बुधवार दि. २२ जानेवारी २०२५

स्टेट्स लावण्यावरून बहिरेवाडीत चाकू हल्ला
एक जखमी… तिघां विरोधात गुन्हा नोंद

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
स्टेट्स लावण्याच्या कारणावरून बहिरेवाडी (ता. आजरा) येथे तरूणाईत झालेल्या वादाचे पर्यवसान मारामारीत होऊन यावेळी झालेल्या चाकू हल्ल्यात युवराज प्रकाश रावळ (वय १७, रा. बहिरेवाडी) हा जखमी झाला आहे. याप्रकरणी रावळ याने दिलेल्या फिर्यादीवरून बहिरेवाडी येथील संदेश कोपरकर, अमन मुल्ला, सुरज चौगुले या संशयित युवकांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी…
युवराज, संदेश, अमन व सुरज हे चौघेही एकमेकांच्या ओळखीचे असून गेल्या वर्षी गणपतीच्या सणावेळी त्यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर परत व्हाट्सअप स्टेट्स ठेवण्यावरुन किरकोळ वाद होतच होते.
गावातील मराठी शाळेजवळ रविवारी रात्री संदेश कोपरकर याने युवराज याला फोन करून बोलावून घेतले. यावेळी संदेशसह तिघे युवक व युवराज यांच्यात वाद झाला. हा वाद विकोपाला जाऊन तिघांनीही युवराज याच्या हातावर व पोटावर चाकूने वार केले. यामध्ये युवराज हा जखमी झाला.
पोलिसांना ही माहिती समजतात ठाणे अंमलदार बाजीराव कांबळे, हवालदार सुर्दशन कांबळे, अनंत देसाई, गणेश मोरे यांनी संशयित आरोपीना तात्काळ अटक केली.

आमचे उपोषण का थांबवले…?
अन्याय निवारण समितीचा नगरपंचायत प्रशासनाला संतप्त सवाल

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी अन्याय निवारण समितीने विविध मागण्यांच्या पार्श्वभूमीवर नगरपंचायतीसमोर आमरण उपोषण आंदोलन केले होते. यावेळी नगरपंचायत प्रशासनाने मागण्यांची पूर्तता करण्याचे लेखी आश्वासन देऊन हे उपोषण थांबवण्याची विनंती केल्यानंतर उपोषण स्थगित करण्यात आले होते. दिलेल्या लेखी आश्वासनामधील एकाही गोष्टीची पूर्तता आजतागायत होत नसेल तर आमचे उपोषण तुम्ही का थांबवले ? असा संतप्त सवाल अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष परशुराम बामणे, सुधीर कुंभार, पांडुरंग सावरतकर, वाय. बी. चव्हाण आदींनी करत नगरपंचायत प्रशासनाला धारेवर धरले.
अन्याय निवारण समिती व नगरपंचायत प्रशासनाचे आज विविध प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर बैठक पार पडली. यावेळी पाणी प्रश्नावरून उपस्थित आणि प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. वारंवार तक्रार करूनही जर पाणी प्रश्न मार्गी लागत नसल्याने शहरवासीयांचे प्रचंड हाल सुरू आहेत असे यावेळी सांगण्यात आले. तक्रारदारांना हेतू पुरस्सर पाणी दिले जात नसल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. मुळातच नवीन पाणीपुरवठा योजनेच्या दर्जा अत्यंत निकृष्ट असून याबाबत दर्जा तपासणी विभागाकडे व मुख्यमंत्र्यांसह संबंधितांकडे तक्रार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
कांही कर्मचारी तक्रारदारांच्या बाबतीत त्यांना त्रास होईल अशा प्रकारचे वर्तन करताना दिसतात. त्यांच्यावर जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करून त्यांना कायमचे घरी पाठवण्याची अथवा बदलीची व्यवस्था केली जाईल असा इशाराही यावेळी दिला.
यावेळी विविध विषयांवर जोरदार चर्चा झाली. चर्चेमध्ये राकेश चौगुले,आथवाडकर, उत्तम कांबळे, प्रदीप नाईक, गौरव देशपांडे, नाथ देसाई, जोतिबा आजगेकर, जावेद पठाण, वाय. बी. चव्हाण,इलगे, नाईक आदींनी भाग घेतला.
पाणीपुरवठा योजनेबाबतच्या तक्रारीचे निवेदन अधिकाऱ्यांना देण्यात आले.


गवसे येथे आठवडा बाजाराला प्रतिसाद

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
गवसे ता. आजरा येथे सुरू करण्यात आलेल्या आठवडा बाजाराला गवसे पंचक्रोशीतील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
पश्चिम भागामध्ये आठवडा बाजार भरत नसल्याने या भागातील नागरिकांना आजरा शहरांमध्ये बाजारासाठी यावे लागत होते. सुमारे दहा किलोमीटरच्या पुढे असणाऱ्या गावातील नागरिकांचे वाहतुकीच्या सुविधांअभावी बाजाराला येताना हाल होत असत. आता दर सोमवारी गवसे येथे आठवडा बाजार भरू लागल्याने या भागातील नागरिकांची चांगली सोय होऊ लागली आहे. विशेषतः आजरा साखर कारखान्याशी संबंधित कर्मचारी व इतर व्यावसायिकांची यामुळे चांगली सोय झाली आहे .

साईट : दत्त मंदिर समोर सोमवार पेठ आजरा संपर्क : ९५२७९७३९६९

बुरुडे येथील विकास कामांचे लोकार्पण

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
बुरुडे -भटवाडी येथील माजी आमदार राजेश पाटील यांच्या फंडातून करण्यात आलेल्या तीस लाखांच्या रस्त्यांसह विविध विकासकामांचे लोकार्पण समारंभपूर्वक करण्यात आले. यावेळी लोकनियुक्त सरपंच श्रीमती वैशाली गुरव, उपसरपंच संजय कांबळे, सुनील बागवे, मानसी पेंडसे, मनीषा तेंडुलकर, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मारुती देशमुख, उपाध्यक्ष धोंडीबा रेडेकर ,दशरथ बागवे, अण्णाप्पा आंबेडकर वसंत बागवे, दौलती कांबळे, अनिल कांबळे, सुनील हरेर, सागर करमळकर, बाळु पवार, मारुती घेवडे उपस्थित होते.

आज शहरात…
♦ ब्राह्मण विकास मंडळ व गजानन पतसंस्था, आजरा यांच्या संयुक्त विद्यमाने सिनेनाट्य अभिनेते शरद पोंक्षे यांचे ‘ सावरकर विचार दर्शन ‘ या विषयावर सायंकाळी पाच वाजता आजरा महाविद्यालयाच्या रंगमंचावर व्याख्यान होणार आहे.



