



तालुका खरेदी विक्री संघाच्या ‘समझोता एक्सप्रेस’ला ब्रेक…?
निवडणूक होण्याची दाट शक्यता
ज्योतिप्रसाद सावंत
आजरा तालुका खरेदी विक्री संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीकरिता २ मे ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. राष्ट्रवादीचे सुधीर देसाई, मुकुंदराव देसाई राष्ट्रीय काँग्रेस व शिवसेना विरुद्ध अशोकअण्णा चराटी व जयवंतराव शिंपी गट अशी ही निवडणूक होण्याची शक्यता सद्यस्थितीस दिसत आहे.
यापूर्वीच शिंपी – चराटी गटाच्या प्रमुख मंडळींनी निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रस्ताव पत्रकार बैठकीद्वारे सत्तारूढ गटाकडे ठेवला आहे. याकरिता त्यांनी संचालक पदाच्या पाच जागांची मागणी केली आहे. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसानंतर मधल्या कालावधीमध्ये बिनविरोधची कोणतीच चर्चा अथवा बैठक झालेली नसल्याने दोन्ही बाजूने निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी करण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून सत्तारूढ गटातर्फे कांही ठरावधारक सहलीवर पाठवण्यात आले आहेत. तर विरोधी शिंपी-चराटी गटाने वेळ पडल्यास निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी म्हणून सर्वच गटातून आपल्या समर्थक इच्छुकांचे अर्ज दाखल केले आहेत. गेल्या आठवड्याभराच्या कालावधीत काही मंडळींनी उमेदवारी अर्ज मागेही घेतले आहेत. तरीही दोन्ही बाजूने असणाऱ्या इच्छुकांची संख्या विचारात घेतल्यास निवडणुक बिनविरोध होण्याची शक्यता मावळत चालली आहे.
जिल्हा बँक निवडणुकीच्या दरम्यान सत्तारूढ आघाडीच्या वतीने जनता बँक, आजरा साखर कारखाना व तालुका खरेदी विक्री संघ येथे काही मंडळींना संधी देण्याचा शब्द दिला गेला आहे. तडजोड झाल्यास अनेकांना या तालुका संघाच्या निवडणूक रिंगणातून बाहेर व्हावे लागणार आहे. भविष्यात आजरा साखर कारखाना वगळता तालुक्यातील अन्य कोणत्याही मोठ्या सहकारी संस्थांच्या निवडणुका नाहीत. त्यामुळे कार्यकर्तेही आलेली संधी सोडायची नाही असा सूर आळवू लागले आहेत.
एकीकडे सत्तारूढ आघाडीने ठराव धारक सहलीवर पाठवले असताना दुसरीकडे शिंपी चराटी गटाकडून सभासदांमध्ये जागृती निर्माण करून सभासद मतदारांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या सर्व घडामोडी सुरू असताना स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवसेना ( शिंदे गट), भारतीय जनता पार्टी यांना प्रतिनिधित्व देताना सत्ताधाऱ्यांसमोर चांगल्याच अडचणी निर्माण होणार आहेत. शिंपी-चराटी गटाचा पाच जागांचा प्रस्ताव असला तरीही स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह इतर घटक पक्षांना संचालक मंडळात स्थान देणे प्रमुख आव्हान आहे. एकीकडे सर्वांचा समावेश करून घेणे तर दुसरीकडे इच्छुक कार्यकर्त्यांची नाराजी रहाणार नाही याचीही काळजी घेणे अशी कसरत सत्ताधाऱ्यांना करावी लागणार आहे. शिंपीी – चराटी गटाकडून आलेल्या पाच जागांच्या प्रस्तावाऐवजी चार जागांवर सत्ताधारी तडजोड करण्यासाठी तयार असल्याचेही समजते. तालुका खरेदी विक्री संघावर निवडणूक खर्चाचा बोजा पडू नये अशी सर्वसामान्य सभासदांची इच्छा असली तरी तडजोडी करण्यात कितपत यश येणार यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. मुळातच गेल्या दहा-बारा दिवसांमध्ये अशी तडजोडीचे कोणतेही प्रयत्न झालेले दिसत नाहीत. आजरा साखर कारखान्याची रंगीत तालीम
तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीतील अनेक घडामोडींवर आजरा साखर कारखान्याच्या निवडणुकीची समीकरणे अवलंबून राहणार आहेत त्यामुळे तालुका खरेदी विक्री संघाची निवडणूक ही आजरा साखर कारखान्याच्या निवडणुकीची रंगीत तालीम समजली जाते.



आजरा अर्बन सेवक पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध

आजरा अर्बन को ऑप बँक ली, सेवकांची सह.पत संस्था मर्यादित आजरा.ता. आजरा जि. कोल्हापूर. ची सन २०२३ ते २०२८ ची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली.
पतसंस्थेच्या चेअरमन पदी श्री.संजय शंकर सावंत यांची व व्हा. चेअरमनपदी श्री अभिजीत अरविंद केसरकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
सन २०२३ ते २०२८ करीता संचालक मंडळ…
संजय शंकर सावंत. (चेअरमन)
अभिजित अरविंद केसरकर.
(व्हा चेअरमन)
संचालक मंडळ :-
प्रकाश तुकाराम परळकर,
रविराज पांडुरंग जोशिलकर,
संजय शिवाजी रेडेकर,
रामचंद्र शंकर डोंगरे,
प्रमोद सुरेश कुरूणकर, रेश्मा रमेश देशपांडे, हर्षल अनंत गवळी, तुषार रवींद्र कांबळे





