mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या


सात जणांना सर्पदंश …
दोघे दगावले
 तीस जणांचा कुत्र्यांनी घेतला चावा

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

       आजरा ग्रामीण रुग्णालयामध्ये जुलै महिन्यामध्ये तब्बल सात जणांवर सर्पदंश व ३० जणांचा कुत्र्यांनी चावा घेतल्याचे रूग्ण दाखल झाले त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत. तालुक्यातील इतर आरोग्य केंद्रामध्ये हे श्वास झालेल्या रुग्णांची संख्या चिंताजनक असून सर्पदंशाने भादवण येथील सौ.ज्योती संभाजी देवलकर व बेलेवाडी हुब्बळगी येथील दिगंबर मारुती मुदाळकर या दोघांचा मृत्यू देखील झाला आहे.

     तालुक्यामध्ये सर्पदंशाच्या तुलनेमध्ये श्वानदंशाचे प्रमाण वाढले आहे. भटक्या कुत्र्यांची संख्या प्रचंड वाढल्याने तालुक्यातील सर्वच गावांमध्ये कुत्र्यांकडून चावा घेतला जाऊन लहान बालके व वयोवृद्ध नागरिक जखमी होत आहेत.

      केवळ सर्पदंश व श्वानदंश झालेल्या रुग्णांनी उपचार घेतले आहेत असे नाही तर मांजरांनी चावा घेतलेल्या १३ व उंदरांनी चावा घेतलेल्या तीन जणांसह विंचू व इतर कीटकांनी चावा घेतलेल्या पाच रुग्णांवर आजरा ग्रामीण रुग्णालयात जुलै महिन्यात उपचार करण्यात आले आहेत.

            कुत्र्यांच्या हल्ल्यात शेळी ठार

     आजरा शहरामध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या प्रचंड वाढली असून गुरुवारी दुपारी भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये आमराई गल्ली येथील इकबाल सिलेमान हकीम यांची शेळी ठार होऊन यामध्ये सुमारे १२ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

          श्रावणात खबरदारी आवश्यक…

     श्रावण महिना सुरू होत असून श्रावण महिन्यामध्ये ऊन- पावसाचा खेळ सुरू झाल्यानंतर साप बाहेर पडत असल्याने सर्पदंशाचा धोका वाढतो. विशेषत: शेती कामाला जाणाऱ्या मंडळींनी सर्पदंशाबाबत खबरदारी बाळगणे आवश्यक आहे असे सर्पमित्रांकडून सांगण्यात आले.

‘व्यंकटराव ‘ मध्ये लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठेंना अभिवादन

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     येथील व्यंकटराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज आजरा या प्रशालेमध्ये लोकमान्य  टिळक यांची पूण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन प्रशालेचे प्राचार्य श्री. आर .जी. कुंभार, पर्यवेक्षिका सौ व्ही.जे.शेलार यांचे हस्ते करण्यात आले.

     याप्रसंगी. बोलतांना सौ.व्ही.ए.वडवळेकर यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यामधील लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे कार्य, परखड व्यक्तिमत्व तसेच त्यांनी समाज प्रबोधन आणि क्रांती घडवण्यासाठी लोकमान्य टिळक त्याचप्रमाणे संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये अग्रेसर समाज प्रबोधन करणारे तसेच दीड दिवसाची शाळा शिकलेले लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या आभाळाएवढे यश व कर्तुत्व संपादन करणाऱ्या दोन महान क्रांतिकारकांच्या कार्याचा आढावा घेतला.

     प्राचार्य श्री. आर.जी.कुंभार यांनीही मनोगत व्यक्त केले.

     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.पी.व्ही पाटील यांनी व आभार श्री.व्ही. एच. गवारी यांनी मानले.या कार्यक्रमासाठी प्रशालेतील सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

टिळकांचे गुण अनुसरा – सुनील सुतार

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     “टिळकांचे गुण अनुसरा. त्यांच्यामध्ये असणारा बाणेदारपणा, कुशाग्र बुद्धी, गणित-संस्कृतमधील आवड आदि गुण आपल्यामध्ये जोपासा‌ असे विचार सुनील सुतार यांनी मांडले. स्वामी विवेकानंद विद्यामंदिरमध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. या वेळी ते बोलत होते.

     प्रथम मुख्याध्यापक सुनील सुतार यांनी प्रतिमापूजन केले. त्यानंतर स्वरा कुंभार, प्रिया बागुल, शांभवी पंडित, दुर्वा बुरूड, लावण्या पाटील, माधुरी लोधी, अन्विता कुरुणकर, शौर्या चोथे, प्रांजल नलवडे ह्या तिसरी-चौथीच्या विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळक यांच्या कार्याविषयीची माहिती आपल्या भाषणातून दिली. आराध्य मोरे, मल्हार सूर्यवंशी, विराज बेळगुंदकर, स्वानंद कोगेकर, अनन्या पिळणकर, किमया खुळे, दिशा नार्वेकर, स्पेहा टोपले, मृणाली पाटील ह्या पहिली-दुसरीच्या विद्यार्थ्यांनीही भाषणे केली.

     मुख्याध्यापक सुनील सुतार, विजयालक्ष्मी देसाई, उत्तम नातलेकर, संयोगिता सुतार, राजाराम गाडीवड्ड, संतोषी कुंभार शिक्षकांसह सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

लकीकट्टी येथील आपत्तीग्रस्त शेतकऱ्याला अंजनाताईंचा मदतीचा हात

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

       लकीकट्टी ता. चंदगड येथील श्री. बाबू तानाजी मुगारे या शेतकऱ्याच्या ४ म्हैशी चरायला सोडल्या असतेवेळी विद्युत तारेचा स्पर्श होऊन मॄत्युमुखी पडून लाखोंचे नुकसान झाले. गोकुळच्या संचालिका अंजनाताई रेडेकर यांनी घटनास्थळी भेट दिली. व तात्काळ २०,००० हजाराची मदत देण्यात आली.

     यावेळी गोकूळचे संकलन अधिकारी बापूसाहेब देसाई, सुपरवायझर आणि जय हनुमान दुध संस्था, पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.

दुचाकींची समोरासमोर धडक…

दोघे जखमी

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     आजरा – आंबोली मार्गावर हॉटेल विनोद समोर दुचाकींची समोरासमोर धडक होऊन गणेश दशरथ गिरी (वय २८ रा. आजरा) व बाळू शंकर बागडी (वय ४० रा. देवर्डे) हे दोघेजण जखमी झाले. गुरुवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास सदर अपघात झाला.

     दोघांनाही उपचारासाठी आजरा ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले.

 

पाऊस पाणी…

     आजरा मंडल व परिसरामध्ये गेल्या २४ तासामध्ये ९० मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. शुक्रवारी पहाटेपासून पावसाचा जोर वाढला आहे.

 


 

संबंधित पोस्ट

पंचायत समिती अधिकाऱ्याचा ऑन ड्युटी मृत्यू

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

Breaking News

mrityunjay mahanews

आज-यात गोवा बनावटीच्या दारुसह  साडेचार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त…

mrityunjay mahanews

कुणी म्हणते बाल हनुमान, तर कुणी मारते दगड…

mrityunjay mahanews
error: Content is protected !!