mrityunjaymahanews
अन्यकोल्हापूरक्रीडागुन्हाठळक बातम्यादेशमनोरंजनमहाराष्ट्रराजकीयसामाजिकस्थानिक

सातच्या बातम्या

शनिवार २१ जून २०२५       

तो मी नव्हेच…
मृत व्यक्ती चक्क हजर झाली…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     गुरुवारी सायंकाळच्या दरम्यान आजरा – महागाव मार्गावर चित्री नदीच्या पात्रात एक अनोळखी मृतदेह ओढ्यातून वाहून आलेला कांही मंडळींनी पाहिला. मृतदेह पाहण्यासाठी आजरेकरांची झुंबड उडाली. जलचरांनी मृतदेहाचा चेहरा कुरतडल्याने ओळख पटवताना चांगलीच दमछाक झाली ‌. कांही मंडळींनी मृतदेहाची छायाचित्र पाहून तो मृतदेह आजऱ्यातील एका दुकानात काम करणाऱ्या कारागिराचा असल्यावर शिक्कामोर्तब केले. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याचे नावही सर्वत्र व्हायरल करण्यात आले. सदरचे वृत्त त्याच्या घरापर्यंत पोहोचताच घरामध्ये गोंधळ उडाला.

     गमतीचा भाग म्हणजे ज्या कारागिराचा सदर मृतदेह आहे असे सोशल मीडिया वरून व्हायरल करण्यात आले होते तो कारागीर आठवडा बाजाराचा दिवस असल्यामुळे सकाळी लवकरच कामाच्या निमित्याने आपल्या दुकानात हजर झाला. त्याला पाहताच अनेकांचे डोळे विस्फारले. पुन्हा मयत व्यक्ती ती नाही असे उलटे मेसेज व्हायरल करण्यात आले.

       सोशल मीडियाच्या या गोंधळामुळे संबंधिताला मात्र अहो तो मी नव्हेच… असे म्हणण्याची वेळ आली. पोलिसांनाही नेमका मृतदेह कोणाचा ? या प्रश्नाचे नव्याने उत्तर शोधावे लागत आहे.

शैक्षणिक स्पर्धेत दर्जा टिकवण्याची गरज : पालकमंत्री प्रकाश आबिटकर

आदर्श व रवळनाथ बालक मंदिराच्या इमारतींचे उद्घाटन थाटात

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा 

       शैक्षणिक संस्थामध्ये आज स्पर्धा तयार झालेली आहे. विद्यार्थी मिळवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते आहे.आपल्या पाल्यांना चांगले आणि दर्जेदार शिक्षण देण्यासाठी पालकांची धडपड सुरु असते त्यासाठी पालकांनी जागृत असणे गरजेचे आहे. गुणवंत आणि आदर्श विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहे आणि हे गुणवंत विद्यार्थी घडवण्यासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी शिक्षकही त्या दर्जाचे असायला हवेत. पूर्वी विद्यार्थी होते पण शाळा इमारती नव्हत्या अलीकडे सुसज्ज शाळा इमारती आहेत पण विद्यार्थ्यांची कमतरता आहे. शिक्षणाचा पाया भक्कम करण्याचे काम जनता शिक्षण संस्थेने आदर्श व रवळनाथ बालक मंदिराच्या माध्यमातून केले असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले. जनता शिक्षण संस्थेच्या आदर्श व रवळनाथ बालक मंदिराच्या इमारत उद्घाटन पालकमंत्री आबिटकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अशोकअण्णा चराटी होते.

       अध्यक्षीय भाषणात अशोकण्णा म्हणाले , आज जनता एज्युकेशन सोसायटी शिक्षणाचे वटवृक्ष बनले आहे. बालवाडी ते पदव्युत्तर शिक्षण या संस्थेत उपलब्ध आहे. येथील विद्यार्थी अनेक क्षेत्रात आपले नावलौकिक करीत आहे. देश विदेशात विविध क्षेत्रात काम करीत आहेत. प्रत्येक क्षेत्रातील शिक्षण देण्याचा मानस संस्थेचा आहे. कृष्णा येसणे यांनीही मनोगत व्यक्त केले. इंजिनियर अभिजीत जालकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

      यावेळी तहसीलदार समीर माने, गटविकास अधिकारी शरद मगर, उपाध्यक्ष विलास नाईक, संचालक डॉ. दीपक सातोसकर, विजयकुमार पाटील, ज्योत्स्ना चराटी, दशरथ अमृते, जी. एम. पाटील, अनिरुद्ध केसरकर, संजय चव्हाण,साधना नारे, जयश्री डांग,संतोष भाटले, शुभदा जोशी , सुमैय्या खेडेकर, यासिराबी लमतुरे, शरीफ खेडेकर, असिफ पटेल, जयवंत सुतार, गोविंद गुरव, सुरेश सावंत, आनंदा कुंभार, सुरेखा भालेराव, नूरजहॉं सोलापुरे, अनिल पाटील, ॲड.सचिन इंजल, विनय सबनीस सी. आर. देसाई, मारुती मोरे, अभिजीत रांगणेकर , प्रकाश पाटील, शशिकांत सावंत, योगेश पाटील यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, मोठ्या संख्येने उपस्थित होते. निलांबरी कामत यांनी आभार मानले.

आबिटकरांच्या झेंड्याखाली नगरपंचायत लढवणार…

     आगामी नगरपंचायत निवडणूक पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या झेंड्याखाली लढवणार असून सर्व विरोधक एकत्र आले तरी आपल्याच आघाडीचा विजय निश्चित आहे असेही चराटी यांनी यावेळी सांगितले.

आजऱ्यात जोरदार पाऊस… धनगरवाडी भरले तर साळगाव बंधाऱ्यावर पाणी 

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      आजरा शहरासह तालुक्यात काल शुक्रवारी जोरदार पाऊस झाला. पावसाचे जोरदार हजेरीमुळे साळगाव बंधाऱ्यावर रात्री उशिरा पाणी आले आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक सोहाळे – बाची मार्गे वळवण्यात आली आहे.

तालुक्यात पडणाऱ्या संततधार पावसाने धनगरवाडी धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. धरणातून १९० क्युसेक, सर्फनाला धरणातून १४१, तर एरंडोळ धरणातून ८० क्युसेकने पाणी हिरण्यकेशी नदीत सोडले जात आहे. तालुक्यातील चित्री धरण ४२ टक्के भरले आहे. धरण परिसरात १०५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. चित्री ४२ टक्के, आंबेओहोळ ७८ टक्के, सर्फनाला ४७ टक्के, एरंडोळ ८४ टक्के, तर उचंगी धरणात ३० टक्के पाणीसाठा झाला आहे.

        काल नेहमीप्रमाणे आठवडा बाजारात पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे बाजारपेठेत सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. आठवडा बाजारासाठी आलेल्या तालुकावासीयांची व व्यापाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली.

      दिवसभर पावसाच्या जोरदार सरी पुन्हा- पुन्हा कोसळत होत्या.

राष्ट्रीय महामार्गाशेजारी गटर नाही…

मार्गाशेजारील रहिवाशांचे जगणे अवघड

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

       संकेश्वर – बांदा महामार्गावरील रस्त्याशेजारील गटर्स न बांधल्यामुळे आजूबाजूच्या घरामध्ये पाणी घुसण्याचे प्रकार धनगरमोळा परिसरात सुरू आहेत. जून महिन्यात ही परिस्थिती असेल तर पावसाळा कसा काढायचा ? असा प्रश्न येथील यशवंत जाधव यांच्यासह अन्य रहीवाशांसमोर आहे.

       रस्त्यावरील संपूर्ण पाणी आजूबाजूच्या परिसरात पसरत असल्याने घरांना बेटाचे स्वरूप प्राप्त होत आहे. यामुळे प्रापंचिक साहित्याचे नुकसान तर होत आहेच परंतु सातत्याने येणाऱ्या या पाण्यामुळे पावसाळा कसा काढायचा ? हा प्रश्न आता अधोरेखित होऊ लागला आहे.

       गोड बोलून अधिकाऱ्यांनी हा महामार्ग पूर्णत्वास नेला आहे परंतु जाधव यांच्यासारख्या कुटुंबीयांच्या दृष्टीने हा महामार्ग म्हणजे डोकेदुखी ठरला आहे.

गवसे, आल्याची वाडी, घाटकरवाडी परिसरात रानडुकरांचा धुडगूस 

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

       गवसे, आल्याचीवाडी येथील नदीचा माळ भागात असणारी ७० ते ८० एकरातील शेतीत रान डुक्करांनी धुमाकूळ घालत शेतकऱ्यांच्या नाकी नऊ करून टाकले आहे. हीच अवस्था घाटकरवाडी भागात आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून वन्य प्राण्यांचा बंदोबस्त होणार तरी कधी ? असा संतप्त सवाल उपस्थित करत आहे.

      एकीकडे पश्चिम भागात तुफानी पाऊस सुरू असताना दुसरीकडे डुकरांचा धुमाकूळ शेती पिकामध्ये सुरू आहे. यापूर्वी इतक्या प्रमाणात हा त्रास नव्हता. परंतु अलीकडे गव्यांबरोबर डुकरांचीही संख्या प्रचंड वाढली आहे. वन्यप्राणी हत्या प्रतिबंधक कायद्याचा काटेकोरपणे अवलंब केला जात असल्याने हे प्राणी म्हणजे शेतकऱ्यांच्या दृष्टीने डोकेदुखी ठरत आहेत.

     सरकारकडून मिळणारी तटपुंजी मदत आणि जंगली जनावराकडून वारंवार होणार नुकसान यातून शेतकरी बांधवांच खताचा खर्च सुद्धा भागत नाही.जंगली जनावरांचा बंदोबस्त करा नाही तर शेती संरक्षणासाठी शासनाने बंदूक परवाने द्यावेत अशी शेतकऱ्यांची मागणी सुरू झाली आहे.

      प्रमोद पांडुरंग पाटील, पांडुरंग गुरव, श्रीकांत पाटील, महादेव हेब्बाळकर, नामदेव माडभगत, मारुती माडभगत, बाळासाहेब पाटील, मारुती भांदुर्गे आदींच्या उसासह अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

आजरा ग्रामीण रुग्णालयात तज्ञ डॉक्टर नेमा…
शिवसेनेची मागणी

आजरा :मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

        ‘मृत्यूंजय’ कार शिवाजीराव सावंत ग्रामीण रुग्णालय, आजरा येथे नवीन डायलेसीस सेंटर चालू करणेत आले आहे. या सेंटरमध्ये अनेक रुग्ण डायलेसीस करुन घेत आहेत पण हे डायलेसीस करताना जर एखादा रुग्ण गंभीर झाला किंवा त्याचे काही बरेवाईट झाले तर त्या सेंटरमध्ये त्यावर उपचार करणारा एम.डी मेडीसीन डॉक्टर उपलब्ध नाही. त्यामुळे पुढे जाऊन तो रुग्ण दगवण्याची शक्यता आहे. त्यामुळे याठिकाणी कायमस्वरुपी एम.डी (मेडीसीन) डॉक्टर नेमण्यात यावा त्याच बरोबर या रुग्णालयात अनेक ग्रामीण भागातून लहान मुले आजारी पडल्यावर त्यांचे पालक उपचारांसाठी या रुग्णालयात येतात. पण या ठिकाणी कायमस्वरुपी बालरोगतज्ञ नसल्यामुळे या बालकांना उपचारांसाठी खाजगी रुग्णालयात यावे लागते हे गरीब कुटुंबाना परवडणारे नाही. डॉक्टर कायमस्वरुपी उपलब्ध नसलेने लहान मुलांचे अतोनात हाल होत आहेत तरी या ठिकाणी कायमस्वरुपी बालरोगतज्ञ नेमणूक करावी अशी मागणी शिवसेना (उ.बा.ठा ) च्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतचे लेखी निवेदन जिल्हा शल्य चिकित्सकांना देण्यात आले आहे.

       यावेळी तालुकाप्रमुख युवराज पोवार, अनपाल तकीलदार, महेश पाटील, रवी सावंत, चंद्रकांत व्हरकटे, पांडुरंग केसरकर आदी उपस्थित होते

कु. किरण आबिटकर यांना शिवाजी विद्यापीठाची पी.एच.डी.

                   विशेष प्रतिनिधी….

     देवचंद कॉलेज अर्जुन नगरच्या कु.किरण  किशोर आबिटकर यांना शिवाजी विद्यापीठाची पीएचडी मिळाली आहे .

      वेगवेगळ्या झाडांच्या पानाचा अर्क काढून त्याचे परीक्षण करून स्पोडोपटेरा लिटूरा अर्थात तंबाखू वरची अळी व हेलीकव्हरपा आर्मीजेरा म्हणजेच हरबऱ्यावरची बोन्ड अळी या दोन किडिंवर त्याचा काय प्रादुर्भाव होतो व त्यापैकी कोणता अर्क या किडीना रोखण्यासाठी उपयुक्त आहे याचा अभ्यास केला आहे.

        प्रा. डॉ. पी. डी. शिरगावे. व्हायवा चेअरमन प्रा. डॉ. एस. आर. यंकांची. रेफरी डॉ पी एस मतिवडे असोसिएट डायरेक्टर (रिटायर्ड) एग्रीकल्चर युनिव्हर्सिटी धारवाड
जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आशिषभाई शाह आणि उपाध्यक्ष डॉ. तृप्तीभाभी शाह, देवचंद कॉलेज चे प्राचार्य प्रा. डॉ. जी. डी. इंगळे.डॉ. टी. जी. नगराजा यांचे मार्गदर्शन लाभले.

 

संबंधित पोस्ट

Breaking News

mrityunjay mahanews

Breaking News

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!