दि. २४ सप्टेबर २०२४

द्राक्षायणी आप्पासाहेब रोडगी यांचे निधन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा येथील मुख्य श्रीमती द्राक्षायणी आप्पासाहेब रोडगी (वय वर्षे -८२) यांचे अल्पश: आजाराने निधन झाले.आजरा येथील चिरमुरे व्यापारी सदानंद रोडगी व किराणा मालाचे व्यापारी बसवराज रोडगी यांच्या त्या मातोश्री होत.
त्यांच्या पश्चात दोन मुले,एक मुलगी,दोन सुना व नातवंडे असा परिवार आहे.आज मंगळवारी रात्री ८ वाजता लिंगायत स्मशानभूमी (लिंगैक्य भूमी/शिवाजी नगर) आजरा येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.

अन्याय निवारण समितीकडून नगरपंचायत प्रशासन धारेवर
कचरा प्रश्नी नगरपंचायतीच्या दारात शंखध्वनी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
शहरामध्ये कचरा उठावाचे कोलमडलेले वेळापत्रक, पाणीपुरवठा योजना मार्गी लागण्यास होत असलेला विलंब या पार्श्वभूमीवर अन्याय निवारण समितीने काल सोमवारी आजरा नगरपंचायतीच्या इमारतीसमोर शंखध्वनी आंदोलन करत दारातच कचरा टाकला. यानंतर झालेल्या बैठकीत नगरपंचायत अधिकाऱ्यांवर विविध प्रश्नांचा भडीमार करत चांगलेच धारेवर धरले. अखेर नगरपंचायतीकडून कचरा उठावाबाबत व पाणीपुरवठा योजना मार्गी लावण्याबाबत लेखी हमी दिल्यानंतर आंदोलन थांबवण्यात आले.
अन्याय निवारण समितीचे प्रमुख परशुराम बामणे, सुधीर कुंभार, विजय थोरवत यांच्या नेतृत्वाखाली सदर आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने शहरवासीय जमा झाले होते. नगरपंचायत कारभाराच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलनकर्त्यांनी शंखध्वनी केला व नगरपंचायतीच्या दारात कचरा टाकला.
यानंतर नगरपंचायतीचे अधिकारी आंदोलन करते व स्थानिक पोलीस अधिकारी यांची संयुक्त बैठक पार पडली.
कचरा उठाव करणारी यंत्रणा नसल्याने शहरात सर्वत्र कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे रोगराई पसरत आहे. नूतन पाणीपुरवठा योजनेच्या पूर्णत्वास विलंब होत असून यामध्ये काही मंडळींनी ‘ढपला’ पाडण्याचे काम केले असल्याचा संशय यावेळी व्यक्त करण्यात आला. निकृष्ट दर्जाचे या योजनेचे काम असून अपूर्ण अवस्थेत हे काम आहे .कोणत्याही परिस्थितीत या योजनेचे काम पूर्ण होईपर्यंत उद्घाटनाचा घाट घालू नये असा प्रयत्न झाल्यास त्याला ताकतीने विरोध करू असा इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी नगरपंचायतीने कचरा उठावाबाबत निश्चित तारीख द्यावी सदर तारखेनंतर जर कचऱ्याचा प्रश्न मार्गी लागला नाही तर घरफाळा पावत्यांची होळी करण्यात येईल व घरफाळा कदापिही भरला जाणार नाही असा इशाराही देण्यात आला.

यावेळी झालेल्या चर्चेमध्ये परशुराम बामणे, विजय थोरवत, अतुल पाटील, सुधीर कुंभार, गौरव देशपांडे, प्रदीप पाचवडेकर, सुरेखा फडके, विठोबा चव्हाण, नाथा देसा,ई दयानंद भोपळे, गुरुदत्त गोवेकर आदींनी भाग घेतला.
लेखी हमी दिल्याशिवाय आंदोलन थांबवले जाणार नाही असा इशारा दिल्यानंतर प्रशासनाच्या वतीने २० ऑक्टोबर पर्यंत कचऱ्याचा प्रश्न तर ५ ऑक्टोबर पर्यंत शहरातील पाणी प्रश्न मार्गी लावण्याची लेखी हमी देण्यात आली.
प्रशासनाच्या वतीने राकेश चौगुले,निहाल नायकवडी, अमर कांबळे, संजय यादव, प्रदीप नाईक यांनी चर्चेत भाग घेतला.
आंदोलनामध्ये पांडुरंग सावरतकर, वाय. बी. चव्हाण,जावेद पठाण, संजय जोशी, सुरेश कुंभार, जोतिबा आजगेकर अशोक गाइंगडे, सी.डी. सरदेसाई, शरद कोलते, विशाल रेळेकर, रवी तळेवाडीकर, संजय कुरुणकर, महेश कांबळे, सतीश बामणे, शरीफ खेडेकर, प्रकाश सावंत यांच्यासह शहरवासीय सहभागी झाले होते.
प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे शहरात विविध प्रश्न
नगरपंचायत प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे शहरात विविध प्रश्न तयार होत आहेत असा आरोप बैठकीत करण्यात आला. पंतप्रधान आवास योजनेतून एकही प्रकरण झालेले नाही. शहरातील गटर्सचे काम केवळ कार्यकर्ते पोसण्यासाठी झालेले आहे. स्वतंत्र मटण मार्केट नसल्याने भटक्या कुत्र्यांची संख्या शहरभर वाढलेली आहे. मोकाट जनावरांचा बंदोबस्त करणे नगरपंचायतीला शक्य झालेले नाही असे विविध आरोप यावेळी करण्यात आले.


आजरा कारखान्याची उद्याची सभा वादळी होण्याची शक्यता…
माजी संचालकांकडून प्रश्नांची मालिका

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवार दिनांक २५ सप्टेंबर रोजी होत असून या सभेच्या पार्श्वभूमीवर माजी संचालकांनी विविध प्रश्नांची मालिका उपस्थित केली आहे. या प्रश्नांचा खुलासा मागितला असल्याने यावर सभेत जोरदार चर्चा होणार असल्याचे दिसत आहे.
चार दिवसापूर्वी कारखान्याचे अध्यक्ष वसंतराव धुरे व संचालक मंडळाने कारखान्यांमध्ये नवीन मशिनरी बसवण्यात आली असून याचबरोबर विविध प्रकारच्या उपक्रमांची माहिती दिली होती. या पार्श्वभूमीवर सदर प्रश्न माजी संचालकांनी उपस्थित केले आहेत. अहवालामध्ये चुकीची माहिती दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
हे प्रश्न पुढील प्रमाणे…
♦जमीन वाढीव मूल्यांकन निधी रु.२७ कोटीवरुन रु. १७९ कोटी दाखविला आहे हे वास्तवास व मार्केट रेटला धरून आहे
काय ? वाढीव मूल्यांकन दिशाभूल करणारे आहे.
♦कायम मालमत्ता वाढीव मूल्यांकन निधी गेल्या वर्षी ० किंमत असताना या वर्षी रु. ८३ कोटी ५३ लाख इतकी रक्कम दाखविली आहे. १९९७ च्या जुन्या मशीनरींची किंमत आता इतकी होऊ शकते काय ?
♦राखीव निधीतून चालू वर्षी १ कोटी ७३ लाख रुपये कमी केले आहेत. या रक्कमेचा वापर कोठे केला ?
♦नफा तोटा पत्रक एसएमपी ऊस बिलावरील व्याज खर्च रु. २ कोटी ७८ लाख ४८ हजार ४०४ रु. दाखविला आहे. ती रक्कम कोणासाठी खर्च केली याचा खुलासा होणे अपेक्षित आहे.
♦गेल्या वर्षीचे क्रशिंग विचारात घेतले तर (३.३६) संस्थेचे एकूण उत्पन्न रु.१५८ कोटी दाखविले होते त्या तुलनेने यंदा क्रशिंग कमी झाले असून ते २.६८ इतके आहे असे असताना तसेच एकूण उत्पन्नात २६ कोटी रुपयांची घट होऊनही नफा तोटा पत्रकात संस्थेचा नफा १ कोटी ३१ लाख १६ हजार दाखविला आहे हे कसे होऊ शकते?
♦सभासदांना साखर वाटप झाले पाहिजे याबाबत निवडणूक जाहिरातनाम्यात उल्लेख केला होता त्याचे काय झाले ?
♦क्रशिंग विचारात घेता ४०० टोळ्या अतिरिक्त येणार आहेत त्याचा वापर कोठे व कसा करणार याचा खुलासा व्हावा.
♦नवीन मशीनरीकरिता रु. ७ कोटी खर्च केले आहे त्यामुळे क्रशिंगमध्ये किती फरक पडणार याचा खुलासा करण्यात यावा या प्रमुख प्रश्नांसह बारा प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.
या प्रश्नांना सामोरे कोणत्या पद्धतीने विद्यमान संचालक मंडळ जाणार हे उद्याच्या सभेत स्पष्ट होईल.
या प्रसिद्धी पत्रकावर माजी संचालक अशोक, चराटी अंजनाताई रेडेकर, सुनील शिंत्रे, जनार्दन टोपले, दशरथ अमृते, तानाजी देसाई, राजेंद्र सावंत, मलिककुमार बुरुड, विलास नाईक, यांच्यासह आतिशकुमार देसाई, युवराज पोवार, शैलेश मुळीक यांच्या सह्या आहेत.

वाटंगी येथे आज श्री हनुमान विकास सेवा संस्थेचा रौप्य महोत्सवी कार्यक्रम

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
वाटंगी ता. आजरा येथील श्री हनुमान वि.का.स. (विकास) सेवा संस्थेच्या रौप्य महोत्सवी समारंभाचे आयोजन आज मंगळवार दिनांक २४ रोजी सकाळी अकरा वाजता करण्यात आले आहे. जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमास आमदार राजेश पाटील, तहसीलदार समीर माने, सहाय्यक निबंधक सुजयकुमार येजरे,जिल्हा बँकेचे विभागीय अधिकारी सुनील दिवटे हे प्रमुख उपस्थित राहणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष अल्बर्ट डिसोझा यांनी दिली.
तसेच या कार्यक्रमास आजरा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष मधुकर देसाई, संचालक सुभाष देसाई, शिवाजी नांदवडेकर, संभाजी पाटील, राजेंद्र मुरकुटे, अनिल फडके, आजरा तालुका संघाचे अध्यक्ष विठ्ठलराव देसाई,संचालक मधुकर येलगार,वाटंगीचे सरपंच बाळू पोवार, जिल्हा बँकेचे विजय सरदेसाई, रवी देसाई विजय कांबळे यांच्यासह मान्यवही उपस्थित राहणार आहेत असेही अध्यक्ष डिसोझा यांनी सांगितले.
स्मशान रोड कामाचा शुभारंभ
यावेळी वाटंगी येथील ख्रिश्चन समाजाच्या स्मशानभूमीकडे जाणाऱ्या स्मशान रोडच्या कामाच्या शुभारंभही आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

मलिग्रे पंचक्रोशीत सुरू आहे करणी- भानामतीचा खेळ?

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
मलिग्रे पंचक्रोशीमध्ये करणी, भानामती यासारखे अघोरी प्रकार आजही सुरू असून पंचक्रोशीतील विविध ‘बाबां’च्या आशीर्वादाने ठीक ठिकाणी अंगारे, धुपारे, लिंबू, बाहुले यासह विविध साहित्य पडलेले दिसत आहे.
केवळ अशिक्षित नव्हे तर सुशिक्षित मंडळींच्याकडून सुरू असलेले हे प्रकार निश्चित चिंताजनक आहेत. देश विज्ञानाची कास धरून प्रगतीचे विविध टप्पे ओलांडत असताना ग्रामीण भाग या अंगा-या- धुपार्यातून बाहेर कधी पडणार ? हा प्रश्न मात्र अद्यापही अनुत्तरीत आहे.


(Advt.)
लवकरच आपल्या सेवेत… आजच ॲडव्हान्स बुकिंग करा..
तुमच्या स्वप्नातील घर, तुमच्या बजेटमध्ये…”आपलं घर* ” शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सर्व सोयीनीयुक्त
✅ शाळा, कॉलेज, बॅंका , स्टँड, हॉस्पिटल, होटेल्स, भाजी मार्केट, पेट्रोल पंप, मेन मार्केट फक्त 2 मिनिटांवर
✅ 1 आणि 2 BHK फ्लॅट्स
✅ इतर अनेक सुविधा
🏡साईटचा पत्ता : समर्थ कृपा रेसिडेन्सी , भगवा रक्षक चौक, सोमवार पेठ, दत्त मंदिरा समोर, आजरा
☎️ संपर्क –
+91 9527 97 3969
‘सन्मित्र’म्हणजे विश्वास : अध्यक्ष अल्बर्ट डिसोझा
४५ वी वार्षिक सभा उत्साहात

आजरा: मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
सभासद व कर्मचारी वर्गांच्या प्रयत्नामुळे सन्मित्र पतसंस्था अत्यंत चांगल्या पद्धतीने सुरू आहे. ‘सन्मित्र म्हणजे विश्वास…’ असे समीकरण तयार झाले असून या विश्वासाला कदापिही तडा जाऊ दिला जाणार नाही. मार्च २०२४ अखेरच्या आर्थिक वर्षात संस्थेला १९ लाख ६० हजार रुपयांचा नफा झाला आहे. ठेवींच्या वाढीसाठी विशेष प्रयत्न केले जात असून सर्वसामान्यांना आर्थिक मदतीचा हात देण्याचे काम संस्थेने केले आहे. असे प्रतिपादन सन्मित्र ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष अल्बर्ट डिसोझा यांनी केले. ते संस्थेच्या ४५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये अध्यक्षपदावरून बोलत होते.
सभेच्या सुरुवातीला श्रद्धांजलीच्या ठराव विश्वास कांबळे यांनी मांडला. नोटीस व अहवाल वाचन संस्थेचे व्यवस्थापक परशराम गिलबिले यांनी केले.
सभेमध्ये जयराम संकपाळ यांच्यासह दहावी व बारावी परीक्षेतील सभासदांच्या यशस्वी पाल्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
सभेस उपाध्यक्ष भीमराव सुतार, दत्तात्रय डोंगरे, मार्शल मिनिंझीस, केरेबिन नोरेंज, केरोलिन डिसोझा, व्हायलेट डिसोझा, विश्वास कांबळे, पांडुरंग माने, बाबुराव चौगले, बाबुराव गिलबिले, संभाजी पाटील, भीमराव वांद्रे, महेश भोसले, बाळू पोवार, वसंत आडसुळे, यांच्यासह शाखा सल्लागार, अधिकारी कर्मचारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रॉबर्ट डिसोझा यांनी आभार मानले.




