

घरफोड्यांचे सत्र सुरूच…
संसारोपयोगी साहित्यसह दागिने लंपास

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुक्यामध्ये घरफोडी व चोऱ्यांचे सत्र सुरूच असून उत्तूर येथील
बबन विठोबा आपके (रा. उत्तूर पैकी पाष्टेवाडी) यांच्या मालकीच्या हावळ गल्ली, उत्तुर येथील घराचा दरवाजामागील लोखंडी बार काढून घरातील संसारोपयोगी साहित्य व सोन्या-चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे.
याबाबतची फिर्याद आपके यांनी पोलिसात दिली असून पुढील तपास हवालदार बाजीराव कांबळे करीत आहेत.

मोबाईलची चोरी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आठवडा बाजारातील गर्दीचा फायदा उठवत काल शुक्रवारी मच्छिंद्र देसाई रा. वेळवट्टी यांच्यासह चौघाजणांचे मोबाईल अज्ञात चोरटयांनी लांबवले.
आठवडा बाजारातील पाकीटमार व चोरटे हे तालुक्यातील ग्रामस्थांच्या दृष्टीने डोकेदुखी ठरत आहेत.

टोल भरणार नाही…
तालुकावासीयांचा निर्धारव्यापक आंदोलनाची तयारी
. आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
संकेश्वर -बांदा महामार्ग उभारणीनंतर आजरा तालुक्यातील मसोली येथे टोल वसुलीसाठी यंत्रणा तयार करण्यात येत आहे. आजरा तालुकावासियांवर कोणी सक्तीने टोल वसुलीचा प्रयत्न केल्यास तो प्रयत्न निश्चितच हाणून पाडू. महामार्गावरील हा टोल हद्दपार करण्यासाठी येत्या १० जूनला टोल नाक्यावर तालुक्यातील जनतेचा मोर्चा धडकणार आहे. टोल न देण्याचा निर्धार आजच्या बैठकीत करण्यात आला.
श्री रवळनाथ मंदिराच्या माडीवर सर्वपक्षीय सदस्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. स्वागत प्रभाकर कोरवी केले.कॉ.संपत देसाई यांनी ज्या अर्थी टोल नाका उभा केला जात आहे त्याअर्थी टोल वसुलीच्या हालचाली सुरू असल्याचे सांगून टोलला विरोध करण्यासाठी तालुकावासीयांना संघटित लढया शिवाय पर्याय नसल्याचे सांगितले.
टोलबाबत महामार्ग व्यवस्थापनाची माहिती स्पष्ट नाही.टोल नाका उभारला जात आहे.त्यामुळे टोल वसूली होणार हे स्पष्ट होते मात्र आम्हाला हा टोल मान्य नाही.आजरा तालुक्यातील वाहनधारकांची ही पिळवणूक आहे त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत टोल द्यायचा नाही असा निर्धार करण्यात आला. याबाबतची माहिती महामार्ग अधिकारी यांच्याकडून मागवून घ्यायची. आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी पुन्हा येत्या सोमवारी बैठक घेण्याचे ठरले. शिष्टमंडळाने प्रांताधिकारी यांची भेट घेत परिस्थिती सांगितली.
चर्चेत परशुराम बामणे,संजय तर्डेकर,संजय पाटील, रशिद पठाण,मसणू सुतार, दशरथ अमृते,परेश पोतदार, विलास नाईक, निवृत्ती कांबळे, तानाजी देसाई यांनी भाग घेतला.
यावेळी रविंद्र भाटले, कारखाना संचालक गोविंद पाटील, रणजित देसाई,मानसिंग देसाई,दिगंबर देसाई,अशोक जांभळे, शरद कोलते,बाळ केसरकर, प्रकाश मोरुस्कर, दिनेश कांबळे, महेश पाटील, जोतिबा आजगेकर, बंडोपंत चव्हाण, पांडुरंग सावरतकर, आप्पासाहेब पाटील, वाय. बी. चव्हाण, देवदास बोलके, निशांत जोशी, मिनिन परेरा यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
ते पैसे टोलसाठी जमा करा…
महामार्गाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले आहे. या कामाकरिता मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करण्यात आली आहे. हा महामार्ग की राज्यमार्ग…? असा प्रश्न निर्माण होण्याजोगी परिस्थिती आहे. प्रत्यक्ष प्रचंड वृक्षतोड, महामार्गाच्या रस्त्याची रुंदी, त्याचा दर्जा, वनविभागाच्या जमिनीतून न झालेला रस्ता, स्थानिक जमिनीतून उत्खनन करून वापरलेली माती, मुरूम, खडी, मनमानी पद्धतीने दिलेली नुकसान भरपाई हे पाहता ठेकेदाराकडे प्रचंड पैसा शिल्लक राहिला आहे. हाच शिल्लक पैसा एक रकमी टोल स्वरूपात शासनाला ठेकेदाराने परत करावा असेही या बैठकीत सुचवण्यात आले.
हाज यात्रेकरूंना शिवसेनेकडून शुभेच्छा…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा येथून हाज येथे यात्रेसाठी जाणाऱ्या मुस्लिम बंधू-भगिनींना शिवसेना (उबाठा) गटातर्फे शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम पार पडला.
यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील, स्वामी विवेकानंद पतसंस्थेचे अध्यक्ष जनार्दन टोपले, वसंत भुईंबर, महेश पाटील, समीर चांद, भिकाजी विभुते आदी मंडळी उपस्थित होती.



