बुधवार दिनांक २१ मे २०२५

सुशांत महाराजांना शुक्रवार पर्यंत पोलीस कोठडी…
गुन्ह्यातील हत्यार सापडले…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
पत्नीचा खून करून दरोड्याचा बनाव करणाऱ्या मडीलगे ता.आजरा सुशांत महाराज गुरव याला पोलिसांनी अटक केल्यानंतर आजरा न्यायालयासमोर सादर केले असता त्याला शुक्रवार पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान गुन्ह्यातील वापरलेले हत्यार मिळवण्यात पोलिसांना यश आले आहे.
रविवारी पहाटे पत्नीची हत्या केल्यानंतर सुशांतने गुन्ह्यात वापरलेले खोरे सदृश्य हत्यार घरामागील गोबर गॅस टाकीत टाकले होते. पोलिसांना ते हत्यार मिळवण्यात यश आले आहे.
पोलीस या प्रकरणाच्या खोलात जाऊन या प्रकरणाचे आणखी काही कारण आहे का ? याचा शोध घेत आहेत. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमगर करीत आहेत.

मान्सून पूर्वचा तडाखा सुरूच…
आजऱ्यात पाऊस किरकोळ तर वारे जोरदार
पश्चिम भागाला धुतले…

मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा आजरा तालुक्यात सुरूच असून काल मंगळवारी पावसाने पश्चिम भागात जोरदार वाऱ्यासह हजेरी लावली. आजरा शहरातही वादळी वाऱ्यामुळे नागरिकांची चांगलीच त्रेधातिरपीट उडाली.
दुपारनंतर जोरदार वाऱ्यासह पावसाचे आगमन झाले. पावसामुळे ठीक ठिकाणी घरांचे पत्रे उडाले तर वृक्ष, डिजिटल फलक विद्युत तारांवर कोसळल्याने पश्चिम भागामध्ये वीज पुरवठा खंडित झाला होता.
आजरा शहरात जोरदार नसला तरी वाऱ्यासह पावसाची रिपरिप सुरूच होती.

वनविभागाच्या प्रलंबित प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर
३० मे रोजी बहुजन मुक्ती पार्टीचे धरणे आंदोलन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
वन्य प्राण्यांमुळे शेतकऱ्यांना निर्माण झालेल्या समस्या अतिशय गंभीर आहेत अनेकदा वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांमुळे मुळे शेतकऱ्यांचे मृत्यू देखील होत आहेत.
वन्य प्राण्यांपासून शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठीच्या काही उपाययोजना वनविभागाने तातडीने कराव्यात या मागणीसाठी ३० मे रोजी बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार बैठकीत देण्यात आली.
वन तळी म्हणजेच पाणी व जंगलातील चारा पुरेपूर उपलब्ध करणे, ज्या जंगलांमध्ये निलगिरी, अष्टम बाभळ, सागवान, बांबू लागवड केल्यामुळे चारा उगवत नाही. अशा जंगलांचे टप्प्याटप्प्याने विरळीकरण करून त्यामध्ये भारताच्या वातावरणाला अनुकूल असणारी देशी प्रजातीची झाडांची लागवड करणे, वनविभाग व शेतकऱ्यांच्या जमिनी याच्या हद्दीवर १० फूट खोल १० फूट रुंद व पुन्हा दहा फूट उंच अशी चर वनविभागाच्या हद्दीत मारली पाहिजे. व त्यानंतर जंगलाच्या शेतकऱ्याच्या हद्दीकडील बाजूस किमान आठ फूट उंचीचे सौर कुंपण असले पाहिजे जेणेकरून कोणताही वन्य प्राणी ते हद्द ओलांडून शेतकऱ्याच्या हद्दीत येणार नाही अथवा कोणताही शेतकरी ही हद्द ओलांडून वनविभागाच्या हद्दीत जाणार नाही. शेतकऱ्यांना income risk management in agriculture या कायद्यानुसार नुकसान भरपाई देण्यात यावी.तसेच सर्व वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांमध्ये जखमी अथवा मृत झालेल्या पीडित व्यक्तींना तात्काळ त्याचे नुकसान भरपाई देण्यात यावी,सद्य स्थितीत देण्यात येणारी नुकसान भरपाई अतिशय तोकडी असल्याने ती वाढवण्यात यावी यासह विविध मागण्यांच्या पार्श्वभूमीवर सदर आंदोलन होणार आहे.
ज्ञयावेळी बैठकीस डॉ. उल्हास त्रिरत्ने, डॉ. सुदाम हरेर,राहुल मोरे, अमित सुळेकर, शरद पाटील, किरण देसाई, जुल्फिकार शेख, तुकाराम कांबळे, शेखर कांबळे, इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
गैरव्यवहारांची भीती असल्याने ‘एक राज्य, एक दस्त’ नोंदणीस स्थगिती द्या…
मराठा महासंघाची मागणी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
शासनाने ‘एक राज्य, एक नोंदणी ‘अंतर्गत खरेदी-विक्री दस्तनोंदणी, जमीन विकसनाच्या, विक्रीच्या नोंदविण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये मोठा गैरव्यवहार, प्रशासकीय अडथळे व अडचणी, लाखो न्यायालयीन केसेस, फौजदारी दावे निर्माण होणार आहेत. प्रशासकीय व न्यायालयीन यंत्रणेवर याचा ताण येणार आहे. त्यामुळे ‘एक राज्य, एक दस्त’ नोंदणी प्रणालीला तातडीने स्थगिती द्यावी, अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघ शाखा आजरातर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनातून केली आहे. निवासी नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई यांना निवेदनाची प्रत देण्यात आली.
शेतकरी, ज्येष्ठ नागरिक, शिक्षित व अशिक्षित नागरिक दर महिन्याला जमीन खरेदी-विक्री व्यवहार करीत नाहीत. केवळ सोयीसाठी काहीतरी नावीन्यपूर्ण केले आहे, हे दाखविण्यासाठी राज्य शासनाने हा निर्णय अमलात आणू नये सर्वच घटकांना दस्त नोंदणी करताना स्थानिक पातळीवर अनेक अडचणी येत आहेत. त्या सुकर होऊन नागरिकांना योग्य सुविधा मिळाव्यात. नवीन कायद्याप्रमाणे बनावट व्यक्ती उभी करून दस्त नोंदणी होणे, मृत व्यक्ती जिवंत दाखवून दस्त नोंदणी होणे, मोठ्या प्रकल्पाच्या ठिकाणच्या जमिन फसवणूक करून खरेदी करणे, कुटुंबातील हिस्से निश्चित नसताना एक भावाने कुटुंबातील अन्य व्यक्तींचे हिस्से विकणे यांसारखे गैरप्रकार होणार आहेत. त्यामुळे या निर्णयाला राज्य शासनाने स्थगिती द्यावी असे म्हटले आहे.
निवेदनावर मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष मारुती मोरे तालुकाध्यक्ष बंडोपंत चव्हाण, प्रकाश देसाई, शिवाजी गुडुळकर, शंकरराव शिंदे, शिवाजीराव पाटील, शिवाजी इंजल, संभाजी इंजल, यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

अन्यथा १६ जूनला उपोषण…
नगरपंचायतीच्या प्रलंबित कामांच्या पार्श्वभूमीवर ‘ अन्याय निवारण ‘ चा इशारा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा नगरपंचायतीमार्फत सुरळीत पाणी पुरवठा होणेबाबत आजरा शहरवासीयांनी अन्याय निवारण समितीतर्फे कायम पाठपुरावा करुन सुध्दा नियमित पाणी पुरवठा होत नसलेची बरीच उदाहरणे नजरेस येत आहेत. नियमित व योग्य दाबाने पाणी पुरवठा करणे बाबत समितीतर्फे दिनांक ११ मार्च रोजी मोर्चा काढणेत येणार असलेचे सूचित केले नंतर दिनांक १० मार्च पासून योग्य दाबाने पाणी पुरवठा करतो असे सांगून सदर मोर्चा रद्द करणेचे षडयंत्र ज्या व्यक्तींनी रचले होते त्या व्यक्तींनी पुढे येऊन सध्या नियमित पाणी पुरवठा करणेची जबाबदारी घेणे जरुरीचे आहे. आजरा शहरातील व उपनगरातील बऱ्याच भागात नवीन पाणी पुरवठा योजनेचे काम झाले असलेने रस्ते खराब झालेले आहेत त्याठिकाणी नवीन रस्त्याची कामे करणे गरजेचे आहे. त्याप्रमाणे कामे चालु आहेत परंतु ज्याठिकाणी नवीन पाणी पुरवठा योजनेची पाईप टाकून व कनेक्शन देऊन योग्य दाबाने पाणी पुरवठा होत आहे याची खात्री करुनच रस्त्याची कामे चालु करावीत. नवीन कनेक्शन अथवा दुरुस्तीसाठी लागलीच नवीन केलेला रस्ता उकरावा लागू नये, शासनाचे पैसे वाया जाणार नाहीत व रहिवाश्यांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी.
नगरपंचायतीच्या विद्युत बिलांची बचत व्हावी यासाठी सौर पॅनल करता योग्य निधी देण्यात आला आहे. परंतु अद्याप सौर पॅनल वापरात का नाही यासह विविध प्रश्न उपस्थित करून हे प्रश्न मार्गी न लागल्यास १६ जून रोजी उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे याबाबतचे लेखी निवेदन नगरपंचायत प्रशासनाला देण्यात आले आहे.
या निवेदनावर अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष परशुराम बामणे, सुमेध वालावलकर, जोतिबा आजगेकर, मिनीन डिसोजा, जावेद पठाण, बंडोपंत चव्हाण, गौरव देशपांडे, संतोष बांदिवडेकर, संजय जोशी, सुमन हरमळकर, अभिजीत लाड, लक्ष्मी नाईक आदींच्या सह्या आहेत.

शेतकऱ्यांनी श्री पद्धतीने चार सूत्री भाताची लागवड करावी : सूर्यकांत दोरूगडे

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
शेतकऱ्यांनी भाताची लागवड चारसूत्री, श्रीपध्दतीने करावी. बीज प्रक्रिया केल्यामुळे किड रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो. त्यामुळे भाताच्या उत्पादनात वाढ होण्यास मदत होते. अशी माहीती रिसोर्स फार्मर सूर्यकांत दोरुगडे यांनी दिली
मुख्यमंत्री प्रशासकीय गतीमानता अभियान अंतर्गत तालुका कृषी अधिकारी कार्यालय आजरा व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) कोल्हापूर यांच्या वतीने दाभिल (ता. आजरा) येथे खरीप हंगामपूर्व शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम झाला. सरपंच युवराज पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
मिठाच्या पाण्यातील बीज प्रक्रियेचे प्रात्यक्षिक करून शेतकऱ्यांना दाखवण्यात आले.
श्री. दोरुगडे यांनी भात लागवड तंत्रज्ञान बाबत मार्गदर्शन केले. जमिन चांगल्या पध्दतीने तयार करावी शेणखत, हिरवळ व कंपोष्ट खताचा वापर केल्यामुळे आताचे उत्पादन वाढते तसेच भाताच्या सुगंध व चवीत फरक पडतो. चार सूत्री श्री पध्दतीने आत लागवड याबाबतही माहीती कृषी सेवक नागेश काळे, नामदेव पाटील, कमलाकर पाटील, नम्रता नार्वेकर, इजाबेल बार्देस्कर, उज्वला कांबळे व शेतकरी उपस्थित होते.
सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक अमित यमगेकर यांनी स्वागत, प्रास्ताविक व आभार मानले.
जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव
तीन रुग्ण आढळले

कोल्हापुर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
जगभर पुन्हा नव्याने तोंड वर काढलेल्या कोरोनाची जिल्ह्यात तिघांना कोरोनाची
लागण झाली आहे.
यापैकी दोघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर एक जणाला उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोल्हापूरमधील ८३ वर्षाच्या वृद्धाला कोरोनाची लागण झाली होती. १२ मे रोजी त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर त्यांच्यावर घरीच उपचार करण्यात आले आहेत. त्यातून ते बरेही झाले आहेत. पुणे जिल्ह्यातील एका ४० वर्षीय महिलेलाही कोरोनाची लागण झाली असून, त्यांचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शाहूवाडी तालुक्यातील एका ४० वर्षीय महिलेलाही कोरोनाची लागण झाली आहे. २० मे रोजी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
सिंगापूर,चिन,थायलंडमध्ये कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. देशातही कोरोना रुग्ण आढळत असल्याने शासनाने या पार्श्वभूमीवर गंभीर दखल घेऊन आवश्यकता उपाय योजना सुरू केल्या आहेत.

संत सोपानकाका स्वच्छ व सुंदर शाळा उपक्रमात व्यंकटराव हायस्कूल तृतीय

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
‘संत सोपानकाका स्वच्छ व सुंदर शाळा’ उपक्रमात व्यंकटराव विद्यालयाने तालुकास्तरीय तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.
संत सोपानकाका सहकारी बँक व श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, सासवड या संस्थांचे संस्थापक शिक्षणप्रेमी, सहकाररत्न स्वर्गीय चंदुकाका जगताप यांच्या जयंतीनिमित्त “संत सोपानकाका स्वच्छ व सुंदर शाळा” हा उपक्रम राबवून विभाग व जिल्हास्तरावरील शाळांची पाहणी करून आरोग्य व स्वच्छता, पर्यावरण, गुणवत्ता, भौतिक सुविधा इं. बाबींची पूर्तता करणाऱ्या शाळांना पुरस्काराने सन्मानीत केले जाते.
सन २०२४-२०२५ या वर्षाकरिता पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्हयामध्ये ‘ संत सोपानकाका सुंदर माझी शाळा’ अभियान राबविण्यात आले होते. या अभियानामध्ये व्यंकटराव हायस्कूलने विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी सहभाग घेवून फाऊंडेशनने ठरविलेल्या अटी व शर्तीची पुर्तता करून तालुकास्तरीय तृतीय क्रमांक प्राप्त केला असल्याची माहिती मुख्याध्यापक राजेंद्र कुंभार यांनी दिली.


