
अजित पवार गटाच्या कार्यकारिणीने शरद पवार गटाला अडचणी…

आजरा:प्रतिनिधी
राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर आजरा तालुक्याच्या राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांमध्ये फारसे मतभेद न होता व वरिष्ठ पातळीवरील फुटीची दखल न घेता सर्व कार्यकर्ते एकत्रितपणे काम करत होते. पण नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची यादी जाहीर केल्याने आता मात्र अजित पवार गटाला आपला सवतासुभा मांडावा लागणार असल्याने राष्ट्रवादीच्या एकसंघतेला तडा जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते एकाच बॅनरखाली काम करत होते.जिल्हा बँक, तालुका खरेदी विक्री संघ यासह आजरा साखर कारखाना निवडणुक लढवताना ‘राष्ट्रवादी’ या एकाच लेबलखाली सर्वजण कार्यरत होते. एकसंघपणे निवडणुकीला सामोरे गेल्याने या निवडणुकांमध्ये घसघशीत यश पदरात पाडून घेण्यात राष्ट्रवादी यशस्वी झाली. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाची तालुका अध्यक्ष पद मुकुंददादा देसाई यांच्याकडे आहे गेली कित्येक वर्षे ते पद समर्थपणे सांभाळत आहेत असे असताना नुकतेच पवार गटाकडून जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई यांच्यावर तालुका अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाची मंडळी ज्येष्ठ नेते शरद पवार, मंत्री मुश्रीफ यांच्यासह माजी आमदार के .पी.पाटील, आमदार राजेश पाटील यांचे नेतृत्व मानणारी आहेत. आतापर्यंत राष्ट्रवादीची अजित पवार यांच्या गटाची कार्यकारणी जाहीर न झाल्याने सर्व काही अलबेल होते. मात्र येथून पुढे या दोन्ही गटांची स्वतंत्र भूमिका राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. महायुतीत अजित पवार गट सक्रिय आहे तर महाविकास आघाडीचे प्रमुख नेते म्हणून शरद पवार यांची ओळख आहे.
समोर पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकांसह स्थानिक नगरपंचायत निवडणुकीचे नगारे वाजत असताना अप्रत्यक्षरीत्या वरिष्ठ नेत्यांच्या भूमिकेमुळे राष्ट्रवादीत फूट पडल्याने याचा फार मोठा फटका या निवडणुकांमध्ये बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कार्यकर्ते अडचणीत….
गट, तट न मानता आजपर्यंत राष्ट्रवादीमध्ये सर्वसामान्य कार्यकर्ते सक्रिय होते. यापुढे मात्र कार्यकर्त्यांची चांगलीच अडचण होणार आहे. कार्यकर्त्यांनाही आता आपला गट निश्चित करावा लागणार आहे. कार्यकर्त्यांची पळवा पळवी होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
दोन पवार… दोन देसाई…दोन आघाडया
राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी अनपेक्षित रित्या जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई यांच्यावर आली आहे.तर गेल्या पंधरा वर्षापासून मूळ राष्ट्रवादी चे तालुका अध्यक्षपद मुकुंददादा देसाई यांच्याकडे आहे. राज्यात असणाऱ्या दोन पवारांच्या राष्ट्रवादीचे नेतृत्व तालुक्यात दोन देसाई सांभाळत आहेत. राज्य पातळीवर दोन वेगवेगळ्या आघाड्यांतून हे दोन गट सक्रीय आहेत. त्यामुळे वरिष्ठ पातळीवर स्थानिक राजकारणाबाबत सुलट निर्णय झाल्यास गोची होण्याची शक्यता आहे.
वाटंगी येथे स्वच्छ जल स्वच्छ मन अभियान
आजरा : प्रतिनिधी
वाटंगी ता आजरा येथे स्वच्छ जल स्वच्छ मन अभियान राबविण्यात आले.या उपक्रमाला नागरिकांनी प्रतिसाद दिला.निरंकारी मिशनच्या माध्यमातून अमृत प्रकल्प अंतर्गत हे अभियान राबविण्यात येत आहे.
अभियानाचे उद्घाटन सरपंच संजय पोवार यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी संपूर्ण गावभर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.तसेच शाळा ओढा दवाखाना व गावातील गल्ली सफाई केली .यावेळी आजरा कारखाना संचालक शिवाजी नांदवडेकर, अभियान प्रमूख भिकाजी पाटील ,सेवा दल संचालक संजय शेंणवी, संजय यादव सर्व सेवा दल व ग्रामस्थ उपस्थित होते.
मराठीची समृद्ध परंपरा वाढवण्याची जबाबदारी तरुणांची – सुभाष विभुते

आजरा: प्रतिनिधी
मराठी भाषेला फार समृद्ध आणि प्राचीन परंपरा आहे. ज्ञानेश्वरांनी तिला अमृताची उपमा दिली आहे. मराठ्यांच्या उज्ज्वल पराक्रमांनी तिला बळकट केले आहे. ती टिकवण्याची आणि वाढवण्याची जबाबदारी ही आजच्या तरुणांवर आहे. असे प्रतिपादन ऋग्वेद नियतकालिकाचे संपादक व बालसाहित्यिक सुभाष विभुते यांनी केले. आजरा महाविद्यालयातील मराठी विभाग आणि ज्ञान स्रोत मंडळ यांच्या वतीने मराठी राजभाषा दिनानिमित्त ग्रंथ प्रदर्शन आणि व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी व्याख्यानप्रसंगी श्री. विभूते बोलत होते.
यावेळी श्री. विभूते पुढे म्हणाले की, मराठी भाषा आणि संस्कृतीच्या विरोधात बोलणाऱ्यांचे तख्त मराठी भाषा मोडते. छत्रपती शिवाजी महाराज यांनी तिला स्वाभिमान दिला आहे. त्यामुळे केवळ प्रतिष्ठेसाठी आपल्या मातृभाषेत बोलण्याची लाज कुणी बाळगू नये. केवळ थोरांच्या प्रतिमा पूजनाने मराठीचे भले होणार नाही तर त्यांचे विचार आचरणात आणणे महत्वाचे आहे. ग्रंथप्रदर्शनाच्या उद्घाटनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी उपप्राचार्य दिलीप संकपाळ यांनी मनोगत व्यक्त केले. प्राचार्य डॉ. अशोक सादळे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. मराठी विभाग प्रमुख आनंद बल्लाळ यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.
यावेळी प्रा. विनायक चव्हाण, ग्रंथपाल रवींद्र आजगेकर, डॉ. आप्पासाहेब बुडके, प्रा. रमेश चव्हाण, प्रा. सलमा मणेर, प्रा. अलका मुगुर्डेकर यांच्यासह महाविद्यालयातील शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती वैशाली देसाई यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. बाळासाहेब कांबळे यांनी केले तर आभार श्रीमती सुषमा पारकर यांनी मानले.
भादवण हायस्कूल मध्ये मराठी राजभाषा दिन साजरा.

भादवण: प्रतिनिधी
कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त भादवण हायस्कूल भादवण मध्ये मराठी राजभाषा दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी भित्तिपत्रके तसेच समूहगीत सादर केले. गौरी कोलतेने मराठी राजभाषा दिनाचे महत्त्व सांगणारे भाषण सादर केले. होरटे यांनी कणा कविता सादर केली सौ. कांबळे यांनी मराठी साहित्य व विविध लेखक कवींचा परिचय करून दिला दयानंद पाटील यांनी शुभेच्छा दिल्या.
मुख्याध्यापक एस. एम. पाटील यांनी आभार व्यक्त केले.यावेळी सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक उपस्थित होते.
कै. केदारी रेडेकर हायस्कूलमध्ये जिल्हास्तरीय शालेय वक्तृत्व स्पर्धा

आजरा: प्रतिनिधी
कै. केदारी बाळकृष्ण रेडेकर यांच्या २६ व्या स्मृतीदिनाचे औचित्य साधून कै. केदारी रेडेकर हायस्कूल पेद्रेवाडी येथे भव्य जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
शनिवार दिनांक ९ मार्च २०२४ रोजी
सकाळी १० वाजता कै.केदारी रेडेकर हायस्कूल, पेद्रेवाडी ता.आजरा येथे या स्पर्धा होणार आहेत.
स्पर्धा गट – ५ वी ते ९ वी
विषय :-
१.रामायणावर बोलू काही
२.व्यसन सोशल मिडीयाचे ,चित्र पालटले समाजाचे
३.आई खरच काय असते?
४.युद्ध नको ,शांती हवी
५.अवकाश संशोधन क्षेत्रात भारताचे स्थान.
पारितोषिके –
प्रथम क्रमांक – २००१/+ रू. व सन्मान चिन्ह
द्वितीय क्रमांक -१५०१/- रू. व सन्मानचिन्ह
तृतीय क्रमांक – २००१/- रू. व सन्मानचिन्ह
चतुर्थ क्रमांक-७०१/-रू व सन्मानचिन्ह
पाचवा क्रमांक -५०१/-रू व सन्मानचिन्ह
स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी व्ही. बी. देऊसकर-९७६७४२८८५५ यु.के.जाधव-९९२१११०१५५
आर.एस्.पाटील-७४९९७८१०२० यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन एस.एम्.चव्हाण
मुख्याध्यापक,केदारी रेडेकर हायस्कूल पेद्रेवाडी यांनी केले आहे.
व्यंकटराव प्रशालेत ‘एस.एस.सी. परीक्षार्थींचा शुभेच्छा समारंभ’ संपन्न

आजरा: प्रतिनिधी
येथील व्यंकटराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज,आजरा या प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ संपन्न झाला.
या कार्यक्रमाला आजरा महाल शिक्षण मंडळ आजाराचे चेअरमन श्री.जयवंतरावजी शिंपी य उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने झाली.संस्थेचे अध्यक्ष जयवंतराव शिंपी यांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन झाले.
याप्रसंगी संस्थेचे सचिव एस.पी.कांबळे माजी प्राचार्य व संचालक सुनील देसाई, संचालक पांडुरंग जाधव संचालकसचिन शिंपी प्रशालेचे प्राचार्य श्री.आर.जी.कुंभार, पर्यवेक्षिका सौ. व्ही.जे.शेलार, शिक्षक-शिक्षिका, विद्यार्थी व कर्मचारी उपस्थित होते.
प्रास्ताविक प्रशालेचे प्राचार्य आर.जी.कुंभार यांनी केले. एस.एस.सी.परीक्षा मार्च २०२५ ला सामो-या जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वर्षभरात गुणवत्ता वाढीसाठी केलेले विविध उपक्रम उपस्थितांसमोर मांडले. त्याचबरोबर प्रशालेच्या उज्ज्वल यशाची परंपरा इयत्ता दहावीचे विद्यार्थी कायम राखतील असा आशावाद व्यक्त केला. तसेच परीक्षार्थींनी तणावमुक्तपणे परीक्षेला सामोरे जावे. अशा शुभेच्छाही दिल्या. अध्यक्षीय भाषणात जयवंतराव शिंपी यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच व्यंकटराव प्रशाला ही गुणवंतांची खाण आहे. तुम्ही देखील हिऱ्याप्रमाणे भविष्यात चमकून शाळेचे नाव रोशन कराल,अशी खात्री दिली. इयत्ता दहावी बोर्ड परीक्षा ही एक आव्हान नसून विविध करिअरचे मार्ग दाखवणारी एक संधी आहे.असा मौलिक उपदेशही त्यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून परीक्षार्थींना दिला.
संचालक सुनील देसाई यांनी बोर्ड परीक्षेला सामोरे जाताना विद्यार्थ्यांनी घ्यावयाची काळजी याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शिक्षक मनोगतातून सौ. एस.डी.इलगे व सौ.ए.डी.पाटील यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्ही. एच. गवारी यांनी केले तर आभार एस.वाय.भोये यांनी मानले.
पं.दीनदयाळ विद्यालयाचे यश

आजरा: प्रतिनिधी
ग्रंथालय प्रतिभागण मुंबई आयोजित विज्ञान धारा विज्ञान एकांकिका स्पर्धा २०२४या स्पर्धेत पंडित दीनदयाळ विद्यालयाने पर ग्रहावरचा पाहुणा ही विज्ञान एकांकिका सादर केलेली होती या एकांकिकेला प्रथम क्रमांक मिळाला असून मुंबई येथे होणाऱ्या अंतिम फेरीसाठी एकांकिकेची निवड झाली आहे.
छाया वृत्त…

आजरा शहरातील गांधीनगर येथील कचरा डेपोला रात्री उशिरा अज्ञातांकडून आग लावण्यात आल्याने सर्वत्र दुर्गंधीयुक्त वास व धुराचे साम्राज्य पसरले आहे.
निवेदन….
सर्वर डाऊन च्या समस्येमुळे काल मंगळवार दिनांक २७ रोजी ‘ सातच्या बातम्या ‘ हे सदर वाचकांपर्यंत पोहोचू शकले नाही. अद्यापही या समस्येचे पूर्णपणे निवारण झालेले नाही. कृपया वाचकांनी याची नोंद घ्यावी.
मुख्य संपादक…

