गुरूवार दि. २ जानेवारी २०२५


कुणी पाणी देता का पाणी…!
पाणी योजना, अपूर्ण विकासकामेप्रश्नी लेखी आश्वासनानंतर उपोषण स्थगीत

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
नवीन पाणी योजना व शहरात अपूर्ण असलेली विकास कामे या प्रश्नावर आजरा
रहिवाशी अन्याय निवारण समितीने काल आजरा नगरपंचायत समोर बेमुदत उपोषण केले. या प्रश्नाची तातडीने सोडवणुक करावी अशी मागणी लावून धरली. दरम्यान मुख्याधिकारी सूरज सुर्वे व प्रशासकीय अधिकारी राकेश चौगुले यांनी समस्यांची सोडवणूक तातडीने करण्याची लेखी ग्वाही दिल्यानंतर उपोषण तात्पुरते स्थगीत करण्यात आले आहे.
अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष परशुराम बामणे म्हणाले, नवीन पाणी योजना, अपूर्ण रस्ते, गटारी व विविध समस्याबाबत वेळोवेळी अन्याय निवारण समितीने आजरा नगरपंचायत प्रशासनाला लेखी निवेदन देवून समस्यांच्या सोडवणुकीबाबत पाठपुरावा केला होता. पण प्रशासनाने केवळ आश्वासने देवून समस्यांच्या सोडवणुकीसाठी चालढकल केली. यामुळे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक होत नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी बेमुदत उपोषणाचा इशारा दिला होता.
या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांनी नगरपंचायत समितीसमोर मंडप ठोकून आज उपोषण आरंभले. नगरपंचायतीच्या विरोधात घोषणाबाजी केली. समस्यांची सोडवणूक वेळेत होत नसल्याने लोकशाही मार्गाने उपोषण करण्याची वेळ आल्याचेही श्री. बामणे यांनी सांगीतले. मुख्याधिकारी श्री. सुर्वे, प्रशासकीय अधिकारी श्री.राकेश चौगुले, पाणी पुरवठा कर्मचारी उतम कांबळे यांनी उपोषणस्थळी भेट देवून लेखी पत्र दिले.
. आंदोलनास सुधीर कुंभार, विजय थोरवत, दयानंद भोपळे, पांडुरंग सावरतकर, दिनकर जाधव, समीर खेडेकर, बंडोपंत चव्हाण,डॉ. स्मिता कुंभार, हिना वाडीकर, शरद कोलते, गुरुदत्त गोवेकर, गुरुदत्त देसाई, शशिकांत कुंभार, श्रीराम तुरंबेकर ,रामचंद्र लिचम, दयानंद गजरे, रुपेश वाळके, शरीफ खेडेकर, प्रकाश पाचवडेकर, प्रकाश सावंत, व्हितोरीनो डिक्रुझ, जावेद पठाण, अशोक गाइंगडे, गोपाळ पावले,अनिल पाटील, संजय कुरुणकर, राजेंद्र कुरुणकर, सुरेश पत्की, हमिद बुड्ढेखान, दत्तात्रय मोहिते, सागर मळीक, मिनिन डिसोजा, शिवाजी सरंबळे, षडानन देशपांडे, सुशील लतीफ, आत्माराम कामत, प्रदीप पाचवडेकर, कुमार बुरुड, वाय. बी. चव्हाण, अतुल पाटील, दत्त्तात्रय देसाई, गौरव देशपांडे, विक्रमसिंह देसाई, परेश पोतदार, विलास रावजीचे, रामदेव गल्ली येथील महिला वर्ग व शहरवासीयांनी मोठ्या संख्येने पाठिंबा दर्शवला.
नगरपंचायतीच्या कारभाराचे सर्वत्र धिंडवडे…
‘ माझी वसुंधरा ‘ स्पर्धेत बक्षीसपात्र ठरलेल्या आजरा नगरपंचायतीचा एकंदर कारभार हा जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत आहे. ना शहरवासीयांना वेळेत पाणी… ना स्वच्छता, निकृष्ट दर्जाची नवीन पाणीपुरवठा योजना, सर्वत्र धुळीचे साम्राज्य, शहरवासीयांची तक्रारीची मालिका, समाज माध्यमातून होणारे भ्रष्टाचाराचे आरोप, होणारी आंदोलने या सर्व बाबींमुळे नगरपंचायतीचे जिल्हाभर धिंडवडे निघत आहेत.
श्री कुरकुंदेश्वर यात्रा आजपासून

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
पेरणोली ता.आजरा येथील कुरकुंदेश्वर यात्रा आज गुरुवार दिनांक २ जानेवारी ते रविवार दिनांक ५ जानेवारी या कालावधीत होणार आहे.
गुरुवार दिनांक २ जानेवारी रोजी रुद्राभिषेक व ब्राह्मण भोजनानेने यात्रेची सुरुवात होईल. शुक्रवारी रात्री थळ यात्रा व शनिवारी दिनांक ४ रोजी मध्यरात्री मुख्य यात्रा व गाऱ्हाणे होणार आहे. त्यानंतर रविवारी सकाळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असल्याचे कुरकुंदेश्वर देवस्थान समितीच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.


पं. दिनदयाळ विद्यालयात मान्यवरांचा सत्कार

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
श्रीमंत गंगामाई वाचन मंदिर आजरा मार्फत दिला जाणारा भूमिपुत्र साहित्यिक पुरस्कार संस्थेचे संचालक डाॅ .श्रध्दानंद ठाकूर यांना मिळाल्याबद्दल त्यांच्यासह विविध क्षेत्रात यश मिळवलेल्या मान्यवरांचा संस्थेचे सचिव मा.मलिककुमार बुरुड यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
सुधीर कुंभार यांची स्वामी विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित आजरा या संस्थेच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अरुण देसाई यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर विद्यालयाचा माजी विद्यार्थी कुमार संतोष डांग याची स्पर्धा परीक्षेतून आरोग्य सेवक पदी निवड झाल्याबद्दल संचालक भिकाजी पाटील यांच्या हस्ते तर विद्यालयाची माजी विद्यार्थिनी कुमारी नंदिनी मिसाळ हिने फूड बेवरेजिसच्या परीक्षेत देशात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल संस्थेच्या उपाध्यक्षा श्रीमती विमल भुसारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी मुख्याध्यापक संजीव देसाई यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

नाताळ सणानिमित्त वाटंगी येथे फराळ
वाटप

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
वाटंगी ता.आजरा येथे नाताळ सणाच्या निमिताने सन्मित्र समूहातर्फे फराळ वाटप करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार राजेश पाटील उपस्थित होते.
स्वागत संस्थेचे अध्यक्ष अल्बर्ट डिसोझा यांनी केले तर प्रास्ताविक मुख्याध्यापक अनिल देसाई यांनी केले. यावेळी माजी आमदार राजेश पाटील यांनी ख्रिस्ती बांधवांना नाताळ सणाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना पाटील म्हणाले की गेल्या पाच वर्षामध्ये विकास कामे करून सुद्धा जनतेने विकास कामाऐवजी धनशक्तीला मोठे केल्याचे दिसून आले. पण यापुढे हार न मानता होणाऱ्या चुकीच्या गोष्टीला विरोध हा करायचाच व पुन्हा जोमाने कामाला सुरुवात करण्याचे आवाहन यावेळी पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले.
यावेळी सरपंच मधुकर जाधव,आजरा कारखाना संचालक शिवाजीराव नांदवडेकर, जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई, एम. के. देसाई, सुभाषराव देसाई, दिगंबर देसाई, विठ्ठलराव देसाई यांच्यासह तालुक्यातील विविध संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.


रो.ह.यो. अंतर्गत शेतकरी गटाच्या बांबू वाटिकांना शासन मान्यता देण्याची मागणी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामिण रोजगार हमी योजनेअंतर्गत शेतकरी गटाच्या बांबू वाटिकांना शासन मान्यता द्यावी. अशी मागणी भूमी शेतकरी उत्पादक गट चिमणे, हिरण्यकेशी ग्राम शेतकरी गट पेरणोली यांच्यावतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी येडगे यांना देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात बांबूलागवडीसाठी प्रोत्साहन म्हणून प्रति हेक्टरी सात लाख रुपयांचे अनुदान जाहीर केले आहे. यंदा एक हजार हेक्टर क्षेत्रावर बांबू लागवडीचे उद्दीष्ट आहे. आजरा, चंदगड, भुदरगड, गडहिंग्लज, राधानगरी, गगनबावडा तालुक्यातील हवामान बांबू लागवडीसाठी पोषक आहे. येथे अनेक वर्षापासून बांबू लागवड होत असून कोट्यावधीची वार्षिक उलाढाल होत आहे. शेतक-यांनी व्यावसायिक बाबू लागवडीसाठी केंद्र शासनाने प्रमाणित केलेल्या विविध बांबू जातीची रोपे तयार करण्याचे शास्त्रशुध्द प्रशिक्षण कृषी विद्यापिठ व नामांकित संस्थामधून घेतलेले आहे. अशा प्रशिक्षित सस्थांना, शेतकरी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामिण रोजगार हमी योजनेअंतर्गत रोपवाटीकेसाठी परवानगी देण्यासाठी
धोरणात्मक निर्णय प्रशासकीय पातळीवर घेतल्यास अनेक अडचणी दूर होतील. रोजगार हमी, अटल बांबू समृध्दी योजनेतून अनुदानाचे प्रस्ताव शेतकरी देत असले तरी रोपे खरेदीच्या बिलासंदर्भात शासकीय धोरण सर्वसमावेशक नाही. अनेक नोंदणीकृत शेतकरी गटांच्या रोपवाटीकामध्ये दर्जेदार व खात्रीशीर बांबू रोपे बनवली जातात. असे असतांना केवळ तीन संस्थाकडून रोपे पुरवठा करणे,या संदर्भातील प्रचलीत धोरण शिथील करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांच्या रोपवाटीकांना शासन मान्यता देवून अधिकृत रोपवाटिकेचा दर्जा द्यावा यामुळे बांबू लागवडीकडे वळणाऱ्या शेतक-यांच्या अडचणी दूर होतील.
भूमी शेतकरी उत्पादक गट चिमणेचे अध्यक्ष वसंतराव तारळेकर, उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील, सचिव प्रशांत कांबळे, पेरणोली बांबू ग्राम शेतकरी गटाचे अध्यक्ष कृष्णा वरेकर, उपाध्यक्ष इनास फर्नांडीस, सचिव सतिश कांबळे यांच्या सहया आहेत.



