गुरूवार दिनांक १७ एप्रिल २०२५


चिकोत्रा समन्यायी पाणी वाटप पथदर्शी प्रकल्पाचा
सुधारित प्रस्ताव सादर करावा : जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

आजरा तालुक्यातील झुलपेवाडी येथील चिकोत्रा मध्यम प्रकल्पातून सहा गावांसाठी चिकोत्रा समन्यायी पाणी वाटप पथदर्शी प्रकल्पाचा सुधारित प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिल्या.
जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, सचिव संजय बेलसरे, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, मुख्य अभियंता हणमंत गुणाले, अ. ह. धुमाळ आणि समन्यायी पाणी हक्क परिषदेचे सदस्य आदि मान्यवर उपस्थित होते.
मंत्री श्री. विखे-पाटील म्हणाले, चिकोत्रा पथदर्शी प्रकल्पास शासनाची मूळ मान्यता आहे. यापूर्वी या कामाच्या काढलेल्या निविदा काही कारणास्तव रद्द झाल्याने या कामासाठी पुन्हा सुधारित प्रशासकीय मान्यता घेणे आवश्यक असल्याने याचा प्रस्ताव विभागाने तातडीने शासनास सादर करावा. चिकोत्रा समन्यायी पाणी वाटप पथदर्शी प्रकल्पांतर्गत सहा गावांसाठी जलसंपदा विभागामार्फत पाणी देण्याचे काम केले जाईल. मात्र ड्रीपसाठी येणारा खर्च संबंधित शेतकऱ्यांनी केला पाहिजे. या गावांनी पाणी वापर संस्था स्थापन करुन त्यानुसार पुढील कार्यवाही करावी असे त्यांनी यावेळी सांगितले.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, उपलब्ध होणाऱ्या पाण्याचा प्रभावी वापर झाला पाहिजे यासाठी शेतकऱ्यांनी ड्रीपची योजना करावी. ड्रीपसाठी आवश्यकतेनुसार जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून कर्ज उपलब्ध करुन दिले जाईल.

समृद्ध शेतीसाठी गोवंश पालन महत्त्वाचे

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
भारतात पूर्वी देशी गायींचा पालन व उपयोग करून शेती केली जात होती. यामुळे जनतेला सकस व आरोग्यदायी आहार मिळत होता लोकांचे जीवनमान सुखी व समृध्द होते. गोमातेच्या पालनातून शेती समृध्द होईल अशी अपेक्षा गोवंश अभ्यासक नितेश ओझा यांनी केले.
येथील पंचायत समितीमध्ये देशी गोवंश आधारीत नैसर्गिक शेती प्रशिक्षण कार्यक्रम झाला या वेळी श्री. ओझा यांनी देशी गाईचे महत्व, नैसर्गिक व सेंद्रीय शेती याबाबत माहीती दिली .महाराष्ट्र गोसेवा आयोग व पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन यांच्यावतीने आयोजन केले होते.
गटविकास अधिकारी संजय ढमाळ अध्यक्षस्थानी होते. सहाय्यक गटविकास अधिकारी दिनेश शेटे, पशुधन विकास अधिकारी (विस्तार) डॉ. पी. डी. डेकळे प्रमुख उपस्थित होते.
डॉ. ढेकळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. ओझा म्हणाले, प्राचीन काळापासून भारतीय शेती समृध्द होती. शेतामध्ये विविध प्रकारची धान्ये पिकवली जात होती. गाय, बैल यांच्या माध्यमातून शेती होत होती. शेण, गोमुत्र खत म्हणून वापर होत होता सर्वांना सकस आहार मिळत होता आरोग्यदायी जीवन होते.शेतीमध्ये वाढती रसायने व औषधाची फवारणी यामुळे शेती नापिक होत आहे. शेती समृध्द करण्यासाठी गो पालन गरजेचे आहे. गटविकास अधिकारी श्री. ढमाळ यांनी सेंद्रीय शेतीचे महत्व सांगीतले.शेतक-यांनी प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन केले.संजय कोराटक यांनी यावेळी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास धनंजय वैद्य, संजय काणेकर, दयानंद मोरे, प्रकाश रावण, यांच्यासह शेतकरी, गो- पालक, सेंद्रीय शेती करणारे शेतकरी, पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सुधीर मिणचेकर यांनी आभार मानले.


जय भीम तरुण मंडळाच्या वतीने आजऱ्यात जंगी मिरवणूक

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
सिद्धार्थ नगर येथील जय भीम तरुण मंडळाच्या वतीने घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त माजी नगरसेवक किरण कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली आजरा शहरातून सवाद्य जंगी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी जोरदार आतषबाजी करण्यात आली.
मिरवणुकीचे उद्घाटन जनार्दन टोपले यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी अण्णाभाऊ सूतगिरणीचे संचालक शशिकांत सावंत, किरण कांबळे, प्रभाकर कोरवी, नाथा देसाई ,बाळ केसरकर उपस्थित होते . मिरवणुकीमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा सहभाग ठेवण्यात आला होता. व्यंकटराव प्रशाला येथून निघालेली सदर मिरवणूक आजरा बाजारपेठेतून पुढे नेण्यात आली.
मिरवणुकीचे नियोजन सतीश कांबळे, सतीश सुर्वे, मिलिंद कांबळे, प्रदीप कांबळे, भूषण कांबळे, आदित्य कांबळे आदींनी केले होते.

प्रत्यक्ष स्थळ पाहणी करूनच खेडगे ते किटवडे रस्त्याच्या कामाचा निर्णय…
आजरा तहसील कार्यलयात बैठक…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
खेडगे ते किटवडे व्हाया आंबाडे रस्त्याचे काम शेतकऱ्यांना विश्वासात न घेता चालू होते. शेतकऱ्यांनी याबाबत कॉ. संपत देसाई यांच्या नेतृत्वाखाली आजरा तहसीलदार यांना निवेदन देऊन आपल्या अध्यक्षतेखाली संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक झाल्याखेरीज रस्त्याचे काम करु देणार नाही असे सूचित केले होते.
शनिवारी १२ रोजी अंबाडे व लिंगवाडी येथील शेतकऱ्यांनी रस्त्याचे काम बंद पाडले होते. या पार्श्वभूमीवर आज आजरा तहसील कार्यालयात बैठक झाली.
हा रस्ता मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत होत असल्याने याला संपादन नाही. त्यामुळं कांही शेतकऱ्यांचे खूपच नुकसान होणार आहे. त्याऐवजी रस्त्याची रुंदी कमी करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. या रस्त्यामुळे पावसाळ्यातील पाट पाण्याचे मार्ग बंद होणार आहेत त्याचा सर्व्हे करून ते पूर्ववत चालू राहतील असे करून देणे. शेतकऱ्यांच्या पाईपलाईन ज्या उखडल्या जातील त्या पूर्ववत बसवून देणे याबाबत शनिवारी १९ रोजी प्रत्यक्ष जाग्यावर जाऊन स्थळ पाहणी करूनच निर्णय करावा असे ठरले.
यावेळी उपअभियंता अविनाश वायचळ, शाखा अभियंता प्रशांत पाडकर याच्यासह श्रमिक मुक्ती दलाचे कार्याध्यक्ष कॉ. संपत देसाई, प्रकाश मोरुस्कर, विष्णू पाटील, सहदेव प्रभू यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अखेर कार्यक्रमाचे स्वरूप ठरले…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या लोकार्पण सोहळ्याची जय्यत तयारी सुरू असून प्राथमिक स्वरूपाचा कार्यक्रम छत्रपती शिवाजी प्रतिष्ठान समिती व प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ठरला आहे.
या कार्यक्रमाचे नियोजन पुढील प्रमाणे करण्यात आले आहे…
सोमवार दिनांक २८ एप्रिल रोजी सकाळी सात ते दुपारी बारा वाजेपर्यंत महिलांची कलश पूजन व कलश मिरवणूक निघणार आहे. यावेळी सर्व धार्मिक विधी व अभिषेक पुतळा समितीचे अध्यक्ष बापू टोपले यांच्या हस्ते होणार आहेत.संध्याकाळी चार ते सहा वाजेपर्यंत पोवाडा सादरीकरण व पुतळा लोकार्पण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. रात्री साडेनऊ ते बारा वाजेपर्यंत शाहिरी गायन कार्यक्रम, विद्युत रोषणाई, लेसर शो, आतषबाजी हे कार्यक्रम होणार आहेत.
दिनांक २९ एप्रिल रोजी शिवजयंती निमित्य सकाळी सात ते दुपारी नऊ वाजेपर्यंत पुतळा अभिषेक होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा मिरवणूक याच दिवशी निघणार असून यावेळी विविध कार्यक्रमांच्या सादरीकरणाचे आयोजन करण्यात आले आहे. अद्यापही ज्यांना कार्यक्रमांमध्ये काही बदल सुचवावयाचे असल्यास त्यांनी कमिटीशी संपर्क साधावा व आपल्या सूचना कराव्यात असे आवाहन करण्यात आले आहे.


निधन वार्ता
गणपती रांगणेकर

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
बाजारपेठ आजरा येथील गणपती रामचंद्र रांगणेकर ( वय ८० वर्षे) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पश्चात मुलगा, नातू, जावई असा परिवार आहे.ट्रॅक्स चालक म्हणून ते आजरा परिसरात परिचित होते. भाजपा कार्यकर्ते अभिजीत उर्फ पिंटू रांगणेकर यांचे ते वडील होत.
विमल हरेर

हात्तीवडे ता. आजरा येथील विमल बाळगू हरेर ( वय ६५ वर्षे ) वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पश्चात एक विवाहित मुलगा, दोन विवाहित मुली, सून जावई नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज गुरुवार दिनांक १७ रोजी आहे.



