लोकशाहीर द ना गव्हाणकर स्मृती पुरस्कार-वाहरू सोनवणे यांना जाहीर
आजरा – प्रतिनिधी.
२०२१ चा लोकशाहीर द. ना. गव्हाणकर पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते, सुप्रसिध्द आदिवासी कवी वाहरू सोनवणे यांना देण्याचा निर्णय पुरस्कार समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. २८ नोव्हेंबर महात्मा फुले स्मृतीदिनी सुप्रसिध्द भाषा शास्त्रज्ञ. पद्मश्री डॉ. गणेश देवी
यांच्या हस्ते गव्हाणकर यांच्या महागोंड या गावी त्याचे वितरण करण्यात येणार आहे.
वाहरू सोनवणे हे नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील असून गेली चाळीस वर्षाहून अधिक काळ महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश आणि राजस्थान राज्यातील भिल्ल,पावरा, गोंड यासह अनेक आदिवासींना संघटित करून त्यांच्या न्याय हक्कासाठी संघर्ष करीत आहेत. सत्तरच्या दशकात उभा राहिलेल्या “मागोवा” या क्रांतिकारक गटाचे ते सक्रिय सदस्य होते. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे आदिवासींच्या उत्थानासाठी झालेल्या प्रचंड संघर्षात ते बिनीचे कार्यकर्ते म्हणून आघाडीवर होते. आदिवासी एकता परिषद या आदिवासींच्या देशव्यापी संघटनेचे ते अध्यक्ष राहिले आहेत. गोधड या त्यांच्या काव्यसंग्रहाचा अनेक विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समावेश आहे. फुले-आंबेडकरी साहित्य संमेलन, आदिवासी साहित्य संमेलन, विद्रोही साहित्य समेलनासह राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय संमेलने व चर्चासत्रांचे अध्यक्षस्थान त्यांनी भूषविले आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळावरही त्यांनी सदस्य म्हणून काम केले आहे. वाहरू सोनवणे यांना पुरस्कार ज्यांच्या हस्ते दिला जाणार आहे ते पद्मश्री गणेश देवी हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे भाषा शास्त्रज्ञ आहेत. गुजरात मध्ये आदिवासी अकादमीची स्थापना करून आदिवासींच्या उत्थानाचे महत्वपूर्ण काम त्यांनी केले आहे. तेजगड येथे भाषा संशोधन संस्थेची स्थापना करून ७८० आदिवासी बोली भाषांचे सर्व्हेक्षण, संकलन व संवर्धन त्यांनी केले आहे. दक्षिणायन या सांस्कृतिक चळवळीची स्थापना करून सांस्कृतिक क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे. त्यांच्या हस्ते वितरीत होणारा हा पुरस्कार समारंभ महागोंड या लोकशाहिरांच्या जन्मगावी होणार आहे. या कार्यक्रमासाठी ग्रामविकास मंत्री ना हसन मुश्रीफ, पालकमंत्री ना सतेज पाटील, खा. संजय मंडलिक, आ. प्रकाश आबिटकर, आ. राजेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रम २८ नोव्हेंबर रोजी सकाळी ठीक ११.३० वाजता होणार आहे. अशी माहिती पुरस्कार समितीच्या वतीने दि. ०७ रोजी पत्रकार परिषदेत समितीचे उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी यांनी दिली. यावेळी समितीचे अध्यक्ष रवींद्र आपटे, कार्याध्यक्ष कॉ संपत देसाई, सदस्य मुकुंददादा देसाई, मनोहर गव्हाणकर, महादेव पवार, रावसाहेब देसाई, बी के कांबळे, काशीनाथ मोरे, अशोक शिवणे, बजरंग पुंडपळ, शिवाजी गुरव, सुनील पाटील, रणजित कालेकर, यांच्यासह समिती सदस्य उपास्थित होते.

