गुरुवार दि. १४ ऑगस्ट २०२५

आजी माजी सैनिकांच्या समस्या सोडवण्यासाठी महसूल प्रयत्नशील : तहसीलदार समीर माने

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजी माजी सैनिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन तहसीलदार समीर माने यांनी केले आहे.
येथील तहसीलदार कार्यालयात मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमान अभियान कोल्हापूर अंतर्गत येथे आजी माजी सैनिक संघटना यांच्या वतीने सैनिक अदालत झाली. आजरा तहसिलदार समीर माने बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. निवासी नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी तथा सुभेदार सुहास कांबळे, माजी सैनिक कल्याण समितीचे आजरा तालुका अध्यक्ष दत्तात्रय मोहीते प्रमुख उपस्थित होते समितीचे तालुका अध्यक्ष श्री. मोहिते यांनी स्वागत केले. त्यांनी प्रास्ताविकात आजी माजी सैनिकांच्या व्यथा मांडल्या. बहिरेवाडी येथील स्मारकबाबत, पंचायत समिती मधील काही विषय, पोलीस स्टेशन यांच्याकडे काही तक्रारी आहेत. त्याची कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावेत. तहसीलदार श्री. माने म्हणाले, प्रत्येकाने आपले अर्ज प्रशासनाकडे जमा करावेत. योग्य कागदपत्रे असतील तर आठ दिवसात प्रलंबित काम मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करु.तहसीलदारांच्याडे सतरा तक्रारी दाखल करण्यात आल्या.
यावेळी आनंदा टेमकर, सुरेश हासबे, कृष्णा पाटील, तानाजी उत्तुरकर, अरविंद देसाई, दत्तात्रय सावंत, जोतिबा शेटे, निवृत्ती कुंभार, संभाजी घाटगे, वीरपत्नीसह आजी- माजी ७० सैनिक उपस्थित होते. दयानंद पाटील यांनी सूत्रसंचालन केले. उपाध्यक्ष समितीचे उपाध्यक्ष दिनकर जाधव यांनी आभार मानले.

हत्ती खानापुरात
भात रोपांचे नुकसान

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
दोन दिवसांपूर्वी इटे येथे दाखल झालेल्या हत्तीने आपला मोर्चा खानापूर गावच्या शेती पिकामध्ये वळवला असून भात रोपांचे मोठे नुकसान केले आहे.
बाबू तुकाराम गुरव, गौतम कांबळे, कृष्णा जाधव, रामदास पाटील, रुजाय कुतीनो आदींच्या भात रोपांचे मोठे नुकसान झाले आहे. हत्तीची शेतकऱ्यांच्या दृष्टीने नव्याने डोकेदुखी सुरू झाली आहे.

उत्तूर ग्रामपंचायतीच्या विविध समित्या कागदावरच….

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा. (मंदार हळवणकर)
उत्तूर ता. आजरा ग्रामपंचायतीने दोन वर्षांपूर्वी गावसभेत प्रशासन अधिक पारदर्शक व परिणामकारक होण्यासाठी विविध समित्यांची स्थापना केली. पण दोन वर्षांनंतरही या समित्या अकार्यक्षम असून कागदावरच राहिल्या आहेत. त्यामुळे विविध समितीचे काम कशा पद्धतीने चालते हा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे.यामध्ये पाणी पुरवठा, क्रीडा, लेखापरीक्षण, महिला व बालकल्याण, ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता, सामाजिक लेखापरीक्षा, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना देखरेख व दक्षता, ग्रामीण बाल संरक्षण आणि नानाजी देशमुख कृषी संजीव समिती अशा अनेक समित्या ठरावाद्वारे मंजूर करण्यात आल्या होत्या.
आजवर या समित्यांची एकदाही बैठक न झाल्यामुळे समिती सदस्य व ग्रामस्थांमध्ये नाराजीची भावना आहे.
समित्यांच्या स्थापनेच्या वेळी गावाच्या सर्वांगीण विकासाचे आश्वासन ग्रामपंचायतीने दिले होते.दोन वर्ष उलटूनही एकही सभा किंवा कार्यवाही न झाल्यामुळे या समित्या फक्त कागदावरच राहिल्या आहेत.
गावातील रस्ते, गटारे, पाणीपुरवठा, आरोग्य सेवा अशा मूलभूत सुविधांशी संबंधित अनेक प्रश्न अद्याप न सुटल्याने ग्रामस्थ त्रस्त आहेत. योग्य नियोजन व चर्चेअभावी अनेक कामे रखडली असून गाव विकासाच्या बाबतीत मागे पडत आहे.ग्रामस्थांमध्ये याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. ग्रामपंचायतीच्या या उदासीनतेमुळे गावातील विकासकामांवर परिणाम होतो आहे.
संबंधित समित्यांच्या सदस्यांनी व ग्रामपंचायतीने तत्काळ सभा घेऊन कार्यवाही सुरू करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. अन्यथा याबाबत वरिष्ठ प्रशासनाकडे तक्रार करण्याचा इशाराही काही ग्रामस्थांनी दिला आहे.

वझरे येथे गावठी दारूची बंदी करा
ग्रामपंचायतीला निवेदन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
वझरे तालुका आजरा येथे गावठी दारू मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होत असल्याने गावामध्ये अनेक कुटुंबामध्ये वाद सुरू असून सामाजिक व कौटुंबिक स्वास्थ्य बिघडले आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण होत आहे बऱ्याच ठिकाणी गावठी दारू विक्री बेकायदेशीर रित्या केली जाते. ग्रामपंचायतीने यामध्ये लक्ष घालून ही दारू विक्री बंद करावी अशी मागणी स्थानिक तरुणांनी केली आहे. याबाबतचे लेखी निवेदन देण्यात आले असून निवेदनावर शिवराज लोखंडे, मानतेश लोखंडे, रवींद्र खोराटे, बापूसाहेब लोखंडे, कृष्णा लोखंडे यांच्यासह तरुणांच्या सह्या आहेत.

पार्वती शंकर विद्यालयात वृक्षारोपण

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
येथील पार्वती-शंकर शैक्षणिक संस्थेत वृक्षारोपण करण्यात आले .
स्वागत मुख्याध्यापक एम.यू. शिकलगार यांनी केले. प्रास्ताविक पंडित वंजारे यांनी केले . नववीच्या ६१ मुला- मुलींनी परिसरात जांभूळ झाडांची रोपे लावली. ग्रामपंचायत उत्तूर यांनी रोपे उपलब्ध करून दिली .
राम पाटील यांनी मनोगत व्यक्त केले . बाळासाहेब जाधव यांनी आभार मानले .

छाया वृत्त

शासनाच्या हर घर तिरंगा अभियानांतर्गत आजरा तहसील कार्यालयामार्फत तहसील आवारात निवासी नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
छाया वृत्त

आवंडी वसाहतीमध्ये सुभाष निकम, पांडुरंग फगरे, शंकर कोले यांनी दिलेल्या झाडांचे स्वतः शाळेच्या मुलांसोबत वृक्षारोपण केले.
शाळेच्या मुख्याध्यापिका दिपाली कवठणकर व विनायक राजयोगी यांनी सर्वांचे आभार मानले.
छाया वृत्त

पथदिवे तर लागलेच नाही तर परंतु पथदिव्यांसाठी उभारलेले विद्युत खांब चक्क आता आडवे होऊन कोसळण्याच्या स्थितीत असून ते धोकादायक बनू लागले आहेत… हे चित्र आहे साळगाव फाट्यावरील राष्ट्रीय महामार्गाने उभा केलेले पदिव्यांच्या खांबांचे.

निधन वार्ता
जिजाबाई मस्कर

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
पेरणोली या.आजरा येथील जिजाबाई तुकाराम मस्कर (वय ९६) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली, सूना, नातवंडे, परतवंडे असा परिवार आहे. आजरा तालुका शेतकरी सहकारी संघाचे कॅशिअर गोविंद मस्कर यांच्या आई होत.


