गुरुवार दि.६ मार्च २०२५


इथे सुरू होण्याआधी संपते कहाणी…
साखरपुड्यानंतर आठच दिवसात युवतीचा मृत्यू

ज्योतिप्रसाद सावंत
आठ दिवसांपूर्वी साखरपुडा झालेल्या तरुणीचा वाग्दत्त वरासोबत दुचाकीवरून जाताना मुंबई येथे झालेल्या अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी परळ, मुंबई परिसरात घडली. साखरपुड्यानंतर लग्नाची स्वप्ने पाहणाऱ्या निकिताची कहाणी सुरू होण्याआधीच संपली.
निकिता भैरु दळवी ( वय २५ वर्षे रा.सिरसंगी ता.आजरा ) असे या दुर्दैवी युवतीचे नाव असून तिचा होणारा पती संदीप कुद्रे हा या अपघातामध्ये जखमी झाला. वाहनचालकाविरुद्ध भोईवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी…
चंदगड, कोवाड येथील संदीप केसरी टूर्समध्ये नोकरीला आहे. त्याचे मुळच्या सिरसंगी येथील व सध्या कांजुरमार्गला राहणाऱ्या निकितासोबत लग्न जमले होते. २३ फेब्रुवारीला त्यांचा साखरपुडा झाला होता. सोमवारी सायंकाळी संदीप निकिताला दुचाकीवरून घरी सोडत असताना, हिंदमाता पुलावर ऑइलवरून दुचाकी घसरली आणि शेजारून भरधाव वेगाने जाणारी कार निकिताच्या अंगावरून गेली. त्यातच तिचा मृत्यू झाला.
निकिता हिच्या पश्चात आई-वडील, बहिण, भाऊ असा परिवार आहे. शिरसंगी येथे बुधवारी तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेबाबत सिरसंगी पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.

सौ.माधुरी गाडे याच भादवणच्या सरपंच…
पुन्हा एक वेळ जनमत गाडे यांच्या बाजूने

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
भादवण (ता. आजरा) गावचे लोकनियुक्त सरपंच माधुरी रणजीत गाडे यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या अविश्वास ठरावाला स्थानिक मतदारांनी फेटाळून लावल्याने पुन्हा एक वेळ गाडे या सरपंचपदी विराजमान झाल्या आहेत. मोठ्या चुरशीने काल मतदान प्रक्रिया पार पडली.
ग्रामपंचायतीच्या १० सदस्यांनी अविश्वास ठराव आणला होता. सदस्यांच्या बैठकीत हा ठराव दहा विरुद्ध दोन मतांनी मंजूर झाला. मात्र गावच्या मतदारांच्या झालेल्या मतदानात ग्रामस्थांनी दाखवलेल्या विश्वासामुळे सरपंच गाडे यांच्यावरील अविश्वास ठराव अखेर बारगळला.
ज्या आघाडीतून सौ. गाडे या सरपंच पदापर्यंत पोहोचल्या होत्या त्याच आघाडीतील सदस्यांनी गाडेंच्या विरोधात मोट बांधल्याने संपूर्ण तालुक्यात या मतदान प्रक्रियेकडे लक्ष लागून होते.
बुधवारी भादवण येथे मतदान झाले. २९५५ मतदारांपैकी १६६१ मतदारांची नोंदणी झाली. १६५८ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. अविश्वास ठरावाच्या बाजूने ६९३ तर अविश्वास ठरावाच्या विरोधात ९२६ मतदारांनी आपला कौल दिला. ३९ मतदान बाद झाले. यामुळे लोकनियुक्त सरपंच माधुरी गाडे यांच्यावरील अविश्वास ठराव बारगळला.

प्रचंड इर्षा…
या मतदान प्रक्रियेमध्ये प्रचंड इच्छा दिसून येत होती. पंचवार्षिक निवडणुकीप्रमाणे प्रचार यंत्रणा राबवण्यासह मतदारांना मतदानास आणण्यापर्यंतची काळजी दोन्ही बाजूने घेण्यात आली होती.

सौ.गाडे समर्थकांचा जल्लोष…
निकालानंतर विजयी सौ. गाडे यांच्या समर्थकांनी जोरदार आतषबाजीसह गुलालाची उधळण करत जल्लोष केला.

पाणीप्रश्नी आजरा शहरवासीय आक्रमक…
शहरात संतापाची लाट…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा शहरामध्ये पाण्याचे नियोजन पूर्णपणे कोलमडले असून हिरण्यकेशी व चित्र नदीच्या काठावर वसलेल्या ‘आजरा’ शहरवासीयांना गेली दोन वर्षे पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. एकीकडे जुन्या पाणीपुरवठा योजनेला लागलेल्या गळत्यांमुळे पाण्याचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले आहे तर दुसरीकडे करोडो रुपये खर्चून तयार करण्यात येत असलेली नवीन पाणीपुरवठा योजना पूर्णत्वास जात नाही अशी अवस्था निर्माण झाली आहे. यामुळे चार-पाच दिवसाआड पाणी पुरवले जात आहे.
नवीन पाणीपुरवठा योजनेबाबत नगरपंचायत अधिकारी व संबंधित ठेकेदाराकडून शहरवासीयांना केवळ आश्वासने मिळत आहेत. सध्या मुस्लिम बांधवांचा रमजान महिना सुरू आहे तर ख्रिश्चन बांधवांचेही उपवास सुरू झाले आहेत. उन्हाचा तडाखाही वाढू लागला आहे. त्यामुळे पाण्याअभावी शहरवासीयांचे प्रचंड हाल होत आहेत.
केवळ नगरपंचायतीच्या ढिसाळ कारभारामुळे शहरवासीयांना टँकरचा आधार घ्यावा लागत आहे. एकंदर शहरवासीयांतून पाणी प्रश्नी उलट सुलट प्रतिक्रिया व्यक्त होत असून संताप व्यक्त होत आहे. या संतापाचा उद्रेक होण्याआधीच नगरपंचायतीने योग्य ती दक्षता घेण्याची गरज आहे.

आजरा साखर कारखान्यात सुरक्षा सप्ताह

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्यात सुरक्षा सप्ताहाचे आयोजन दिनांक ४ मार्च ते १० मार्च राष्ट्रीय सुरक्षितता सप्ताह निमित्त वसंतराव देसाई आजरा साखर कारखाना येथे विविध कार्यक्रमानी सप्ताहाची सुरुवात करण्यात आली.
पहिल्या सत्रात कारखान्याचे व्हाईस चेअरमन सुभाष देसाई यांच्या हस्ते सुरक्षितता ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी कारखान्यातील सर्व कर्मचाऱ्यांना सुरक्षिततेची शपथ देण्यात आली.
दुसऱ्या सत्रात कोल्हापूर येथील ट्रेनर शिरीष पाटील यांचे कडून सर्व कर्मचाऱ्यांना औद्योगिक सुरक्षितता याविषयी ट्रेनिंग देण्यात आले. यावेळी कारखान्याचे जेष्ठ संचालक मुकुंददादा देसाई, प्रभारी कार्यकारी संचालक व्यंकटेश ज्योती, जनरल मॅनेजर एस के सावंत, चीप इंजिनियर सुरेश शिंगटे, कार्यालयीन अधीक्षक अनिल देसाई, सॅनिटरी निरीक्षक आर एन देसाई, लेबर ऑफिसर सुभाष भादवणकर, कोल्हापूर येथील कामगार कल्याण अधिकारी (महाराष्ट्र शासन ) विजय शिंगाडे, केंद्र संचालक संघशन जगतकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेफ्टी ऑफिसर रमेश देसाई यांनी केले.


सावधान…
‘छावा’च्या बेकायदेशीर प्रदर्शनाबाबत कारवाईची शक्यता

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
गडहिंग्लज उपविभागात सध्या अनेक ठिकाणी विविध मंडळे, सेवाभावी संस्था, व्यक्ती यांच्या वतीने ‘ छावा’ चित्रपट प्रोजेक्टरद्वारे दाखवला जात आहे. याला नागरिकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. परंतु या दाखवल्या जाणाऱ्या चित्रपटाची कॉपी ही सिनेमागृहातून चित्रीकरण करून डाउनलोड केलेली असल्याचे समोर येत असून कायद्याने हा गुन्हा आहे. याबाबत पोलिसांत सिनेमागृह चालकांकडून तक्रारी दाखल होत असल्याने चित्रपटाचे असे प्रदर्शन करून संबंधित व्यक्ती अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे .

साईट : दत्त मंदिर समोर सोमवार पेठ आजरा संपर्क : ९५२७९७३९६९

उत्तूर येथे महिला मेळावा व व्याख्यानाचे आयोजन

उत्तुर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत, उत्तूर येथे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवनोन्नत्ती अभियान अंतर्गत ज्ञानज्योती महिला प्रभाग संघ व ग्रामपंचायत उत्तूर यांच्या संयुक्त विद्यमाने स्वयं सहायता समुहातील महिलांचा मेळावा व त्यांनी उत्पादित केलेल्या विविध वस्तू , खाद्य पदार्थ यांचे विक्री प्रदर्शन आयोजित केले आहे .
हा कार्यक्रम शुक्रवार दि. ७ मार्च २०२५ रोजी होणार असून यावेळी महिला सबलीकरण व सक्षमीकरण या विषयावर प्रा. अलका जाधव यांचे व्याख्यान होणार आहे . कार्यक्रमाचे उदघाटन सुषमा देसाई प्रकल्प संचालक, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनन्नोती अभियान यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी माजी जि.प. अध्यक्ष उमेश आपटे रहाणार असून आजरा कारखाना चेअरमन वसंतराव धुरे, माजी उपसभापती शिरीष देसाई, वनिता डोंगरे जिल्हा अभियान व्यवस्थापक, सरपंच किरण आमणगी, गट विकास अधिकारी संजय ढमाळ, तालुका अभियान व्यवस्थापक प्रवीण बोकडे यांची उपस्थिती रहाणार आहे .

छाया वृत्त...

आजरा शहर पानपट्टी व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष भिकाजी गणपतराव विभूते यांनी नुकताच शिवसेना शिंदे गटात प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.


