

पळापळ…
लाडकी बहीण योजनेची कागदपत्रे जमा करण्यासाठी बहिणींची पळापळ

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनची घोषणा होताच कागदपत्रे जमा करण्यासाठी महिलांची धावाधाव सुरू झाली आहे.
गेले दोन दिवस महिला वर्ग कागदपत्रे गोळा करण्यामध्ये व्यस्त आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये महिलांची चांगलीच दमछाक झाली असली तरी आता कागदपत्रे सादर करण्याची मुदत वाढवल्याने महिला वर्गास थोडा दिलासा मिळाला आहे. या योजनेतील लाभार्थी महिलांना ३१ ऑगस्ट पर्यंत अर्ज करता येण्याची मुभा देण्यात आलेली आहे.
योजनेकरता पात्र होण्यासाठी असणारी वयोमर्यादा ६० वरून ६५ वर्षे करण्यात आली असून अधिवास प्रमाणपत्र नसल्यास त्या ऐवजी पंधरा वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, जन्म दाखला या चार पैकी कोणतेही एक ग्राह्य धरण्यात येणार असून या योजनेकरता पाच एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे.
ज्या लाभार्थींकडे अडीच लाख रुपयांचा उत्पन्नाचा दाखला उपलब्ध नसेल व जर त्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल तर त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात आली आहे.
एकंदर शासनाच्या या योजनेकडे महिलावर्ग प्रचंड आकर्षित झाला असून ठिकठिकाणी कागदपत्रे गोळा करण्याकरता होणारी गर्दी या योजनेला मिळणारा प्रतिसाद स्पष्ट करत आहे.

तहसील समोर दुकान गाळे नकोच…
रिकाम्या जागेत पार्किंग व्यवस्था करण्याची मागणी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तहसील कार्यालयाच्या संरक्षक भिंत व संकेश्वर-बांदा महामार्गाच्यामध्ये असणाच्या रिकाम्या जागी काही मंडळींकडून दुकान गाळे टाकाण्याचा प्रयत्न चालु आहे. या गाड्यांना अन्याय निवारण समितीसह स्थानिक नागरिकांनी विरोध केला असून येथे पार्किंगची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी तहसीलदारांसह सार्वजनिक बांधकाम विभाग व आजरा नगरपंचायतीकडे केली आहे.
मुळातच या परिसरात महामार्ग अत्यंत अरुंद आहे. येथे दुचाकी अथवा चार चाकी पार्कींगची कोणतीही सोय नाही. त्यामुळे या अरुंद मार्गावरच दुतर्फा वाहने पार्किंग केली जातात,वास्तविक या रिकाम्या जागेत नगरपंचायत व सार्वजनिक बांधकाम विभागाने दुचाकी व चार चाकी गाडी पार्कींगची व्यवस्था केल्यास त्याठिकाणी रस्त्यावर उभी केलेल्या वाहनांची सोय होईल व रस्ता वाहतुकीस सुटसुटीत होईल, मात्र सद्यस्थितीत मनमानी पध्दतीने विनापरवाना खोके पालण्याचा प्रयत्न सुरु असून या जागी जर बेकायदेशीररित्या असा प्रयत्न झाल्यास अन्याय निवारण समितीतर्फे आंदोलन छेडून वरिष्ठांकडे दाद मागण्यात येईल.
सदरची जागा ही पार्किंगसाठी राखीव असून या जागेत कोणीही अनाधिकृतरित्या अतिक्रमण केलेस, गाळे उभारलेस त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असे फलक नगरपंचायतीने तातडीने लावावेत असे याबाबतच्या निवेदनात नमूद केले आहे.
निवेदन आजरा तहसीलदारांना देण्यात आले असून यावेळी अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष परशुराम बामणे, विजय थोरवत, शिवाजी गुडुळकर, प्रकाश हरमळकर, वाय. बी. चव्हाण,जावेद पठाण, गौरव देशपांडे, जोतिबा आजगेकर, अश्विन डोंगरे,पांडुरंग सावरतकर,दिनकर जाधव उपस्थित होते.

आंबेओहोळ धरणग्रस्तांची प्रांत कार्यालयात झाली बैठक
जलसमाधीवर ठाम

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आंबेओहोळ धरणग्रस्तांचे बरेच प्रश्न अजून शिल्लक असून याबाबत तातडीने बैठका घेऊन प्रश्न मार्गी लावण्यात यावेत अशी मागणी आंबेओहोळ धरणग्रस्त संग्राम संघटनेने केली होती. या संदर्भात दिनांक २ जुलै २०२४ पासून प्रांत कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर दिनांक १ जुलै रोजी सायंकाळी ४ वाजता गडहिंग्लज प्रांताधिकारी यांनी आंबेऒहळ धरणग्रस्त संघटनेचे अध्यक्ष व कांहीं प्रमुख आंदोलनकर्ते यांचे सोबत प्रांत कार्यालयात बैठक घेण्यात आली.
यावेळी कॉ. शिवाजी गुरव, बाबुराव नाईक, संजय येजरे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित राहून चर्चा करण्यात आली. जे प्रश्न मार्गी लागण्यासारखे आहेत याबाबत प्रांताधिकारी यांनी प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न केला व या सर्व प्रश्नाबाबत येत्या दहा ते पंधरा दिवसांमध्ये व्यापक बैठक घेऊन सर्व प्रश्न मार्गी लावण्याचे लेखी आश्वासन यावेळी प्रांताधिकार्यांनी यांनी संग्राम संघटनेचे अध्यक्ष शिवाजी गुरव याना दिले आहे. त्यामुळे दिनांक २ जुलै रोजी प्रांत कार्यालय गडहिंग्लज येथील आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.
परंतु या बैठकीत दिनांक १० जूलै रोजी आंबेऒहोळ धरणस्थळावर जलसमाधी आंदोलन होणार असून सदर आंदोलनाबाबत चर्चा व निर्णय वरीष्ठ पातळीवर होणे आवश्यक आहे असे सांगितले. त्यामुळे सदरच्या दि.१० जुलै रोजी होणाऱ्या आंदोलनावर ठाम असल्याचे व आंदोलन होणार असल्याचे संजय येजरे यांनी सांगितले.


रामतीर्थ प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या चेअरमनपदी मारूती देसाई
माधुरी मोरे व्हा. चेअरमन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
येथील रामतीर्च प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या चेअरमनपदी मारूती देसाई यांची तर व्हा. चेअरमनपदी माधुरी मोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक अधिकारी तवा आजऱ्याचे सहाय्यक निबंधक सुजयकुमार येजरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नवनिर्वाचित संचालकांच्या विशेष सभेत या निवडी करण्यात आल्या.
चेअरमनपदासाठी देसाई यांचे नाव विश्वास येजरे यांनी सुचविले त्यास संतोष शिवणे यांनी अनुमोदन दिले. तर व्हा. चेअरमन पदासाठी मोरे यांचे नाव युनूस लाडजी यांनी सुचविले त्यास संजय केसरकर यांनी अनुमोदन दिले संस्थेची निवडणूक बिनविरोध पार पडल्यानंतर पदाधिकारी निवडीही बिनविरोध करण्यात आल्या. निवडीनंतर बोलताना नूतन पदाधिकाऱ्यांनी सर्वांना सोबत घेऊन संस्थेचे प्रगतीचे काम केले जाईल असा विश्वास संचालकांना दिला
यावेळी संस्थेचे संस्थापक जनार्दन नेऊंगरे, राज्य शिक्षक संघाचे कोषाध्यक्ष संभाजी बापट, शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष मायकेल फर्नाडिस, रवींद्र दोरूगडे, पांडूरंग आजगेकर, अर्जुन पाटील, लक्ष्मण कविटकर यांच्यासह नूतन संचालक मारूती डेळेकर, तानाजी गिरी, जगन्नाथ सुतार, संचालिका सुवर्णा पोवार यांच्यासह माजी संचालक, व्यवस्थापक विजय पत्ताडे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. पांडूरंग डेळेकर यांनी सूत्रसंचलन केले तर संजय मोहिते यांनी आभार मानले.



