
शक्तिपीठ ला विरोध…
अखिल भारतीय किसान सभा आक्रमक

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
शक्तीपीठ महामार्गाविरोधात आजऱ्यातील शेतकऱ्यांचे प्रांत अधिकारी यांना हरकती व निवेदन सादर करण्यात आले.
गोवा ते नागपूर शक्तीपीठ मार्ग हा आजरा तालुक्यातील सहा गावांमधून जाणे प्रस्तावित आहे. शेळप, पारपोली, सुळेरान, खेडगे, दाभिळलवाडी, आंबाडे ही गावे होत. या सर्व गावातील बाधित शेतकऱ्यांनी आज अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने गिरीश फोंडे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन व सामुदायिक हरकती प्रांताधिकारी बारवे यांना देऊन आपला विरोध दर्शवला.
यावेळी गिरीश फोंडे म्हणाले,” आजरा तालुक्यातील जमिनी या बागायत आहेत. या रस्त्याच्या क्षेत्रामध्ये अनेक डोंगर आहेत शिवाय हिरण्यकेशी नदी वाहते. या महामार्गामुळे पर्यावरण व शेती दोन्ही उध्वस्त होणार आहेत. हा प्रस्तावित रस्ता जंगलातून जात असल्याने प्राण्यांचा अधिवास नष्ट होऊन भविष्यात जंगली प्राणी हे गावच्या वस्तींमध्ये व शेतात येऊन मनुष्यहानी होणार आहे. हा रस्ता कोणीही शेतकरी व सामान्य नागरिकांनी मागणी न करता केवळ भांडवलदारांच्या हितासाठी सरकार शेतकऱ्यांच्यावर लादत आहे. सध्या गोवा नागपूर यासाठी महामार्ग अस्तित्वात असताना दुसरा कशासाठी? असा सवालही केला.
प्रांताधिकारी बारवे यांनी आमल्याकडे केवळ गॅझेट नोटिफिकेशन व हरकतींचे परिपत्रक आले आहे या व्यतिरिक्त कोणत्याही सूचना महाराष्ट्र शासनाकडून अजून देखील मिळालेल्या नाहीत.” शेतकऱ्यांच्या हरकती शासनापर्यंत आम्ही पोहोचवू असे आश्वासन त्यांनी दिले.
शक्तिपीठ महामार्गाचे गॅझेट नोटिफिकेशन अर्थात महामार्गाचा निर्णय तात्काळ रद्द करावा अन्यथा आजरा तहसीलवर मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला.
यावेळी किसान सभेचे गिरीश फोंडे, सुधाकर पाटील, प्रकाश शेटगे, गोविंद पाटील, बाळासाहेब पाटील, श्रावण वाझे, कविता नवार,तानाजी पाटील, प्रकाश कांबळे, नारायण गुंजार, प्रवीण नार्वेकर, निवृत्ती कांबळे,महादेव कांबळे, वसला नवार,अंजना कांबळे यासह शेतकरी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
शेळप, पारपोली, सुळेरान, दाभिलवाडी, खेडगे, लिंगवाडी, घाटकरवाडी या गावातील शेतकरी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
वन्यप्राण्यांचा धोका वाढेल
आजरा तालुका हा पश्चिम घाटातील इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये येतो. हा महामार्ग अनेक डोंगरातून पर्यावरण व शेती उध्वस्त करत जाणार आहे. यामुळे जैवविविधतेला धोक्यात येईल. प्राण्यांचा अधिवास नष्ट होऊन ते गाव वस्तीत, शेतात शिरतील.

वणवासत्र सुरूच…
मलिग्रे कोवाडे जंगलाला वणवा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
तालुक्यामध्ये एकीकडे वणवे रोखण्यासाठी मोहीम मोठ्या प्रमाणावर राबवली जात असताना दुसरीकडे वणवा लागण्याचे सत्र सुरूच आहे.मलिग्रे -कोवाडे जंगल परिसरात लागलेल्या वणव्यात वनसंपदेची प्रचंड हानी झाली. हजारो एकरावरील जंगल परिसर जळून गेला. वन्यप्राण्यांचा आदिवास नष्ट झाला आहे. आजरा तालुक्यात सतत लागत असलेल्या वणव्यांच्यामुळे वन्यप्राण्यांचा शेतीवाडीत वावर वाढला असून पिक नुकसनी सुरू आहे.
दोन दिवसापूर्वी या परिसरात वणवा लागला. आजही तो धुमसत आहे. वणवा लागण्याचे नेमके कारण समजलेले नाही. हात्तीवडेच्या परिसरातून तून वणवा पसरत आला. पेद्रेवाडी जंगल परिसरातून मलिग्रे, कोवाडे परिसरातील पळात, व चिरका परिसरात तो पसरत गेला. दाभेवाडी परिसरातही वणवा आहे. दुपारी लागलेला वणवा वाळलेला गवत व पालापाचोळा यामुळे भडकला. यामुळे जंगलातील दुर्मिळ औषधी वनस्पती, स्थानिक प्रजातीची नष्ट होत आहेत. सरीसृप प्राणी, गवे, वनगाई यासह दुर्मिळ किटक, पक्षी व अन्य जंगली प्राण्यांचा आदिवास जळून गेला आहे. वनविभागाने याबाबत तातडीने कारवाई करण्याची गरज असून वणवा प्रतिबंधक उपाय योजना कराव्यात अशी मागणी स्थानिक शेतकरी व नागरीक करीत आहेत.

मडिलगे येथे हरिनाम सप्ताह उत्साहात

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
मडिलगे ता. आजरा येथे हरिनाम अखंड सप्ताह ऊत्साहात संपन्न झाला. सप्ताहामधील जागराची किर्तन सेवा ह.भ.प. सुशांत सुरेश गुरव यांची झाली. हेची दान देगा देवा या जगद्गुरू श्रीतुकाराम महाराज अभंगावर निरुपन केले. वारकरी सांप्रदाय व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पेद्रेवाडीतील वक्तृत्व स्पर्धेत सरवडेची अनुष्का जाधव प्रथम

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
कै.केदारी रेडेकर यांच्या २६ व्या स्मृतिदिनानिमित्त पेद्रेवाडी हायस्कूलमध्ये झालेल्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत राधानगरी तालुक्यातील सरवडे येथील किसनराव मोरे हायस्कूलच्या अनुष्का जाधवने प्रथम क्रमांक पटकावला.
संस्था उपाध्यक्ष पांडूरंग ढवळे, व्यंकटराव महाविद्यालयाचे प्राचार्य सुभाष शेळकेंच्या उपस्थितीत स्पर्धा झाल्या.स्पर्धेत दियाराणी कोरवी (बॅरीस्टर नाथ पै.विद्यालय, गडहिंग्लज) हिने द्वितीय तर अनन्या मिश्रकोटी (साधना हायस्कूल, गडहिंग्लज) तृतीय क्रमांक पटकावला. अमृता कांबळे (माध्यमिक विद्यालय, आर्दाळ), ज्योती कडगावकर (एस. एस. हायस्कूल, नेसरी) यांना उत्तेजनार्थ क्रमांक देण्यात आला.
विजेत्यांचा संस्था अध्यक्षा व गोकुळ संचालिका अंजनाताई रेडेकरांसह मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरवले. कार्यक्रमाला विद्यार्थी, शिक्षक, पालक उपस्थित होते.

पेरणोली केंद्रशाळेत वणवा प्रतिबंधक जनजागृती

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
पेरणोली केंद्रशाळेत वणवा प्रतिबंधक जन जागृती कार्यक्रम संपन्न झाला. आजरा वनविभाग परिक्षेत्र वनाधिकारी स्मिता डाके यांनी मार्गदर्शन केले.
वनरशक आस्मिता घोरपडे यांनी मुलांना जंगलात वणेव लावू नये, पर्यावरण संरक्षण संवर्धन करणे, वन्यजीव संरक्षण याविषयी माहिती दिली. झाडे लावा झाडे जगवा, जंगल में फायर नहीं, फ्लॉवर्ड होने चाहिए आशा स्लोगन देत विद्यार्थींनी प्रभात फेरी गावातून काढली.
याप्रसंगी वनपाल बाळेश न्हावी, वनरक्षक तानाजी लटके, दयानंद शिंदे, वनमजूर मारुती शिंदे, प्रविण कांबळे,दत्तात्रय जाधव शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. मुख्याध्यापक सुभाष विभूते यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.शिवाजी कुदळे यांनी आभार मानले.



