
काजू नवा… दर जुना
आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा बाजारपेठेत नवीन काजू बियांची आवक सुरू झाली असून काजू बिया नवीन हंगामातील असल्या तरीही बियांचा दर जुनाच असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे यावर्षीही दराचा काजू उत्पादकांना फटका बसणार असे दिसत आहे.
सध्या नव्या काजूला ९०/- रुपये प्रति किलो इतका दर मिळत आहे. गेली दोन वर्षे हा दर कायम आहे. काजू बियांना हमीभाव मिळावा यासाठी जोरदार उठाव होत असताना दरात मात्र कोणताही बदल दिसत नाही. बाहेरच्या देशातून आयात होणाऱ्या बियांना स्थानिक काजू प्रक्रिया उद्योजक प्राधान्य देत असल्याने स्थानिक काजूची मागणी कमी होत चालली आहे.
एकंदर परिस्थिती पाहता काजू बिया नव्या मात्र दर जुनाच अशी स्थिती आहे.
आंदोलन स्थगीत…
अखेर अधिका-यांनी दिला दाखला

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
हरपवडे येथील २६ जानेवारी रोजी ग्रामसभा झाल्याबाबतचा दाखला पंचायत समिती प्रशासनाने न दिल्यास सोमवार दि १८ रोजी बोंब मारो आंदोलनाचा इशारा सरपंच,उपसरपंच व सदस्यांनी गटविकास अधिकारी संजय ढमाळ यांना निवेदनातून दिला होता. याबाबत मृत्युंजय महान्यूज ने १५ रोजी वृत्त प्रसिद्ध केले होते.या वृत्ताची दखल घेऊन गटविकास अधिका-यांनी ग्रामसभा झाल्याचा दाखला ताबडतोब दिला.
२६ जानेवारी २०२४रोजी रीतसर ग्रामसभा झालेली होती. या सभेचा सर्व वृत्तांत ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक यांनी पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी व विस्तार अधिकारी यांचेकडे ग्रामसभेचे प्रोसिडिंग, सह्यांचे प्रोसिडिंग व नोटीस प्रसिद्ध केलेली व दवंडी रजिस्टर इ. सर्व कागदपत्रे सादर केलेली होती.तरीही पंचायत समिती प्रशासन दाखला देण्यास टाळाटाळ करत होते.
त्यामुळे सोमवार दि १८ रोजी ‘ बोंब मारो ‘ आंदोलन करण्याचा इशारा सरपंच सागर पाटील,उपसरपंच शिवाजी कांबळे,माजी सरपंच व सदस्य गोविंद गुरव,आनंदा कदम,संगिता जाधव,नंदा गुरव,रेश्मा मुल्लाणी आदींनी इशारा दिला होता.याबाबत वृत्त प्रसिद्ध होताच दाखला देण्यात आला.
वाटंगी येथे विविध विकासकामांचा शुभारंभ

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
वाटंगी, ता. आजरा येथे आचारसंहितेच्या अनुषंगाने विविध तांडावस्ती सुधार योजना, रोहयो योजनेतून अंतर्गत रस्ते डांबरीकरण, काँक्रीटीकरण कामाचा तसेच ग्रामपंचायतीच्या माध्यमातून १५ वा वित्त आयोग व खच्छता अभियान बक्षीस रकमेतून स्मशानभूमी संरक्षक कठडा (शुशोभिकरण) नदी, गटर्स, मोरेवाडी शाळा दुरुस्ती, पंचायत युवा क्रिडा अंतर्गत व्यायामशाळा, ओपन जिम, वॉटर एटीएम अशा अनेक कामांचा शुभारंभ सरपंच संजय पोवार यांचे हस्ते करण्यात आला.
यावेळी माजी सरपंच शिवाजी नांदवडेकर, रोमन करवालो, मधुकर जाधव,स्वाती गुरव (उपसरपंच), मिनाक्षी देसाई, इंदू कुंभार, मंगल वांद्रे , सुनीता सोनार, ग्रामसेवक रणजीत पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
उत्तूर मध्ये एक कोटीच्या विकास कामांचा शुभारंभ

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून उत्तुर येथे एक कोटीच्या विकास कामाचा शुभारंभ लोकनियुक्त सरपंच किरण आमणगी यांच्या हस्ते करण्यात आला. यामध्ये धामणे रोड पठार पानंद, विठ्ठल रुक्मिणी मंदिर नजीकची पानंद, बीएसएनएल ऑफिसच्या पाठीमागील पानंद या पानंदींचा विस्तार करून त्यांचे मुरमीकरण करणे.तसेच खाजगी लाभार्थींच्या सात सिंचन विहिरी,जनावारांचे गोठे अशा विविध कामांचा शुभारंभ यावेळी करण्यात आला.
यावेळी उपसरपंच समीक्षा देसाई, ग्रामपंचायत सदस्य महेश करंबळी, संजय उत्तुरकर,राजेंद्र खोराटे, सुवर्णा नाईक, सुनिता केसरकर, आशा पाटील, अनिता घोडके, ग्राम रोजगार सेवक दादू सावंत, उषा चव्हाण, बाळू खांडेकर, अशोक इंगळे, शिवाजी राजाराम, लक्ष्मण कुंभार, प्रशांत पोटे,कृष्णा भाईगडे,विजय पाकले, गोपाळ बर्डे, दत्तात्रय चव्हाण, दत्तात्रय हावळ, बाजीराव कुंभार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
संशोधक नितिन सावंत यांचा सत्कार

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
पेरणोली ता आजरा येथील हायस्कूलचा माजी विद्यार्थी व संशोधक नितिन सावंत यांनी जपान येथे मेंदूवरील संशोधनात भरीव योगदान दिल्याबद्दल पेरणोली हायस्कूलच्यावतीने सत्कार करण्यात आला.अध्यक्षस्थनी सेवानिवृत्त शिक्षक इनास फर्नांडीस होते.
यावेळी सावंत यांचा फर्नांडीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले.यावेळी सावंत म्हणाले,अतिशय खडतर परिस्थितीतून जावे लागले.कारकिर्दीची सुरवात वाचमनपासून केली.परंतु जिद्द,चिकाटी व आत्मविश्वासाच्या जोरावर संशोधन क्षेत्रात काम करता आले.
यावेळी फर्नांडीस,वंदन जाधव,कृष्णा सावंत यांनी मनोगत व्यक्त केले.दरम्यान येथील एकता समूहाचे प्रमूख संतोष जाधव यांच्यावतीनेही सत्कार करण्यात आला.संदीप फगरे यांनी सूत्रसंचालन केले.जितेंद्र निर्मळे यांनी स्वागत केले. मुख्याध्यापक आनंद व्हसकोटी यांनी आभार मानले.
छायावृत्त…

एकीकडे रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे वाहनधारकांना कसरत करावी लागत असताना आजरा पेट्रोल पंपापासून गांधीनगरच्या दिशेने जाणाऱ्या वळणावर रस्त्याशेजारी पंधरा दिवसापूर्वी खोदलेला भला मोठा खड्डा अद्याप तसाच असल्याने छोटे-मोठे अपघात होत आहेत.



