mrityunjaymahanews
अन्य

आजरा तलाठ्याच्या प्रतापांची तक्रार थेट आयुक्तांकडे…


आजरा तलाठ्याच्या प्रतापाचा चेंडू आयुक्तांच्या कोर्टात

बेकायदेशीर बिगर शेती प्रकरणे

 

                    आजरा:प्रतिनिधी

       आजरा येथील गेले सहा महिने गाजत असलेल्या बोगस बिगर शेती प्रकरणांच्या चौकशीचा चेंडू आता थेट पुणे आयुक्तांच्या कोर्टात गेला असून जिल्हाधिकारी व गडहिंग्लजचे उपविभागीय अधिकारी याबाबत काय निर्णय घेणार याकडे तालुकावासीयांचे लक्ष लागून आहे. मुक्ती संघर्ष समिती पुन्हा एक वेळ याप्रकरणी आक्रमक झाली असून तातडीने या प्रकरणाची शहानिशा व्हावी अशी मागणी त्यांनी पुणे आयुक्तांकडे करत या प्रकरणी आंदोलनाचा इशारा दिला आहे. मुक्ती संघर्ष समितीच्या या भूमिकेमुळे बेकायदेशीर रित्या झालेले फेरफार व आदेश रद्द होणार का ? असा सवाल आता उपस्थित होत आहे.

       आजरा येथील विद्यमान तलाठी शिवराज देसाई यांची आजरा येथे नेमणूक झाल्यापासून यांनी मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीररित्या डायरी उतारे घालणे, पोटहिस्से करणे, फेरफार घालणे, कलम ८५ नुसार नोंदी करण्याबरोबरच बोगस बिगर शेती प्रकरणांमध्ये त्यांचा सहभाग असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यांच्या कार्यक्षेत्रात बेकायदेशीररित्या उत्खनन सुरू आहे या सर्वांची सखोल बिनचूक अशा अनेक गोष्टींची चौकशी व्हावी. तलाठी यांच्या कालावधीतील सर्व दप्तर तपासणी झाली पाहिजे.
आजरा तालुक्यातील सर्व बिगरशेती ( NA) प्रकरणांच्या बाबतीत ज्या ज्या तलाठी व सर्कल यांनी फेरफार केलेले आहेत व बिगर शेती प्रकरणात हस्तक्षेप ব सहभाग आहे. या सर्वाची ही चौकशी झाली पाहिजे. याबाबतीत गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन, चौकशी समिती नेमून याची सखोल चौकशी झाली पाहिजे. लक्ष दिले नाही. तर मुक्ती संघर्ष समिती या संघटनेच्या वतीने आजरा तहसीलदार कार्यालय आजरा येथे जन आंदोलन करणार असल्याचा इशाराही मुक्ती संघर्ष समितीने दिला आहे

      लॅडमामाफीयांना हाताशी धरून नगररचना विभागासह विविध शासकीय विभागांच्या आदेशांना कचऱ्याची पेटी दाखवत आजरा तालुक्यात महसूल विभागाच्या तत्कालीन स्थानिक कर्मचारी व अधिकाऱ्यांनी बिगर शेती प्रकरणांचा घाललेला गोंधळ अद‌याप सुरुच असून याप्रकरणी नेमण्यात आलेली चौकशी समिती नेमकी काय करत आहे व यातून काय निष्पन्न झाले…? या सर्व प्रकाराला वरदहस्त कोणाचा? याचा समिती अहवाल काय…? या सर्व बाबी अदयाप उघड झाल्या नसल्याने याचा सर्वसामान्यांना त्रास होत असून नगररचना विभागाच्या आदेशाशिवाय, खरेदी विक्री व्यवहार बंद झाले असल्याने मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत.

गेले सहा महिने सुरू असलेल्या मुक्ती संघर्ष समितीच्या बोगस बिगर शेती प्रकरणी आंदोलनामुळे बिगर शेती प्रकरणातील महसूल विभागाची लक्तरे वेशीवर आली आहेत. ग्रीन झोन मधील जमिनीचे बिगर शेती आदेश काढणे, ओपन स्पेस न सोडणे, नाला शेड बॅक न सोडणे, रस्ता शेड बॅक न सोडणे, ग्रामपंचायतींचे ना हरकत दाखले नसणे, बंध पत्र नसणे, मूळ रेखांकन बदलून बिगर शेतीचे आदेश करणे, संशयास्पद पद्धतीने गट नंबर मधील फेरफार घालणे, सातबारा नोंदी, सर्वच संशयाच्या भोव-यात असून गेल्या काही वर्षात झालेल्या बिगर शेती आदेश प्रकरणांची दफ्तर तपासणी होण्याची मागणी वारंवार केलेली आहे. मुक्ती संघर्ष समितीने हा प्रश्न उचलून धरला आहे. पण अद‌यापही या प्रकरणांचा चौकशी अहवाल बाहेर न आल्याने याला नेमका वरदहस्त कोणाचा? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

मुक्ती संघर्षची भूमिका...

      आजरा तालुक्यातील सर्व बिगरशेती जमिनीच्या बिगर शेती आदेशानुसार सर्व गट नंबर मधील फेरफार  घातले आहेत. बोगस व चुकीच्या पद्धतीने बिगर शेती प्रकरणांचे आदेश करून नागरिकांना अडचणीत आणण्याचा जबाबदार असणारे कांही कर्मचारी याबाबतीत संबंधित तलाठी व मंडळ अधिकारी आणि ( NA) संदर्भातील आदेश (ऑर्डर) कशा झालेल्या आहेत. याबाबतीत तत्कालीन सर्व तहसिलदार या सर्वाची सखोल चौकशी झाली पाहिजे.

       संबंधित शिवराज देसाई तलाठी आणि इतर सर्व संबंधितांची सखोल चौकशी करुन दोषींवर कायदेशीर कारवाई करून फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा.

आजरा येथील विद्यमान तलाठी शिवराज देसाई यांच्या कालावधीतील सर्व दप्तर तपासणी झाली पाहिजे. तसेच खालील मागण्यांची चौकशी समिती नेमून चौकशी झाली पाहिजेत तसेच आजरा तालुक्यातील सर्व बिगरशेती NA प्रकरणांच्या बाबतीत ज्या ज्या तलाठी व सर्कल यांनी फेरफार केलेले आहेत व बिगर शेती प्रकरणात हस्तक्षेप व सहभाग आहे. या सर्वाची ही चौकशी झाली पाहिजे व असे प्रकार करणा-या व जबाबदार असणा-या अधिका-यांची व त्यांच्या आर्थिक व्यवहारांची कसून चौकशी होण्याची गरज आहे.

      याबाबत मुक्ती संघर्ष समितीने चौकशीची मागणी करून, वेळोवेळी स्मरणपत्र देऊनही संबंधितांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने आजरा तालुक्यातील बिगर शेती प्रकरणांच्या प्रत्येक आदेशानुसार त्यासाठी जोडलेल्या कागदपत्रांची कसून चौकशीसाठी ताबडतोब कार्यवाही व कारवाई झाली पाहिजे.

      हतबल प्लॉटधारकांकडून लाखो रुपये कमवण्याच्या नादात बोगस व चुकीच्या पद्धतीने बिगर शेती प्रकरणांचे आदेश करून नागरिकांना अडचणीत आणणा-या तलाठ्यासह सर्व संबंधितांवर व जबाबदार असणा-यांवर काही फरक पडलेला नाही. यामध्ये सर्वसामान्य मात्र भरडला जात आहे.

सेक्शन ८५ कलमाचा गैरवापर…

       महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम-१९६६ चे कलम ८५ नुसार कलमाचा महसूल विभागातील कर्मचा-याने गैरवापर करून काही जमिनींची विल्हेवाट लावली आहे. याची सखोल चौकशी झाली पाहिजे.

       वरील सर्व मु‌द्द्यांच्या बाबतीत आपण तातडीने प्रक्रिया सुरू करावी. आयुक्तांनी याबाबतीत गांभीर्याने लक्ष दिले नाही. तर आजरा तहसीलदार कार्यालय आजरा येथे
जन आंदोलन उभे करणार असल्याचा इशाराही संघटनेने दिला असून याबाबतची लेखी पत्रे पुणे आयुक्तांसह जिल्हाधिकारी उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांना देण्यात आली आहेत.

      या पत्रावर संघटनेचे राज्याध्यक्ष संग्राम सावंत अबुसईद माणगावकर, समीर खेडेकर, विनोद ओतारी, बाळू कांबळे, मोहन गावडा, सुरेश खोत, प्रमोद पाटील, आकाश कुकडे, दिगंबर विटेकरी, संघर्ष प्रज्ञावंत आदींच्या सह्या आहेत.


मृत्यू दोन…

प्रश्न अनेक


                 ज्योतिप्रसाद सावंत

           आजरा तालुक्यातील देवर्डे येथील उच्चशिक्षित श्रावण शिवाजी बुरुड व साळगाव येथील ओंकार संभाजी कांबळे या दोन समवयस्क तरुणांचा एकाच दिवशी अनुक्रमे आत्महत्या केल्याने व दुचाकी अपघातात मृत्यू झाला. सर्वसामान्य कुटुंबातील २२ वर्षीय तरुणांच्या मृत्यूने विविध प्रश्न उपस्थित होत आहेत हे नक्की.

         श्रावण बुरुड या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. वनविभागाच्या भरती प्रक्रियेमध्ये आघाडीवर असणाऱ्या श्रावण याच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये श्रावण याचे शिक्षण झाले. कुटुंबीयांकडूनही मोठ्या अपेक्षा असताना श्रावण याने आपला जीवन प्रवास संपवला. अलीकडे तरुणांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. विभक्त कुटुंब पद्धती, एकाकीपणा, सोशल मीडियाचा वाढता वापर, बेरोजगारीमुळे येणारे नैराश्य, नोकरीसाठी सुरू असणारी प्रचंड स्पर्धा, कौटुंबिक अडचणी, वेळेत स्थिरस्थावर होता न येणे, आर्थिक अडचणी यासारखे विविध प्रश्न तरुणांसमोर उभे ठाकत आहेत. शिक्षण व पात्रता असूनही करावा लागणार संघर्ष निश्चितच आत्महत्येसारख्या घटनांना कारणीभूत ठरत आहे हे यामुळे अधोरेखित होत आहे. व्यक्तीनिहाय कारणे वेगवेगळी असली तरी याचे गांभीर्य मात्र दिवसेंदिवस वाढू लागले आहे.

        एकाच दिवशी एकीकडे श्रावण याच्या आत्महत्येची घटना घडली असताना दुसरीकडे ओंकार या तरुणाचे दुचाकी अपघातात निधन झाले. तरुणाई आणि दुचाकी अपघात हे समीकरण अलीकडे वाढत चालले आहे. दुचाकी अपघातात मृत्यूला सामोरे जावे लागणाऱ्यांमध्ये तरुणांचे असणारे प्रमाण हे निश्चितच चिंताजनक आहे. वाहन चालवण्याचे साधे साधे नियम अंमलात न आणल्याने तरुणाईला जीव गमवावा लागत आहे. आत्महत्या असो वा अपघात असो पालकांची चिंता व जबाबदारी यामुळे निश्चितच वाढत चालली आहे.

      पाल्यांना समुपदेशनाची गरज निर्माण होत असून यामध्ये शैक्षणिक संस्था, पोलीस प्रशासन, सामाजिक संस्था यांनी पुढाकार घेतल्यास याचे निश्चितच सकारात्मक परिणाम भविष्यात दिसू लागतील.


भारत आणि इंडियातील दरी संपवावी लागेल :
डॅा. रघुनाथ माशेलकर,

सु. रा. देशपांडे स्मृती पुरस्कार प्रदान सोहळा


                   आजरा : प्रतिनिधी

         एकाच भारतामध्ये एकीकडे भारत आणि इंडिया वसलेले असून त्यातील दरी संपवण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करावे लागतील असे प्रतिपादन ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॅा. रघुनाथ माशेलकर यांनी केले.

        ज्येष्ठ शिक्षक, शिवभक्त, पत्रकार सु. रा. देशपांडे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ देण्यात येणारा पुरस्कार डॅा. माशेलकर यांना सोमवारी राम गणेश गडकरी सभागृहात प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेक्ष क्षीरसागर आणि माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते शाल, मानपत्र आणि धनादेश देवून त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार जयश्री जाधव, न्यू एज्युकेशन सोसायटीचे सल्लागार विनोदकुमार लोहिया उपस्थित होते.

        सध्यस्थितीचा आढावा घेताना डॅा. माशेलकर म्हणाले, भारतामधील तिसऱ्या स्तरातील शहरांमध्ये राहणारे निम्मे लोक अजून गरीब आहेत. १०० पैकी २४ महानगरेच विकसित झाली असून देशातील प्रत्येक सहा व्यक्तींमागे एकजण झोपडपट्टीत रहात आहे. सहापैकी एकजण अजूनही निरक्षर आहे. या सर्वांना उन्नतीच्या मार्गावर आणण्याची गरज आहे. त्यामुळे एकीकडे अमृतकाळ साजरा करत असताना इंडिया आणि भारत यातील भेद संपवण्यासाठी पुढाकार घ्यावा लागेल. तसेच विश्वगुरू होण्याआधी आपल्याला विश्वमित्र व्हावे लागेल. सु. रा. देशपांडे यांनी एक शिक्षक, पत्रकार, शिवभक्त, संघटक म्हणून केलेले वैविध्यपूर्ण काम प्रेरणादायी आहे.

        राजेश क्षीरसागर म्हणाले, देशपांडे यांच्या स्मृती जागवण्यासाठी देशपांडे परिवाराने आयोजित केलेला हा उपक्रम प्रेरणदायी आहे. सतेज पाटील म्हणाले, सु. रा. देशपांडे यांनी जीवनात एक विचार डोळ्यासमोर वाटचाल केली. ग्रामीण भागातील प्रश्नांची जाण असलेल्या देशपांडे यांनी त्या सोडवण्यासाठी त्यांच्यापरीने प्रयत्नांची पराकाष्ठा केली. डॅा. माशेलकर यांचा गौरव करण्याचे भाग्य आम्हांला मिळाले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार वासुदेव कुलकर्णी, उदय कुलकर्णी, ज्येष्ठ इतिहास लेखक डॅा. रमेश जाधव, हिल रायडर्सचे संस्थापक प्रमोद पाटील, चिल्लर पार्टीचे मिलिंद यादव यांचा डॅा. माशेलकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. समीर देशपांडे यांनी प्रास्ताविक केले. डॅा. सागर देशपांडे यांनी माशेलकर यांचा परिचय करून दिला. संदीप मगदूम यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी विविध मान्यवरांसह आजरा, गडहिंग्लज, निपाणी, सावंतवाडी, चिपळूण, पुणे येथील अनेकजण उपस्थित होते.

असा असावा नवा भारत

स्त्रीपुरूषांना समान संधी देणारा, जातीपातीच्या पलिकडचा, सांस्कृतिकतेचा अभिमान असणारा परंतू इतर संस्कृती आणि धर्म यांचा आदर करणारा, योग्य शिक्षण, श्रीमंत गरीबातील दरी कमी करणारा आणि आनंदी असणारा समाज आपल्याला निर्माण करायचा आहे असे डॅा. माशेलकर म्हणाले.


‘श्रमुद’ चे आंदोलन स्थगित

                    आजरा : प्रतिनिधी

         २० फेब्रुवारीला जिल्हाधिकारी यांच्यासोबत बैठकीचे लेखी पत्र मिळाल्याने आज श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाखाली सर्फनाला धरणाचे काम बंद करण्याचे आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

         सर्फनाला प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसनाचे रखडलेले प्रश्न तातडीने सोडवण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत तातडीने बैठक न झाल्यास आज मोर्चाने येऊन धरणाचे काम बंद करण्याचा इशारा श्रमिक मुक्ती दल प्रणित सर्फनाला धरणग्रस्त संघटनेने दिला होता. या पार्श्वभूमीवर आज धरणस्थळावर कॉ संपत देसाई यांच्या नेतृत्वाखाली धरणग्रस्त स्त्री पुरुष मोठ्या संख्येने जमले होते. सकाळी अकरा वाजता धरणग्रस्त स्त्री पुरुष जमल्यानंतर घोषणानी परिसर दणाणून सोडला. याच दरम्यान कोल्हापूर पाटबंधारे परिमंडळचे अधीक्षक अभियंता म्हेत्रे, कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर यांच्यासह पाटबंधारेचे अनेक अधिकारी तेथे आले.

     यावेळी बोलतांना कॉ. संपत देसाई म्हणाले, आमच्या कांही महत्वाच्या प्रश्नांची सोडवणूक व्हावी यासाठी आम्ही पूर्वसूचना देऊनही आपण प्रश्न सोडवण्यासाठी हालचाल न झाल्याने आज आम्ही याठिकाणी धरणाचे काम बंद करण्यासाठी आलो आहोत. आमचे प्रश्न न सोडवता दडपशाहीने धरणाचे काम पुढे रेटण्याचा प्रयत्न झाल्यास आम्ही तो उधळून लावू जिल्हाधिकारी यांच्यासोबत बैठक होऊन पुनर्वसनाचा कालबद्ध कार्यक्रम दिला जात नाही तोपर्यंत धरणाचे काम होऊ देणार नाही असा इशारा त्यांनी दिला.

     प्रशासनाचे प्रतिनिधी म्हणून बोलताना अधीक्षक अभियंता  म्हेत्रे म्हणाले, जिल्हाधिकारी नव्याने रुजू झाले आहेत त्यांना प्रश्न समजून घ्यायला वेळ लागेल तरीही त्यांनी २० तारखेला बैठक घेण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे आमची आपल्याला विनंती राहील असे सांगून त्यांनी बैठकीचे लेखी पत्र दिले.

      २० तारखेला होणाऱ्या बैठकीपूर्वी पारपोली येथे १४ तारखेला पूर्व तयारीची बैठक प्रांताधिकारी व कार्यकारी अभियंता यांच्यासोबत घेण्याचेही ठरविण्यात आले. बैठकीचे लेखी पत्र दिल्यानंतरच आंदोलन तात्पुरते स्थगित करीत असल्याची घोषणा श्रमुदचे कार्यध्यक्ष कॉ संपत देसाई यांनी केली.

      यावेळी कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर, उपअभियंता यांच्यासह अशोक मालव, संतोष पाटील, प्रकाश कविटकर, प्रकाश शेटगे, हरी सावंत, कृष्णा ढोकरे, श्रावण पोवार, गोविंद पाटील, धोंडिबा सावंत, ज्ञानेश्वर गुंजाळ, ज्ञानेश्वर ढोकरे, मारुती ढोकरे यांचायसह धरणग्रस्त स्त्रीपुरुष मोठ्या संख्येने हजर होते. ठाणे अंमलदार दत्ता शिंदे यांनी बंदोबस्त ठेवला होता.


सौ.उर्मिला मायदेव स्मृती प्रित्यर्थ सुगम गायन व उपशास्त्रीय गायन स्पर्धा संपन्न

               आजरा: प्रतिनिधी

         श्रीमंत गंगामाई वाचन मंदिर आजरा तर्फे कै. उर्मिला श्रीपाद मायदेव यांच्या स्मृतिप्रित्यर्थ महिलांची सुगम गायन स्पर्धा व मुलांची उपशास्त्रीय गायन स्पर्धा उत्साहात पार पडली. स्पर्धेची सुरुवात कै. उर्मिला मायदेव यांच्या प्रतीमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. श्री नानासाहेब मायदेव सौ विनया मायदेव व सौ प्राची मायदेव यांची यावेळी प्रमुख उपस्थीती होती. अध्यक्ष डॉ. अशोक बाचुळकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.

       महिलांच्या सुगम गायन स्पर्धेत सौ. पूनम विजय आजगेकर (भादवण) यांनी प्रथम क्रमांक मिळविला, सौ. संगीता अशोक माधव (आजरा) यांनी व्दितीय तर कु. सुकन्या संजय शेणवी (विटे) यांनी तृतीय क्रमांक मिळवीला. शालेय उपशास्त्रीय गायन स्पर्धेत प्राथमिक गटात कु. सुक्षिता राघवेंद्र तेलंग (गडहिंग्लज) हिने प्रथम क्रमांक मिळविला. व्दितीय क्रमांक कु आयुष ओमकार गिरी (आजरा), तृतीय क्रमांक कु आरोही तुषार पाटील (गडहिंग्लज) यांना मिळाला तर माध्यमिक गटात कु. शलाका ओमकार गिरी (आजरा) हिने प्रथम क्रमांक मिळविला. व्दितीय क्रमांक कु. विनया संतोष देसाई (कोळींद्रे) तर कु साक्षी संजय शेणवी (विटे) हिने तृतीय क्रमांक मिळविला.

       सुगम गायन स्पर्धेसाठी परिक्षक म्हणून प्रा. मीना शिरगुप्पे व सौ. श्रध्दा वाटवे यांनी तर उपशास्त्रीय गायन स्पर्धेसाठी अनिकेत गाडगीळ व अभिषेक देशपांडे यांनी काम पाहिले.

      यावेळी उपाध्यक्षा गीता पोतदार,विनायक आमणगी, सुभाष विभुते, विजय राजोपाध्ये, महंमदअली मुजावर, डॉ. अंजनी देशपांडे, शंकर ओतारी, अनिता नाईक, विद्या देशपांडे, सलोनी ठाकर, श्रध्दा डांग, डॉ गौरी भोसले, सौ. वंदना आजगेकर, ग्रंथपाल चंद्रकांत कोंडुसकर यांसह संगीतप्रेमी नागरिक उपस्थित होते.

      संचालक वामन सामंत यांनी सुत्रसंचालन केले तर सौ. विद्या हरेर यांनी आभार मानले.


आंबेओहोळचे पाणी हिरण्यकेशी नदीत सोडण्यास विरोध… प्रकल्पग्रस्त व लाभधारक शेतकऱ्यांची भूमिका

                     उत्तूर : प्रतिनिधी

        आंबेओहोळ मध्यम प्रकल्पातील पाणी हे कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये हिरण्यकेशी नदीमध्ये सोडण्याबाबत आजरा व गडहिंग्लज तालुक्यातील शेतकऱ्यांनी मागणी केली असल्याचे सांगण्यात आले. परंतु हे पाणी देण्यास आपला विरोध असल्याचे आंबेओहोळ प्रकल्पांतील प्रकल्पग्रस्त शेतकरी व लाभधारक शेतकरी यांनी पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांसमोर (दक्षिण )निवेदनाद्वारे स्पष्ट केले आहे.

         आंबेओहोळ प्रकल्पाच्या लाभक्षेत्राखेरीज इतर कोणत्याही ठिकाणी सदर प्रकल्पाचे पाणी देण्यास सर्व शेतकऱ्यांचा विरोध आहे. त्यामुळे सदर प्रकल्पाचे पाणी आमच्या हक्काचे असून हिरनण्यकेशी नदीत सदरचे पाणी सोडू नये अशी विनंतीही कार्यकारी अभियंता यांना करण्यात आली आहे.

        याबाबतच्या निवेदनावर कर्पेवाडीचे सरपंच मच्छिंद्र कडगावकर, आरदाळचे माजी सरपंच विजय वांगणेकर, पंचायत समितीचे माजी उपसभापती शिरीष देसाई, माजी जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ तेली, संजय येजरे, शंकर पावले, गणपती सांगले, शशिकांत लोखंडे, तानाजी पाटील, पांडुरंग पाटील, अनिल बेलकर, सचिन पावले, बाळासाहेब वसंत पाटील आदींच्या सह्या आहेत.


उत्तूरच्या नवजीवन विद्यालयात टीव्ही बंदची शपथ !
पालकांनी केले दोन तास टी व्ही बंद !

                    उत्तूर: प्रतिनिधी

      विद्यार्थ्यांचे अभ्यासाकडे होणारे दुर्लक्ष वाढता सोशल मिडियाचा वापर,सांयकाळी टीव्ही पाहण्याचे वाढते प्रमाण यामुळे अभ्यासाच्या वेळी मुले अधिक टीव्ही पहात असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सुरेखा परीट यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सांयकाळी दोन तास टीव्ही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.मुख्याध्यापक रवींद्र येसादे यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता १ ली ते ७ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शपथ देऊन सांयकाळी ७ . ३० ते ९ .३० वाजेपर्यंत टीव्ही बंदचा निर्णय घेण्यात आला.

      दिंगबर कुंभार यांनी विद्यार्थ्यांना शपथ देऊन अधिक टीव्ही पाहण्यामुळे होणारे दुष्यपरिणाम यांची माहिती दिली. शपथ घेतल्यानंतर विद्यार्थ्यांनी टीव्ही बंद केल्याचा अभिप्राय व फोटो पाठवून उपक्रमाला चांगला प्रतिसाद दिला .

      यावेळी विमल कुराडे . परशराम चव्हाण यांनी मनोगते व्यक्त केली .स्वागत आशाताई साळवेकर यांनी तर सुत्रसंचालन मंगल कोरवी तर रेश्मा आजगेकर यांनी आभार मानले .

उपक्रमाचे स्वागतच…

      नवजीवन विद्यालयाने घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे टीव्ही बंद मुळे पालक वर्ग मुलांच्या शिक्षणाकडे अधिक लक्ष देतील . प्रथमतः गावचा नागरिक म्हणून मी प्रथम माझा टीव्ही बंद करून . मुलांच्या अभ्यासासाठी वेळ दिला, अशी प्रतिक्रिया व सरपंच किरण आमणगी यांनी दिली.


सरपंच परिषदेच्या जिल्हाध्यक्षपदी
जी .एम्. पाटील

                     आजरा: प्रतिनिधी

          सरपंच परिषद मुंबई, महाराष्ट्रच्या वतीने कोल्हापूर येथे घेण्यात आलेल्या जिल्हा कार्यकारणी बैठकीमध्ये एकमताने जिल्हाध्यक्ष पदी  देवर्डे गावचे माजी सरपंच जी. एम. पाटील यांची निवड करणेत आली.

       प्रदेश सरचिटणीस राजू पोतनीस,राज्य विश्वस्त व जिल्हा परिषदेचे सदस्य शिवाजी मोरे, महिला प्रदेशाध्यक्षा राणीताई पाटील यांनी प्रशासनावर पकड ठेवण्यासाठी सरपंच परिषद मुंब‌ई महाराष्ट्र च्या माध्यमातुन एकत्रितपणे काम करण्याची गरज असल्याचे सांगितले .

      यावेळी चंदगड तालुकाध्यध आर .जी .पाटील राधानगरी तालुकाध्यक्ष नेताजी पाटील,
आजरा तालुकाध्यक्ष संदिप चौगुले,
आजरा महिला तालुकाध्यक्ष शारदा गुरव.
करवीर तालुकाध्यक्ष अभिजित पाटील,
भुदरगड तालुकाध्यक्ष संदिप पाटील यांच्यासह जिल्हा कार्यकारणी सदस्य व विविध गावचे सरपंच व सदस्य उपस्थित होते.

      सर्वांना विश्वासात घेऊन सर्व सरपंचांच्या प्रश्नासाठी ताकदिने पाठपुरावा करून जिल्हयाला विकासाकडे घेऊन जाण्याचा प्रामाणिक प्रयत्न राहील असे नूतन जिल्हाध्यक्ष पाटील यांनी स्पष्ट केले.


आवाहन…


        शासन पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) ही योजना आजरा शहरासाठी लागू झाली आहे. बस या योजनेअंतर्गत सर्व प्रवर्गातील, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील बेपर कुटुंबांना त्यांच्या स्वमालकीच्या जागेवर नवीन घरकुल बांधणेस केंद्र शासनाकडून १.५ लक्ष व राज्य शासनाकडून १.० लक्ष असे प्रतिलाभार्थी एकुण २.५ लक्ष अनुदान प्राप्त होणार आहे.

      आजरा नगरपंचायतीमार्फत या योजनेचा पहिला सविस्तर प्रकल्प अहवाल (पहिली यादी) बनविणेची कार्यवाही सुरू आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन मुख्याधिकारी, आजरा नगरपंचायत यांचेद्वारे करणेत आले आहे. विहित नमुन्यातील अर्ज आजरा नगरपंचायतीच्या बांधकाम विभागामध्ये उपलब्ध आहेत. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची पात्रता प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) च्या मार्गदर्शक सूचनानुसार व वेळोवेळी निर्गमित झालेल्या शासन निर्णयानुसार राहील असेही स्पष्ट केले आहे .


निधन वार्ता…
कृष्णा कुंभार

      भादवण ता. आजरा येथील कृष्णा भाऊ कुंभार (वय ७६वर्षे ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी ,दोन मुले, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. गुरुवार दि.८ रोजी रक्षा विसर्जन कार्यक्रम आहे.


संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

राष्ट्रवादीचे विमान सुसाट…

mrityunjay mahanews

आत्महत्या. ???

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

फड सांभाळ तुऱ्याला ग आला… आता फड सांभाळायचा कसा…?

mrityunjay mahanews
error: Content is protected !!