
आज मतदान

आजरा:प्रतिनिधी
साखर कारखान्याकरिता आज रविवारी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीची श्री रवळनाथ शेतकरी विकास आघाडी व शिवसेना, भाजपा, राष्ट्रीय काँग्रेस, स्वाभिमानीची श्री चाळोबा देव विकास आघाडी यांच्यात लढत होत आहे.
दोन्हीही आघाड्यांनी गेले आठ दिवस प्रचाराचे रान उठवले आहे. आर्थिक अडचणीतून कारखाना बाहेर काढण्याचा दावा दोन्ही आघाड्यांकडून करण्यात आला आहे.
मतदानाच्या पार्श्वभूमीवर शासकीय निवडणूक यंत्रणाही सक्रिय झाली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस खात्याकडून विशेष दक्षता घेण्यात येत आहे. मतदानाला येणाऱ्यांना ओळखपत्र बंधनकारक असल्याचे सांगण्यात आले.
बाहेरगावी असणारे मतदार आणण्याकरीता मोठी यंत्रणा राबवण्यात आली आहे. विशेष गाड्यांची व्यवस्था ही उमेदवारांनी केली आहे. सुमारे ७० टक्के मतदान होईल असा अंदाज जाणकारांकडून व्यक्त केला जात आहे.


संकेश्वर-बांदा महामार्ग बाधित शेतकऱ्यांचा २९ डिसेंबर रोजी आंदोलनाचा इशारा

आजरा: प्रतिनिधी
खेडे ,तालुका -आजरा येथील हनुमान मंदिर येथे संकेश्वर -बांदामहामार्ग बाधित शेतकऱ्यांची काल दि.१६रोजी बैठक झाली. या बैठकीत दि.२९ डिसेंबर रोजी तहसील कार्यालय आजरा येथे विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्याचा निर्णय झाला .
मागील दि.१२ ऑक्टोबर २०२३ रोजी आजरा तहसील कार्यालयासमोरील आंदोलनाच्या वेळी महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी वरिष्ठांच्या सोबत बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप बैठक झाली नाही ती बैठक तात्काळ आयोजित करावी.
शिवाय खाजगी जमिनी संपादन करताना २०१३ च्या भूमी संपादन कायद्याप्रमाणे एन्.ए. दराच्या रेडी रेकनरच्या पाचपट दराने दर निश्चित केल्याशिवाय कोणतेही महामार्गाचे काम करू नये, अशी मागणी आहे. त्यामुळे महामार्गाचे चालू काम बंद करण्यात यावे, तसेच नागपूर येथील अधिवेशनावर नुकताच दि.१३ डिसेंबर २०२३ रोजी महाराष्ट्रातील महामार्ग बाधित शेतकऱ्यांचा महामोर्चा काढण्यात आला . राज्य पातळीवर सर्व महामार्ग बाधित शेतकऱ्यांच्यासाठी योग्य तो निर्णय होईलच तोपर्यंत भूसंपादनाची मनमाने पैशाची नोटीस काढण्यात येऊ नये. अशा योग्य दर न ठरवता सरकारने काढलेल्या नोटिसा महामार्गामुळे बाधीत होणा-या शेतकरी, घरमालक, व्यापारी इ. कडून स्वीकारल्या जाणार नाहीत असा ठराव आज झालेल्या बैठकीत करण्यात आला आहे.
रस्ता बांधणाऱ्या कंपनीसोबत सरकारने केलेल्या कराराची प्रत संघटनेला देण्यात यावी. रस्त्याच्या दुतर्फा बळजबरीने जमिनी घेऊन महामार्ग बनवला आहे त्या शेतकऱ्यांना त्यांच्या रस्ता रुंदीकरणासाठी वापरलेल्या जमिनीचा मोबदला देण्यात यावा, सर्व लगत धारक शेतकऱ्यांच्या नावे असणाऱ्या जमिनीचे मोजमाप करण्यात यावे.जर अशा शेतकऱ्यांना मोबदला दिला नाही तर बांधा वापरा व हस्तांतरण करा या तत्त्वावर कंपनी ज्यावेळी टोल वसुली करेल त्यामध्ये मिळणाऱ्या पैशातील वाटेकरी हे संकेश्वर- बांदा महामार्ग लगत धारक शेतकरी राहतील ही जाहीर मागणी शेतकऱ्यांची बैठकीत करण्यात आली.
सदर बैठकीसाठी संघटनेचे अध्यक्ष शिवाजी गुरव यांनी मार्गदर्शन केले. या बैठकीत शिवाजी इंगळे,गणपतराव येसणे, अनिल शिंदे यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी अण्णासो पाटील, दिगंबर होरंबळे ,आनंदा येसणे ,आनंदा खोराटे यांनी यावेळी अनुभव कथन केला. सचिन देशपांडे, शिवाजी डोंगरे कांचन बेळगुंदकर, लता मोरबाळे, शिवाजी देसाई, अशोक लकांबळे, रवी बेळगे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.


आजरा महाविद्यालयाच्या मिसबाह बागवानचे यश

आजरा: प्रतिनिधी
शिवाजी विद्यापीठाच्या वतीने घेण्यात आलेल्या सन २०२३-२४ मधील अविष्कार संशोधन स्पर्धेमध्ये आजरा महाविद्यालयाने यश मिळविले. महाविद्यालयाची विद्यार्थिनी मिसबाह इनायतुल्ला बागवान हिने विद्यापीठ स्तरावर प्रथम क्रमांक पटकावला.‘
‘निओलॉजीजम’ विषयावर तिने संशोधन प्रकल्प केला होता. महाविद्यालयाच्या इंग्रजी विभागाच्या वतीने ‘लँग्वेज आणि ह्युमॅनीटी’ विभागातून हा संशोधन प्रकल्प तयार करण्यात आला होता.
या ‘अविष्कार’स्पर्धेसाठी प्रथम संस्थात्मक स्तरावर तिने सादरीकरण केले. त्यानंतर विवेकानंद कॉलेज येथे झालेल्या इंटरकॉलेज स्तरावर तिचा दुसरा क्रमांक मिळवील्याने विद्यापीठ स्तरावर तिची निवड झाली. विद्यापीठामध्ये झालेल्या या स्पर्धेत तिने उत्कृष्ट संशोधन प्रकल्प सादर करीत पहिला क्रमांक पटकावला. आता जानेवारी महिन्यामध्ये नाशिक येथे होणाऱ्या पुढील इंटर युनिव्हर्सिटी स्पर्धा फेरीसाठी तिची निवड झाली आहे.
या संशोधन प्रकल्पासाठी डॉ. श्रीमती एस. आय. मणेर यांचे तसेच इंग्रजी विभागप्रमुख प्रा. रमेश चव्हाण, प्रा. शेखर शिऊडकर आणि प्रकल्पतज्ञ डॉ. अविनाश वर्धन, डॉ. तानाजी कावळे, प्रा. मलिकार्जुन शिंत्रे यांचे मार्गदर्शन लाभले. तर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक सादळे, कार्यालय अधीक्षक योगेश पाटील, उपप्राचार्य दिलीप संकपाळ यांचे प्रोत्साहन लाभले.



निधन वार्ता
गणपतराव नांदवडेकर

मेंढोली ता. आजरा येथील माजी सैनिक गणपतराव लक्ष्मण नांदवडेकर (वय ७८) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. आजरा येथे ते फुलवाले फौजी म्हणून प्रसिद्ध होते.



