मंगळवार
दि.२० ऑक्टोबर २०२६


गोकुळ मध्ये शिट्टी वाजली….
आमदार बंटी पाटील ठरले किंग मेकर

आजरा : प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या गोकुळ निवडणुकीत आमदार सतेज पाटील यांनी राजकीय मुत्सद्दीपणाची झलक दाखवत महायुतीला धोबीपछाड दिली. दहा आमदार, दोन मंत्री व एक खासदार अशी कागदावर तगडी फौज असणाऱ्या मंडळींच्या महायुतीच्या आघाडीच्या पॅनलचा १३ विरुद्ध १२ असा धुव्वा उडवला.
गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वास पाटील, नवीद मुश्रीफ ,अरुण डोंगळे, शौमीका महाडिक, अशोकअण्णा चराटी यांच्यासह अनेक दिग्गजांना पराभवाचा मोठा फटका बसला आहे.१२ नव्या चेहऱ्यांना गोकुळ मध्ये संधी मिळाली आहे.
विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे…
काँग्रेस समविचारी आघाडी/ कंसात पडलेली मते
अभिजीत तायशेटे(३१९४) शशिकांत पाटील, चुयेकर (३१११), प्रा. किसण चौगुले ( २८५१) बाबासाहेब चौगुले (२६७०) विद्याधर गुरबे (२६२७) राहुल देसाई (२६५१)बाबासाहेब देवकर (२५५५) विश्वजीत जाधव (२५२९) अंजनाताई रेडेकर (२४४६) भाग्यश्री डोंगळे (२५९२) शशिकांत खोत (२९३८) राजू आवळे (२५४५) बयाजी शेळके (२८५३)
महायुती…
राहुल पाटील (३०४४) वीरेंद्र मंडलिक(३०४७) डॉ चेतन नरके(३०२६) अंबरीश घाटगे (२९३४) अजित नरके (२८६९) रणजीतसिंह पाटील (२७४४) मदन देसाई (२७२६) रणजीत सिंह कृष्णराव/के.पी. पाटील (२६६४ ) राजेश पाटील (२६६९) अजित पाटील (२५९९) कर्णसिंह गायकवाड(२५८२) अमरसिंह पाटील(२५७२)
नवीन चेहरे…
मदन देसाई,अजित पाटील, रणजीतसिंह दिलीप पाटील, राहुल पाटील, राजू आवळे, भाग्यश्री डोंगळे, शशिकांत खोत, वीरेंद्र मंडलिक, विश्वजीत जाधव, राहुल देसाई, विद्याधर गुरबे, बाबासाहेब देवकर
प्रमुख पराभूत…
नवीद मुश्रीफ, डॉ. सुजित मिणचेकर, विश्वास पाटील, अरुण डोंगळे, शौमिका महाडिक, सतीश पाटील, अशोकअण्णा चराटी, दीपक पाटील
अशोकअण्णा चराटी २४१९ मतांसह २७ व्या स्थानावर रहावे लागले.
दगाबाजीची चर्चा…
अशोकअण्णा चराटी यांना विजयासाठी १५४ मते कमी पडली. आघाडी मधील अंतर्गत दगाबाजीचा फटका त्यांना बसल्याची चर्चा निकालानंतर रंगली होती.

अंजनाताईंची फिल्डिंग पुन्हा कामाला
अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने मतदारांपर्यंत पोहोचण्यात अंजनाताई पुन्हा एकदा यशस्वी ठरल्या. ठराव धारकांशी संपर्क व प्रचार यंत्रणा प्रभावीपणे राबवल्याने सलग दुसऱ्यांदा ३४३१ इतकी विक्रमी मते मिळवत त्यांनी गोकुळमध्ये दिमाखात प्रवेश मिळवला .

जागर आरती उत्साहात

आजरा: प्रतिनिधी
ग्रामदैवत श्री रवळनाथ मंदिरामध्ये शारदीय नवरात्रोत्सव महोत्सवानिमित्त श्री रवळनाथ नवरात्र उत्सव उपसमितीच्या वतीने मंदिर परिसरात डोक्यावरील आरती/ जागर आरती व दुर्गा प्रसादाचे वाटप कार्यक्रम उत्साहात पार पडला.
शहरातील भाविकांचे ही आरती म्हणजे मोठे आकर्षण आहे. आरती वेळी भाविक, मानकरी व स्थानिक नागरिक प्रचंड संख्येने उपस्थित होते.

तरुणाला लोखंडी रॉडने मारहाण ; एका विरोधात गुन्हा नोंद
आजरा : प्रतिनिधी
पत्नीला फोन करतो या कारणावरून चिमणे येथील एका तरुणाला गाडी अडवून लोखंडी रॉडने बेदम मारहाण केल्याची घटना आजरा तालुक्यात घडली आहे.
चव्हाणवाडी घाळी रस्त्यावर सायंकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. याबाबत जखमी आदिनाथ सुनील सुतार ( वय २६, रा. चिमणे, ता. आजरा ) याने आजरा पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याबरोबर एका विरोधात गुन्हा नोंद केल्याची माहिती आजरा पोलिसांनी दिली.
फिर्यादीनुसार ते आपल्या ताब्यातील /MH-09-DL-1498 या मोटरसायकलवरून जात असताना किरण विष्णू कोकाटे रा. चव्हाणवाडी याने त्यांची गाडी थांबवली. गाडीवर असतानाच तू माझ्या बायकोला फोन का करतोस व तिच्याशी का बोलतोस असे म्हणून शिवीगाळ करत हातातील लोखंडी रॉडने पाठीवर व हातावर मारहाण केली.
या मारहाणीत फिर्यादी गंभीर जखमी झाले असून त्यांचा हात फ्रॅक्चर झाला आहे. त्यांच्यावर गडहिंग्लज येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
आजरा पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पो.हे.कॉ. मकानदार हे करत आहेत.

आजरा तालुका स्वतंत्र विधानसभा मतदारसंघ करा…
अखिल भारतीय मराठा महासंघाची मागणी

आजरा: प्रतिनिधी
लोकसंख्येचा निकष न ठेवता भौगोलिक परिस्थितीचा विचार करुन आजरा तालुक्याला स्वतंत्र विधानसभा मतदारसंघ करा अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाने पत्रकार परिषदेत केली.
आजरा तालुक्यातील ७३ ग्रामपंचायतींच्या ग्रामसभेचे व पंचायत समिती ठराव मराठा महासंघाने गोळा केले असून निवेदनासह हे ठराव राष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय निवडणूक आयोग, राज्यपाल, मुख्यमंत्री व राज्य निवडणूक आयोग यांना पाठवण्यात आले असल्याचे सांगितले.
स्वागत संभाजी इंजल यांनी केले.यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष मारुती मोरे म्हणाले,शहरांचा विकास झपाट्याने होत असताना ग्रामीण भाग विकासापासून अद्याप वंचित आहे.देश महासत्ता बनण्यासाठी ग्रामीण भागाचा विकास अपेक्षित आहे. लोकसंख्येचा निकष शहरांना लागू होतो मात्र ग्रामीण भागातील तालुक्यांना हा निकष अन्यायकारक ठरत आहे.आजरा तालुका ४० ते ५० किलोमीटर क्षेत्रफळाचा आहे.तालुक्याचे तीन विधानसभा मतदारसंघात विभाजन झाले आहे.यामुळे तालुका अद्यापही विकासापासून वंचित राहिलेला आहे २०२९ ला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी आजरा तालुक्याची स्वतंत्र विधानसभा मतदारसंघाची निर्मिती करावी.आजरा तालुक्या प्रमाणे इतर तालुक्यांनाही स्वतंत्र विधानसभा मतदारसंघ करावे अशी मागणी मराठा महासंघाची असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते व सरपंचांना एकत्र आणून हा लढा व्यापक करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी बंडोपंत चव्हाण, सी.आर.देसाई, शंकरराव शिंदे, प्रकाश देसाई, दत्तात्रय मोहिते, शिवाजी इंजल, अमोल बांबरे, सी.डी.सरदेसाई, सूर्यकांत आजगेकर यांच्यासह मराठा महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.


आजचे पंचांग
दिनांक : २० ऑक्टोबर २०२६
वार : मंगळवार
माह (अमावस्यांत) : आश्विन
माह (पूर्णिमांत) : आश्विन
ऋतु : शरद
आयन : दक्षिणायन
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथी : नवमी तिथी (दुपारी १२.५० पर्यंत) त्यानंतर दशमी तिथी
नक्षत्र : श्रवण नक्षत्र (सायंकाळी ०६.०१ पर्यंत) त्यानंतर धनिष्ठा नक्षत्र
योग : शूल योग (२१ ऑक्टोबर रात्री १२.४९ पर्यंत) त्यानंतर गण्ड योग
करण : कौलव करण (दुपारी १२.५० पर्यंत) त्यानंतर तैतुला करण
चंद्र राशी : मकर राशी
सूर्य राशी : तूळ राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : दुपारी ०३.१७ ते सायंकाळी ०४.४४ पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.००ते दुपारी १२.४६
सूर्योदय : सकाळी ०६.३५
सूर्यास्त : सायंकाळी ०६.११
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत

