रविवार दि. ५ जानेवारी २०२५


हाथी चले अपनी चाल…
हत्तीचा यमेकोंड गावातून फेरफटका

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
यमेकोंड ता. आजरा येथे सका-सकाळीच महाकाय हत्तीने ग्रामस्थांना दर्शन देत गावातून फेरफटका मारल्याने ग्रामस्थांची चांगलीच त्रेधा तिरपीट उडाली.
काल शनिवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास विलास राजाराम, बंडू रामू होडगे ,गुंडू कृष्णा कसलकर , सचिन बंडू राजाराम, तानाजी सखाराम कातकर यांच्या केळी व ऊस पिकासह इतर पिकांचे रात्रभर नुकसान केल्यानंतर पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास शेतातून बाहेर पडलेल्या हत्तीने थेट गावामध्ये प्रवेश केला. येथील दत्त मंदिराजवळून गावातील मुख्य चौक येथे गेल्यानंतर बाबुराव अडसुळे यांच्या घराजवळ थांबून त्याने थेट डोंगराच्या दिशेने प्रयाण केले.
पहाटे लवकर शेतीकामासह डेअरीला दूध घालणाऱ्या मंडळींची हत्तीचे भले मोठे धुड पाहून भीतीने गाळण उडाली.
हत्तीने मुक्काम लांबवला…
गेले काही दिवस हत्ती शिरसंगी – यमेकोंड- वाटंगी परिसरातच तळ ठोकून आहे. यावर्षी मात्र त्याने मुक्काम लांबवल्याचे स्पष्ट होत आहे.


आजरा तालुका महायुतीच्या वतीने नवनिर्वाचित मंत्री व आमदार यांचा आज भव्य नागरी सत्कार

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
नाम.हसन मुश्रीफ (वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री),नाम.प्रकाशराव आबिटकर (आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री), शिवाजी पाटील (चंदगड विधान सभा मतदार संघ आमदार) व अमल महाडिक (दक्षिण कोल्हापूर मतदार संघ आमदार) यांचा आजरा तालुक्यातील भारतीय जनता पार्टी, शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादी पार्टी (अजितदादा गट) यांचे वतीने भव्य नागरी सत्कार होत आहे सत्कार समितीने सदर कार्यक्रमाचे नेटके आयोजन केले आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष धनंजय महाडिक ( खासदार, राज्यसभा भारतीय जनता पार्टी) असून कोल्हापूर जिल्हा सह. दूध उत्पादक संघ मर्या. कोल्हापूरचे चेअरमन अरुण डोंगळे यांची प्रमुख उपस्थिती असल्याची माहिती आजरा तालुका भारतीय जनता पार्टी, शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादी पार्टी (अजितदादा गट) सत्कार समितीचे प्रमुख अशोक चराटी यांनी पत्रकार परिषदेत दिली.यावेळी विजयकुमार पाटील, डॉ.अनिल देशपांडे, विलास नाईक, दशरथ अमृते यांच्यासह समितीचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
मंत्रीपदी निवड झाल्यानंतर प्रथमच नूतन सार्वजनिक आरोग्य मंत्री ना. प्रकाश आबिटकर व वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. हसन मुश्रीफ आजरा येथे येत असल्याने त्यांच्या स्वागताची जंगी तयारी करण्यात आली आहे.
वेळवट्टी येथे नामदार मुश्रीफ यांचा सत्कार समारंभ
वेळवट्टी ता. आजरा येथे नामदार हसन मुश्रीफ व माजी राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर -पाटील यांच्या भव्य नागरी सत्काराचे आयोजन आज रविवारी सकाळी बारा वाजता करण्यात आले आहे.
या कार्यक्रमास माजी खासदार श्रीमती निवेदिता माने, माजी आमदार राजेश पाटील, माजी आमदार राजूबाबा आवळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुर्लेकर, जिल्हा बँकेचे संचालक भैया माने, सुधीर देसाई यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
जनता सहकारी गृह तारण संस्थेचा स्थलांतर समारंभ
जनता सहकारी गृह तारण संस्थेच्या मुख्य कार्यालयाचा स्थलांतर समारंभ आज रविवारी दुपारी साडेचार वाजता होणार आहे. सदर कार्यक्रमाचे उद्घाटन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते, आमदार शिवाजीराव पाटील व अण्णाभाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोक अण्णा चराटी, सहाय्यक निबंधक एस. बी. येजरे यांच्या प्रमुख उपस्थितीत व जनता गृहतारण संस्थेचे अध्यक्ष मारुती मोरे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.

आजऱ्यातील धाडसी जिगरबाज तरुणांच्या पाठीवर पोलीस खात्याची थाप…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
पोलीस वर्धापनदिन, रेझिंग डे अनुषंगाने आजरा पोलीस ठाणे हद्दीमधील पोलीस दलास वेगवेगळ्या अपघाताच्या ठिकाणी तसेच पूर परिस्थिती व आपत्तीच्या वेळी मदत करणारे स्थानिक नागरिक जिगरबाज व धाडसी तरुण गौरव देशपांडे,निखिल पाचवडेकर ,सिद्धेश नाईक,समीर जमादार,शंतनु पाटील सर्व रा.आजरा ता. आजरा यांचा रामदास इंगवले, उपविभागीय पोलीस अधिकारी, गडहिंग्लज विभाग यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
गेल्या रविवारी परोली बंधाऱ्यामध्ये बुडालेल्या तीन तरुणांना वाचवण्यासाठी/त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यासाठी या तरुणांनी पोलीस दलाला केलेले सहकार्य निश्चितच कौतुकास्पद असल्याचे यावेळी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नागेश यमगर यांनी सांगितले.
कार्यक्रम प्रसंगी पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

चार चाकी व दुचाकीच्या अपघातात दोघे जखमी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा आंबोली मार्गावर आल्याची वाडी गावाजवळून जाणाऱ्या रस्त्यावर चारचाकी व दुचाकी एकमेकांना धडकून झालेल्या अपघातात पारपोली येथील ज्ञानेश्वर महादेव सावंत (वय ४४ वर्षे) व पांडुरंग विष्णू वाकर(वय ५२ वर्षे) हे दोघे जखमी झाले आहेत.
शनिवारी दुपारी सदर अपघात झाला. आरवली, शिरोडा येथून संबंधित चारचाकी कल्याण/ मुंबईच्या दिशेने चालली होती तर पारपोलीच्या दिशेने दुचाकीस्वार येत असताना सदर अपघात घडला. जखमींवर आजरा ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले.


आज-यातील गिरणी कामगार मंत्री आबिटकर, मुश्रीफ यांना भेटणार

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुक्यातील गिरणी कामगार हक्काची घरे मिळवण्यासाठी आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर व मंत्री हसन मुश्रीफ यांना आज भेटून निवेदन देणार असल्याची माहिती आबा पाटील, जानबा धडाम व काकासो देसाई, दादासो मोकाशी यांनी दिली.
आजरा- गडहिंग्लज – चंदगड- राधानगरी – भुदरगड – कागल – उत्तूर भागातील गिरणी कामगारांच्या घरासाठी लढा चालू आहे. सातत्याने सन १९८२ साला पासून त्यासाठी लढा देत आहोत, परंतु अद्याप या मागणीला यश आले नाही. शासनाकडे या विषयी पाठपुरावा चालू आहे.
विधानसभेत आवाज उठवून न्याय मिळवून देणे कामी प्रयत्न करावा. हाय कोर्टाच्या आदेशानुसार गिरणी कामगाराना गिरणीच्या जागेवर हक्कानची घरे मिळावीत. म्हाडा कार्यालयाने घरासाठी गिरणी कामगाराना पात्र करून घेतले आहे. परंतु आतापर्यंत घरांचा प्रश्न सोडवलेला नाही. गिरणी कामगाराचा प्रश्न बरेच दिवस रखडलेला असून काही गिरणी कामगार मयत झाले आहेत. त्यांच्या वारसाना सुद्धा घरे देण्याची तजवीज करण्याबाबत निवेदन देण्यात येणार आहे.


पार्वती शंकरच्या विद्यार्थ्यांनी साकारली एक आधुनिक विज्ञानदिंडी – ” यंत्रमानव “

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
येथील श्री शिवपुत्र शंकर करंबळी एज्युकेशनल व चॅरिटेबल ट्रस्ट व पार्वती शंकर शैक्षणिक संस्थेच्या २१ व्या बालवैज्ञानिक संमेलनाचा आरंभ नावीन्यपूर्ण विषयावरील विज्ञानदिंडी व पथनाट्याने आज झाला.” ए आय ” तंत्रज्ञान व यंत्रमानव या विज्ञान तंत्रज्ञानाच्या आविष्काराचे या दिंडीतून दिमाखदार विलक्षण दर्शन घडून आले. या दिंडीच्या उद्घाटन कार्यक्रम संस्थासंचालक विनायक करंबळी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. तर दिंडीचे उद्घाटन येथील प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ.संजय ढोणुक्षे यांचे हस्ते करण्यात आले.
कृत्रिम बुद्धिमत्ता व त्यातून आकारास आलेला कृत्रिम माणूस त्यामुळे मानवी जीवनात शेती, उद्योगधंदे ,शिक्षण ,सेवाक्षेत्र ,संरक्षण, हवामान अंदाज ,आरोग्यसेवा या सर्वच क्षेत्रावर झालेला प्रभाव या दिंडी व पथनाट्यातून समाजापुढे उभा करण्याचा प्रयत्न झाला. अध्यक्षीय मनोगतात विनायक करंबळी यांनी गेली २१ वर्ष प्रतिवर्षी नवा वैज्ञानिक विषय घेऊन येणारे संमेलन शाळेच्या प्रगतीचे प्रतीक असल्याचे नमूद केले.
संस्थेचे अध्यक्ष बसवराजआण्णा करंबळी, उपाध्यक्ष विश्वनाथआण्णा करंबळी, सेक्रेटरी श्री सुरेश मुरगुडे, संचालक , डॉ. व्ही एम पाकले ,संचालक प्राचार्य डॉ. दिनकर घेवडे, यांच्या मार्गदर्शनाने दिंडी यशस्वी झाली.

आज विशेष...
♦ इकॉनॉमिक्स असोसिएशनचे आज आजरा महाविद्यालय आजरा येथे एकदिवसीय अधिवेशन …
♦ कुरकुंदेश्वर यात्रेनिमित्त पेरणोली देवस्थान येथे सकाळी प्रसादाचा कार्यक्रम…





