mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

शुक्रवार दि.७ मार्च २०२५

वेळवट्टी येथे गवतगंजी पेटल्या…
पन्नास हजारांचे नुकसान

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      वेळवट्टी ता. आजरा येथील आनंदा धोंडीबा गुरव यांच्या मालकीच्या गवत गंजींंनी गुरुवारी दुपारी अचानकपणे पेट घेतल्याने बघता बघता गवत जळून गेले. स्थानिक ग्रामस्थांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला परंतु यामध्ये त्यांना फारसे यश आले नाही.

       या आगीमध्ये सुमारे पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाले असून जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

‘ त्या ‘ जात आहेत..

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

        आजरा तालुक्यातील अल्पवयीन मुलींसह महाविद्यालयीन तरुणी बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले आहे. पोलीस दरबारी या मुलींची नोंद ‘बेपत्ता’ अशी होत असली तरीही बहुतांश मुली या प्रेमप्रकरणातून विवाहाच्या उद्देशाने स्वमर्जीने घरातून बाहेर पडताना दिसत आहेत.

       बेपत्ता होणाऱ्या (?) या मुलींमुळे पोलीस विभागाची डोकेदुखी मात्र वाढत आहे. यातूनच आंतरधर्मीय अथवा अंतरजातीय विवाहासारखा प्रकार घडला किंवा पोक्सोअंतर्गत गुन्हा नोंद झाला तर या डोकेदुखीत वाढच होत आहे.

      काल गुरुवारी पुन्हा तालुक्यातील दोन मुली बेपत्ता झाल्याची फिर्याद मुलींच्या पालकांनी पोलीसांत दिली आहे. मोबाईलचा वारेमाप वापर, समुपदेशनात पालकांना येणाऱ्या मर्यादा, रोजीरोटीच्या मागे लागलेल्या पालकांचे नकळतपणे मुलींकडे होणारे दुर्लक्ष, अती लाड ही प्राथमिक कारणे आता पुढे येऊ लागली आहेत.

      त्या स्वखुशीने जात आहेत… पण जाताना पालकांसह पोलीस दलालाही कामाला लावून जात आहेत.

वसंतराव धुरे यांचा कारखाना अध्यक्षपदाला राम राम…

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

       आजरा साखर कारखान्याचे चेअरमन वसंतराव धुरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून याबाबत उलट सुलट चर्चा सुरू आहे. अद्याप त्यांच्या राजीनामा मंजुरीचे सोपस्कार पूर्ण झालेले नाहीत.

      कारखान्याचा यावर्षीचा गळीत हंगाम समाधानकारक झालेला नाही. कारखाना गाळप वाढवण्याच्या दृष्टीने मशनरी मध्ये कोट्यावधी रुपये खर्च केलेला खर्चामुळे फारसे काही साध्य झाले नसल्याचेही स्पष्ट होत आहे.

       एकहाती सत्ता आल्यानंतर नामदार हसन मुश्रीफ यांचे कट्टर समर्थक अशी ओळख असणाऱ्या वसंतरावांकडे कारखान्याची अध्यक्ष पदाची धुरा सोपवण्यात आली. अंतर्गत कुरबुरी, अपेक्षित गाळप न होणे यामुळे हे अध्यक्षपद धुरे यांच्या दृष्टीने काटेरी मुकुट ठरले होते.

        उद्या शनिवारच्या संचालक मंडळाच्या सभेत तो मंजूरीसाठी ठेवला जाईल. राजीनामा पार्श्वभूमीवर नूतन अध्यक्षपदाच्या हालचाली आतापासूनच गतिमान झालेल्या आहेत.

जबाबदारी घेणार कोण…?

      कारखान्याचे अध्यक्षपद म्हणजे सद्यस्थितीला मोठी जबाबदारी समजले जाते. दिवसेंदिवस कारखाना  आर्थिक अडचणीत येऊ लागला आहे. कोणी कितीही बढाया मारल्या तरी कारखाना आर्थिक संकटातून बाहेर पडणे केवळ अशक्य दिसत असल्याने अध्यक्ष पदाची जबाबदारी घेणार कोण ? हा प्रश्न सध्या असून तोही लवकरच मार्गी लागेल.

चार लाख मे.टन. गाळपाचे स्वप्नच…

      गेले कांही वर्षे सत्तेत येणारा प्रत्येक अध्यक्ष यावर्षी कोणत्याही परिस्थितीत चार लाख मे.टन गाळपाचा टप्पा गाठणारच असे सुरुवातीला ठामपणे सांगतांना दिसतो. त्यानंतर मात्र प्रत्यक्षात हे गाळप तीन लाखाच्या आतच गुंडाळावे लागत आहे त्यामुळे गेली काही वर्षे चार लाख मे. टन गाळपाचा टप्पा ओलांडणे हे सभासदांच्या दृष्टीने केवळ स्वप्नच राहिले आहे.

आता पाणी प्रश्नी ११ मार्चला मोर्चा …
आजरेकर एकवटले

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      आजरा शहर व उपनगरात नियमित पाणी पुरवठा होत नसल्याच्या निषेधार्थ सर्वपक्षीय आजरेकर एकवटले असून आजरा रहिवासी अन्याय निवारण समितीच्या पुढाकाराने सर्व राजकीय पक्ष व संघटना यांच्या वतीने आजऱ्यात ११ मार्चला महामोर्चा आयोजित करण्यात आला आहे.

      ज्ञशहर व उपनगराला स्वच्छ व नियमित पाणी पुरवठा होण्यासाठी आजरा रहिवासी अन्याय निवारण समितीने अनेकवेळा आजरा नगरपंचायतीकडे पाठपुरावा केला आहे.१ जानेवारी रोजी नगरपंचायत कार्यालयासमोर बेमुदत उपोषण केले होते त्यावेळी येत्या पंधरा दिवसांत पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे लेखी आश्वासन प्रशासनाने दिले होते.यानंतर पुन्हा समितीने मुख्याधिकारी यांच्या दालनासमोर ठिय्या करत शंखध्वनी आंदोलन केले होते यावेळीही नवीन मोटर खरेदी करुन पाणी पुरवठा करु असे आश्वासन दिले.आजरा रहिवासी अन्याय निवारण समिती वारंवार याबाबत पाठपुरावा करत असताना नगरपंचायतीने मात्र कागद नाचवत समिती व जनतेची दिशाभूल केली आहे.

       दुषित पाण्यामुळे रोगराई पसरली आहे.जनतेचा उद्रेक झाला आहे.याचा निषेध म्हणून येत्या ११ मार्चला नगरपंचायतीवर महामोर्चा काढण्यात येणार आहे. याबाबतचे निवेदन समितीने नगरपंचायत, पोलिस स्टेशन व तहसिलदार कार्यालयात दिले आहे.

      निवेदनावर विजय थोरवत (शिवसेना शहर प्रमुख) , सुधीर देसाई (संचालक के. डी.सी.सी बँक )मुकुंद देसाई (राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष),कॉ. संपत देसाई (प्रदेश अध्यक्ष ),परशुराम बामणे (अध्यक्ष अन्याय निवारण समिती )उदयराज पवार (माजी सभापती पंचायत समिती आजरा ) व पांडुरंग सावरतकर,रवी भाटले, गौरव देशपांडे , जोतिबा आजगेकर, दिनकर जाधव,मिनीन डिसोजा, बडोपंत चव्हाण ,वाय बी चव्हाण, अमित सामंत, विक्रम देसाई , रशीद पठाण,संतोष डोंगरे यांच्या सह्या आहेत.

संजयभाऊंकडून जळीतग्रस्तांना २५ हजार रुपये

       आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

        आजरा, गांधीनगर येथे घराला लागलेल्या आगीमध्ये राहुल गायकवाड यांचे मोठे नुकसान झाले आहे.या कुटुंबीयांचा संसार उभारण्यासाठी मदत म्हणून भगवा रक्षक चे अध्यक्ष श्री. संजयभाऊ सावंत व माजी नगरसेविका सौ. संजीवनी सावंत व सावंत कुटुंबीयांकडून रोख २५ हजार रुपयाची मदत करण्यात आली.

        यावेळी प्रदीप पाचवडेकर, वैभव संजय सावंत, अतुल पाटील, पप्पू ओतारी, विजय नेवरेकर, रमेश चंदनवाले, सुमित संजय सावंत, रमेश वडर उपस्थित होते.

साईट : दत्त मंदिर समोर सोमवार पेठ आजरा संपर्क : ९५२७९७३९६९  

संवेदना फाऊंडेशनतर्फे महिला दिनानिमित्त व्याख्यान

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

         जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून येथील संवेदना फाऊंडेशनच्यावतीने कर्तृत्ववान महिलांचा सत्कार, व्याख्यान तसेच हरपवडे धनगवाड्यावर दळणयंत्र प – दान असा संयुक्त कार्यक्रमा आयोजित करण्यात आला आहे.

        रविवार दि. ९ मार्च रोजी महाजन गल्लीतील जे. पी. नाईक पतसंस्थेच्या सभागृहात सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत हा कार्यक्रम होणार आहे. दिवाकर कृष्ण पुरस्कार प्राप्त लेखिका निलम माणगावे यांचे ‘घे उंच भरारी’ या विषयावरील व्याख्यानही यावेळी होणार आहे. संवेदना महिलाशक्ती तर्फे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन संवेदना फाऊंडेशनच्यावतीने करण्यात आले आहे.

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

आजरा तालुका खरेदी विक्री संघ निवडणूक धुमशान सुरू

mrityunjay mahanews

नानासाहेब (बंटी) देसाई यांचे निधन

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

राज्यात आम्हीचं वाढवलं.. आम्हीचं गाडणार…शरद कोळी

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!