
स्मार्ट प्रीपेड मीटर्सचे लवकरच आगमन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
महावितरणने राज्यभरात २ कोटी २५ लाख ६५ हजार स्मार्ट प्रीपेड मीटर्स लावण्याचा निर्णय घेतला असून लवकरच घरोघरी आता स्मार्ट प्रीपेड वीज मीटर्स दिसणार आहेत. महावितरणने घेतलेल्या या निर्णयाला महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनने विरोध केला आहे. स्मार्ट मीटर योजनेचे वीज ग्राहकावर परिणाम होणार आहेत असे फेडरेशनचे मत आहे.
स्मार्ट मीटर्स बसविल्यास महावितरणच्या स्वतःच्या मालकीचे अडीच कोटी मीटर्स भंगार होतील. याचा आर्थिक फटका महावितरणला होऊन हा बोजा वीज दरवाढीत ग्राहकांना बसेल अशी भीती व्यक्त केली जात आहे.
आर्थिक बोजा,स्मार्ट मीटर योजना व सुधारित वितरण क्षेत्र योजनेंतर्गत ४० टक्के रक्कम महाराष्ट्रात महावितरणला कर्जरूपाने उभारावी लागणार आहे.त्यावरील व्याजाचा बोजा महावितरणला सोसावा लागणार आहे. १६ हजार कोटींची मुद्दल व त्यावरील व्याजाचा बोजा महावितरणच्या २०२४ साली होणाऱ्या खर्च खात्यात वर्ग झाल्याने ही रक्कम वीज दरवाढीच्या २०२४ च्या प्रस्तावात ग्राहकांच्या बिलामधून वीज दरवाढीद्वारे वसूल करण्यात येणार आहे.याशिवाय २० हजारांवर कर्मचारी या योजनेमुळे बेकार होणार आहेत. त्यामुळेच फेडरेशन याला विरोध करत आहे. परंतु वीज चोरी व वीज वितरणची वाढती थकबाकी रोखण्यासाठी स्मार्ट मीटर्स हा प्रभावी उपाय त्यांना असल्याचे कांही तज्ञांचे मत आहे.
असे असले तरीही महावितरण कडून राज्य पातळीवर स्मार्ट मीटर्स बसवण्याची जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे आता लवकरच घरोघरी प्रीपेड स्मार्ट मीटर दिसणार हे निश्चित.

जोरदार पावसानंतर विश्रांती पेरणीपूर्व कामे वेगावली

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
गेले आठ ते दहा दिवस आजरा तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावून सध्या विश्रांती घेतल्याने पेरणीपूर्व कामे वेगावली असून शेतकरी कुटुंबे शेतामध्ये दिसू लागली आहेत.
उन्हाळी सुट्ट्या संपत आल्याने मुंबई- पुण्यासह बाहेर गावाहून गावी आलेला चाकरमानी परतू लागला आहे. त्यामुळे जत्रा- यात्रा, विवाह सोहळे, विविध समारंभांचा हंगाम संपत आला असून बळीराजा शेती कामाकडे वळला आहे. यावर्षी मान्सून पूर्व पावसाने चांगली साथ दिल्याने खरीपाची सुरुवात तरी चांगली झाली असल्याने पेरणी पूर्व कामांना वेग आला आहे.
जमीन नांगरट, ढेकळे फोडणे, कुळवणे, जमीन सपाट करणे, सऱ्या / वाफे तयार करणे, पाण्यासाठी पाट काढणे इ. कामांमध्ये शेतकरी वर्ग व्यस्त दिसू लागला आहे.

पाणी प्रश्नी वडकशिवाले येथे आज हंडा मोर्चा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
वडकशिवाले येथील पाणी प्रश्नी ग्रामस्थ आक्रमक झाले असून आज सोमवारी ग्रामपंचायत कार्यालयावर हंडा मोर्चा काढण्यात येणार असल्याचे ग्रामस्थांनी स्पष्ट केले आहे.
याबाबत प्रशासनाला लेखी निवेदन देण्यात आले असून गावातील दलित वस्ती असलेल्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची बोअर आहे. सदर बोअरवेल गेले महिनाभर कोरडी पडली आहे. त्यामुळे दि ८ मे २०२४ रोजी ग्रामस्थांनी तहसिलदार आजरा यांना सदर समस्येवर तोडगा काढण्यासाठी विनंती अर्ज सादर केला होता. त्यानुसार उप अभियंता पाणी पुरवठा, पं. स. आजरा यांनी स्थळ पाहणी आणि पंचनामा करून त्याच बोअरच्या पासून ५० मीटर अंतरावर असलेली बोअर ताब्यात घेऊन त्यातून गावाला पाणी देण्याचा उपाय सुचवला आहे. त्यानुसार ग्रामपंचायतीने मागणी करणे आवश्यक आहे. तसे रीतसर पत्र मा. तहसिलदार आजरा यांनी सरपंच/ग्रामसेवक वडकशिवाले यांना दि. २१ मे २०२४ रोजी पाठवले आहे. परंतु समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन आजतागायत पत्र सादर न केल्याने समस्त ग्रामस्थाना याचा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच पर्यायी पाणी दूषित येत असल्याने अनेक ग्रामस्थ आजारी पडले आहेत. गावातील ज्येष्ठ नागरिकाना सुद्धा पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.
त्यामुळे ग्रामस्थानी सोमवारी दि.२७, मे रोजी सकाळी १० वा. ग्रामपंचायत कार्यालयावर हंडा मोर्चा काढण्यात येणार असल्याचेही नमूद केले आहे.
ग्रामस्थ पाणीपट्टी नियमित भरणारे नागरिक असल्याने पाणी ही प्राथमिक गरज आहे आणि ग्रामपंचायतीने राजकारण न करता व्यवस्था पुरवलीच पाहिजे म्हणून हे आंदोलन करीत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

मोटर पंप धारक शेतकरी आणि वाहनधारकांची आज बैठक

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुक्यातील मोटरपंप धारक शेतकरी, आणि वाहन धारकांची बैठक आज सोमवार दि २७ मे २०२४ रोजी सकाळी ठिक ११.३० वाजता श्री रवळनाथ मंदिराच्या माडीवर होणार आहे.
मिटरसक्ती आणि वाढीव पाणीपट्टीच्या विरोधात होणारे राज्यव्यापी आंदोलन ,आजरा शहरानजीक होणाऱ्या टोलनाक्याबाबत भूमिका ठरविणे या विषयावर चर्चा होणार असून सर्वानी वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहन कॉ. संपत देसाई व पंचायत समितीचे माजी सभापती अल्बर्ट डिसोजा यांनी केले आहे.


