रविवार दिनांक २० एप्रिल २०२५


परीक्षा झाली.. मेरीटमध्ये कोण…?

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
वसंतराव देसाई आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या नूतन अध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांचे मुख्य नेते वैद्यकीय शिक्षण मंत्री नाम. हसन मुश्रीफ यांनी सर्व संचालकांच्या मुलाखती जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मुख्य कार्यालयामध्ये घेतल्या.
अध्यक्ष पदाकरीता माजी अध्यक्ष विष्णुपंत केसरकर व संचालक मुकुंदराव देसाई यांची नावे पुढे आहेत. या दोघांबाबत इतर संचालकांकडून मते मंत्री मुश्रीफ यांनी आजमावून घेतली. प्रमुख संचालकांच्या मतांवरच अध्यक्ष निवडीची प्रक्रिया अवलंबून आहे.
कारखान्याची सद्यस्थिती, नूतन अध्यक्षांची कारखाना सुरळीत चालवण्याची क्षमता, विधानसभा निवडणुकांमधील भूमिका इत्यादी बाबींचा विचार करूनच सदर निवड होणार असल्याचे समजते.
इच्छुकांच्या व संचालकांच्या मुलाखतीच्या माध्यमातून तोंडी परीक्षेचे सोपस्कार पार पडले असून मेरिटमध्ये मुकुंददादा की विष्णुपंत हे मंगळवारीच ठरणार आहे.

भाजपाचे ‘बाबा’ गेले…

कोल्हापूर : मृत्युंजय महान्यूज
भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष विजय ऊर्फ बाबा भाऊसाहेब देसाई (वय ७६वर्षे ) यांचे रात्री निधन झाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, गोपीनाथ मुंडे, नितीन गडकरी यांच्यासह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी त्यांचे चांगले संबंध होते. काही काळ गोकुळचे ते स्वीकृत संचालक होते. तसेच भाजप कामगार मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस व संघटनमंत्री होते. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात भाजप रुजविण्यासाठी देसाई यांचे योगदान मोठे राहिले आहे.
रविवारी (दि. २०) सकाळी ९ वाजता कळंबा स्मशानभूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
बापूसाहेब म्हणजे कष्ट आणि जिद्दीचे प्रतिक
अमृत महोत्सव उत्साहात…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
निंगुडगे सारख्या ग्रामीण भागात जन्मलेल्या व शून्यातून विश्व निर्माण करणारे उद्योगपती बापूसाहेब सरदेसाई म्हणजे कष्ट व जिद्द याचे आहेत. अनेकांना त्यांनी मदतीचा हात दिला आहे. पुण्यासारख्या शहरांमध्ये रहात असतानाही त्यांनी गावाशी जोडलेली नाळ कदापिही तुटू दिली नाही. अनेक तरुणांना रोजगार देण्याचे काम त्यांनी केले आहे. त्यांची सामाजिक शैक्षणिक व औद्योगिक वाटचाल अशी सुरू राहू दे… अशा शुभेच्छा उद्योगपती बापूसाहेब सरदेसाई यांना अमृत महोत्सव सोहळ्यानिमित्त उपस्थितांनी दिल्या.
बापूसाहेब सरदेसाई औद्योगिक प्रशिक्षण संस्था गवसे येथे अमृत महोत्सव सोहळा पार पडला. सदर सोहळ्यास जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी, अण्णाभाऊ संस्था समूहाचे अध्यक्ष अशोकअण्णा चराटी, तुळशीराम मुळीक, पांडूतात्या सरदेसाई, विजयकुमार पाटील व मान्यवर उपस्थित होते.
यावेळी किटवडे धनगरवाडा येथील शाळकरी मुलांना शालेय साहित्य चे वाटप करण्यात आले. सरदेसाई यांचा मानपत्र स्मृतिचिन्ह देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला. कृतज्ञतेच्या भावनेतून समाजाचे आपण देणे लागत आहोत याचे भान ठेवून आपल्याकडून शक्य ती मदत केली जात असल्याचे यावेळी बापूसाहेब यांनी सांगितले.
यावेळी पांडुरंग सरदेसाई तुळशीराम मुळीक यांची देसाई अप्पासाहेब सरदेसाई रंजीत पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रम प्रसंगी पंचायत समिती माजी सभापती निवृत्ती कांबळे, विष्णुपंत केसरकर, मारुती डोंगरे, प्रा. रामकुमार सावंत,अविनाश हेब्बाळकर, ॲड. वामन पाटील, शिवाजी पाटील, तातोबा पाटील, चंद्रकांत पाटील, सुरेश बुगडे, लहू पाटील, महादेव पोवार, मानसिंग देसाई, राजेंद्र देसाई, सरपंच सौ. रेखाताई पाटील, सहदेव नेवगे, संजय पाटील,सौ. माधवी धारव, सौ.अनुराधा देसाई, हेमंत धोंडे ,महेश सरदेसाई, दिग्विजय भूतल, सागर कांबळे यांच्यासह औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे पदाधिकारी- कर्मचारी ,गवसे,निंगुडगे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उद्या आजऱ्यात होणाऱ्या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
उद्या सोमवारी २१ तारखेला आजरा येथे वारकरी संप्रदायाच्या मेळाव्याचे आयोजन केले असून तालुक्यातील वारकरी मंडळींनी या मेळाव्याला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आज श्रमिक पतसंस्थेच्या माडीवर मेळाव्याचे नियोजन करण्यासाठी कॉ. संपत देसाई यांचे अध्यक्षतेखाली बैठक झाली. सुरवातीला गौरोजी सुतार महाराज यांनी स्वागत आणि प्रास्तविक करून मेळावा का घेणार आहोत याची माहिती सांगितली. गेले वर्षभर आजरा तालुका वारकरी मंडळ तालुक्यात कार्यरत आहे. रामकृष्ण हरी वारकरी संप्रदाय संस्था स्थापन केली असून या संस्थेची पुढील दिशा ठरवण्यासाठी सोमवारी मेळावा होत आहे. तयारीसाठी तालुक्यातील सर्वच गावात वारकरी मंडळींच्या सभा बैठका झाल्या आहेत.
बैठकीला पांडुरंग जोशीलकर, ह.भ.प. संतु महाराज यांच्यासह मंडळाचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. मेळावा आनंदराव नांदवडेकर प्राथमिक शिक्षक पतसंस्था आंबोली रोड आजरा यांच्या सभागृहात सोमवार दी २१ रोजी ठीक ११.०० वाजता होणार आहे. सर्वानी मेळाव्याला उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

उर्दू मराठी शाळेत नेत्र तपासणी शिबीर

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
येथील उर्दू मराठी प्राथमिक विद्यामंदिरात आयोजित करण्यात आलेल्या नेत्रतपासणी शिबीरात विद्यार्थ्यांच्या डोळ्यांचे आरोग्य तपासण्यात आले. डॉ. अग्रवालस् आय हॉस्पिटल व गडहिंग्लज अंकुर हॉस्पिटल मधील तज्ज्ञांकडून ही तपासणी करण्यात आली.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष इस्माईल नसरदी होते.
प्रास्ताविक मुख्याध्यापक युनूस लाडजी यांनी केले. या नेत्रतपासणी शिबीरात ए आर या आधुनिक यंत्राद्वारे नेत्र तपासणी करण्यात आली. पथक प्रमुख गिरीश आयवाळे, अंकिता आजगेकर, काजल पाटील, विजय यादव, रूपाली रेडेकर व सुभाष यांनी विद्यार्थ्यांची तपासणी केली व पालकांना मार्गदर्शन केले. काही विद्यार्थ्यांना गडहिंग्लज येथे उपचारासाठी पाचारण केले. अंकिता आजगेकर यांनी डोळ्यांचे आजार व त्यावरील उपचार या संदर्भात पालकांना व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे बशीर तकिलदार, यास्मिन बुड्डेखान, हाजी सईद शिडवणकर, मुबीन मुराद, याहया बुड्डेखान व आसिया चांद उपस्थित होते.

आजरा हायस्कूलमध्ये बाल वैज्ञानिक सक्षम खवरे याचा सत्कार

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
येथील आजरा हायस्कूलचा कु. सक्षम जयसिंग खवरे याने लेखी प्रात्यक्षिक, प्रकल्प, मुलाखत यामध्ये डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक परीक्षेत सिल्व्हर मेडल प्राप्त केल्याबद्दल व आजरा तालुक्यातील यश प्राप्त केलेला हा एकमेव विद्यार्थी ठरल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
मुंबई य ठिकाणी हा पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. मुख्याध्यापक संभाजी होलम,उपमुख्याध्यापक अजित तोडकर व पर्यवेक्षक स्नेहलता कामत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अशोक चराटी व सर्व संचालक मंडळ, यांचे प्रोत्साहन लाभले.तर रोहिता सावंत, आई रेश्मा, वडील जयसिंग खवरे यांचे मार्गदर्शन लाभले.



