त्र, गडहिंग्लज विभाग गडहिंग्लज, श्री. शिवदास भिवसन सोनवणे, लेखापरिक्षक श्रेणी-१, सह. संस्था (साखर) कोल्हापूर, श्री. मारूती रामु केसरकर व श्री. आनंदा कृष्णा जाधव, शेतकरी प्रतिनिधी, श्री. तुकाराम मारूती मोळे, केनयार्ड सुपरवायझर यांचे समक्ष काटयांची तपासणी केली.
त्यावेळी कार्यकारी संचालक श्री.एस. के. सावंत, जनरल मॅनेंजर (टेक्नि.), चिफ केमिस्ट, ऊस पुरवठादार शेतकरी, केनयार्डचे कर्मचारी, सर्व वाहन मालक व चालक प्रत्यक्ष उपस्थित होते.

मराठा समाजाने शेतीबरोबरच आता उद्योग क्षेत्रात उतरले पाहिजे : जिल्हाध्यक्ष मारुती मोरे
मराठा महासंघाचा जिल्हा मेळावा आजरा येथे संपन्न

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
मराठा समाज हा शेती करणारा समाज म्हणून पूर्वीपासून ओळखला जातो. आज शेतीत नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याबरोबरच समाजाने आता उद्योग क्षेत्रात उतरले पाहिजे असे मत अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष मारुतीराव मोरे यांनी व्यक्त केले मराठा महासंघाचा दक्षिण विभागाचा मेळावा आजरा येथे संपन्न झाला, प्रमुख आयोजक म्हणून ते बोलत होते. – वेध भविष्याचा या विषयावर हा मेळावा झाला.
मेळाव्यास आजरा, गडहिंग्लज, भुदरगड, चंदगड, कागल, राधानगरी या तालुक्यातील तसेच गोवा राज्यातील पदाधिकारी उपस्थित होते.
प्रारंभी राष्ट्रमाता जिजाऊमासाहेब आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व मराठा समाजासाठी बलिदान देणारे मराठा महासंघाचे संस्थापक स्व. आण्णासाहेब पाटील यांच्या प्रतिमा पूजन करण्यात आले.
यावेळी बोलतांना जिल्हाध्यक्ष मारुतीराव मोरे म्हणाले, महाराष्ट्रात मराठा समाजाची महाराष्ट्राची लोकसंख्या ३८ टक्के आहे तलवारीच्या जोरावर मराठ्यांनी स्वराज्य मिळविले, त्याच समाजाला आरक्षणासाठी झगडावे लागत आहे. मराठा समाजाने आता कर्मकांड, अंधश्रद्धा यांना बळी पडू नये.
स्वागत व प्रास्ताविक प्राचार्य सी आर देसाई यांनी केले, प्रास्ताविकामधे त्यानी मराठा समाजाने सुत्रबद्ध विचार करुन ए. आय. तंत्रज्ञान युगाला सामोरे जाताना काळजीपूर्वक प्रयत्नशिल राहुन आपल्या पिढीने २१ व्या शतकाला सामोरे जावे व महिलांच्यामधे जनजागृती वाढवून त्यांचा सहभाग १००% करण्यामधे प्रयत्न करावेत. तसेच आपले संघटन मजबूत करावे असे सुचीत केले. यावेळी प्राचार्य डॉ. एस. बी. भांबर यांचे ‘ मराठा समाज काल आज आणि उद्या’ या विषयावर व्याख्यान झाले. दुसऱ्या सत्रात डॉ प्रा. आप्पासाहेब बुडके यांचे संघटनेचे महत्व या विषयावर व्याख्यान झाले. या मेळाव्यात भुदरगडचे तालुकाध्यक्ष प्रा.आनंद चव्हाण, प्राचार्य सुरेश सातवणेकर, चंदगड) बंडोपंत चव्हाण आजरा सुहास निंबाळकर, राधानगरी आप्पासो शिवणे गडहिंग्लज इंद्रजित घाटगे,कागल या तालुकाध्यक्षांची व प्रकाश गावकर (गोवा राज्य, कुंडलिक खोडवे (कागल), प्रकाश पोवार (गडहिंग्लज यांची भाषणे झाली.
त्याच बरोबर मराठा महासंघाचे दिनदर्शिका प्रकाशन सोहळा या कार्यक्रमाचे वेळी संपन्न झाला. डॉ.अशोक बाचूळकर यांनी वक्त्यांची ओळख करून दिली. आभार संभाजीराव इंजल यांनी मानले.
पं. दीनदयाळ विद्यालय मध्ये वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रम उत्साहात

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
पंडित दिनदयाळ विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
दीप प्रज्वलनाने व स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.स्वामी विवेकानंद तसेच राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त प्रमुख पाहुणे प्रा ए .डी कांबळे व मान्यवरांच्या हस्ते फोटोचे पूजन करण्यात आले. यानंतर पाहुण्यांचे व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. मुख्याध्यापक संजीव देसाई यांनी प्रास्ताविकेत केले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ए. डी.कांबळे( र .भा. माडखोलकर महाविद्यालय, चंदगड) यांनी ‘ साधी राहणी उच्च’ विचारसरणी असणाऱ्या पं. दीनदयाळ उपाध्याय यांच्याबद्दल माहिती सांगून संस्थेच्या कार्याचा गुणगौरव केला. राजमाता जिजाऊ यांनी त्या काळात स्त्रियांना मानसन्मान मिळवून देण्याची सुरुवात केली. जिजाऊंनी छ.शिवाजी महाराज यांना हिंदवी स्वराज्य स्थापनेची प्रेरणा दिली. स्वामी विवेकानंद यांनी हिंदू धर्माचे महत्त्व संपूर्ण जगाला सांगितले . त्यांच्या शिकागो येथील जागतिक धर्म परिषदेतील प्रभावी भाषणांनी संपूर्ण जगाला भारताची महान संस्कृती कळली.संस्काराची शिदोरी ही आयुष्याला पुरणारी आहे .आई-वडिलांचे आशीर्वाद घ्या. त्यांच्या कष्टाचा आदर करा. शिक्षकांनी दिलेल्या माहितीचे रूपांतर ज्ञानामध्ये विद्यार्थ्यांना करता आले पाहिजे .माणसात राहण्याचा प्रयत्न करा .माणसे जोडण्याचे कौशल्य शिका. विद्यार्थ्यांना छोट्या बोधपर कथांतून संस्कारांचे महत्त्व सांगितले. विज्ञान जीवनामध्ये सर्वश्रेष्ठ आहे .कागदावरील गुण म्हणजे आपली गुणवत्ता नाही तर आपल्याला व्यवहारी ज्ञान किती आहे हे महत्त्वाचे आहे .घेतलेलं ज्ञान कुठे वापरावे याचं ज्ञान झालं पाहिजे. ज्या महान भारतात जन्माला आलो त्या भारताची संस्कृती आपण जपली पाहिजे. घर, शाळा आणि समाज यांच्याकडून होणाऱ्या संस्कारातून सृजनशील विद्यार्थी घडत असतो. विद्यार्थी हा अभ्यास करून घाम गाळणारा नसावा तर सुसंस्कारी असावा असा संदेश आपल्या मार्गदर्शनातून प्रा.ए.डी कांबळे यांनी विद्यार्थ्यांना देऊन विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
यानंतर संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. सुधीर मुंज यांनी संस्कारांची शिदोरी घेऊन आपल्या जीवनात आपण आपले व्यक्तिमत्व घडविले पाहिजे असे आपल्या मनोगतात सांगून विद्यार्थ्यांनी वर्षभरात मिळविलेल्या यशाचे कौतुक करून त्यांचे अभिनंदन केले. या कार्यक्रमासाठी संस्थेचे सचिव मलिक कुमार बुरुड, खजानिस रमेश कारेकर, संचालक सुधीर कुंभार, भिकाजी पाटील, सल्लागार प्रकाश पाटील, लक्ष्मण पाटील, सुरेश कुंभार तसेच माजी शिक्षक गोपाळ कदम, राकेश करमळकर,पालक ,सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी ,सर्व विद्यार्थी – विद्यार्थिनी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश प्रभू, भरत बुरुड यांनी केले. आभार विजय राजोपाध्ये यांनी मानले.

विद्या मंदिर वाटंगी येथे विद्यार्थ्यांचा खाद्य महोत्सव उत्साहात

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
विद्यार्थ्यांमध्ये उपक्रमशीलता, स्वावलंबन व व्यावहारिक कौशल्यांचा विकास व्हावा या उद्देशाने विद्या मंदिर वाटंगी, ता. आजरा येथे विद्यार्थ्यांनी खाद्य महोत्सव आयोजित केला होता.
या महोत्सवात विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या विविध चविष्ट व पारंपरिक खाद्यपदार्थांचे स्टॉल्स उभारले होते. पोहे, उपमा, वडापाव, भेळ, चॉकलेट, मिठाई, केक, चहा -बिस्कीट आदी पदार्थांनी उपस्थितांची मने जिंकली. पदार्थांची देवाण घेवाण करणे त्याचा हिशेब ठेवणे यातून त्यांनी व्यवहारज्ञानाचा अनुभव घेतला.
विद्यार्थ्यांनी पदार्थनिर्मितीपासून विक्री, स्वच्छता व आर्थिक नियोजनाची जबाबदारी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडली.
या उपक्रमाचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. उमेश घोरपडे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे व संघभावनेचे कौतुक करत असे उपक्रम विद्यार्थ्यांना जीवनोपयोगी कौशल्ये आत्मसात करण्यास मदत करतात, असे मत त्यांनी व्यक्त केले. सुरवातीला श्रीमती रंजना हसुरे यांनी उपस्थितांचे स्वागत करून कार्यक्रमाचा हेतू सांगितला .
या खाद्य महोत्सवाला शिक्षकवृंद, पालक व ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी विश्वास कांबळे, पुंडलिक नाईक, अंकुश सुतार, संतोष बिरजे, अविनाश कांबळे, सौ. रेश्मा कसलकर , पल्लवी जाधव, छाया जाधव यांच्यासह ज्येष्ठ नागरिक,शिक्षक उपस्थित होते.

निधन वार्ता
जयराम जाधव

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
खानापूर ता. आजरा येथील जयराम मुस्लिम जाधव ( वय ६५ वर्षे) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगा, दोन विवाहित मुली, जावई असा परिवार आहे.
छायावृत्त…

आजरा तालुक्यातून जाणाऱ्या हलकर्णी- चंदगड रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे आहे . ला दर्जा ना पाणी व सदर कामाकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नसल्याने या नव्याने तयार होत असणाऱ्या रस्त्याची बांधकामापूर्वीची दुर्दशा झाली आहे. या रस्त्याचे हात्तीवडे येथे टिपलेले हे छायाचित्र.


