mrityunjaymahanews
अन्यआजरा तालुका विशेषकोल्हापूरगुन्हाठळक बातम्याराजकीयसामाजिकस्थानिक

सातच्या बातम्या

शुक्रवार  दि.१० आक्टोंबर २०२५

सोशल मीडियावर स्वयंघोषित नगरसेवकांचा धुमाकूळ

महत्त्व वाढवण्यासाठी खटाटोप


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग निहाय आरक्षण व प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम यासारख्या सोशल मीडियावर स्वयंघोषित संभाव्य उमेदवारांनी चांगला धुमाकूळ घातला आहे. यातील किती जण प्रत्यक्ष नगराध्यक्ष व नगरसेवक पदाकरिता रिंगणात राहणार हा संशोधनाचा विषय असला तरीही तूर्तास आपले महत्त्व स्वतःहून वाढवून घेण्याचा हा चाललेला खटाटोप सध्या चर्चेत आहे.

अनेक इच्छुकांना या आरक्षणाचा फटका बसला आहे. त्यामुळे रिंगणात येण्यापूर्वीच ते रिंगणाबाहेर गेले आहेत. आरक्षण जाहीर होताच संबंधित प्रभागातील व संबंधित आरक्षणानुसार जे उमेदवारीस पात्र ठरू शकतात अशा मंडळींचे संदेश या समाज माध्यमातून झळकू लागले आहेत. काहींनी तर आपल्या बगलबच्च्यांच्या माध्यमातून स्वतःच रसद पुरवून आपणही या स्पर्धेमध्ये आहोत असे दाखवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. अशांची एकंदर राजकीय परिस्थिती व पार्श्वभूमी पाहता केवळ स्वतःचे महत्त्व वाढवण्यासाठी या भावी, परमनंट (?) मंडळींचा चाललेला हा खटाटोप आहे हे सांगण्याची गरज नाही.

काही का असेना सध्या शहरवासीयांची चांगलीच करमणूक सुरू आहे हे मात्र नक्की.

पाऊस उभा..‌.
पिके आडवी...
धुवॉंधार पावसाने तालुक्याला झोडपले

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा शहरासह परिसराला गुरुवारी दुपारपासून पावसाने चांगलेच झोडपले. भात कापणी व मळणीमध्ये गुंतलेल्या शेतकऱ्याची यामुळे चांगलीच तारांबळ उडाली. कांही ठिकाणी तर या जोरदार पावसाने भात पिके आडवी होऊन मोठे नुकसान झाले आहे. पावसामुळे विद्युत पुरवठा खंडित झाल्याने सुमारे आठ ते नऊ तास तालुका अंधारात होता.

ऑक्टोबर महिन्यामध्ये पाऊस थांबेल या प्रतीक्षेत असणाऱ्या आजरा तालुका वासीयांना काल पावसाने हजेरी लावून चिंतेत टाकले आहे. भात कापणी व मळणी बाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून यावर्षी तब्बल पाच महिने सातत्याने पावसाने हजेरी लावत नवा विक्रम केला आहे.

तालुक्यातील रस्त्यांची दुर्दशा…

सततच्या पावसामुळे तालुक्यातील अनेक रस्त्यांची दूर्दशा झाली आहे. आजरा शहरात तर सर्वत्र चिखलाचे साम्राज्य आहे.

अखेर वीज पुरवठा सुरू झाला
रात्रभर कर्मचाऱ्यांची झाली दमछाक

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास आजरा शहराला वीज पुरवठा करणारी ३३ केव्ही लाईन ब्रेक डाऊन झाली. एकीकडे वीज कर्मचाऱ्यांच्या संपाची चर्चा सुरू असताना विद्युत पुरवठा खंडित झाल्याने याबाबत तर्कवितर्क लढवले जात होते. प्रत्यक्षात मात्र लाईन ब्रेक डाऊन झाली होती हे वास्तव होते.

आरदाळ गावानजीक दोन पीन इन्सुलेटर, शिप्पूर गावाजवळ एक इन्सुलेटर व आजरा शहराजवळील एक इन्सुलेटर बदलून वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आव्हान वीज कर्मचाऱ्यांसमोर होते. पावसाचा व्यत्ययही पुन्हा पुन्हा येत होता.

अखेर सुमारे नऊ तास सलग काम करून हे इन्सुलेटर बदलण्यात आले त्यानंतर वीजपुरवठा सुरळीत झाला. या कामी कार्यकारी अभियंता संजय पोवार यांच्यासह वीज वितरण चे कर्मचारी यांनी विशेष प्रयत्न केले.

शुक्रवारी पहाटे चार वाजता वीजपुरवठा सुरळीत झाला. वीज वितरणचे कर्मचारी निश्चितच अभिनंदनास पात्र ठरले.

निधन वार्ता
अण्णासाहेब देसाई

कोवाडे ता. आजरा येथील श्री. आण्णासाहेब गणपती देसाई यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. निधन समयी ते ८० वर्षांचे होते. इंटरनॅशनल एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया, मुंबई येथून अधिकारी पदावरून ते निवृत्त झाले होते.

त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, नातवंडे यांच्यासह मोठा परिवार आहे.

श्री डि. वाय. देसाई व भास्कर देसाई यांचे ते चुलते होत.

सुनंदा पालकर

खेडे ता.आजरा येथील सुनंदा रामचंद्र पालकर (वय ७७ वर्षे ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

त्यांच्या पश्यात एक मुलगा, दोन विवाहित मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

आजरा अर्बन बँक शाखा कार्वे चे शाखाधिकारी विलास पालकर यांच्या त्या आई होत.

कानोली विकास सेवा संस्थेचा उद्या अमृत महोत्सवी कार्यक्रम

आजरा मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा 

कानोली विकास सेवा संस्था मर्यादित कानोली या संस्थेला ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल वैद्यकीय शिक्षण मंत्री नाम. हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत अमृत महोत्सवी सोहळ्याचे विशेष आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष दिलीप पाटील व उपाध्यक्ष गुलाब देसाई यांनी दिली.

या कार्यक्रमास माजी आमदार राजेश पाटील, जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई, गोकुळच्या संचालिका अंजनाताई रेडेकर, आजरा साखर कारखान्याचे अध्यक्ष मुकुंदराव देसाई, यांच्यासह वसंतराव धुरे, प्रकाशभाई पताडे, अल्बर्ट डिसोजा, विष्णुपंत केसरकर अनिल फडके, महादेव पाटील, सुभाष देसाई, एम.के. देसाई, दौलती पाटील, दिगंबर देसाई, राजेंद्र मुरुकटे, सहाय्यक निबंधक सुजय येजरे, जिल्हा बँकेचे विभागीय अधिकारी सुनील दिवटे, बँक निरीक्षक विजय कुंभार यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कानोली विकास सेवा संस्थेच्या प्रांगणात सकाळी १०.३० वाजता सदर कार्यक्रम होणार आहे.

आजचा मोर्चा स्थगित

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आज शुक्रवार दिनांक दहा १० रोजी आजरा शहरातील भटक्या व मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्तासंदर्भात सर्वपक्षीय मोर्चा काढण्याचे नियोजन करण्यात आले होते.

तथापि, मा. मुख्याधिकारी, नगरपंचायत आजरा यांनी मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्ताबाबत मिशन रेबीज, गोवा या संस्थेच्या  व्यवस्थापकांशी लेखी तसेच मौखिक स्वरूपात संपर्क साधून कार्यवाही सुरू असल्याचे कळविले आहे. याबाबतचे लेखी पत्र अध्यक्ष, आजरा रहिवासी अन्याय निवारण समिती यांना प्राप्त झाले आहे.

तसेच श्री. परशुराम बामणे यांच्याशी दूरध्वनीद्वारे सविस्तर चर्चा देखील करण्यात आलेली आहे.वरील कार्यवाहीचा विचार करता आजचा मोर्चा तात्पुरता स्थगित करण्यात आला आहे.

नावीद मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळ वाटप

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

गोकुळचे अध्यक्ष नावीद मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त आजरा ग्रामीण रुग्णालयामध्ये गोकुळ कर्मचाऱ्यांच्या वतीने फळे वाटपाचा कार्यक्रम पार पडला.

या कार्यक्रम प्रसंगी डॉक्टर सागर तेऊरवाडकर, डॉ. जमदाडे, महेश कोले, दशरथ होलम,विश्वास चव्हाण,विजय केसरकर, उदय पाटील, संजय पाटील, दयानंद जाधव यांच्यासह  गोकुळचे कर्मचारी व आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

राज्यपाल कोशारी यांच्या विरोधात आजऱ्यात शिवसैनिक आक्रमक… संभाजी चौकात केले जोडे मारो आंदोलन

mrityunjay mahanews
error: Content is protected !!