गुरुवार दि.५ डिसेंबर २०२४




भटकी कुत्री… भुरट्या चो-या आणि पाण्याच्या गळत्या…

ज्योतिप्रसाद सावंत
आजरा शहरांमध्ये वाढलेल्या भुरट्या चोऱ्या, गल्लीबोळात दिसणारी भटकी कुत्री व ठिकठिकाणी पाणीपुरवठा योजनेस लागलेल्या गळत्या शहरवासीयांच्या दृष्टीने डोकेदुखी ठरत असून कायमस्वरूपी भेडसावणारे हे प्रश्न निकाली कधी लागणार ? असा प्रश्न आता शहरवाशीय उपस्थित करू लागले आहेत.
शहरांमध्ये चोऱ्यांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. यापैकी कांही मंडळी पोलीस स्टेशनला जाऊन तक्रारी नोंदवताना दिसतात तर कांही मंडळी पॉलिसी चौकशीचा ससेमिरा व त्यातून काहीच निष्पन्न न होण्याची शक्यता यामुळे पोलीस स्टेशनला जाण्याऐवजी शांतच राहत आहेत. परंतु शहरांमध्ये प्रमाण प्रचंड वाढले आहे हे निश्चित. बंद घरे चोरट्यांचे लक्ष्य बनू लागली आहेत. संसार उपयोगी साहित्यासह दागदागिन्यांवर डल्ला मारून गायब मंडळींचा शोध अद्याप तरी लागलेला नाही. त्यामुळे या चोरट्यांचा शोध हे पोलिसांच्या समोर मोठे आव्हान आहे.
शहरामध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. लहान मुले, महिला, वयोवृद्ध नागरिक यांच्यावर भटक्या कुत्र्यांकडून हल्ले होत असून आजरा ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचाराकरीता जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. भटक्या कुत्र्यांची वाढलेली संख्या आहे शहरांमधील कचरा व्यवस्थापनाचे फार मोठे अपयश म्हणावे लागेल. शहरामध्ये सर्वत्र असणारी चिकन, मटन व्यावसायिकांची दुकाने, हॉटेल व्यवसायीकांकडून टाकला जाणारा कचरा यामुळे या भटक्या कुत्र्यांचे अस्तित्व सर्वत्र दिसत आहे. नगरपंचायत या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात अपयशी ठरत आहे हे नाकारून चालणार नाही.
शहरामध्ये पाणीपुरवठा योजनेस ठीक- ठिकाणी लागलेल्या गळत्या व त्यातून लाखो लिटर पाणी वाया जात असल्याचे चित्र गेली कित्येक वर्षे शहरवासीय अनुभवत आहेत. एकीकडे कांही भागात पाण्यासाठी नागरिकांना वणवण करावी लागत असताना दुसरीकडे मात्र गटर्स मधून वाहून जाणारे पाणी असा परस्पर विरोधाभास सर्रास पहावयास मिळत आहे.
एकंदर शहरातील भुरट्या चोऱ्यांसह भटक्या कुत्र्यांची वाढलेली संख्या व पाणीपुरवठा योजनेला लागलेल्या गळत्या हा सध्या शहरामध्ये चर्चेचा विषय आहे हे निश्चित…



वसंतराव धुरे यांना मातृशोक

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा साखर कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष वसंतराव धुरे यांच्या मातोश्री श्रीमती पार्वती बापूसाहेब धुरे (वय ८५ वर्षे) यांचे वृद्धापकाळाने उत्तुर मुक्कामी निधन झाले.
त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुली, दोन विवाहित मुले,सूना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. उत्तूर येथे आज गुरुवारी सकाळी ११ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.



आजरा अर्बन बँकेच्या डोंबिवली शाखेचा स्थलांतर सोहळा संपन्न

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
दि आजरा अर्बन को-ऑप. बँक लि., आजरा (मल्टी-स्टेट) या बँकेच्या डोंबिवली शाखेचे मा.नाम. रविंद्र चव्हाण, सार्वजनिक बांधकाम मंत्री, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री, ग्राहक संरक्षण मंत्री यांचे शुभहस्ते व अध्यक्षतेखाली शाखा स्थलांतर सोहळा पार पडला. कार्यक्रमाला आम. प्रकाश आबिटकर, मोरेश्वर भोईर, माजी उपमहापौर कल्याण डोंबिवली महानगरपालिका, उपाध्यक्ष भाजपा कल्याण, अशोकअण्णा चराटी -प्रमुख, अण्णा भाऊ संस्था समूह व संचालक उपस्थितीत होते.
याप्रसंगी आमदार प्रकाश आबिटकर यांनी ग्रामीण भागात स्थापन झालेल्या आजरा बँकेने केलेल्या अलौकिक प्रगतीबद्दल अभिनंदन करून आजरा बँकेने खाजगी व राष्ट्रीयकृत बँकाप्रमाणेच प्रगती केली असलेचे गौरवोद्गार काढले.
अशोकअण्णा चराटी यांनी बँकेच्या कार्याचा आढावा घेत ग्रामीण भागात स्थापन झालेली व शहरामध्ये शाखांचा विस्तार असणारी मल्टीस्टेट दर्जाची आजरा बँक ही अग्रगण्य बैंक म्हणून राज्यासह देशभरात नावलौकिकास पात्र झाली असलेचे सांगितले तसेच नॅशनल बँका ज्या सेवा सुविधा देत आहेत त्या सर्व आपल्या बँकेकडे उपलब्ध असून त्याचा ग्राहकांनी लाभ घ्यावा असे प्रतिपादन केले.
उदघाटन प्रसंगी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत गंभीर, रमाकांत पाटील नगरसेवक, जालींदर पाटील, नगरसेवक, पंढरी म्हात्रेसो, भाजपा उपाध्यक्ष, रवी म्हात्रेसो नगरसेवक, गिरीधर कुराडे,दशरथ होडगे, म विजयकुमार पाटीलसो, भैरु टक्केकर, अनिकेत चराटी, राजू परुळेकर, महेश पाटील, प्रकाश गावडे, तसेच बँकेचे चेअरमन रमेश कुरुणकर, व्हा. चेअरमन सुनिल मगदुम सुरेश डांग, विलास नाईक, डॉ. दीपक सातोसकर, डॉ. अनिल देशपांडे, किशोर भुसारी, बसवराज महाळंक, मारुती मोरे, आनंदा फडके, सौ. प्रणिता केसरकर, श्रीमती शैला टोपले, सौ. अस्मिता सबनिस, सुर्यकांत भोईटे, किरण पाटील, संजय चव्हाण, ॲड. सचिन इंजल, मनोहर कावेरी, जयवंत खराडे तसेच परिसरातील प्रतिष्ठित मंडळी व मान्यवर उपस्थित होते.


संविधान प्रास्ताविकाचा कट्टा बांधकामासाठी चे मलिग्रे येथे दिले निवेदन.

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
संविधान संवर्धन चळवळ व राष्ट्रमाता जिजाऊ संविधान गट यांच्या वतीने, मलिग्रे ग्रामपंचायतच्या मार्फत भारतीय संविधान प्रास्ताविकेचा कट्टा बांधण्यात यावा व इतर मागण्यांचे निवेदन देण्यात आले्
यावेळी सरपंच शारदा गुरव, ग्रामसेवक धनाजी पाटील, सदस्य राजाराम नावलगी उपस्थित होते. या निवेदनात संविधान संवर्धनाची अंमलबजावणीची प्रक्रिया व्हावी, याचा एक टप्पा म्हणून भारतीय संविधान प्रास्ताविकेचा कट्टा मलिग्रे ग्रामपंचायतच्या हद्दीत उभा करावा, व त्याची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी. तसेच होणाऱ्या ग्रामसभा, मासिक सभा व इतर सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमांची सुरुवात, भारतीय संविधान प्रास्ताविकेच्या वाचनाने करावी . ग्रामपंचायत हद्दीतील रिकाम्या जागेत संविधान कट्टा बांधण्यात यावा. दिनांक २६ नोव्हेंबर हा दिवस “संविधान दिवस “म्हणून साजरा करण्यात यावा. घर-घर संविधान व माझे संविधान-माझा अभिमान या कार्यक्रमाची अंमलबजावणी करावी.अशा आशयाचे निवेदन मलिग्रे ग्रामपंचायत तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र, मराठी शाळा याना देण्यात आले,
यावेळी संविधान संवर्धन चळवळीचे कार्यकर्ते बाळूभाऊ कांबळे, विष्णू कांबळे, बंडू कांबळे, बरकत जमादार,अनुसया कांबळे, मंगल कांबळे, मालूताई कांबळे, रंगूबाई कांबळे याच्या सह राष्ट्रमाता जिजाऊ संविधान गट महिला व कार्यकर्ते उपस्थित होते.


व्यंकटराव येथे संस्थेमार्फत माजी शिक्षकांचा “शिक्षक सन्मान सोहळा ” संपन्न

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा येथील आजरा महाल शिक्षण मंडळ आजरा संस्थेमार्फत “माजी शिक्षक सन्मान सोहळा” नुकताच संपन्न झाला. या सोहळ्यासाठी संस्थेअंतर्गत विविध शाखांतून सेवानिवृत्त झालेले जवळजवळ ,३० शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या सर्वांचा यथोचित सन्मान झाल्यानंतर प्रास्ताविक श्री शिवाजी पारळे यांनी केले.
शिक्षक मनोगत एम. ए. पाटील यांनी व नवीन शिक्षकांना या सेवानिवृत्त शिक्षकांचा परिचय पी. एस. गुरव यांनी करून दिला.
सेवानिवृत्त शिक्षकांमध्ये ए. के. पावले, एस. जी. इंजल, बी.बी. गुरव व सी. आर. देसाई यांनी या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले.
संस्थेचे सचिव अभिषेक शिंपी यांनी आपल्या मनोगतामध्ये सर्व शिक्षकांना या शिक्षक सन्मान सोहळ्याचे आपले उदात्त उद्दिष्ट सांगितले.. आजपर्यंत अनेक इंजिनियर, डॉक्टर, प्राध्यापक, उद्योजक, सायंटिस्ट, कलाकार, खेळाडू निर्माण केलात हा शाळेचा सन्मान व देशसेवाच आहे .याबद्दल सर्वांचे आभार मानले. आणि कौतुकही केले.
अध्यक्षीय भाषणात संस्थेचे अध्यक्ष जयंतराव शिंपी यांनी तालुक्यातील व्यंकटराव ही पहिली शाळा ही आपणा सर्वांच्या कार्यकर्तृत्वातून दिवसेंदिवस नावारूपाला येत आहे इथे घडलेले विद्यार्थी विविध क्षेत्रात चमकत आहे हे फक्त आजी आणि माजी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या अध्यापन सहयोगातूनच. या विद्यार्थ्यांना अद्ययावत शिक्षण मिळावे म्हणून शासनाचा कोणताही निधी नसतानाही ही तीन मजली इमारत बांधून पूर्ण केली आहे.
आभार पी. व्ही. पाटील यांनी मानले. या सन्मान सोहळ्यासाठी संस्थेचे उपाध्यक्ष श्री एस पी कांबळे, खजिनदार श्री सुनील पाटील, संचालक श्री सचिन शिंपी, श्री पांडुरंग जाधव, श्री सुधीर जाधव, श्री विलास पाटील, श्री के.जी पटेकर,विक्रम पटेकर, विश्वास जाधव, माजी शिक्षकासमवेत व्यंकटराव हायस्कूल, व्यंकटराव ज्युनिअर कॉलेज, व्यंकटराव महाविद्यालय, व्यंकटराव प्राथमिक, भादवण हायस्कूल, सिरसंगी हायस्कूल देवर्डे हायस्कूल. या सर्व शाळांचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षिका व स्टाफ उपस्थित होते.





