mrityunjaymahanews
कोल्हापूरठळक बातम्या

तीन लाखांच्या ऐवजासह बॅग परत… ‘मृत्युंजय महान्यूज’ इफेक्ट

तीन लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने प्रामाणिकपणे परत… ‘मृत्युंजय महान्यूज‘ बातमीचा परिणाम…

भादवण फाट्यावरून सराफी व्यवसायिकाची सोन्या-चांदीचे दागिने असणारी बॅग अज्ञाताने चोरून नेल्याबाबतची बातमी ‘मृत्युंजय महान्युज’ मध्ये शुक्रवारी दुपारी प्रसिद्ध करण्यात आली. सदरचे वृत्त वाचल्यानंतर केवळ अर्ध्या तासात येथील जनता बँकेतील सेवानिवृत्त व्यवस्थापक उदयराज राजाभाऊ पाटील ( रा. शिवाजी नगर,आजरा) यांनी सदर बॅग आपणाला सापडल्याचे ‘मृत्युंजय महान्यूज’चे मुख्य संपादक ज्योतिप्रसाद सावंत यांना संपर्क साधून सांगितले. यानंतर तातडीने संपर्क साधून सदर बॅग आज-याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील हारुगडे व युवराज जाधव यांच्याकडे सुपूर्त केली. सुमारे तीन लाखांचा ऐवज असणारे सदर बॅग पुन्हा मिळाल्याने आजरा पोलीसांचा जीव भांड्यात पडला.

कुर (ता. भुदरगड) येथील सराफी व्यावसायिक मोहन गणपती शिरोडकर हे सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा अंदाजे तीन लाख रुपयांचा ऐवज असणारी बॅग घेऊन दुचाकीवरून गारगोटी च्या दिशेने चालले होते. उत्तुर फाट्यावर उसाचा रस पिण्याकरता ते थांबले असता दुचाकीवर बॅग नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. गोंधळून गेलेल्या शिरोडकर यांना सदर बॅग चोरीस गेली असावी असे वाटले तशी फिर्यादही त्यांनी आजरा पोलिसात दिली. प्रत्यक्षात मात्र शिरोडकर हे दुचाकीवरून प्रवास करत असताना हाजगोळी ते खेडे दरम्यान व सदर बॅग दुचाकी वरून पडली होती. गडहिंग्लजवरून आज-याच्या दिशेने येणाऱ्या उदयराज पाटील यांना ती दिसली. बॅग ताब्यात घेऊन त्यांनी मडिलगे गावापर्यंत त्यांचा पाठलाग करून बॅग देण्याचा प्रयत्न केला. वेगवान स्थितीत दुचाकी हाकणाऱ्या शिरोडकर यांच्याशी त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. सदर बॅग घरी आणून त्यांनी ती तशीच ठेवली. दरम्यान सकाळी त्यांच्या जवळच्या नातेवाईकांचे निधन झाल्याने ते मुरगुड येथे निघून गेले. दुपारी पुन्हा आजरा येथे परतल्या नंतर ‘मृत्युंजय महान्युज’ मधून प्रसिद्ध झालेले वृत्त त्यांनी पाहिले. तशीच ठेवलेली बॅग उघडून पाहताच बातमीमध्ये असणाऱ्या वर्णनाप्रमाणे त्यांना जिन्नस आढळल्यानंतर त्यांनी तातडीने मुख्य संपादक ज्योतिप्रसाद सावंत यांच्याशी संपर्क साधून याबाबतची माहिती दिली.

सुमारे तीन लाख रुपयांचा ऐवज असणारी सदर बॅग अखेर सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील हारुगडे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली. पाटील यांच्या प्रामाणिकपणाबद्दल आजरा पोलिसांसह शहरवासीयांतून कौतुक केले जात आहे.

वाहन चालकाची दागिन्यांची बॅग हातोहात लंपास…भादवण फाट्यावरील प्रकार

दुचाकीवरुन प्रवासाने थकवा आल्याने दुचाकी थांबवून उसाचा रस पीत असताना अज्ञात चोरट्याने दुचाकीवर ठेवलेली बॅग हातोहात लंपास केली. यामध्ये सुमारे ४५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने होते. याबाबतची फिर्याद मोहन गणपती शिरोडकर रा. कुर ता. भुदरगड यांनी आजरा पोलिसात दिली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शिरोडकर हे कानुर येथून आजरा मार्गे गारगोटी च्या दिशेने जात होते. दरम्यान ते भादवण/उत्तूर फाट्यावरील श्रीकृष्ण रसवंतीगृहाजवळ आपली दुचाकी थांबवून ते रस पीत होते. याचवेळी त्यांच्या दुचाकीवर ठेवलेली पिशवी अज्ञाताने लंपास केली. शिरोडकर यांच्यासमोरच काही सेकंदात सदर प्रकार घडला. परंतु नेमकी कोणी पिशवी नेली? हे त्यांना समजू शकले नाही. पिशवीमध्ये लक्ष्मीहारासह दागिने व इतर साहित्य होते. आजरा पोलीस पुढील तपास करीत आहेत.

वीज मागणीच्या पार्श्‍वभूमीवर आजऱ्यात चक्काजाम…

शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आजरा येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले. भाई भाई चित्रमंदिर आजरापासून संघटनेचे कार्यकर्ते मोर्चाने येथील संभाजी चौकात आले संभाजी चौकात आल्यानंतर सुमारे अर्धा तास चक्का जाम आंदोलन करण्यात आले.यावेळी माजी सभापती निवृत्ती कांबळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष तानाजी देसाई,बी.के.कांबळे, कॉ. शिवाजी गुरव, अमानुल्ला आगलावे, कृष्णा पाटील यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली. राज्यकर्ते भ्रष्टाचार, बलात्कार, इडी या प्रकरणावरून गोंधळ घालुन वीजेच्या प्रमुख मागणीकडे लक्ष हटवण्याचा प्रयत्न करीत आहेत ही बाब चुकीची आहे. डोंगरकपारीत राहणाऱ्या शेतकऱ्याला शेती पिकांना रात्री पाणी देताना अडचणी येत असून दिवसाची वीज मिळावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.                   आंदोलनामध्ये आजरा कारखान्याचे संचालक दशरथ अमृते, गंगाराम डेळेकर कॉ. शांताराम पाटील, काशिनाथ मोरे, आजरा कारखान्याचे उपाध्यक्ष आनंदराव कुलकर्णी सहभागी झाले होते.

जिल्हा बँक संचालक सुधीर देसाई यांच्यासह मान्यवरांचा हुडे येथे सत्कार…

हुडे (ता आजरा) येथे जिल्हा बँकेचे नूतन संचालक सुधिर देसाई, यशवंत सरपंच पुरस्कार प्राप्त शृंगारवाडीच्या अंबूताई सुतार, ग्रामसेवक मुरलीधर कुंभार ,शिरसंगीचे सरपंच संदीप चौगले यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई यांनी बँकेतून मिळणाऱ्या सर्व योजना सामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपला प्रयत्न राहील असे सांगितले.यावेळी ग्रामसेवक कुंभार यांनी ग्रामपंचायतीने पारदर्शी कारभार ठेवला तरच गावाचा विकास साधता येत असल्याचे स्पष्ट केले.

कार्यक्रमास राजू होलम, यशवंत चौगुले, सुशिल देसाई, तुकाराम घडाम, युवराज देसाई, अरविंद देसाई, राहूल धडाम, सागर देसाई, ग्रामसेवक मुरलीधर कुंभार, सिरसंगीचे सरपंच आनंदा देसाई व ग्रामस्थ उपस्थित होते.

खेडगे गावला स्वतंत्र महसूल गाव म्हणून दर्जा देण्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांचे निर्देश…

श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर आणि कार्याध्यक्ष कॉ. संपत देसाई यांच्या उपस्थितीत काल कोल्हापूर येथे सर्फनाला प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबत बैठक झाली या बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार, प्रांताधिकारी वसुंधरा बारवे, कार्यकारी अभियंता एस.आर. पाटील, तहसीलदार विकास अहिर यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
सर्फनाला प्रकल्पामुळे पारपोली, गावठाण ही गावे विस्थापित होत असून पारपोली पैकी खेडगे हे गाव आहे तिथेच राहत असल्याने खेडगे या गावाला स्वतंत्र महसूल गावं म्हणून घोषित करण्यात येईल. तसा प्रस्ताव तातडीने करावा असे निर्देश आजच्या बैठकीत जिल्हाधिकारी यांनी महसूल यंत्रणेला दिले.

लाभक्षेत्रात ज्या जमिनी वाटप केल्या आहेत त्यांचे नकाशे घेऊन शेतकऱ्यांना त्याचे फाळणी नकाशे बनवून मोजणी करून देण्याचाही सूचना यावेळी देण्यात आल्या. ज्या जमिनी खडकाळ किंवा नापीक असतील त्यांचे सपाटीकरण व माती टाकून देण्याची प्रक्रिया एप्रिलमध्ये करण्यात याव्यात अशा सूचना देऊन प्रकल्पग्रस्तना जमीन ही कसण्यालायकचं दिली जाईल यासाठी पाटबंधारे खात्याने सर्व ती जबाबदारी उचलावी असेही त्यांनी सांगितले. जमीन कमी पडत असल्यास देवर्डे येथील संपादन प्रक्रिया राबविण्याच्या सूचनाही दिल्या. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादन न करता वापरल्या गेल्या त्यांना भूभाडे देण्याचे निर्देश दिले गेले. धरणासाठी घातलेल्या सुरुंगामुळे खेडगे येथील कांही घरांना तडे जात असल्याने सुरुंगाची क्षमता कमी करावी आणि ज्या घरांना तडे गेले आहेत किंवा भिंत खचली आहे त्यांना नुकसान भरपाई देण्याची सूचना त्यांनी दिली.
यावेळी गंगाराम ढोकरे, हरी सावंत, गोविंद पाटील, धोंडिबा सावंत, अनिल अमूनेकर, एकनाथ गुंजाळ, राजाराम अमूनेकर, लक्ष्मण शेटगे नवनाथ अमूनेकर यांच्यासह प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

प्रभाग आठ मधून माझा विजय निश्चित…सुहेल काकतीकर

mrityunjay mahanews

पोलीस असल्याचे भासवून वृद्धा कडून 35 हजार रुपयांचे दागिने लंपास …पावसाचा पत्ता नाही… रामतीर्थ धबधबा मात्र सुरू…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

आज-यात बैलगाडी शर्यती वेळी राडा.. बैलांसह तिघे झाले जखमी… पाच जणांविरोधात गुन्हा नोंद

mrityunjay mahanews

सुलगाव येथील बेपत्ता व्यक्तीचा मृतदेह रामतीर्थ परिसरात सापडला

mrityunjay mahanews
error: Content is protected !!