बुधवार दि.१५ आक्टोंबर २०२५


पान मसाल्यासह मावा विक्रेत्यांवर पोलिसांची धाड
दोघा विरोधात गुन्हा नोंद

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा येथील संभाजी चौकातील न्यू हॉटेल मलबार व लिबर्टी पान शॉप वर स्थानिक पोलिसांनी धाड घालून मोठ्या प्रमाणावर पान मसाला व मावा ताब्यात घेतला आहे. याप्रकरणी संजय मधुकर कांबळे (रा. सोनुर्ले ता. शाहुवाडी सध्या रा. शिवाजीनगर आजरा) व इरफान अब्दुल अहमद मुल्ला (रा. आमराई गल्ली, आजरा) या दोघा विरोधात पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.
जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये विमल, हिरा, रजनीगंधा. गुटखा, पान मसाला, मावा, सुगंधी सुपारी इत्यादीचा समावेश आहे.
दयानंद विठोबा बेनके यांनी आजरा पोलिसात फिर्यादी असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक धोंडे करीत आहेत.

हत्ती हटाव आंदोलन स्थगीत : २५ ला कोल्हापुरात बैठक, विविध मागण्यावर चर्चा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
सहाय्यक वनसंरक्षक विलास काळे यांनी आंदोलकांच्या स्थानिक स्तरावरील काही मागण्या पूर्ण करण्याची ग्वाही दिली. त्याचबरोबर अन्य धोरणात्मक मागण्याबाबत (ता. १५) याबाबत वरिष्ठाशी बैठक लावणार असल्याचे लेखी पत्र दिल्याने सोमवारपासून सुरू असणारे आंदोलन आंदोलकांनी आंदोलन तात्पुरते स्थगित केले. घाटकरवाडी येथील वनविभागाच्या कार्यालयासमोर घाटकरवाडी, किटवडे पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी बेमुदत ठिय्या ठोकला होता. आज आंदोलनाचा दुसरा दिवस होता.
कृषी विभाग व कृषी उत्पन्न बाजार समितीकडून सन २०२५ चे बाजारभाव घेवून नुकसान भरपाई शेतकऱ्यांना दिली जाईल. यासह अन्य मागण्याबाबत सहाय्यक वनसंरक्षक काळे यांनी सकारात्मकता दर्शवली. या वेळी आजरा कारखान्याचे अध्यक्ष मुकुंदराव देसाई, शिवसेना उबाठाचे युवराज पोवार, चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांच्या प्रतिनिधी भारती जाधव यांची भाषणे झाली. संचालक अनिल फडके, भाजपचे तालुका अध्यक्ष अनिकेत चराटी, आजरा कारखान्याचे माजी संचालक दशरथ अमृते, उदयोजक रमेश रेडेकर यांनी आंदोलनस्थळी भेट देवून पाठिंबा दिला.
पालकमंत्री पालकमंत्री आबिटकर यांचा भ्रमणध्वनीवरून संपर्क
पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी भ्रमणध्वनीद्वारे आंदोलकांशी त्यांच्या विविध मागण्यावर चर्चा केली. हत्ती संगोपन केंद्र, तारेचे कुंपण, अतिवृष्टीमुळे कर्जमाफी या मागण्याबाबत लवकरच बैठक घेणार असल्याची ग्वाही दिली.

सोहाळे येथे धम्मचक्र परिवर्तन दिन संपन्न

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
नालंदा नगर सोहाळे या.आजरा मध्ये ६९ वा धम्मचक्र परिवर्तन दिवस व पंचशील तरुण मंडळ सोहाळे या मंडळाचा वर्धापन दिन सोहळा हे दोन्ही कार्यक्रम साध्या पद्धतीने साजरे करण्यात आले.
यावेळी नालंदा नगर मधील सर्व बौद्ध उपासक व उपासिका उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधीर कांबळे यांनी केले. शिवाजी सम्राट व तानाजी कांबळे यांनी पंचशील ग्रहण केले तर आभार आनंदा कांबळे यांनी मांडले.

समाजाची प्रगती हेच ‘रवळनाथ’ चे ध्येय
सौ. मीना रिंगणे
आजरा शाखेचा २९ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
रवळनाथ हौसिंग फायनान्स सोसायटीचा प्रवास हा आजरा येथून सुरु झाला आहे.ही संस्था आपल्या आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक अशा विविधांगी कार्यातून ग्रामीण भागातील आपल्या समाजबांधवांचे जीवन समृद्ध करत आहे. त्यामुळे समाजाची प्रगती हेच ध्येय केंद्रस्थानी ठेऊन रवळनाथची वाटचाल सुरु आहे, असे मत खळनाथच्या उपाध्यक्षा सौ. मीना रिंगणे यांनी व्यक्त केले.
संस्थेच्या आजरा शाखेच्या २९ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या. संस्थापक अध्यक्ष श्री. एम. एल. चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला. संचालक प्रा. व्ही. के. मायदेव, आजरा शाखा चेअरमन प्रा. डॉ. विनायक आजगेकर, प्रा. डॉ. शिवशंकर उपासे यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रा डॉ. शिवशंकर उपाशी व प्रा. व्ही. के. मायदेव यांनी यावेळी मनोगत व्यक्त केली. संस्थापक अध्यक्ष श्री. एम. एल चौगुले यांच्या कुशल नेतृत्वाखाली संस्थेने व्यवस्थापन, शाखाविस्तारासह २९ वर्षांची वाटचाल यशस्वी केली आहे. संस्थेचे बँकेत रुपांतर होण्यासाठी वाटचाल सुरु असून ते देखील निश्चित पुर्ण होईल असे सांगितले.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते श्री रवळनाथाच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. याप्रसंगी संचालक श्री. महेश मजती, प्रा. विजय आरबोळे, सभासद श्री. गुरु गोवेकर यांनी देखील मनोगत व्यक्त केले. आजरा शाखा चेअरमन प्रा.डॉ. विनायक आजगेकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. शाखा सल्लागार सौ. सुरेखा भालेराव यांनी सुत्रसंचालन केले. सीईओ श्री. डी. के. मायदेव यांनी आभार मानले.
यावेळी संचालक प्रा. डॉ. किरण पोतदार, शाखा सल्लागार प्रा. राजीव टोपले, श्री. गणपती नाईक, माजी संचालक प्रा. जनार्दन दळवी, प्रा. वैजनाथ बचुटे, सभासद श्री. षडानन देशपांडे, श्री. दिलीप भालेराव, शाखाधिकारी श्री. दीपक शिंदे यांच्यासह सभासद अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. दिवसभरात विविध मान्यवरांनी संस्थेस भेट देऊन शुभेच्छा दिल्या.

जनता सहकारी गृहतारण संस्थेच्या कर्मचाऱ्यांना निमित्त १६.६६% दिवाळी बोनस
आजरा: मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
जनता सहकारी गृहतारण संस्थेने रौप्यमहोत्सवी वर्षामध्ये पर्दापण केले आहे. याच टप्प्यावरती संस्थेने सभासदांच्या विश्वासास पात्र १०० कोटी ठेवींचा टप्पा पुर्ण केला आहे. ठेवी आणि कर्जाचा योग्य समतोल राखत संस्था प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे. संस्थेच्या या वाटचाली मध्ये कर्मचाऱ्यांचे योगदान लक्षात घेऊन संस्थेकडून (१६.६६%) दिवाळी बोनस देत आहोत असे प्रतिपादन संस्थेचे चेअरमन श्री. मारूती मोरे यांनी केले.
सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे पगार देणारी आणि दिवाळी भेट म्हणून १६.६६ (दोन पगार) देणारी जनता गृहतारण संस्था ठामपणे पुढे जात आहे. १०० कोटी ठेवी पूर्ण केल्याबद्दल नुकतीच एक आगाऊ वेतनवाढ दिलेली असताना सुध्दा संस्थेने दिवाळी बोनस दिलेला आहे असे मत व्हा. चेअरमन डॉ. अशोक बाचूळकर यांनी व्यक्त केले. यावेळी कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस, ड्रेसकोड आणि मिठाईचे वाटप करून कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देणेत आल्या.
याप्रसंगी संचालक रविंद्र आजगेकर, प्रशासकीय अधिकारी मारूती कुंभार, व शाखाधिकारी अरविंद कुंभार आणि कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी मॅनेजर मधुकर खवरे संचालक मंडळाने नेहमीच कर्मचाऱ्यांचे हित लक्षात घेतले आहे. त्यांनी दिलेली भेट आम्ही आनंदाने स्विकारून संस्थेच्या प्रगतीसाठी एक दिलाने काम करू असे सांगितले.

भिकाजी आजगेकर यांचे निधन…

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
पेंढारवाडी तालुका आजरा येथील भिकाजी गणपती आजगेकर (वय ७० वर्षे ) यांचे अल्पशा आजाराने पुणे येथे निधन झाले.
ते पेंढारवाडी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित मुंबई चे संस्थापक सदस्य, माजी अध्यक्ष, श्री एकता पंतभक्त मंडळ पेंढारवाडीचे अध्यक्ष होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना , नातवंडे असा परिवार आहे.
पेंढारवाडी येथे आज बुधवारी सकाळी ९ वाजता अंत्यसंस्कार विधी होणार आहे.

स्वदेशीचा दीप – अंधांच्या हातांनी उजळलेला.
गर्जना प्रतिष्ठानचा उपक्रम
आजरा: मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीनी दिलेल्या हर घर स्वदेशी या आवाहनाला प्रतिसाद देत गर्जना प्रतिष्ठान तर्फे नेत्रचळवळ संचलित अंधांचे रोजगार केंद्र, गडहिंग्लज येथील अंध बांधवांनी स्वतःच्या हातांनी तयार केलेले आकर्षक स्वदेशी आकाशकंदील व लाईट माळा गर्जना प्रतिष्ठानच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचविण्यात येत आहेत.या विक्रीतून होणारा १०० टक्के नफा अंध रोजगार केंद्र, गडहिंग्लज यांच्याकडे देण्यात येणार असून, या माध्यमातून अंध बांधवांना रोजगाराचा नवा किरण मिळत आहे.
विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना दिवाळी भेट स्वरूपात हेच स्वदेशी कंदील, लाईट माळा आणि शुभेच्छा पत्र गर्जना प्रतिष्ठानमार्फत स्पीड पोस्टद्वारे पाठविण्यात आले आहे.
या उपक्रमाचा एक भाग म्हणून आज गर्जना प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. दिगंबर मिसाळ, गर्जना परिवार प्रमुख श्री. प्रकाश बेलवाडे, स्वयंसेवी कार्यकर्ते श्री. विनायक चिटणीस आणि श्री. जोतिबा नांदवडेकर यांनी आजरा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, महसूल अधिकारी तसेच विविध शासकीय अधिकाऱ्यांना भेट देऊन या उपक्रमाची माहिती दिली.
यावेळी अंध बांधवांनी तयार केलेले स्वदेशी कंदील अधिकाऱ्यांना भेट स्वरूपात देण्यात आले.
या उपक्रमामुळे समाजात स्वदेशी वस्तूंचा प्रसार, स्थानिक उत्पादनांचा गौरव आणि दिव्यांग बांधवांच्या आत्मनिर्भरतेचा संदेश पोहोचत आहे.स्वदेशीचा दीप अंधांच्या हातांनी उजळलेला हा उपक्रम खऱ्या अर्थाने दिवाळीचा सामाजिक व प्रेरणादायी प्रकाश ठरत आहे.

आज तालुक्यात…
आजरा कारखान्याचा आज बॉयलर अग्नी प्रदीपन कार्यक्रम आज बुधवारी सकाळी अकरा वाजता आयोजित करण्यात आला आहे.



