शनिवार दि. ४ जानेवारी २०२५


कौटुंबिक हिंसाचार प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा नोंद

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
वेळोवेळी शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी किणे ता. आजरा येथील विवाहिता सौ. अलका दळवी यांनी आजरा पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून पतीसह अन्य चौघांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमगर यांच्या मार्गदर्शनाखाली आजरा पोलीस करीत आहेत.

शंकर हुक्केरी यांचे निधन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा येथील ज्येष्ठ मसाला व्यापारी शंकर बसाप्पा हुक्केरी (वय ६८ वर्ष) यांचे अल्पश: आजाराने शुक्रवारी रात्री निधन झाले.
येथील सामाजिक कार्यकर्ते वृषाल हूक्केरी यांचे ते वडील व आजरा मर्चंटस् सहकारी पतसंस्थेच्या संचालिका उमा हुक्केरी यांचे पती होत.
त्यांच्या पश्चात पत्नी, विवाहित मुलगा, मुलगी, जावई, सून, नातवंडे असा परिवार आहे.

६ तारखेच्या मोर्चासाठी आजऱ्यातून शंभर गाड्यांचे नियोजन….
बैठकीत निर्णय…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
गडहिंग्लज महावितरण कार्यालयावर स्मार्ट आणि प्रीपेड मीटरच्या विरोधात निघणाऱ्या मोर्चासाठी आजरा तालुक्यातून शंभर गाड्यांचे नियोजन आज जनता बँकेच्या सभागृहात झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जोतिबा चाळके होते. सुरुवातीला सावित्रीबाई फुलेंच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. डॉ नवनाथ शिंदे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा आढावा घेतला.
यावेळी बोलताना कॉ संपत देसाई म्हणाले की स्मार्ट आणि प्रीपेड मीटरच्या नावाखाली अदानी आपल्या हक्काची वीज खिशात घालू पाहत आहे. सर्व सामान्य ग्राहकांची मोठ्या प्रमाणात लूट केली जाणार आहे. वीज ग्राहकाबरोबरचं व्यापारी छोटे छोटे उद्योग व्यावसायिक यांचीही लूट होणार आहे. आता आपण गप्प बसलो तर पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही. जन प्रबोधन घडवून मोठ्या प्रमाणात जनतेत उठाव करावा लागणार आहे. त्याची सर्वत्र जोरादर तयारी सुरू आहे. गडहिंग्लज महावितरण कार्यालयावर निघणाऱ्या या मोर्चात आजरा तालुका सर्वात आघाडीवर असेल असे नियोजन करू.
आनंदराव कुंभार म्हणाले, या मोर्चासाठी पक्ष बाजूला ठेऊन सगळे एकत्र येऊया, मोर्चा यशस्वी करून आजऱ्यात एक महापरिषद घेऊ. युवराज पोवार, प्रकाश मोरुस्कर, वाय बी चव्हाण, रवींद्र भाटले, काशिनाथ मोरे, संतोष मासोळे, मारुती कांबळे, संताजी सोले यांनी विविध सूचना मांडल्या.
यावेळी विक्रम देसाई, दशरथ घुरे, शिवाजी डोंगरे, आबा पाटील, विष्णू पाटील, भीमराव माधव, एन जे सुतार, युवराज जाधव, नामदेव फगरे, दिनेश कांबळे, बाबू येडगे, सरिता कांबळे, संतु पाटील, संतु कांबळे, जयराम परीट, नितीन कुंभार, गंगाराम येडगे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


रुग्णवाहिकांची संख्या वाढवा
बहुजन मुक्ती पार्टीची मागणी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुक्यामध्ये एक ग्रामीण रुग्णालय व चार ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. परंतु आजरा तालुक्यासाठी आजरा ग्रामीण रुग्णालय व उत्तुर प्राथमिक आरोग्य केंद्र येथे प्रत्येकी एक अशा केवळ दोनच १०८ च्या रुग्णवाहिका आहेत. रुग्णवाहिकांच्या कमतरतेमुळे नेहमीच रुग्णांच्या आरोग्याची हेळसांड होत असते. त्यातच एखाद्या गंभीर पेशंटला आजर्यातून १०८ रुग्णवाहिकेतून गडहिंग्लजला घेऊन जावे लागते. गडहिंग्लज मध्ये त्या पेशंट वर उपचार होत नसतील तर, पुढील उपचारासाठी गडहिंग्लज वरून पुढे कोल्हापूरला घेऊन जाण्यासाठी त्याच ॲम्बुलन्सचा वापर केला जातो. या दरम्यान आजऱ्यातील ग्रामीण रुग्णालयात अथवा एखाद्या प्राथमिक आरोग्य केंद्रात एखादा पेशंट अत्यवस्थ झाला तर त्याला घेऊन जाण्यासाठी एकही गाडी मिळत नाही असे अनेकदा आढळून आले आहे. अशावेळी नेसरी, उत्तुर, चंदगड येथून रुग्णवाहिका मागवली जाते. परंतु तोपर्यंत रुग्णाला प्रचंड त्रास सहन करावा लागतो. कांही वेळा तर केवळ ॲम्बुलन्स वेळेवर न मिळाल्यामुळे रुग्णांचा जीव दगावल्याच्याही घटनाही आजऱ्यामध्ये घडलेल्या आहेत.
याखेरीज १०८ च्या रुग्णवाहिकांचे दोन प्रकार आहेत ALS व BLS यापैकी आपल्या आजऱ्यासाठी ज्या दोन रुग्णवाहिका मिळाल्या आहेत त्या दोन्हीही BLS म्हणजेच साधारण प्रकारच्या आहे. यामध्ये एखादी मोठी इमर्जन्सी हाताळता येऊ शकत नाही. त्यामुळे आजरा तालुक्याला एखादी ALS ॲम्बुलन्स सुद्धा पुरवण्यात यावी.
याशिवाय गरोदर मातांना प्रसूती केंद्रात घेऊन जाण्यासाठी १०२ च्या रुग्णवाहिका देखील आहेत. परंतु त्या केवळ गरोदर मातांना बाळंतपणानंतर घरी सोडण्यासाठी वापरल्या जातात. त्यांना प्रसूती वेदना होत असतील त्यावेळी १०८ रुग्णवाहिकेलाच बोलवले जाते. त्याविषयी लोकांमध्ये प्रबोधन करण्याची आवश्यकता आहे.
वरील विषय अतिशय गंभीर आहेत. यावर शासन प्रशासनाने लवकरात लवकर लक्ष घालून आजरा तालुक्यासाठी एक ALS रुग्णवाहिका व आणखी किमान २ BLS रुग्णवाहिका आजरा तालुक्यासाठी मिळाव्यात असे निवेदन तहसीलदारांना सादर करण्यात आले. मागणीचा विचार करून लवकरात लवकर या रुग्णवाहिकांची पूर्तता न केल्यास बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने भविष्यात उग्र आंदोलन निर्माण केले जाईल असा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी किरण के. के, संदीप दाभिलकर, अमित सुळेकर, डॉ. सुदाम हरेर, द्वारका कांबळे, सुरेश दिवेकर, मोहन कांबळे उपस्थित होते.

आजरा कारखान्यावर रिफ्लेक्टर वाटप

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
विभागीय मोटर वाहन विभागातर्फे (आर. टी. ओ.)वाहतूक सुरक्षा साप्ताहनिमित्त वसंतराव देसाई आजरा शेतकरी सह. साखर कारखान्यावर वाहतूक नियमांचे मार्गदर्शन करीत रिफ्लेटर वाटपाचा कार्यक्रम पार पडला.
कारखाना गाळप हंगाम सुरु असलेने ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांची रेलचेल रस्त्यावर वाढली आहे. शेतकऱ्याचा ऊस कारखान्यापर्यंत व्यवस्थित पोहच करणे वाहतूकदारांची जबाबदारी असते. परंतु ही वाहतूक करताना योग्यरित्या वाहतूक नियमांची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.
यावेळी मोटर वाहन निरीक्षक अनिल भादवणर यांनी उपस्थित ट्रक, ट्रॅक्टर चालक व मालक यांना वाहतूक नियमांची माहिती दिली. त्याचप्रमाणे वाहतूक नियमांचे पालन करीत विना अपघात वाहतूक करण्याबाबत सांगितले. यावेळी सहा. मोटर वाहन निरीक्षक स्नेहा देसाई यांनीही मार्गदर्शन केले.
कारखान्याचे व्हा. चेअरमन एम. के.देसाई यांनी स्वागत केले. प्रस्तावना प्र. कार्यकारी संचालक व्यंकटेश ज्योती यांनी केली तर आभार मुख्य शेती अधिकारी युवराज पाटील यांनी मानले.
यावेळी कारखान्याचे संचालक संभाजी पाटील (हत्तीवडे ), राजेंद्र मुरुकटे, अनिल फडके, ऊसपुरवठा अधिकारी अजित देसाई, केनयार्ड सुपरवायझर तुकाराम मोळे, शेती विभाग हेड क्लार्क संदीप कांबळे, वाहतूकदार तसेच इ.कर्मचारी उपस्थित होते.

‘ व्यंकटराव ‘ मध्ये ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
व्यंकटराव हायस्कूल मध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली
याप्रसंगी आजरा महाल शिक्षण मंडळ आजरा या संस्थेचे सचिव अभिषेक शिंपी व सचिन शिंपी यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले.व्ही. टी.कांबळे यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्याचा आढावा घेतला.
यशराज पोतदार व श्रावणी कातकर या विद्यार्थ्यांनी महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा केली होती. आर्या प्रभू , आर्या पाटील ,जो जो यादव ,शुक्राणी दोरुगडे ,स्नेहल सावरतकर या विद्यार्थ्यांनी कविता ,ओवी व भाषणातून आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरी देसाई व कादंबरी धुरी यांनी केले.यावेळी संचालक विलास पाटील, प्राचार्य आर जी कुंभार पर्यवेक्षिका सौ व्ही.जे शेलार, डी. आर. पाटील उपस्थित होते.
आभार सौ. एस. डी. ईलगे यांनी मानले.


पं.दिनदयाळ विद्यालयाचे यश

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या वतीने घेण्यात आलेल्या श्रीनिवास रामानुजन गणित प्राविण्य परीक्षेत पं. दीनदयाळ विद्यालयातील विद्यार्थीनी मीरा सुनिल हरेर हिची गणित प्रज्ञा परीक्षेसाठी निवड झाली.तसेच मुख्याध्यापक संघाच्या वतीने घेण्यात आलेल्या डॉ ए. पी. जे.अब्दुल कलाम तालुकास्तरीय विज्ञान प्रज्ञा शोध परीक्षेत समर्थ सुनिल निकम,सर्वस्वी सचिन पाटील,दर्श बिपिनचंद्र परळकरया विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.



