सोमवार दि.२५ नोव्हेंबर २०२४



स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उमटणार विधानसभा निकालाचे पडसाद

आजरा : ज्योतिप्रसाद सावंत
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये आजरा तालुक्याने राष्ट्रवादी व राष्ट्रीय काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातील तीनही जिल्हा परिषदेमध्ये महायुतीला मताधिक्य दिले आहे. याचे पडसाद येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांवर उमटण्याची शक्यता अधोरेखित होऊ लागली आहे.
भाजपाचे शिवाजीराव पाटील, शिवसेना शिंदे गटाचे प्रकाशराव आबिटकर आणि अजित पवार राष्ट्रवादी गटाचे मंत्री हसन मुश्रीफ हे या निवडणुकीत विजयी झाले आहेत. कोळींद्रे, आजरा व उत्तुर जिल्हा परिषद मतदार संघांनी या तिघांनाही मताधिक्य देण्याचे काम केले आहे. या निवडणुकीत स्थानिक नेत्यांनी सोयीच्या भूमिका घेतल्याने निकालानंतर अनेक मंडळींची गोची झालेली आहे. गेली पाच ते सहा वर्षे नगरपंचायतीसह जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीला सामोरे जाण्याच्या दृष्टीने अनेकांनी आपापल्या संभाव्य मतदारसंघांमध्ये चांगलीच मशागत केली होती. वरिष्ठ नेते मंडळींची रसद आपणालाच राहील असे गृहित धरून केलेली ही मशागत बदललेल्या राजकीय संदर्भामुळे वाया जाण्याची शक्यताही निर्माण झाली आहे.
शिवसेना (उबाठा) व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची अवस्था तर विचित्र होऊन बसली आहे. जिल्ह्यात ना धड आमदार ना खासदार… अशा परिस्थितीत आगामी निवडणुकींना सामोरे जायचे कसे ? हा ही प्रश्न सतावू लागला आहे.
महायुतीच्या कार्यकर्त्यांना मात्र निकालाने चांगलेच बळ मिळाले आहे. आमदार हसन मुश्रीफ यांचे मंत्रीपद निश्चित आहे. आमदार प्रकाश आबिटकर हे मंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत तर शिवाजीराव पाटील यांचे भाजपामधील वजन सर्वश्रुत आहे. विधानसभेच्या निकालानंतर महा विकास आघाडीच्या घटक पक्षांमध्ये मोठी पडझड व कार्यकर्त्यांची पळापळ होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
एकंदर विधानसभा निवडणुकीचा हा निकाल आजरा तालुक्याच्या राजकारणावर दूरगामी परिणाम करणारा ठरणार आहे.
नवीन चेहरे लागले कामाला...
विधानसभा निवडणुकीत महायुतीला मताधिक्य मिळण्याबरोबरच राज्यात व केंद्रात असणारी सत्ता स्थानिक कार्यकर्त्यांना जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रवेशाकरता खुणावू लागली आहे. त्यामुळे महायुतीतील स्थानिक नवीन चेहरे नेटाने कामाला लागले आहेत.



आजरा शहर महाविकास आघाडीच्या पाठीशी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा जिल्हा परिषद मतदार संघामध्ये महायुतीचे उमेदवार प्रकाशराव आबिटकर यांना सुमारे चार हजार मतांचे मताधिक्य मिळाले असताना आजरा शहरातील मतदान पाहता शहराने महाविकास आघाडीलाच ‘हात ‘ दिल्याचे स्पष्ट झाले आहे.
आजरा शहरांमध्ये आमदार आबिटकर यांच्या माध्यमातून नळपाणीपुरवठा योजनेसह रस्ते, गटर्स, मंदिर, सांस्कृतिक सभागृहे, क्रीडा संकुल, वाचन मंदिर व इतर कामांकरिता सुमारे १०० कोटींचा निधी गेल्या पाच वर्षांमध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे. जे मागितले ते दिले असा फॉर्म्युला आबिटकर यांनी वापरूनही शहरांमध्ये के. पी. पाटील यांनी ९५७ मतांची आघाडी घेतली आहे. तर ए. वाय. पाटील यांना सुमारे २०० मतदान झाले आहे.
अपवादात्मक एखादे गाव वगळता सर्वत्र आमदार आबिटकर यांना मताधिक्य मिळाले असताना आजरा शहरात मात्र मताधिक्य कमी होण्याचे कारण आता स्थानिक मंडळी शोधू लागली आहे.
शहरामध्ये मताधिक्य कमी होणे हा नगरपंचायत निवडणुकीच्या दृष्टीने महायुतीला धोक्याचा इशारा समजला जातो. सर्वत्र महायुतीचे वारे असताना आजरा शहरात मात्र मताधिक्क्यात झालेली घट महायुतीच्या दृष्टीने चिंताजनक आहे.
तालुक्यात आनंद… शहरात धडधड…
महायुतीचे तालुका भरातील कार्यकर्ते व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील इच्छुक मंडळी आनंदोत्सव साजरा करत असले तरीही आजरा शहरांमध्ये मात्र नगरपंचायतीकरता असणाऱ्या इच्छुकांची मतदानाची आकडेवारी पाहून धडधड वाढली आहे.









