

मिशन 150 : मुंबईवर भाजपाचे वर्चस्व असावे; अमित शाहांचा शिंदे गटालाही शह
मुंबईतल्या राजकारणावर फक्त भाजपाचे वर्चस्व असावे. मुंबई महापालिकेत पुढचा महापौर भाजपाचा होणार”, असे वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकांबाबत केले आहे. मात्र अमित शाहांच्या या वक्तव्यामुळे भाजपासोबत युती केलेल्या शिंदे गटाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे
मुंबईतल्या राजकारणावर फक्त भाजपाचे वर्चस्व असावे. मुंबई महापालिकेत पुढचा महापौर भाजपाचा होणार”, असे वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकांबाबत केले आहे. मात्र अमित शाहांच्या या वक्तव्यामुळे भाजपासोबत युती केलेल्या शिंदे गटाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेत शिंदे गटाचे वर्चस्व टिकणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. तसेच, “तुम्हाला माहिती असेल की उद्धव ठाकरेंनी कशाप्रकारे आपल्याशी धोका केला. राजकारणात सगळं काही सहन करा मात्र धोका सहन करू नका. जे धोका देतात त्यांना योग्य ती शिक्षा झालीच पाहिजे. यासाठी भाजपचा एक एक कार्यकर्ता मैदानात उतरला पाहिजे”, अशा शब्दांत अमित शाह यांनी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला.
अमित शाह यांच्या उपस्थितीत मुंबईत भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक पाडली. ‘मेघदूत’ बंगल्यावर मुंबईतील भाजप नगरसेवक पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत अमित शाह यांनी संबोधित करताना ‘मिशन 150’ असे म्हणत महापालिका निवडणुकीच्या तयारीचा नारळ फोडला. यावेळी अमित शाह यांनी “मुंबई महापालिकेत पुढचा महापौर भाजपाचा होईल. प्रत्येक कार्यकर्ता रस्त्यावर आला पाहिजे. मुंबईतल्या राजकारणावर वर्चस्व फक्त भाजपाचे असावे”, असे वक्यव्य केले. एकिकजे भाजपा आणि शिवसेनेचा वाद कायम आहे. मात्र दुसरीकडे नुकताच शिवसेनेतून बंडखोरी करून भाजपाशी युती करत राज्याच सरकार स्थापन केलेल्या शिंदे गटाला भाजपा योग्य वागणूक देणार का, असा सवाल उपस्थित होत आहे. कारण सध्या महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार आहे, मात्र अमित शाहांनी केलेल्या वक्तव्यावरून महापालिका निवडणुकीत भाजपा शिंदे गटाला शह देत असल्याचे चित्र दिसत आहे.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडाळी पुकारल्यानंतर महाविकास आघाडीतून बाहेर पडा आणि भाजपाशी युती करा, असे सांगितले होते. तसेच, एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेच्या आणखी आमदारांनी शिंदे गटात सहभाग घेतला. परंतु, अमित शाहांच्या या वक्तव्यामुळे शिंदे गट महापालिका निवडणुकीत किती जागांवर वर्चस्व मिळवणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. दरम्यान, अमित शाह यांनी लालबागचा राजाच्या दर्शनाने मुंबई दौऱ्याचा शुभारंभ केला.
शिवसेनेने आमच्या जागा पाडून आमच्या पाठीत खंजीर खुपसला : अमित शाह
दरम्यान या बैठकीला संबोधित करताना अमित शाह यांनी आक्रमक भूमिका घेत उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. “तुम्हाला माहिती असेल की उद्धव ठाकरेंनी कशाप्रकारे आपल्याशी धोका केला. राजकारणात सगळं काही सहन करा मात्र धोका सहन करू नका. जे धोका देतात त्यांना योग्य ती शिक्षा झालीच पाहिजे. भाजपचा एक एक कार्यकर्ता मैदानात उतरला पाहिजे. 2019 मध्ये पहिल्यांदा भाजपचं संपूर्ण बहुमताचं सरकार आले. असं पहिल्यांदाच झालं आहे. वर्ष 2014 मध्ये केवळ दोन जागांसाठी शिवसेनेने युती तोडली होती असा गौप्यस्फोट शाह यांनी केला. भाजपने कधीच छोटा भाऊ-मोठा भाऊ म्हटले नाही. शिवसेनेनेच युती तोडली असल्याचे सांगत शिवसेनेने आमच्या जागा पाडून आमच्या पाठीत खंजीर खुपसला, असे अमित शाह यांनी सांगितले.
उद्धव ठाकरेंना जागा दाखवण्याची वेळ आली : अमित शाह
महाराष्ट्रातले हिंदुविरोधी राजकारण आपल्याला संपवायचं असल्याचे सांगत शाह यांनी भाजपच्या आगामी राजकारणाची दिशा स्पष्ट केली. तुम्ही नरेंद्र मोदींच्या नावावर, देवेंद्र फडणवीसांच्या कामावर मतं मागितली आणि जिंकून आले. तुम्ही जनतेचा विश्वासघात केला असल्याचे शाह यांनी सांगितले. मुंबईतल्या राजकारणावर वर्चस्व केवळ भाजपचं असावे. आता उद्धव ठाकरेंना जागा दाखवण्याची वेळ आली आहे., असेही अमित शाह यांनी सांगितले.
पुढील चार महिन्यात मुंबई महापालिकांचे बिगुल वाजणार असून, शिवसेना-भाजपसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. राज्यातले ठाकरे सरकार उलथवल्यानंतर आता भाजपने थेट मुंबई पालिकेवरच लक्ष केंद्रीत केले आहे. मुंबई पालिकेचे वर्षाचे बजेट 50 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

कोण आला रे कोण आला…शिवसेनेचा वाघ आला ; पण कोणता?

मुंबई : ‘जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो…’ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हा आवाज दसरा मेळाव्यात कानावर पडताच, शिवाजी पार्कवर जमलेल्या शिवसैनिकांमध्ये उत्साह संचारायचा. ‘कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला’, अशा घोषणांनी परिसर दुमदुमून जात असे. पण आता दसरा मेळावा कोण घेणार आणि कोण वाघ ठरणार, असा गहन प्रश्न निर्माण झाला आहे. शिवसेनेतील ठाकरे आणि शिंदे या गटांबरोबरच मनसे कार्यकर्त्यांनी देखील दसरा मेळावा घेण्याची आग्रही भूमिका घेतल्याने तिढा निर्माण झाला आहे.
शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात बाळासाहेब ठाकरेंकडून कोणत्या विचारांचे सोने लटुले जाते, याकडे केवळ शिवसैनिकच नव्हे तर, विरोधकांचेही लक्ष लागलेले असे. अनेक वर्ष वृत्तवाहिन्या आणि थेट प्रक्षेपणाचा प्रकार नव्हता. त्यामुळे शिवाजी पार्कवर जाऊन बाळासाहेबांचे विचार ऐकल्यानंतर पुन्हा सकाळी वृत्तपत्रातील त्याचे वृत्त वाचले जात होते. त्यांच्या भाषणाचे गारुड शिवसैनिकांवर असायचे. नेहरू-गांधी घराणेशाहीवर शब्दांचे आसूड ओढणाऱ्या बाळासाहेबांच्या पश्चात त्याचे पुत्र उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पक्षाची कमान सांभाळली आणि त्यानंतरही गेल्यावर्षीपर्यंत दसरा मेळावा त्याच उत्साहात साजरा होत आला.
जूनमध्ये झालेल्या विधान परिषद निवडणुकीनंतर शिवसेनेत उभी फूट पडली. विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली 40 आमदारांनी ‘उठाव’ केला. त्यामुळे शिवसेनेत दोन गट निर्माण झाले असून दोघांनीही आपलीच शिवसेना खरी असल्याचा दावा केला आहे. आता हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचले आहे. आतापर्यंतच्या सुनावणीचा वेग लक्षात घेता, एवढ्यात तरी त्याचा निकाल लागेल, असे वाटत नाही. पण दुसरीकडे नवनियुक्त सरन्यायाधीश उदय लळित जुने खटले निकाली लावण्यावर भर देत आहेत, त्यामुळे कदाचित याचा निर्णय लागू शकतो, अशी शक्यताही वर्तवण्यात येत आहे.

आता शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यावरही दोन्ही गटांनी दावा केला आहे. त्यातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उडी घेतली आहे. मनसेप्रमुख राज ठाकरेंनी दसरा मेळावा घ्यावा, अशी मागणी मनसैनिकांनी केली आहे. त्यामुळे ‘कोणता झेंडा घेऊ हाती,’ अशी अवस्था कार्यकर्त्यांची झाली आहे. दसरा मेळाव्याच्या परवानगी साठी ठाकरे गटाकडून मुंबई महापालिकेकडे अर्ज दाखल झालेला असतानाच शिंदे गटाकडून आमदार सदा सरवणकर यांनी देखील अर्ज केला आहे. परिणामी दसरा मेळाव्याच्या परवनागीची शस्त्र मुंबई महापालिकेच्या ढोलीत आहेत, ती नक्की कोणाच्या हाती लागतात आणि कोण दसरा मेळावा साजरा करतो, हे लवकरच स्पष्ट होईल. तथापि, दसरा मेळाव्याची परवानगी न मिळाल्यास न्यायालयात दाद मागण्याची तयारी ठाकरे गटाने केली आहे.
( बातमी सौजन्य : आँनलाइन बातम्या )

डॉ. आनंद बल्लाळ यांची रशिया येथे होणाऱ्या परिषदेसाठी निवड

आजरा महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख डॉ. आनंद बल्लाळ यांची मॉस्को (रशिया) येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी नुकतीच निवड झाली आहे.
भारत आणि रशिया यांच्या राष्ट्रीय संबंधास पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने रशिया सरकार, भारत सरकार यांच्या सहकार्याने लोमोनोसॉव मॉस्को स्टेट युनिव्हर्सिटी, रशियन स्टेट युनिव्हर्सिटी, सेंट पिटर्सबर्ग युनिव्हर्सिटी, मॉस्को यांच्यासह भारतातील इंडियन कॉन्सिल ऑफ कल्चरल रीलेशन्स, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे अध्यासन मुंबई विद्यापीठ आदी संस्थांच्या संयुक्त विद्यमाने ही परिषद आयोजित करण्यात आली आहे. रशिया मॉस्कोतील मार्गारिटा रुडोमिनो ऑल रशिया स्टेट लायब्ररी फॉर फॉरेन लिटरेचर येथे ही आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली असून या परिषदेत डॉ. बल्लाळ लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या वगनाट्यावरील मार्क्सवादाचा प्रभाव हा शोधनिबंध सादर करणार आहेत.
या परिषदेदरम्यान या ग्रंथालयाच्या परिसरात उभारण्यात आलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण देखील होणार आहे. डॉ. बल्लाळ यांची क्वारंटाइन ही कादंबरी, मराठी हास्यात्मिका हा समीक्षाग्रंथ आणि स्वातंत्र्यानंतर आजही हा कवितासंग्रह प्रसिद्ध झाला आहे. मराठी हास्यात्मिका या ग्रंथास शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघाच्या पुरस्काराबरोबरच नुकताच दक्षिण महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. मराठी नाटक आणि मराठी लोककला हा डॉ. बल्लाळ यांच्या खास अभ्यासाचा विषय असून यांनी आतापर्यंत राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध चर्चासत्रातून यासंबंधी शोधनिबंध सादर केले आहेत. तसेच अनेक ठिकाणी त्यांनी साधनव्यक्ती म्हणून मार्गदर्शन केले आहे. पीएच. डी. पदवीसाठी मार्गदर्शक म्हणूनही त्यांना मान्यता मिळालेली आहे.
मॉस्को ( रशिया ) येथील परिषदेत त्यांच्या शोधनिबंधाची निवड झाल्याबद्दल जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अशोक चराटी, उपाध्यक्ष विलास नाईक, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अनिल देशपांडे, सचिव रमेश कुरुणकर, सर्व संचालक, प्राचार्य डॉ. अशोक सादळे, उपप्राचार्य दिलीप संकपाळ, कार्यालयीन अधीक्षक योगेश पाटील तसेच परिसरातील अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

स्वरूप तोडकर संगीत विशारद

अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालय, मुंबई यांच्या वतीने घेण्यात आलेल्या संगीत विशारद गायन या परीक्षेत आजरा येथील स्वरूप अजित तोडकर याने प्रथम श्रेणी प्राप्त केली आहे. रियाजामध्ये सातत्य ठेवून व चिकाटीने स्वरूप ने ही पदवी प्राप्त केली आहे व आज-याच्या नावलौकिकात भर घातली आहे. शास्त्रीय संगीताचे शिक्षण त्याचे वडील संगीत विशारद श्री. अजित तोडकर यांचे कडून घेतले आहे. भाऊ तबलावादक ओंकार तोडकर व आई सुजाता तोडकर यांचे त्याला प्रोत्साहन मिळाले.
यापूर्वी स्वरूपाची शासनाच्या कलेतून एन.सी.सी.च्या आर. डी. कॅम्प मध्ये निवड झाली होती व दिल्ली येथे महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व त्याने केले होते.


आजरा येथील प.पू. लक्ष्मण बुवा महाराज मोरजकर यांचा सप्ताह सोहळा आजपासून
आजरा येथील प.पू श्री .लक्ष्मण बुवा महाराज मोरजकर यांच्या सप्ताहास आज सोमवार दिनांक ५ सप्टेंबर पासून सुरुवात होत आहे .सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी 11 वाजता महाराज यांच्या पोथीचे श्री विठ्ठल मंदिर येथे प्रयाण त्यानंतर दुपारी १२ वाजता भक्तमंडळींकडून समाधीस्थळी जाऊन महाराज यांना आमंत्रण देण्यात येणार व 5 सप्टेंबर ते शनिवार दिनांक १०सप्टेंबर या कालावधीमध्ये रोज रात्री विविध भजनी मंडळ यांच्या भजनाचा कार्यक्रम होणार आहे .रविवार दिनांक 11 सप्टेंबर रोजी जागराचा कार्यक्रम असेल तर सोमवार दिनांक 12 सप्टेंबर रोजी दिंडी व मंगळवार दिनांक 13 सप्टेंबर रोजी महाप्रसाद व तांदळाचा प्रसाद असेल .सप्ताहाच्या निमित्ताने मंगळवार दिनांक 13 सप्टेंबर रोजी दुपारी दहा ते चार या कालावधीत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती येथील श्री .विठोबा देव नबापुर चे ट्रस्टी सुभाष मोरजकर यांनी सांगितले.





