रविवार दि.८ जून २०२५

आजऱ्यात बकरी ईद उत्साहात

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा शहरासह परिसरात बकरी ईद उत्साहात साजरी करण्यात आली.
आजरा शहरात सकाळी साडे आठ वाजता ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठण करण्यात आले. यावेळी प्रवचन
मुफ्ती खालिद खलीफ,नमाज पठण मौलाना लियाकत तगारे तर खुतबा पठण हाफिज इरफान लाडजी यांनी केले.पावसाने उघडीप दिल्याने दिवसभर उत्साही वातावरण होते.हिंदू बांधवांनीही मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या.
ईदच्या पार्श्वभूमीवर आजऱ्याचे सहा.पोलिस निरीक्षक नागेश यमगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस व गृह रक्षक दलाच्या जवानांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. उपविभागीय पोलिस अधिकारी रामदास इंगवले यांनी भेट दिली. उत्तूर येथेही बकरी ईद उत्साहात साजरी करण्यात आली.

विकसित कृषी संकल्प अभियान अंतर्गत शेतकऱ्यांना शेतीविषयक मार्गदर्शन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुक्यात सुळे, कानोली, भादवणवाडी, हालेवाडी, उत्तुर व बहिरेवाडी येथे विकसित कृषी संकल्प अभियान अंतर्गत शेतकऱ्यांना शेतीविषयक मार्गदर्शन करण्यात आले. कधी विभागामार्फत उपक्रम राबविण्यात आला, सिद्धगिरी कृषी विज्ञान केंद्र कणेरी मठ, कृषी विभाग व आत्मा यांच्यावतीने आयोजित करण्यात आले.
केंद्र शासनाकडून (ता. २९) में पासून विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. कृषि क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान, सुधारित बियाणे, नैसर्गिक शेती, मृदा आरोग्य आणि पशुपालन यासंबंधी माहिती देण्यात येत आहे (ता. १२) पर्यत ही मोहीम चालेल .देशभरातील ७०० जिल्हयांमध्ये दीड कोटी शेतकऱ्यांना याची माहीती दिली जाईल. ऊस शेतीतील नवीन तंत्रज्ञान, सुधारित बियाणे आणि सिंचन पद्धतीचा अवलंब करण्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर मित्र पीक पढ़ती, मुदा आरोग्य तपासणी आणि नैसर्गिक शेतीच्या पद्धतीचा अवलंब करण्याचे शेतकऱ्यांना सुचविले जात आहे. शेतकऱ्याना विविध ॲप आणि संकेतस्थळाच्या माध्यमातून, शेतकऱ्यांना विविध योजना, अर्ज प्रक्रियाची माहिती देण्यात येत आहे.
सिध्दगिरी कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. सुनील कुमार यांनी प्रास्ताविक केले. राधानगरी कृषी संशोधन केंद्राचे डॉ. शैलेश कुमार, शास्त्रज्ञ पांडूरंग काळे, राजेंद्र वावरे, उपविभागीय कृषी अधिकारी किरण पाटील, तालुका कृषी अधिकारी भूषण पाटील यानी मार्गदर्शन केले यावेळी डॉ. नरेंद्र राजबिरी, डॉ. राहुल, विश्वंभर जाधव, विजयसिंह दळवी, प्रदीप माळी, पी जी पाटील, अमित उमरोकर, योगेश जगताप, शिवाजी गडकरी, कृषि विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिवराज्याभिषेक दिनानिमित्त विविध कार्यक्रम

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा येथील शिवाजी सावंत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे शिवराज्याभिषेक दिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात पार पडले. तहसीलदार श्री. समीर माने हे प्रमुख अतिथी होते . तसेच प्रा. संदीप हातकर हे प्रमुख वक्ते होते.
कार्यक्रमानंतर वृक्षारोपणाचा कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
सर्व शिक्षक , कर्मचारी तसेच विद्यार्थी व नागरिक या कार्यक्रमास उपस्थित होते.

आता ब वर्ग सभासदांनाही मिळणार सवलतीच्या दरातील साखर

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
वसंतराव देसाई आजरा तालुका सहकारी साखर कारखान्याने “ब” वर्गातील पाच हजार शेअर्स रक्कम पूर्ण असलेल्या सभासदांना साखर देण्याचा निर्णय घेतला आहे. पात्र सभासदांनी साखर उचल करावी असे आवाहन संचालक अशोक तर्डेकर यांनी पत्रकार परिषदेद्वारे केले आहे.
यावेळी श्री. तर्डेकर म्हणाले एप्रिल २०२४ मध्ये कारखाना वार्षिक सभेमध्ये उत्पादक सभासदांना साखर देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. परंतु कारखान्याची स्थिती अडचणीची असतानासुद्धा कारखाना गाळप वाढवण्यास प्रयत्न सुरू होते. चेअरमन, व्हा. चेअरमन व संचालक मंडळाने निर्णय घेऊन साखर देण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला. ‘ब’ वर्ग मधील पाच हजार रुपये पूर्ण असलेल्या सभासदांना साखर द्यावी अशी आपण मागणी केली होती. सर्व संचालक मंडळाने मांडलेल्या विषयाला संमती दिली व ‘ब’ वर्ग सभासदांना साखर देण्याचा निर्णय झाला आहे.
आता ब वर्गातील सभासदांनीही कारखाना सेंटरमध्ये आधार कार्ड झेरॉक्स देऊन साखर उचल करावी असे आवाहनही तर्डेकर यांनी केले आहे.

निधन वार्ता
बंडू देसाई

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
सुलगांव येथील शेतकरी बंडू बाबू देसाई ( वय ७५ वर्षे ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
रामतीर्थ गृहतारण संस्थेचे मॅनेजर श्री. विनायक देसाई यांचे ते वडील होत.
रक्षा विसर्जन सोमवार दिनांक ९/६/२०२५ रोजी सकाळी आहे.

फोटो क्लिक





