गुरुवार दिनांक २४ एप्रिल २०२५



सरळ रस्त्यावर विचित्र अपघात
तिघे जखमी…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा पंचायत समिती समोरील संकेश्वर – बांदा मार्गावर झालेल्या विचित्र अपघातात सात वाहनांचे नुकसान झाले तर तिघेजण जखमी झाले आहेत. बुधवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास झालेल्या या अपघाताची फिर्याद प्रसाद चंद्रकांत पार्सेकर ( वय ४२ वर्षे व्यवसाय नोकरी रा प्लॉट नं 13/2 क्रिस्टल कॅसल, धायरी फाटा, पुणे) यांनी आजरा पोलिसात दिली आहे.
या फिर्यादीवरून रक्षित हर्षद शहा ( वय वर्षे ४३ रा. मालाड, मुंबई) यांच्या विरोधात निष्काळजी व हयगयीने वाहन चालवून अपघातास कारणीभूत ठरल्याबद्दल गुन्हा नोंद केला आहे. प्रसाद चंद्रकांत पार्सेकर, गंधा प्रसाद पार्सेकर ,शनया प्रसाद पार्सेकर हे तिघेजण या अपघातात जखमी झाले आहेत.
पार्सेकर कुटुंबीय दोडामार्ग आंबोली मार्गे चालले असताना आजरा येथ चहा पिण्याकरीता पंचायत समिती आजरा येथील रोडवर मोटार कार डाव्या बाजू रस्त्याच्या कडेला उभी करून चहा पिण्यासाठी उतरत असताना गडहिंग्लज कडून येणाऱ्या इनोवा मोटर कार ( MH – 47 BV 2610 ) मधील चालक आरोपी याने भरधाव वेगाने हयगयीने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या आय -२० मोटारकार नं (MH 12 VC 2690 ) ने समोरून जोराची धडक देवून पार्सेकर यांच्या उजव्या पायाला व हाताला फिर्यादी यांचे मुलगीच्या डोक्याला व पत्नीच्या दोन्ही गुडघ्यांना मुक्कामार लागलेने व पार्सेकर यांच्या कारचे नुकसान पार्सेकर यांचे गाडीचे पाठीमागील मोटर कारचेही (MH 09/ GJ 6216) नुकसान केले.
कोणतीही वळण नसताना सरळ रस्त्यावर झालेल्या या अपघातानंतर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यामध्ये आणि चार मोटरसायकलचेही नुकसान झाले आहे.
आजरा पोलीस पुढील तपास करीत आहेत.

लक्ष्मी देवी मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्यास उत्तुरला दणक्यात सुरुवात
कलश मिरवणूक ठरली लक्षवेधी

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
उत्तुर येथे १६ ते १८ मे दरम्यान होणाऱ्या लक्ष्मी देवी यात्रेच्या पार्श्वभूमीवर श्री लक्ष्मी देवी मूर्ती प्रतिष्ठापना कार्यक्रमास सुरुवात झाली आहे.
बुधवारी पहिल्या दिवशी पारंपारिक वाद्याच्या गजरात हजारो नागरिकांच्या उपस्थितीत उत्तूर (ता. आजरा) लक्ष्मी देवी मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी काढण्यात आलेली कलश मिरवणूक लक्षवेधी ठरली. येथील लक्ष्मी मंदिरात भुवनेश्वर येथून आणलेली देवीची दगडी मूर्ती प्रतिष्ठापना करण्याचा निर्णय यात्रा कमिटी व जिर्णोद्धार समितीने घेतला आहे. हा सोहळा तीन दिवस होणार आहे.सकाळी महादेव मंदिरात गावातील नागरिक जमा झाले. या मंदिरातून मिरवणूकला सुरुवात झाली. महिला डोक्यावर आंबील, पाण्याचा कलश घेऊन व गारवा सहभागी झाल्या होत्या. मिरवणूक मार्ग रांगोळ्यांनी सजवण्यात आला होता.
दुपारी संकल्पवाचन व जलाभिषेक झाला. यानंतर गावातील सर्व मंदिरात श्रीफळ विडा व अक्षता अर्पण करण्याचा कार्यक्रम झाला. यावेळी अमृतराव पाटील,सरपंच किरण आमणगी,डॉ. प्रकाश तौकरी , उमेश आपटे, सौ. वैशाली आपटे, वसंतराव धुरे, विश्वनाथ करंबळी, शिवलिंग सन्ने, महेश करंबळी, कलाप्पा नाईक, आप्पासाहेब शिंत्रे, गौरव धुमे, मेघश्याम आपटे,सागर येसादे ,वैभव कुराडे , सुरेंद्र धुरे, मुकुंद पाटील, संदेश रायकर, कृष्णा पांडव, सुनील आमणगी , सतीश सुतार ,संजय गुरव, सुधाकर सावंत,सुधाकर हुले उपस्थित होते.

जंगले हरित बनवा मृत नको…
वन्य प्राण्यांच्या बंदोबस्ताचे काय…?
आजरा येथील बैठकीत जोरदार चर्चा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुक्यामध्ये विशिष्ट प्रकारची झाडे लावून जंगले हिरवी बनवली आहेत. परंतु जैवविविधतेच्या दृष्टीने हे वृक्ष बिनकामाचे असल्याने केवळ हिरवी बनलेली जंगले प्रत्यक्षात मृत आहेत. यासाठी स्थानिक जंगली प्रजातींची आवश्यकता आहे. वन्यप्राण्यांच्याकडून उपद्रव सध्या वाढत आहे. ही चिंतेची बाब आहे वनविभागाने सर्वसामान्यांच्या अडचणी समजावून घ्याव्यात अशी मागणी आजरा येथे वन विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या वन हक्क संघर्ष समितीच्या बैठकीत करण्यात आली. बैठकीस वनविभागाचे सहाय्यक वनसंरक्षक नवनाथ कांबळे, आजरा परिक्षेत्र वन अधिकारी मनोजकुमार कोळी यांची प्रमुख उपस्थिती होती.
इथून पुढे स्थानिक ग्रामस्थांच्या विचाराने जंगल संवर्धनाबाबत प्रयत्न केले जातील. अशी ग्वाही सहाय्यक वनसंरक्षक नवनाथ कांबळे यांनी दिली. शेतकऱ्यांनी यावेळी विविध समस्या मांडल्या.
कॉ. संपत देसाई म्हणाले, आजरा तालुक्यात वन्यप्राण्यांचा उपद्रव वाढला आहे. पिकांचे नुकसान होत आहेच त्याचबरोबर माणसांच्यावर वन्यप्राण्यांच्याकडून हल्ले होत आहेत. या गोष्टीचा वनविभाग गांभिर्याने कधी विचार करणार ? आजरा तालुक्यात जंगल समृध्दीकरणाचा पथदर्शी प्रकल्प राबवावा अशी मागणी केली. शेतकऱ्यांना पिकाची नुकसान भरपाई तुटपुंजी मिळत असून एकूण नुकसान क्षेत्राच्या आधारावर शंभर टक्के नुकसान भरपाई मिळावी.
राजू होलम,काशिनाथ मोरे, प्रकाश मोरुस्कर, किरण तानावडे, संजय घाटगे, नारायण भडांगे, हरिबा कांबळे, दशरथ घुरे, बयाजी मिसाळ, तुळसाप्पा पोवार, संजय देसाई आदींनी यावेळी शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या.
शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई वेळेत द्यावी. शेतकऱ्यांना स्वसंरक्षणासाठी बंदुका द्याव्यात अशी मागणीही करण्यात आली. वरिष्ठाशी चर्चा करून स्थानिक पातळीवरील प्रश्न सोडवले जातील. धोरणात्मक निर्णयाबाबत पुन्हा बैठक लावली जाईल. अशी ग्वाही श्री. कांबळे यांनी दिली.
बैठकीस संजयभाऊ सावंत, आनंदा कुंभार/साळगाव, जोतिबा चाळके यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दुचाकी अपघातात दोन विद्यार्थी जखमी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा – आंबोली मार्गावर माद्याळनजीक दुचाकी एसटीला घासून झालेल्या अपघातात विशाल वसंत माडभगत (वय १९ वर्षे) व सुजल सुभाष माडभगत ( वय १४ वर्षे/ दोघेही रा. आल्याचीवाडी ता. आजरा) हे जखमी झाले आहेत. यापैकी विशाल गंभीर असून त्याला उपचाराकरीता गडहिंग्लज येथे हलवण्यात आले असल्याचे समजते.
बुधवारी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास दोघेही आजरा येथून आल्याच्यावाडीच्या दिशेने जाताना सदर अपघात झाला.

देशपातळीवर झळकले ‘व्यंकटराव’ चे विद्यार्थी…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप [BDS] २०२५ परीक्षेत व्यंकटराव हायस्कूल,आजराच्या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश मिळवले.
यशस्वी विद्यार्थी पुढील प्रमाणे…
कुमार स्वराज प्रवीण निंबाळकर (देशात १८ वा सुवर्णपदक विजेता) , कुमार विवेक धनाजी पाटील (देशात २६ वा सुवर्णपदक विजेती) ,कुमारी सौश्रुती अमित पुंडपळ देशात ५२ वी(सुवर्णपदक विजेती),कुमारी संस्कृती धनाजी इलगे(कास्यपदक विजेती विद्यार्थिनी)
प्रमाणपत्रधारक विद्यार्थी :- अर्णव समीर जाधव
सर्व विद्यार्थ्यांना सौ.ए.डी.पाटील, श्री.पी.एस.गुरव यांचे मार्गदर्शन व प्राचार्य श्री.आर.जी.कुंभार पर्यवेक्षिका. सौ.व्ही.जे.शेलार यांचे प्रोत्साहन लाभले.

केंद्र शासनाची २.० प्रधानमंत्री आवास योजना आजरा शहराकरीता लागू…
आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा नगरपंचायतीच्या वतीने आजरा नगरपंचायत हद्दीतिल सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे कि, केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.० आजरा शहरासाठी लागू झाली आहे. या योजनेंतर्गत सर्व प्रवर्गातील, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील बेघर कुटुंबांना त्यांच्या स्वमालकीच्या जागेवर नवीन घरकुल बांधणेस प्रति लाभार्थी रक्कम २.५ लक्ष रुपये अनुदान प्राप्त होणार आहे. तरी नवीन घरकुल बांधणीकरिता इच्छुक लाभार्थ्यांनी आजरा नगरपंचायतशी संपर्क साधावा, असे आवाहन मुख्याधिकारी सुरज सुर्वे यांनी केले आहे.
या योजनेची पात्रता पुढीलप्रमाणे आहे…
अर्जदार आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील (ज्यांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न ३ लाख किंवा त्यापेक्षा कमी) असावा.
अर्जदाराची स्वमालकीची जागा असावी. अर्जदाराचे स्वतःचे किंवा कुटुंबातील कोणत्याही सदस्याचे नावे भारतात कुठेही पक्के घर नसावे.
अर्जदाराने किंवा त्याच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याने गेल्या २० वर्षात शासनाच्या कोणत्याही घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
नवीन नियोजित घराचे बांधकाम ३० चौ. मी. ते ४५ चौ. मी. चटई क्षेत्रफळापर्यंत असावे.

थोडक्यात…

आजरा आगारासाठी नवीन ५ बसेस प्राप्त झालेल्या आहेत. आजरा तालुक्यात स्वामी समर्थ महाराजाचें भरपूर भक्त असून त्यांचे सेवेसाठी आजरा आगारातून आजरा-निपाणी-कोल्हापूर-सांगली -अक्कलकोट अशी नियमीत बस सोडण्यात यावी. त्या मुळे आगाराचे उत्पन्नात निश्चितच वाढ होईल त्याच प्रमाणे आजरा- आदमापूर मार्गावरही बस सोडण्यात यावी अशी मागणी अन्याय निवारण समितीच्या वतीने निवेदनाद्वारे आजरा आगार व्यवस्थापकांकडे करण्यात आली आहे.

छायावृत्त…

शहरामध्ये सध्या सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य झाले असून नळ पाणीपुरवठा योजनेच्या कामासाठी खुदाई एप्रिल महिना संपत आला तरी सुरूच आहे. याचा फटका वाहन चालकांना बसत असून. काल बुधवारी दूध वाहतूक करणारा टेम्पो खुदाई केलेल्या सरीमध्ये अडकला. तो बाहेर काढण्यासाठी बराच वेळ प्रयत्न सुरू होते.

पाऊस पाणी
आजरा तालुक्यात बुधवारी सायंकाळनंतर ठीक- ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली. सलग दोन दिवस झालेल्या पावसाने हवेत गारवा निर्माण झाला असून वारंवार वीज पुरवठा खंडित होताना दिसत होते.





